आली दिवाळी भाग १
भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते.
वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीचे असतात .
घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भयनिवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे.
महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस !!
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
भारत हा कृषिप्रधान देश आहे.
येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे.
तिच्या प्रती कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे.
तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
वसुबारस दिवशी गायीची पाडसासह सायंकाळी पूजा करतात. सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.
या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.
व सकाळी आणि संध्याकाळी पणत्या लावणे सुरु केले जाते .
ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात.
घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.
व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात –
तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते
मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि
अर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.
गोमातेला नैवेद्य दिल्याने पुण्य प्राप्त होते
आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभते म्हणून ही पूजा करतात.
वसुबारस साजरा करण्यामागे असा एक समज आहे की,
दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि तापमान वाढ होते. हे टाळण्यासाठी म्हणून १०० कोटी देव जिच्यात सामावले आहेत अशा आपल्या गोमातेचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवाच्या दैवी किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे
. गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभु प्रतिनिधित्व करते आणि म्हणून या दिवशीची उपासना आहे.
समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे. त्यांतील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.
याची कहाणी अशी सांगितली जाते ..
एका छोट्या गावात एक म्हातारी तिच्या सुने सोबत रहात होती.
तिच्याकडे गाईगुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळीं मुगाळीं वांसरं होतीं.
एके दिवशीं काय झालं..
आश्विन मास आला.
पहिल्या द्वादशीच्या दिवशीं म्हतारी सकाळीं उठली. शेतावर जाऊ लागली.
सुनेला हाक मारली, ‘मुली, इकडे ये” सून आली. ‘काय’ म्हणून विचारले तशी म्हातारी म्हणाली. “मी शेतावर जातें. दुपारी येईन. तूं माडीवर जा, गव्हाचे मुगांचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव.”
सुनेने नीट ऐकुन न घेता फक्त हो हो केले व त्याचा भलताच अर्थ घेतला
म्हातारी शेतावर गेली.
सून माडीवर गेली. गहूं मूग काढून ठेवले. खालीं आली. गोठ्यांत गेली. गव्हाळीं मुगाळीं वासरं उड्या मारीत होती, त्यांना ठार मारलं, चिरलं व शिजवून ठेवून सासूची वाट पहात बसली.
दुपार झाली. तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं.
सासूनं पाहिले तर तांबडं मांस दृष्टिस पडलं.
तिनं हे कायं’ म्हणून सूनेला विचारले. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. ‘तुम्ही सांगितलं तसं केलं’ म्हणाली.
सासूने ओळखले न समजता सूनेकडून चुकी घडलीआहे
ती तशीच उठली.
देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनवू लागली. ‘देवा देवा! कोपू नको. सून अजाण आहे. तिचा अपराध पोटात घाल. माझी वासरे जिवंत कर.’ असं न होईल तर संध्याकाळीं मी आपला प्राण देईन.”
या दृढ निश्चयाने ती देवापाशीं बसून राहिली.
देवानं तिचा एकनिश्चय पाहिला.
निष्कपट अंतःकरण पण पाहिले . ..
पुढं संध्याकाळीं गाई घरी आल्या.
हंबरडे फोडूं लागल्या,आपल्या वासरांना हाक देऊ लागल्या ,तशी देवाला चिंता पडली.
हीचा निश्चय ढळणार नाही’ असं देवाला वाटले.
मग देवानं गाईंची वासरं जिवंत केली.
तीं उड्या मारीत मारीत आईकडे दुध प्यायला गेलीं.
गाईचे हंबरडे बंद झाले.
म्हातारीला आनंद झाला.
सुनेला खुप नवल वाटलं.
तिची चुक तिला उमगली
नंतर म्हातारीनं गाईगोर्ह्यांची पूजा केली.
गोडघोड स्वयंपाक केला त्यांना जेवायला घातले घरातली सगळी आनंदाने जेवली, आनंदी झाली.
ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारीं, पिंपळाच्या पारीं, गाईंच्या गोठी सुफळ संपूर्ण.
उत्तरप्रदेशात त्या व्रताला बछवाँछ असे म्हणतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे.
गुजरातमध्ये आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळी सुरू होते त्या दिवसाला ‘वाधवारान’ असे म्हणतात. त्या दिवशी स्त्रिया सकाळी उठून सडासंमार्जन करून रांगोळ्या काढतात. त्यात वाघाचे चित्र हमखास असते. ते चित्र भाऊबीजेपर्यंत ठेवतात.
धेनूची प्रजनन क्षमता आणि इच्छापूर्ती करण्याची क्षमता सर्वाधिक असते. सवत्स गायीमध्ये सृजनशीलता आणि उत्पत्तीची शक्ती कार्यान्वित झालेली असते.
अशा गायीमध्ये कामधेनूचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाल्यामुळे सवत्स गायीचे पूजन केले जाते. सवाष्ण स्त्रियांमध्ये सृजनशीलता, सौभाग्य लक्ष्मीचे तत्त्व आणि उत्पत्तीची शक्ती कार्यान्वित झालेले असतात.
एकभुक्त राहून, म्हणजे केवळ एक वेळचे अन्न ग्रहण केल्याने शरिरामध्ये अन्नरस पूर्णपणे पचतो आणि उदरात पोकळी निर्माण झाल्याने देहामध्ये निर्गुण चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता जागृत होते. अशा प्रकारे लक्ष्मीतत्त्व प्रबळ असणार्या सौभाग्यवती स्त्रीने सवत्स गायीचे पूजन केल्यास तिला गायीकडून प्रक्षेपित होणारे दैवी तेज आणि चैतन्य अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करता येते.
त्यामुळे या दिवशी सवाष्ण स्त्रिया गायीच्या पावलांवर हळदी-कुंकू वाहतात आणि फुले अर्पण करतात अन् निरांजनाने गायीला ओवाळतात. त्यामुळे गायीमध्ये सुप्तावस्थेत असणारे देवत्व प्रगट होते. गायीला केळीच्या पानावर पुरणपोळीचा नैवेद्य देतात..
हा दिवाळी पूर्व सुरवातीचा दिवस
क्रमशः