Nava Prayog - 4 books and stories free download online pdf in Marathi

नवा प्रयोग... - 4

नवा प्रयोग...

पांडुरंग सदाशिव साने

४. अपेक्षा

दिवाणखाना भव्य होता. ठायी ठायी कोचे होती. मध्ये बैठक होती. तेथे होड होते. महात्माजींची तसबीर तेथे होती. घना तेथे बसला होता. तो व्यवस्थापक व मालक यांची वाट पाहात होता. खिशातून टकली काढून तो तेथे कातीत बसला आणि रामनाम म्हणत होता. त्याची क्षणात तन्मयता झाली.

“पुरे सारे ढोंग.” व्यवस्थापक येऊन म्हणाले.

“ढोंग आहे की मनापासून कर्म होत आहे, प्रभूला माहीत. तुम्ही तरी ढोंग करू नका म्हणजे झाले. येथे महात्माजींची तसबीर तुम्ही लावली आहे, तिला साक्ष ठेवून वागता ना?” घनाने विचारले.

“महात्माजी तर मालक म्हणजे ट्रस्टी म्हणतात. तुमचा निराळा प्रचार.”

“परंतु ट्रस्टी म्हणजे आपण काय समजता?”

“अज्ञानाचे पालक म्हणजे ट्रस्टी होणे. कामगारांना त्यांचे कल्याण कळत नाही. आम्ही त्यांचे हित पाहिले पाहिजे. आम्ही रोज कोर्टकचे-या करतो. ट्रस्टी म्हणजे काय ते का आम्हांला माहीत नाही?”

तुम्हांला खरेच माहीत नाही. महात्माजींच्या ट्रस्टीशिपचा हा अर्थ नव्हे. कामगारांनी मालकाला म्हणायचे, ‘आम्ही श्रमून संपत्ती निर्माण करून तुमच्या हवाली ठेवतो. ती सांभाळा, नीट व्याजी लावा, किंवा आणखी उत्पादनात घाला. आम्हांला गरज भासेल तेव्हा तुमच्याजवळ मागू. चाळी नसतील तर सांगू चाळी बांधा. पगार महागाईमुळे पुरत नसेल तर म्हणू पगार वाढवा; आणि हे सारे करण्याबाबत – आमच्या कष्टर्जित संपत्तीची व्यवस्था लावण्याबद्दल तुम्हांला महिना शे-दोनशे रुपये घ्या.’ महात्माजी तर एकदा म्हणाले, कामगार जर महिना पाचच रुपये ध्या म्हणतील तर मालकाने पाचच घ्यावेत. महात्माजींच्या ट्रस्टीशिपमध्ये असा हा क्रांतिकारक अर्थ आहे. आणि मालक आयत्या बिळावर नागोबा बनला तर कामगारांनी शांतपणे सत्याग्रह करावा असेही गांधीजींनी सांगितले आहो. आहे हा अर्थ पसंत? त्या महापुरुषाच्या लिहिण्यातला हा अर्थ आहे. आहे का पसंत? बोला. या अर्थाने ट्रस्टी व्हायला आहात का तयार? नसाल तर तुम्ही दांभिक ठराल. मग कशाला या तसबिरी? कशाला ही सोंगे?”

“आम्ही गांधीजींच्या ट्रस्टीशिपचा अर्थ वकिलाला विचारू. मुनशींना विचारू.”

“विनोबाजींना विचारा. मश्रूवालांना विचारा.”

“त्यांना काय कायद्याची भाषा कळते?”

“परंतु सत्याची तर कळते ना?”

“सत्यावर दुनिया नाही जालत. चांदीचा रुपया बाजारात चालणार नाही. त्यात दुसरी धातू मिसळाल तेव्हाच तो खणकन वाजेल व बाजारात चालेल.”

“महात्माजींचे सत्य असे बाजारी नव्हते. ते शंभर नंबरी सोने होते.”

“जाऊ द्या त्या गोष्टी. आपण मुद्यावर येऊ. तुमचे म्हणणे काय? हल्ली सभा, मिरवणुका सारे चालले आहेत ते कशासाठी? ती मशालींची मिरवणूक कशासाठी? गावाला का आग लावायची आहे? तुम्ही जहाल बोलता, शिव्या देता. तुम्ही कृतघ्न आहात. ज्या मालकाने एवढ्या कामगारांना उद्योगाला लावले त्याला तुम्ही चोर म्हणता?”

“तुमची गीता त्याला जोर म्हणते; वेदातील ऋषी त्याला चोर म्हणतात. गीता सांगते, दुस-यांची झीज भरून न काढता चंगळ करीत बसणे म्हणजे चोर होणे. तुम्ही मोटारीसाठी तबेला सुंदर बांधता, परंतु कामगारांसाठी चाळी नाही बांधणार. इंजिन चालावे, यंत्र चालावे म्हणून तेल घालाल; परंतु हे जिवंत जीव जगावेत, त्यांच्या सांध्यांना तेल-तूप मिळावे म्हणून थोडी पगारवाढ करणार नाही. केवळ अधर्ममय आहात तुम्ही.”

“सुंदरदास आधार्मक? त्यांनी रामाचे मंदिर बांधले. लाखो रुपये देणग्या दिल्या ते अधार्मक?”
“जो पैसा निर्माण करून सुंदरदासांच्या हवाली करतो, त्याच्यासाठी काय केले, सांगा? इतर दानधर्माची यादी नका वाचू. कामगारांची पगारवाढ करणार आहात?”

“हल्लीचा पगार पुरेसा आहे. पगार अधिक केला तरी का पुरणार आहे? तो दारूत, सिनेमात, जुगारात जायचा.”

“दिवसभर श्रमणारा कामगार महिन्यातून दोनचारदा सिनेमा पाहायला गेला तर ती का चैन? आणि सारेच कामगार काही दारू नाही पीत. सारेच जुगार नाही खेळत. गरिबांच्या दु:खावर डाग नका देऊ. तुम्हांला त्यांच्याविषयी किती आपलेपणा वाटतो ते माहीत आहे. त्या पार्वतीचा नवरा क्षयाने मेला. काही दिलेत का तिला? तुमच्या कारखान्यात झिजून तो मेला.”

“तसा का करार आहे?”

“हृदयाचा धर्म म्हणून काही आहे की नाही? म्हणे त्यांना काम देऊन आम्ही उपकार करतो! पन्नास-साठ पैसे देता आणि वीस-तीस रुपयांचा माल त्यांच्याकडून निर्माण करून घेता. पन्नास पैसे देता तर काम रुपयाचे घ्या. परंतु काम घेता वीस रुपयांचे — हातावर ठेवता पन्नास पैसे! सारा चोरांचा बाजार!”

इतक्यात सुंदरदास तेथे आले. व्यवस्थापक उभे राहिले. घनाही उभा राहिला. त्याने नमस्कार केला.

“कशाला चोराला नमस्कार?” सुंदरदास हसून म्हणाले.

“इतर चोरांपेक्षा तुम्ही बरे. कसले व्यसन तरी तुम्हाला नाही. संस्कृतीची, ज्ञानाची तुम्हांला आवड आहे. दानधर्मही करता. तुमचे मुख्य पाप एकच की, जो तुमच्या हातात ही संपत्ती देतो त्याच्याशी तुम्ही कृतघ्नपणे वागता.”

“त्यांना पगार देतो.”

“तो त्यांना पुरत नाही.”

“त्यांनी सोडून जावे. दुसरे कामगार यायला तयार आहेत.”

“हे बोलणे विसरा. असे बोलण्याचे दिवस गेले. कामगारांचे युग येत आहे. जगात क्रांती होत आहे. या देशात रक्तपात व्हायला नको असतील तर जरा विवेकाने बोला. मी तुमच्याजवळ मुख्यत: दोन मागण्या करायला आलो आहे. (१) पगारवाढ; (२) तुम्ही संस्कृतीमंदिरासाठी कामगारांच्या पगारातून मागे कित्येक वर्षे घेतलेला आहे—तो सारा पैसा सव्याज परत करा. त्यातून कामगारांसाठी चाळी बांधू. सहकारी संस्था चालवू. दरसाल तुम्ही पैसे घेतलेत. जवळजवळ लाखभर घेतलेत. पुढे तुम्ही ती प्रथा बंद केलीत. या लाखाचे गेल्या १५ वर्षांतील व्याज काय होईल?

तीन टक्के धरले तरी व्याजाचे २२।। हजार रुपये होतील. हे पाव लाख तुम्ही दिले पाहिजेत. संस्थेत संस्थापक म्हणून तुमचे नाव, आणि पैसे गरिबांजवळून घेता? सारीच संपत्ती गरीब तुम्हाला देतात. परंतु तेवढ्यानेही समाधान न होता त्यांच्या तोंडचा घास काढलात! कोठे हे पाप फेडाल? तुम्हांला जर धर्माची चाड असेल, न्यायाची चाड असेल, संस्कृती म्हणजे मानवता, उदारता, सहानुभूती हा अर्थ पटत असेल तर तुम्ही या दोन्ही मागण्या मंजूर करायला हव्यात.”

“एकही मागणी मंजूर होणार नाही. माझ्याच संस्कृतीमंदिरात तुम्हीही होता.”

“परंतु तेथील हकीगती कळल्यावर राजीनामा देऊन बाहेर पडलो.”

“आणि येथे आगलावेपणा करीत बसलात! या शान्त गावात अशान्ती आणणे हा वाटते तुमचा धर्म?”

“लोकमान्य टिळकांना इंग्रज असेच म्हणत. महात्माजी एकदा म्हणाले, ‘इंग्रजी राज्याविरुद्ध अप्रीती उत्पन्न करणे माझा धर्म आहे’. न्यायाचा उपासक अशांतीला भीत नसतो. मेलेल्यांना जिवंत करणे म्हणजे का अशांती? स्वाभिमानी व न्याय्य जिण्याची कल्पना आणून देणे म्हणजे का अशांती? शांती म्हणजे का काहींना संपत्तीत लोळणे नि काहींनी फूटपाथवर उपाशी पडणे?”

“गांधीजी परकी सत्तेविरुद्ध अशांती उत्पन्न करीत होते; स्वजनांविरुद्ध नाही.”

“स्वजनही जुलूम करतील तर? महात्माजी एकदा म्हणाले, ‘या वरिष्ठ वर्गाविषयी मी आता निराश झालो आहे. मी खालची जनता उठवतो म्हणजे हे सारे लब्धप्रतिष्ठित गडगडून पडतील!”

“हे महात्माजींचे शब्द?”

“हो. त्यांचे; त्यांचेच बर का. उद्या स्वतंत्र हिंदुस्थान एक दिवसही आर्थिक विषमता सहन करणार नाही, असेही ते म्हणाले. तुम्ही कान असून बहिरे आहात. सोयीची वाक्ये तेवढी तुम्ही घेता!”

“तुम्ही तरी दुसरे काय करता?”

“आम्ही सामग्य्राने बघतो. ते असो; तुम्ही काय करणार ते बोला.”

“घनश्याम, तुम्ही माझे प्रायव्हेट सेक्रेटरी व्हा. या नसत्या फंदात कशाला पडलात? मला सुंदर सुंदर वाचून दाखवा.”

“भूल कोणाला पाडू बघता! पैशाची, सुखाची मला लालसा नाही. श्रमणा-यांची मान उंच करणे हा माझा धर्म आहे. सांगा, काय करणार, बोला.”

“काही न केले तर तुम्ही संप करणार?”

“उपायच हरल्यावर संपाचाच रामबाण.”

“अहमदाबादला मागे गांधीजींच्या नेतृत्वाखालीही संप टिकू शकला नाही. तिस-या दिवशी कामगार कामावर जाऊ लागले. गांधीजींनीही उपवास सुरू केला. घनश्याम, संप सोपी वस्तू नाही. पोराबाळांची उपासमार होते. दुकानदार उधार देत नाही. या आगीत कामगारांना लोटू नका.”

“राजकीय स्वातंत्र्यासाठी देश आगीतून गेला. लोकमान्य, गांधीजी, यांनी लोकांना अग्निदिव्य करायला सांगितले. ते का वेडे?”

“परंतु तुम्ही कशासाठी हे करणार?”

“आर्थिक स्वातंत्र्यासाठी. नुसते राजकीय स्वातंत्र्य काय चाटायचे आहे? विजयाकडे त्यागाच्या पाय-या करूनच जावे लागते. कामगार आज त्याग करतील. पुढची पिढी सुखी होईल. अमेरिकेतील कामगार ५० वर्षांपूर्वी गोळीबारात मेले, फाशी गेले. परंतु कामाचे ८ तास झाले. सुखासुखी, फुकाफुकी कोणी काही देत नाही.”

“तुम्हांला सरकारने पकडले तर? अशांती निर्माण करण्याचा, धर्मावर टीका करण्याची आरोप करतील. लोकांच्या धार्मिक भावना दुखवाल तर समाजात प्रक्षोभ माजेल. धर्म म्हणजे का अफू?”

“होय; तुझ्या प्राक्तनामुळे तू गरीब आहेस, शनि-मंगळ तुला छळत आहेत, असे सांगणारा धर्म म्हणजे अफू. परंतु जो धर्म सर्वांना आत्मवत मानायला सांगतो तो अफू नव्हे. भगवान बुद्धांसारखा पुरुष उभा राहतो आणि चराचराविषयी आपलेपणा वाटतो. ती भावना अफू नव्हे. तो धर्म आहे का आपणाजवळ? कामगारांच्या दु:खाशी होता का कधी एकरूप? तुमचे बिर्लाशेठ म्हणाले, मंदिरावर आमचा विश्वास नाही, परंतु मंदिरे बांधून धार्मिक म्हणून आम्हांला मिरवता येते. संस्कृतीचे रक्षक म्हणून मिरवता येते. हे संस्कृतीचे रक्षक की भक्षक? ते दालमियाशेठ कामगारांना म्हणाले, पैसै म्हणजे काय माया आहे. परंतु स्वत: बेटा चैनीत लोळत असतो. मी कोणते पाप करायचे ठेवले आहे! – असे तो म्हणतो. एक लग्न, दुसरे लग्न, तिसरे लग्न;-- बायका म्हणजे जणू भाजीपाला. सुंदरदास, असे लोक धर्माचे नि संस्कृतीचे उद्धरकर्ते मानले जातात हा केवढा विनोद!”

“तुम्ही फार छान बोलता.”

“तुमचे सर्टिफिकेट नको आहे.”

“घनश्याम, संप पुकारलात तर पकडले जाल. याद राखा.”

“सरकार का केवळ तुमचे आहे?”

“मग कोणाचे आहे?”

“गरिबांचे नाही?”

“शब्दाला गरिबांचे परंतु सूत्रधार आम्ही आहोत. आणि पैशाने कोणाला विकत घेता येत नाही? सारे अधिकारी आमच्या हातातील. उद्या तुम्हांला मी येथून हद्दपार करू शकतो.”

“ठीक. हीच तुमची संस्कृती ना? तुमच्याच तोंडून तुमची लीला कळली हे बरे झाले! तुमच्याबद्दल थोडाफार आदर वाटे, तोही गेला.”

“तुमच्या आदराची आम्हांला जरुरी नाही. जोपर्यंत इंग्रजी, मराठी, गुजराती, हिंदी वृत्तपत्रे आमचे पवाडे गात आहेत, तोवर आम्हांला कशाची भिती? संपादकाचे कान ओढून आम्ही लिहायला लावतो. भरपूर पगार देतो. परंतु त्यांची स्वतंत्र बुद्धी मारतो. भीष्माचार्यांसारखे अर्थाचे दास झाले तेथे प्रचार सुरू करवतो. तुम्हांला ते माय धरणी ठाय होईल. काय समजलात तुम्ही?”

“समजलो,-- की तुम्ही एक द्रव्यान्ध मनुष्य आहात.”

“बस् करा.”

“अच्छा, नमस्ते.”

“या सुंदरपूरातून तुम्हांला घलवीन तरच नावाचा सुंदरदास!”

“ईश्वराची पृथ्वी विपुल आहे. आणि मरताना सर्वांना साडेतीन हातच पुरत असते. बरोबर अधिक नेता येत नसते.”

घना तेथून निघून गेला. आता तेथे शान्तता होती.

“पाणी आणू?” व्यवस्थापकांनी विचारले.

“द्या पेलाभर.” मालक म्हणाले.

थोडा वेळ गेल्यावर, पाणी पिऊन शांत झाल्यावर सुंदरदास व्यवस्थापकास म्हणाले : “हे पहा, फौजदार व मॅजिस्ट्रेट तुमच्या परिचयाचे आहेतच. त्यांना सारे सांगून ठेवा. पैशांकडे पाहायचे नाही. याचा काटा दूर करायचा.”

“ते माझे काम. मी त्यांच्या कानावर तसे घालून ठेवलेच आहे. ते म्हणाले, निर्धास्त असा. आपण विश्रांती घ्या. डोक्याला खूप त्रास झाला असेल.”

“मी जातो.”

सुंदरदास गेले. व्यवस्थापक नाना कारवाया करायला गेले.

घनाच्या भेटीतून काही निष्पन्न झाले नाही असे कामगारांना कळले. सर्वत्र असंतोष होता. संपाशिवाय उपाय नव्हता. एकदा ताकद अजमावून पहायला हवीच होती. परंतु घना सचिंत होता. आपल्याला अटक झाली तर? तो स्वत:ची फिकीर नव्हता करीत. संपाचे काय होईल हा प्रश्न होता. संपाचे नेतृत्व कोण करील? कोण धीर देईल? सखाराम येईल का? त्याची बहीण येईल का? उपयोग होईल. किती छान होईल दोघे आली तर!

त्याला पत्र लिहायचे त्याने ठरवले. त्या दिवशी रात्री कामगार कार्यकर्त्यांजवळ चर्चा आटोपून घरी आल्यावर तो लिहित बसला.

प्रिय सखाराम,

ब-याच दिवसांनी हे पत्र लिहित आहे.

माझ्या चळवळी वळवळी तुला माहीतच आहेत. मध्यंतरी तालुकाभर हिंडलो. परवा सुंदरदासांना भेटलो, परंतु काहीच करायला ते तयार नाहीत. संपाचाच आता उपाय.

परंतु संप पुकारताच मला अटक होईल असे वाटते. तू इकडे येशील का? निदान मला अटक होताच येशील का? आधीपासूनच आलास तर सारे तुला समजावून देईन. सर्वांशी तुझा परिचय करून देईन. मालतीबाईही आल्या तर छान होईल. त्या विचारीत की मला येईल का काम करता? खूप येईल काम करायला. त्यांच्याही जीवनात आनंद येईल. कर्महीन जीवनामुळे त्या उदास असत.

बघा विचार करून. एखादे वेळेस तुम्हालाही तुरुंगात जावे लागेल. परंतु त्यात वाईट काय आहे? थोरामोठ्यांनी केले तेच आपण करीत आहोत. विचार करून पत्र पाठव.

सर्वांस स. प्रणाम.

तुझा
घना

त्या दिवशी सखाराम कोठे तरी बाहेरगावी गेला होता. वडील भावाची पत्नी अजून माहेरीच होती. मालती एकटीच घरात होती. ती शिवणकाम करीत होती. ते पत्र टाकून पोस्टमन गेला.

तिने ते पत्र हातात घेतले. सुंदरपूरचा छाप होता. घनाचे पत्र! तिला घनाची आठवण आली. कधी कधी त्याची मूर्ती ती मनासमोर आणीत असे; परंतु पुन्हा तिच्यावर पडदा पाडी. वेड्या मनाने आशा धरू नये असे ती म्हणे. आज ते पत्र आले होते. काय बरे असेल त्य़ात? माझ्याविषयी असेल का काही त्यात? भाऊ त्याच्याजवळ काही बोलला असेल का? दादाची तर इच्छा होती. विचारून बघ तरी—म्हणून तो भाऊला म्हणाला. काय असेल या पत्रात? पुन्हा आजारी नसतील ना पडले? येथे आले तर त्यांची सेवा करीन. पुन्हा तळ्यावर भाकरीचा खेळ खेळू. तुमच्या दगडांना जणू पंख आहेत असे मागे म्हणाले. हसायचे किती गोड! डोळ्यांत करुणा, परंतु कधी कधी सात्त्विक संतापाने डोळे लाल होत. खरेच घना! नाव किती छान! मेघ कधी गर्जना करील, तर कधी कधी मुका असेल. कधी सूर्याच्या किरणांनी रंगेल. त्याला घर-दार नाही. कधी दूर जातो, कधी दूर जातो, कधी पृथ्वीजवळ ओसंडून येतो. जवळचे सारे जीवन भूमातेला देतो. सृष्टीला हसवतो. घना, तुमचे नाव किती छान! तुम्ही कोणाची जीवनभूमी हिरवी हिरवी करणार? कामगारांची, श्रमणारांची,-- होय ना? आणि मी? मला नाही ओलावा देणार?

हातात पत्र घेऊन मालती विचारात रमून गेली. तिला आईची अकस्मात आठवण आली. ती मरताना म्हणाली, “तुझे कल्याण होईल.” ते शब्द का खोटे होतील? हृदयापासून निघालेला उदगार परमेश्वराचा असतो. ती जणू वेदवाणी असते, अपौरुषेय वाणी असते. ती का खोटी होईल?

असे विचार तिच्या मनात आले. तिने पत्राकडे प्रेमाने पाहिले. अक्षर कसे छान आहे! त्यांचे सारे जीवनच सुंदर आहे. त्यांच्या जीवनात कसलीच का उणीव नसेल? सामजसेवेच्या आनंदाने सारे जीवन भरून जात आसेल का? कोणाला माहीत! मा वेडी आहे. आशा कशाला करू? आणखी दु:खाला कारण!

‘मालती शिवणकाम कर. येथे भावाच्या घरी सेवा करता येईल ती कर. अधिक नको इच्छू’, असे जणू तिचे मन तिला म्हणत होते. तिने पदराने डोळे पुसले. ते पत्र तिने फोडले नाही. मला काय अधिकार, असे मनात म्हणून ती पुन्हा कपडे शिवीत बसली.

सखाराम दोनचार दिवस झाले तरी घरी आला नाही. पुन्हा जगाचा मुशाफीर होऊन घर सोडून गेला की काय? आता आईचा पाश नव्हता, म्हणून का तो गेला? मालती समाधान मानायला शिकली होती. ते पत्र तसेच पडून होते. उत्तर कोण लिहिणार!

तिकडे घना पत्राची वाट पाहात होता. दोन दिवस झाले, चार दिवस झाले,--पत्र नाही. सखाराम वकिलीचा अभ्यास करीत होता. तो कसा येणार? का बहिणीचे लग्न ठरवायला कुठे गेला? घनासमोर मालतीची मूर्ती आली. तिच्याजवळ मी मोकळेपणाने बोलत असे. खेळत असे. तिची इकडे येण्याची इच्छा असावी. तिला सार्वजनिक सेवेची हौस असावी. तिचा कोडमारा होत आहे. सखारामच्या का हे लक्षात येत नाही? परंतु मी तरी एकदम काय म्हणू? आणि मला ना घर, ना दार. आज तुरुंग, तर उद्या गोळी. मालती सुखी असू दे. एकच वेळ, फक्त एकच वेळ तिने भरलेल्या डोळ्यांनी मजकडे पाहिले होते. त्या बघण्यातील अर्थ कोणाला कळणार, कोणाला समजणार? मी मालतीला पत्र लिहू का? सखाराम घरी नसेल, पत्र कोणी फोडले नसेल. लिहू मालतीला पत्र? परंतु काय लिहू? प्रिय लिहू की चिरंजीव लिहू? प्रिय लिहिले म्हणून काय झाले? तो शब्द आता रूढ झाला आहे. त्या शब्दात अधिक अर्थ आता कोणी पहात नाहीत. त्याने पत्र लिहिले.

प्रिय मालती,
सप्रेम प्रणाम,

प्रिय सखाराम का तेथे नाही? तुम्ही दोघे येथे याल का, म्हणून त्या पत्रात मी विचारले होते. येथे परवापासून संप सुरू होईल. कामगारांत उत्साह आहे. परंतु मला लवकरच अटक होईल असे कळते.

सखाराम आला तर तो नेतृत्व घेईल. तुम्हीही आलात तर स्त्रियांत उत्साह येईल. तुम्ही म्हणाला होता, मला नाही का काही काम करता येणार! देवाने काम वाढून ठेवले आहे. ते ताट लोटू नका. नेहमीच अशी संधी येत नसते. जीवनात क्रांती करणारे हे क्षण असतात. जीवनातील नवीन दालने उघडतात. आपण अकस्मात उंच जातो. जणू चंद्र-सूर्य-ता-यांबरोबर बोलू लागतो. खरे ना?

बघा विचार करून कळवा. निदान सखाराम येथे नाही, तो येताच विचार करून काय ते कळवू, असे उत्तर तरी लिहा.

सर्वांस स.प्र.

तुमची वैनी आली का? जयंता, पारवी यांच्या गमती तुम्ही सांगत असा. ती मुले जवळ नसल्यामुळे तुम्हांला करमत नसेल. घर सुने सुने वाटत असेल. मुले म्हणजे घराची शोभा. असो.

तुमच्या पत्राची वाट पाहात आहे.

घना.

मालतीच्या नावाने कधी पत्र येत नसे. तिला नव्हत्या मैत्रिणी, नव्हत्या बहिणी. आज तिच्या नावे पत्र आले. तिने धावत जाऊन घेतले. त्यांचेच पत्र मला आले! हो, मला, भाऊच्या पत्राची वाट पाहून निराश होऊन बहुधा त्यांनी मला लिहिले असावे. काय बरे त्यांनी लिहिले असेल! दोनच ओळी असतील की काही भावमधुरता असेल? परंतु ही कामाची माणसे. त्यांना इकडे तिकडे पाहायला वेळ कुठे होत असेल? हे असे लोक सारखे काम लावून न घेतील तर ते उबगतील, कंटाळतील.

तिने पत्र फोडून वाचले. एकदा, दोनदा, तीनदा वाचले. जीवनात क्रांती करणारे क्षण! खरेच का माझ्या जीवनात क्रांती होईल? घरातून बाहेर न पडणारी कामगारांच्या सभेत बोलेल, त्यांच्या चाळीतून हिंडेल, त्यांना धीर दईल. ही का क्रांती नव्हे? परंतु क्रांती एकांगी नसते. खरी क्रांती सर्वांगपूर्ण असते. हे क्षण घनश्यामांच्याही जीवनात नाही का उलथापालथ करणार?

ती विचार करीत होती. माझ्या जीवनात क्रांती झाली तर त्यांच्याही जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही.

सायंकाळी सखाराम आला.

“भाऊ, किती रे दिवस?” तिने विचारले.

“अग मी आजारी पडलो. आता बरा आहे. तुम्हांला काळजी वाटू नये म्हणून कळवले नाही.”

“परंतु काळजी वाटायची थोडीच राहिली? दादा काल सायंकाळी जेवलाही नाही. त्याला वाटले की तू पुन्हा कुठे गेलास! दादाचे आपणा सर्वांवर फार प्रेम. दादावर आपला भार पडतो असे तुला-मला वाटते म्हणून तो दु:खी असतो. मला म्हणाला, ‘माले, शिवणकाम नाही केलेस तरी चालेल.’ मी म्हटले, ‘दादा वेळ जावा, हा मुख्य उद्देश हो.’ भाऊ, तुझ्या त्या मित्राचे पत्र आले आहे. उद्या का परवापासूनच संप सुरू व्हायचा आहे. कदाचित सुरू झालाही असेल. माझ्या पत्रात तसे आहे. आपल्याला त्यांनी बोलावले आहे. जायचे का? ते वाट पहात असतील! तूच त्यांना उद्या काय ते लिही. तू गेलास तर मीही येईन.”

सखारामने पत्र वाचले. विचार करीत तो फे-या घालीत होता. तिकडे मालती स्वयंपाकात होती. तो तिला मदत करायला गेला. दोघे भावंडे बोलत होती.हात आहे.

“माले. तिकडे जाणे म्हणजे संकट आहे. तुरुंगात जावे लागेल, आमचे काही नाही; परंतु तुझे काय होणार? तुरुंगात जाणे उद्या लग्नाला आड न येवो म्हणजे झाले!” तो म्हणाला.

“माझ्या लग्नाची तुम्ही काळजी करू नका म्हणून मागेच नाही का मी सांगितले? देवाने कोणी जीवनाचा प्रेमळ उदार सोबती दिला तर त्याचा हात हातात घ्यावा, नाहीतर असेच राहून होईल ती घरीदारी सेवा करावी, असे मी मनात निश्चित केले आहे. तू मला घेतल्याशिवाय जाऊ नकोस. मी बोजारूप नाही होणार. भाऊ, मालतीत दुस-या कोणाचा तरी संचार झाला आहे. नेभळी, भेकड, मुखदुर्बळ मालती मेली, ही नव-मालती आहे,-- क्रांतिकारक मालती!”

“तुझा धीटपणा तुला बघायला आलेल्या त्या बावळटाला तू खडे सवाल केलेस तेव्हाच दिसून आला होता. मालती काही म्हण, तुला न्यायला धीर होत नाही. समज, -- लाठी बसली, गोळीबार झाला, दंगल झाली. दगड लागला तर कसे व्हायचे? दादा काय म्हणेल? आई वरून काय म्हणेल? तू बाबांची किती लाडकी होतीस! लहानपणी आईने तुला एकदा रागाने मार दिला तर बाबा धावून आले व आईला म्हणाले, ‘मला मार, तिला मारू नको.’ त्या शब्दांनी आईला मेल्यासारखे झाले. पुन्हा म्हणून तिने तुला कधी हात लावला नाही. असा तुला का आगीत नेऊ!”

“भाऊ, माझे सुख तुला प्रिय आहे ना?”

“हे काय विचारतेस. माले!”

“मग माझे सुख सुंदरपुरात आहे. माझे सुंदर ध्यान तेथे आहे. त्या मूर्तीच्या सान्निध्यात मी काळिकाळासमोर उभी राहीन.”

“आणि ती मूर्ती तुरुंगात पडला तर?”

“त्या मूर्तीचा ध्येयदेव हृदयाशी धरून मी आगीत उडी घेईन.”

दादाही बाहेरून आला. तिघे भावंडे जेवायला बसली. जेवताना सारी चर्चा झाली. दोन दिवसांनी वैनी यायची होती. ती आल्यावर मालती नि सखाराम यांनी जावे असे ठरले.

दुस-या दिवशी तशा अर्थाचे पत्र सखारामने घनाला लिहिले. मालती आनंदली. तिच्या तोंडावर कधी नव्हते असे तेज फाकले. कधी दिसले नव्हते असे कोवळे लावण्य शोभले.

दोघे भाऊ मनात म्हणाले, “ सुखी होवो!”

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED