Mastermind - 4 books and stories free download online pdf in Marathi

मास्टरमाईंड (भाग-४)

शेवंताचा मृत्यु पाहुन तरवडे गावाला आठवडाही उलटला नव्हता आणि त्यांना त्यांच्या लाडक्या अनिता ताईंचा मृत्य पहावा लागला होता.

शेवंताच्या मृत्युने कदाचीत एवढे दुःख कुणाला झाले नव्हते. पण अनिता ताईच्या मृत्युने पुर्ण गावं हळहळला.

‘तरवडे’ गावावर एक प्रकारचा सन्नाटा पसरला होता. गावाबाहेर असणाऱ्या शाळांना आपसुकच सुट्ट्या मिळाल्या होत्या. गावातील व्यवहार थंडावले होते. प्रत्येक जणच एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघत होता. गावातल्या कुठल्याही लॉज, खानावळ वर अनोळखी इसम आल्यास त्याची माहीती पोलीस स्टेशनवर कळवण्यात यावी याची व्यवस्था त्यांनी करुन ठेवली. गावातील निर्जन स्थळं, गावाबाहेरील शेतं, पडके वाडे या ठिकाणी जाण्यास गावकऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला. गावात अनोळखी असा इसम कुणाच्या पहाण्यात आला नव्हता. गावाबाहेरील वाडे, परीसर शोधुन काढला होता, पण कुणाच्या रहाण्याच्या खुणा सापडल्या नव्हत्या.

“कोण असेल हा खुनी? मोटीव्ह काय असेल त्याचा? झालेल्या खुनांमध्ये दोघींचा तसा एकमेकींशी काही संबंध नव्हता. खुनी खरंच माथेफिरु असेल?” पोलीसांच्या डोक्यात प्रश्नांनी गोंधळ केला होता. पण त्याची उत्तरं काही केल्या सापडत नव्हती.

जिल्ह्यातील वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार काही दिवस पर्जन्याची शक्यता होती आणि त्याला पुरक हवामानही पडले होते. दिवसभर ढगाळ हवामानामुळे हवेत एक प्रकारचा कुंदपणा पसरला होता. वारा नसुनही हवेत बोचरेपणा होता. सारे काळे आकाश तरवडेगावावर कोसळण्यासाठी आतुरलेले होते.

********

‘तरवडे’ गावात खळबळ उडाली होती. गावाबाहेरील लॉज मध्ये एका तरूणीचा खुन होऊन काही दिवस सुध्दा नव्हते झाले की काल गावातच पुन्हा एक बळी गेला होता. पोलीस पंचायतीसमोर
गावातील पत्रकार आणि बातमीच्या शोधात शहरातुन आलेले न्युज रिपोर्टरांची गर्दी जमली होती.

‘हे बघा, तुम्ही उगाच इथे गर्दी करु नका, तपास कार्य पुर्ण झाले की तुम्हाला पुर्ण माहीती दिली जाईल’ इ.पवार पत्रकारांना बाहेर लोटत म्हणत होते.

‘कधी होणार तुमचा तपास पुर्ण? आधीच दोन लोकांचा जिव गेला आहे, अजुन कित्ती लोकांना आपला जिव गमवावा लागेल?’ रिपोर्टर

‘आमचा तपास चालु आहे..अधीक..’

‘काय तपास चालु आहे? काय माहीती लागली तुमच्या हाती?’ रिपोर्टर

‘हे कार्य एखाद्या सिरीयल माथेफिरू खुन्याचेच असले पाहीजे’ इ.पवार

‘कशावरुन?’, रिपोर्टर

‘कश्यावरुन नाही?’, वैतागुन इ. पवार म्हणाले, ‘हे बघा दोन्ही खुनांमध्ये खुनाचा मोटीव्ह काहीच दिसत नाही. हे दोन्ही खुन एकापाठोपाठ घडले आहेत आणि खुनासाठी वापरण्यात आलेला सुरा हा एकाच बनावटीचा असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिलेला आहे’

‘याशिवाय अधिक माहीती सध्या तरी आमच्याकडे नाही. अधिक तपासांनंतरच अधीक खुलासा होऊ शकेल.’ इ.पवार

‘म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे की या गावात एक माथेफिरु खुनी मोकळा फिरत आहे आणि सध्यातरी तुमच्या हातात काहीच सुगावा / पुरावा नाही? आणि जोपर्यंत तुमचा तपास पुर्ण होत नाही तो पर्यंत गावातील लोकांनी त्या खुन्याचे बळी होत रहायचे की काय?’ संतप्त होत पत्रकार इ.पवारांना प्रश्न विचारत होते.

‘हे बघा, मला असं काहीही म्हणायचं नाही आहे, आमचा तपास सुरु आहे, अधीक माहीती मिळाली की तुम्हाला कळवले जाईल…’ असं म्हणत त्यांनी त्या गलक्याला बाहेर काढायला सुरुवात केली.

********

“हॅलो इन्स्पेक्टर”, आपल्या चेहऱ्यावर नेहमीची इंप्रेसिव्ह स्माईल आणत जॉन म्हणाला.

“हॅलो”, काहीश्या तुसड्या आवाजात इन्स्पेक्टर पवार म्हणाले.. “आपण?”

“मी जॉन.. डिटेक्टीव्ह जॉन” आपल्या खिश्यातुन आपले डिटेक्टिव्ह एजंन्सीचे कार्ड काढुन ते पवारांच्या हातात देत जॉन म्हणाला

इन्स्पेक्टर पवारांनी ते कार्ड घेतले आणि जॉनला बसण्याची खुण केली.

जॉनने बसत असतानाच आपल्याकडील फाईल ज्यामध्ये डिटेक्टीव्ह एजंन्सीचे सरकारमान्य सर्टीफिकेट, जवळच्या पोलीस स्टेशनमधील मान्यतप्राप्तीचे पत्र, इतर कागदपत्र होती ती पवारांकडे सरकवली.

पवारांनी ती सर्व कागदपत्र काळजीपुर्वक पाहीली आणि म्हणाले.. “बोला डिटेक्टीव्ह जॉन, काय मदत करु शकतो मी तुमची?”

“मला गावात नुकत्याच झालेल्या खुनांबद्दल अधिक माहीती हवी आहे”, जॉन

“चव्हाण, जॉन साहेबांना केस पेपर दाखव”, पवार काहीश्या त्र्याग्याने म्हणाले

“पवार साहेब, मला तुमचे केस पेपर नको आहेत. त्यातील बहुतांश माहीती मी पेपरमध्ये वाचलेली आहे. मला अशी माहीती हवी आहे जी तुम्ही प्रसिध्दी माध्यमं किंवा अजुन कुणाला दिलेली नाही”, जॉन आपल्या चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवत म्हणाला.

“माफ करा जॉन साहेब, पण त्याव्यतीरीक्त अधिक माहीती आमच्या कडे नाही”, पवारांचा जॉन मधील इंटरेस्ट गेला होता, ते परत आपल्या कामात मग्न झाले.

“ऑल राईट, मी विचारायचे काम केले. माहीती कशी आणि कुठुन मिळवायची हे मला चांगले माहीती आहे इन्स्पेक्टर साहेब. येतो मी”, खुर्चीवरुन उठत जॉनने आपला हात पुढे केला. इन्स्पेक्टर पवार आपल्या कामात मग्न होते. जॉनने काही क्षण आपला हात पुढे धरला आणि मग तो आल्या मार्गी परत फिरला.

******************************

“अवं भाऊसाहेब हे काय ऐकतोय आम्ही?”, नानासाहेब तणतणत भाऊसाहेबांच्या बैठकीच्या खोलीत आले.

नानासाहेब भाऊसाहेबांचे धाकले बंधु, परंतु स्वभावाने भाऊसाहेबांच्या अगदी विरुध्द.भाऊसाहेब शांत, मनमिळावु, मितभाषी तर नानासाहेब म्हणजे उथळ माथ्याचे, चिडक्या स्वभावाचे, पुढचा-मागचा विचार न करता जे वाटलं ते करुन मोकळं होणारे.

स्वभावातील ह्या मोठ्ठ्या फरकामुळेच भाऊसाहेब त्याच्या आई-बापांचे आणि पर्यायाने शाळा आणि नंतर गावात सर्वांचे लाडके होते. याउलट नानासाहेब मात्र नकळत सर्वांच्या तिरस्कारास पात्र ठरत होते. नानासाहेब लहानपणापासुनच जुगार, सिगारेट, दारु, वाया गेलेले मित्र यांच्या नादी लागतं इतरांपासुन दुर होत गेले तर भाऊसाहेब लहानपणापासुन जबाबदाऱ्या सांभाळत गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती बनले होते.

बापाच्या मृत्युनंतर त्यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. बापाने संपत्तीची समभागात वाटणी केली होती खरी, पण ठरावीक रकमेउपर खर्चासाठी नानासाहेबांना भाऊसाहेबांची परवानगी घेणे बंधनकारक केले होते. त्यानंतर तर प्रत्येक वेळेस नानासाहेब आणि भाऊसाहेबांमध्ये वाद होत गेले. भाऊसाहेबांचं आणि नानासाहेबांच तसं कध्धीच पटलं नव्हतच. बापाच्या जाण्याने त्यांच्यामधील उरले सुरले नाते ही संपुष्टात आले आणि नानासाहेब भाऊसाहेबांबरोबर न रहाता वेगळ्या हवेलीत रहायला गेले..

“अरं नान्या.. शांत हो.. जरा..”, भाऊसाहेब गावातील काही मोजक्या मान्यवरांबरोबर चर्चा करत त्यांच्या बैठकीच्या खोलीत बसले होते. नानासाहेबांना असं तणतणंत आलेले पाहुन त्यांना
ओशाळल्यासारखे झालं.. “अरं काय झालं सांगशील का जरा?”

“भाऊसाहेब तुमी म्हणं ती आपली दक्षीणेकडच्या जमिनीतलं २५ एकर जमीन भुमीहिनांना देऊन टाकणार हायं?” नानासाहेब उभ्या-उभ्याच बोलत होते.

“व्हयं नान्या.. तु ऐकलं ते बरोबर हाय”, भाऊसाहेब

“अरं काय बा तुझा एकट्याचाच व्हता व्हयं? मला काय विचारायची पध्द्त हाय का नाय? अरं त्या जमीनीवर मी फॅक्टरी टाकनार हाय नव्हं सांगितलं होतं नव्ह तुला?”, नानासाहेब

“अरं २५ एकरचा एक तुकडा तर देतोय नं एवढी बाकीची जमीन पडली हाय बाजुला.. घे नं ती तुला!” भाऊसाहेब

“नाय.. ते काय नाय! माझा विरोध हाय ह्याला.. मला ती पुर्ण जमीन हवी हाय, कंपनीला तसा शब्द दिलाय मी!”, नानासाहेब

“शब्द आम्ही पण दिलाय नानासाहेब!”, भाऊसाहेब

“अरं विचारतं कोण तुझ्या शब्दाला? त्या जमीनीतला प्रत्येक एकर मला महत्वाचा हायं, मोठ्ठ नुकसान होईल माझं. तुला जमिनी वाटायचीच हौस असंल ना, तर तुझा हा पडका वाडा देऊन टाक, त्या जमीनीला हात लावायचा नाय!!!”, नानासाहेब

“हे बघ नान्या, त्या जमीनीला नदी जवळ हाय, विहीरीलाही पाणी लागंल असं भुतज्ञ म्हणाले हायेत, गरीब लोकांना ती जमीन मिळाली तर त्यांचा पाण्याचा मोठ्ठा प्रश्न सुटणार हाय. आम्ही शब्द दिलाय, परत माघारी नाय घेऊ शकत”, भाऊसाहेब खंबीरपणे म्हणाले

“ठिक हाय तर.. आजवर लै ऐकुन घेतलं तुझं.. थोरला म्हणुन लै सहन केलं तुला, आता म्या पण बघतं कसं त्या जमीनीवर फॅक्टरी उभी रहात नाय ते..” नानासाहेब

“नान्या, माझा मुडदा पडला तरी चालंल, पण आमचा शब्द आम्ही खाली पडु नाय देणार..” भाऊसाहेबही आता तणतणले होते..

“अस्सं, हरकत नाय, तुझा मुडदा पडुन फॅक्टरी उभं रहाणार असलं तर ते बी मंजुर हाय!!” असं म्हणत नानासाहेब जसे आले, तसे तणतणत निघुन गेले.

*******************************

‘तरवडे’ गावातील एका स्वस्तात स्वस्त हॉटेलमध्ये जॉनने खोली घेतली होती. अर्थात तरीही जवळ असलेले शिल्लक पैसे विचारात घेता तो आठवड्यापेक्षा अधीक काळ तिथे राहु शकेल असे त्याला वाटत नव्हते. त्याला त्वरीत काहीतरी हालचाल करणे आवश्यक होते.

हातातल्या सिगारेटचे झुरके घेत जॉन सर्व घटनाक्रमांचा सुरुवातीपासुन विचार करत होता.

“जिथे तो इसम पहिल्यांदा त्या बस मध्ये शिरला ती जागा वस्तीपासुन तशी लांबच आहे. म्हणजे तो माणुस कुठल्यातरी गाडीतुन तिथपर्यंत आला असावा अथवा त्याने स्वतःची गाडी आणली असावी.

जर का तो इसम गुन्हेगार असेल आणि गुन्हा करायचाच याच उद्देशाने तिथे आला असेल तर तिथपर्यंत येण्यासाठी तो कुणावर विसंबुन राहील किंवा अधीका-अधीक लोकांच्या संपर्कात येईल असे वाटत नाही. म्हणजे तो स्वतःच्याच गाडीने तिथे आलेला असणार. आणि तसे असेल तर त्याने त्याची गाडी नक्कीच आजुबाजुला कुठे तरी लपवुन ठेवलेली असणार”

जॉन लगेच आपल्या जागेवरुन उठला.

तारापुर एक्झीटला जॉन पोहोचला तेंव्हा चार वाजुन गेले होते. जॉनने आजुबाजुला एक नजर टाकली. जवळपास वस्ती अशी कुठेच नव्हती. आजुबाजुला उंचच उंच गवत वाढलेले होते. जॉनने साधारण अंदाज घेउन आजुबाजुचा परीसर शोधावयाला सुरुवात केली. परंतु तासभर झाला तरी म्हणावे असे काही सापडले नव्हते. साधारणपणे १ किलोमीटर मागे गेल्यावर जॉनला रत्याच्या कडेने शेतामध्ये गेलेले कारचे टायर्स दिसले. जॉन त्या टायर मार्कसचा मागोवा घेत घेत गवतांमध्ये घुसला. गवताचा एका भागातील गवत दबल्यासारखे वाटत होते. नक्कीच कुठलीतरी एखादी कार इथे आतपर्यंत येउन गेली आहे. एका ठिकाणचे गवत पुर्णपणे दबले गेले होते, जसे एखादे जड वाहन खुप वेळ त्या ठिकाणी थांबवले असेल.

“कदाचीत हीच ती जागा असावी, जेथे त्या इसमाने त्याची गाडी लपवुन ठेवली असेल”, वाईल्ड गेस!!, पण शक्यता पडताळुन पहाण्यासारखी होती. जॉनला आपल्या इंन्स्टींक्ट्स वर पुर्ण विश्वास होता.

म्हणजे असे असु शकेल, गुन्हेगाराने रस्त्याच्या कडेला मोहीत्यांची बंद पडलेली कार बघीतली. त्याने आपली कार वळवुन इकडे मागे आणली आणि गवतामध्ये लपवली. मग तो बंद पडलेल्या मोहीत्यांच्या कारपाशी येऊन थांबला. बस ड्रायव्हरचा असा समज झाला की त्याचीच गाडी बंद पडली आहे. त्याने त्याचा फायदा घेऊन बसमध्ये प्रवेश केला.

जिथे बस बंद पडली तेथील लॉज मध्ये तो त्या तरूणीला काही तरी कारणाने घेऊन गेला, तिथे तिचा खुन केला. मग तो परत इथे आला आणी आपली गाडी घेउन गेला.. गेला.. पण कुठे? जिकडुन आला होता तिथे? का जिकडे चालला होता तिकडे?” जॉनचे स्वगत चालु होते.

जॉनने पुन्हा एकदा दबलेल्या गवताचे निरीक्षण केले. टायर मार्क्स ज्या दिशेने आतमध्ये आले होते त्याच दिशेने बाहेर गेले होते. “..म्हणजे असं.. गुन्हेगार तारापुर कडुन तरवडे किंवा पुढे कुठेतरी चालला होता. त्याने मोहीत्यांची गाडी बघीतली. तिथे त्याने गाडी वळवुन पुन्हा माघारी घेतली आणि गवतात न्हेऊन ठेवली. म्हणुन टायर मार्क्स आहेत डावीकडुन डावीकडे आतमध्ये गेलेले.

गाडीची दिशा होती तारापुरच्या दिशेने. आणि त्याच दिशेने गाडी रिव्हर्स मध्ये बाहेर निघाली आहे. म्हणजे गाडीचे तोंड अजुनही तारापुरच्या दिशेनेच होते याचा अर्थ असा असु शकतो की तो पुन्हा जिकडुन आला त्याच दिशेने गेला आहे.

बस्सं.. याव्यतीरीक्त जॉनला अधिक काहीच मिळु शकले नाही. त्याने काही पुरावे काही खुणा शोधण्याचा खुप प्रयत्न केला परंतु ‘क्ल्यु’ ज्याला म्हणता येईल असे काहीच मिळाले नाही

“चला..आजचा दिवस अगदीच काही व्यर्थ झाला नाही. जिथुन सुरुवात करावी एवढे तरी काही तरी मिळाले”, असा विचार करत जॉन माघारी फिरला.




असं म्हणतात कधी कुणाबद्दल वाईट बोलु नये. आपल्या आजुबाजुला नियती फिरत असते. कधी कुणाच्या तोंडुन काही निघेल आणि नियती ’तथास्तु’ म्हणेल सांगता येत नाही. भैय्यासाहेबांच्या बाबतीत अस्संच काही वाईट तर नाही ना घडणार?? वाचत रहा मास्टरमाईंड..

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED