Aali diwali - 2 books and stories free download online pdf in Marathi

आली दिवाळी - २

आली दिवाळी भाग २

दिवाळीचा पहीला दिवस ,आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी .
पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळी हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस दीपोत्सवाचे असतात.

या दिवशी वस्त्र आणि अलंकाराची खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी उपवासही केला जातो. घरातले अलंकार तिजोरीतून काढून स्वच्छ करून ते पुन्हा जागेवर ठेवले जातात.

कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग यांची विधिवत पूजा केली जाते. त्यांना नैवेद्य दाखवला जातो.
या दिवशी शक्य असले तितकं दान करण्यात येतं. सायंकाळी तेलाने भरलेला एक दिवा प्रज्वलित करून त्याचं पूजन करून तो दिवा घराच्या दाराजवळ आणि धान्याच्या राशीजवळ ठेवला जातो. हा दिवा रात्रभर जळत राहू दिला जातो. त्यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होऊन ती स्थिर होते, असा समज आहे.

याच दिवशी धन्वंतरी जन्मोत्सव हे आणखी एक व्रत करण्यात येतं. आयुर्वेदाचे प्रवर्तक असलेले धन्वंतरी विष्णूचा अवतार होते .
धन्वंतरी सर्व वेदात निष्णात होते. मंत्र-तंत्रातही विशारद होते. त्यांच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झालं.
त्यामुळे त्यांना ‘देवांचे वैद्यराज’ हे पद मिळालं.
संध्याकाळी ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतराची प्रार्थना केल्यामुळे दीर्घायुष्य मिळतं, असं मानलं जातं.
धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरी एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्‍या हातात ‘जळू’, तिसर्‍या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आले . (समुद्रमंथनातून बाहेर आले असे म्हणतात )
या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतात .
कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून या दिवशी लोकांना देतात.
याचा अर्थ असा की.
कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते.
कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
या दिवशी यमदीपदान हे व्रतही केलं जाते.
यामध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने दीपदान करण्यात येतं. या दिवशी संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर एका पात्रात अन्न ठेवलं जाते.
राईच्या तेलाने भरलेला मातीचा दिवा त्यावर ठेऊन दक्षिण दिशेकडे वात करून तो लावला जातो. त्या दिव्याचे विधीवत पूजन करून यमराजांची प्रार्थना केली जाते.

दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन करतात.
‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी.
श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी !
हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते
व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.
या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे.
या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जात.
धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते.
लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा जमाखर्च द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते असा समज आहे .
धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम १/६ भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.’ असे वर्तन करणार्‍या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला जातो.

पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता आणि राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते.
राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न करता देत असे. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. ‘सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबलही वाढत असे.

धनत्रयोदशी ची पौराणिक कथा अशी आहे ..
एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, "तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी तुम्हांला त्यांची दया येत नाही का?"
त्यावर यमदूत म्हणाले, "एकदाच असं झालं होतं. हेमराज नावाच्या राजाला एक पुत्र झाला. षष्ठीपूजनाच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचं भविष्य सांगितलं की, 'हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल.' ते ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपवून ठेवलं. पण सोळाव्या वर्षी त्या मुलाचं लग्न होताच त्याचे प्राण घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो. त्या वेळी तिथे झालेला विलाप ऐकून आम्ही व्यथित झालो.
लग्नाच्या चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्या मुलाचा मृत्यू झाला होता. लग्नासारख्या अतिशय आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हांला खूप वाईट वाटलं. असा प्रसंग कोणावरही येऊ नये असं आपण काहीतरी कराल, तर फार बरं होईल."
यावर यमदेव म्हणाले, "धनत्रयोदशीपासून पाच दिवस जो दीपदान करील, त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यू येणार नाही."

गोत्रिरात्र नावाचे व्रतही याच आश्विन वद्य त्रयोदशीपासून अमावस्येपर्यंत केलं जातं.
गाईचा गोठा किंवा सोयीस्कर ठिकाणी ८ फूट लांब व ४ फूट रूंद यज्ञवेदी तयार करून त्यावर सवोर्तोभद मंडल स्थापन केलं जातं. त्यावर छत्राकार वृक्ष काढून त्याला फळं, फुलं, पक्षी काढले जातात. झाडाच्या बुंध्याशी मंडलाच्या मध्यभागी गोवर्धनधारी श्रीकृष्ण, डाव्या बाजूला रुक्मिणी, मित्रविंदा, शैब्या, जांबवंती व उजव्या बाजूला सत्यभामा, लक्ष्मणा, सुदेष्णा, नागनजिती, पुढील भागात नंदबाबा मागील भागात बलराम तसंच कृष्णासमोरच्या भागात सुरभी, सुनंदा, सुभदा, कामधेनू यांच्या सुवर्णप्रतिमा स्थापित केल्या जातात.

‘गोर्वधनाय नमः’ म्हणत प्रत्येकाची पूजा केली जाते. त्यानंतर गाईंना नैवेद्य दाखवला जातो. पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवून टोपल्यातून सात धान्यं, सात पक्वान्नं सुवासिनींना दिली जातात. अशा प्रकारे व्रत करून चौथ्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर १०८ तिळांची आहूती दिली जाऊन व्रताचे उद्यापन केले जाते. यामुळे सुखप्राप्ती होते, असे मानले जाते.
हा झाला दिवाळीचा पहीला दिवस

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED