Mastermind - 3 books and stories free download online pdf in Marathi

मास्टरमाईंड (भाग-३)

“अरे ए पश्या .. अरं इकडं य जरा”, भाऊसाहेब पेपरमधील बातमी वाचत असतानाच म्हणाले. भाऊसाहेब ‘तरवडे’ गावचे पाटील आणि श्रीमंत प्रस्थ. बोलण्यात गावंढळ बाज असला तरीही गडी मोठा हुश्शार होता. चालण्यात, वागण्यात एक तडफदारपणा होता. गावातील लोक त्यांना बिचकुन असतं. गावातली भांडण, मारामाऱ्या भाऊसाहेबांच्या नुसत्या जाण्याने मिटत असत. गावाच्या मध्यावर महालासारखा पसरलेला मोठ्ठा वाडा, गावाबाहेर द्राक्ष, ज्वारी, बाजरीची शेतं, त्यामध्ये राबणारी असंख्य लोकं, गावात २ पेट्रोल पंप, गावाच्यावेशीवर गर्द झाडीमध्ये दडलेली अवाढव्य वाडी, दिमतीला महागाड्या गाड्यांचा ताफा, हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या, चेहऱ्यावर करारी भाव आणि त्याला साजेश्या झुपकेदार मिश्या. अंगात बहुतेक वेळा कडक इस्त्रीचा क्रिम रंगाचा शर्ट, स्वच्छ पाढरेशुभ्र धोतर आणि कर्र-कर्र आवाज करणाऱ्या कोल्हापुरी चपला.

पेपरमधील त्या बातमीकडे बोटं दाखवत भाऊसाहेब पश्याशी बोलत होते, “अरे ही शेवंती नव्ह का? अरं खुन झाला म्हणं तिचा गावाबाहेरच्या लॉज मध्यं”

“होय भाऊसाहेब, तिच ती. रांड साली, आपल्या कृत्याने मेली. गाठला असेल कोणीतरी माथेफिरू झxxला”..

“ह्म्म.. अरं काय हे पश्या.. मेलेल्याबद्दल असं बोलतं व्हयं कुणी?” भाऊसाहेब

“माफ करा भाऊसाहेब, पण ती व्हतीच तसली पोरं, अख्ख गावं बोलतयं तसं…” पश्या मान खाली घालुन बोलला.

“अरं असेल तशी ती, पण आता मुडदा झालीय नव्हं? बरं थोड्यायेळाने गाडी काढ, आपल्याला तिच्या घरला जाऊन यायला हवं आणि नंतर पोलीस पाटलाला पण भेटुन येउ. काय?”

“व्हयं जी, काढतो गाडी, सकाळीच धुतलीया बघा चकाचक..” पश्या व्हरांड्यातुन पळत पळत जाताना म्हणाला.

भाऊसाहेबांनी ती बातमी वाचुन काढली आणि मग समोर असलेला आलं घातलेला गवती चहा फुरक्या मारत संपवला.

*********

भाऊसाहेब पोलीस-स्टेशनमध्ये पोहोचले तेंव्हा इस्पेक्टर पवार टेबलावर ठेवलेले पोस्टमार्टमचे रिपोर्ट्स वाचण्यात गुंग होते. भाऊसाहेबांना आतमध्ये येताना पाहुन ते उठुन उभे राहीले.

“अरं बसा बसा.. तुम्ही कशाला उठताय?”, पोलिस स्टेशनच्या बसक्या दारातुन वाकुन येत भाऊसाहेब म्हणाले.. “अहो.. पोलिस महानिरीक्षक तुम्ही. तुमच्यासमोर आम्ही उभं रहायचं काय?”

“अहो काय भाऊसाहेब थट्टा करता आमची? अहो हे अख्ख गावं झुकतेय तुमच्यापुढे, आणि आम्ही बसुन रहायचं होय?.. या बसा..” समोरच्या खुर्चीकडे हात दाखवत इन्स्पेक्टर पवार म्हणाले.

“पवार साहेब.. पेपरमध्ये वाचलं बघा कालचं… काल रात्रीपासुन इथेच आहात की काय?” भाऊसाहेब

“नाही, काल पंचनामा संपवुन घरीच गेलो होतो, सकाळी लवकर आलो”, इन्स्पेक्टर पवार म्हणाले.

” बरं बरं!! जरा काय झालं सांगता का सविस्तर?”, भाऊसाहेब आपल्या झुपकेदार मिश्यांना पिळ देत म्हणाले.

“कसं आहे भाऊसाहेब, थोडे कॉन्फेडेंन्शियल आहेत हे रिपोर्ट्स. पुर्ण तपास झाल्याशिवाय नाही सांगु शकत जास्त काही. पण तुम्हाला म्हणुन सांगतो, गावातल्याच एका मुलीचा ‘सुजीत लॉज’ मध्ये निर्घुण खुन झालाय. शेवंता नाव तिचं. तुम्ही ओळखता तिला?”

“अवं तिला कोण नाय ओळखत? सर्व घरांचे बिछाने तिने गरम….” भाऊसाहेबांच्या मागेच उभ्या असलेल्या पश्याचे वाक्य भाऊसाहेबांनी तोडले..

“पश्या.. विचारल्याशिवाय मध्ये मध्ये बोलु नये!!”

आणि मग पवारांना उद्देशुन म्हणाले, “पवार साहेब.. तसा फारसा संबंध नाय माझा तिच्याशी.. पर.. गावातली हाय… म्हणजं व्हती… म्हणुन माहीती हायं एवढचं..!”

भाऊसाहेबांचं बोलणं इ.पवार काळजीपुर्वक ऐकत होते. त्यांच बोलण झाल्यावर ते म्हणाले.. “अस्सं..! तर तिचा काल चाकु भोसकुन खुन झाला आहे. एकदा नाही, दोनदा नाही तर आठ वेळा चाकु भोसकला गेला. यावरुन खुन्याला एक तर तिच्याबद्दल प्रचंड चिड होती आणि दुसरे म्हणजे तिला संपवायचेच या एकाच उद्देशाने तिच्यावर हल्ला करण्यात आला होता हे नक्की. पण खुनामागचे कारणं मात्र अजुन स्पष्ट झाले नाही. तिच्यावर बलात्कार झालेला नाही, आणि तिच्या पर्समधले थोडेफार पैसे, अंगावरचे दागीने जसेच्या तसेच आहेत!”

‘अस्सं अस्सं..’, भाऊसाहेब उद्गारले.. ‘बरं पण काय सुगावा?’

‘माफ करा भाऊसाहेब, आत्ताच अधिक काही सांगु नाही शकत. वेळ येताच पुर्ण माहीती कळवेन’, पवार

‘बरं बरं.. तुमचं बी बरोबर हाय, तुम्ही पडली सरकारी माणसं, आम्ही पडलो ह्या गावातच लहानाचे मोठं झालेलं, असु द्या. चालु द्या तुमची कामं’ असं म्हणुन भाऊसाहेब उठले आणि दाराकडे वळुन बाहेर पडले.

भाऊसाहेब जाईपर्यंत इन्स्पेक्टर पवार उभं राहुन त्यांच्या पाठमोऱ्या मुर्तीकडे पहात होते. ते गेल्यावर परत समोरची रिपोर्टची फाईल त्यांनी जवळ ओढली आणि ती वाचण्यात ते गढुन गेले.

समोर सावंतांची चाहुल लागताच पवारांनी न बघताच विचारले, “बोला सावंत काय माहीती?”

“साहेब, त्या गाडीचा मालक सापडला. ती गाडी दुसऱ्याच कुणाची तरी होती. श्री. मोहीते, त्या गाडीचे मालक. गाडी बंद पडली म्हणुन एका कारची मदत घेऊन ते शेजारच्या गावात गेले होते. ह्या इसमाने त्या बंद पडलेल्या गाडीचा फक्त लिफ्ट मागण्यासाठी वापर केलेला दिसतोय”, सावंत

“त्या.. श्री मोहीतेंचे सर्व रेफरंन्सेस चेक करा. कुठल्या गाडीतुन ते गावात गेले, तिथला गॅरेजवाला कुणी हे सांगु शकतो का ते पहा. त्यांनी सांगीतलेली प्रत्येक गोष्ट पडताळा”, पवार

“हो साहेब, काम चालु आहे. मोहीते ४०शीच्या आसपासचे गृहस्थ आहेत. त्यांचे वर्णनही त्या इसमाशी जुळत नाही आहे.” सावंत

“हम्म.. ठिक आहे. त्यांचा कॉन्टाक्ट नंबर घेऊन ठेवा आणि गरज लागली तर सांगा फोन करु”, असं म्हणुन पवार परत आपल्या कामात मग्न झाले.

“बरं साहेब”, असं म्हणुन सावंत निघुन गेले.

*******************

शेवंताच्या घरावर आभाळ कोसळले होते. तिचे म्हातारे आई-बाप एकटे पडले होते. जरी त्यांना माहीती होते की त्यांची मुलगी काय ‘काम’ करते, तरी त्यांनी त्या गोष्टीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले होते. शेवटी काही झाले तरी त्यांचे घर शेवंताच्याच कमाईवर चालले होते.

शेवंताच्या जाण्याने त्यांना मिळणारा एकुलता एक पैश्याचा मार्ग खुंटला होता. त्यातच आठवडा उलटला तरी चालु असलेल्या पोलीस, बातमीदारांच्या ना-ना प्रश्रांनी त्यांना भंडावुन सोडले होते. मृत व्यक्तीच्या चारीत्राचे धिंडवडे काढायला त्यांना काय मज्जा मिळत होती कुणास ठाऊक?

त्या वृध्द माता-पित्यांना एकच मजबुत सहारा वाटत होता तो अनिता-ताईंचा. तिशीतल्या ‘अनिता-ताई’ तरवडे गावातील समाजसेविका होत्या. लोकांच्या, अडल्या-खुपल्याच्या मदतीला त्या सदैव धावुन जात असत. ह्यावेळचि घटनाही त्याला अपवाद नव्हती. आपल्या समर्पक उत्तरांनी आणि चतुर संभाषण कौशल्याने त्यांनी बातमीदारांची तोंड बंद केली होती. त्या चालवत असलेल्या एन.जी.ओ. मधुन काही मदतनिधी काढुन त्यांनी शेवंताच्या आई-वडीलांना काही प्रमाणात आर्थीक आधार देऊ केला होता. त्यांच्या जखमेवर हळुवार फुंकर मारली होती.

“अनिता ताई, कसे आभार मानु तुमचे? खरंच तुम्ही नसत्या तर काय झाले असते आमचे?”, शेवंताच्या आई गहीवरुन अनिता ताईंशी बोलत होत्या.

“अहो आभार कसले मानायचे त्यात? मी पण तुम्हाला मुलीसारखीच ना? मग मुलीचे कसले आभार मानताय? जेवढे शक्य होईल तेवढे करणे माझं कर्तव्यच होते!'”

“कशीही असली तरी शेवंता शेवटी आमची पोरं होती. आजवर तिनंच आम्हाला खाऊ घातलं होतं. गावं काही म्हणो, आम्हाला तिच्या जाण्याचे दुःख आहेच की!!”

शेवंताच्या आईच्या डोळ्यातुन अश्रु टपकत होते. मंद दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशलेली ती खोली सुन्न झाली होती. शब्द मुकं झाले होते.

काही वेळ शांततेत गेल्यावर अनिता-ताई म्हणाल्या, “बरं निघते मी. उशीर झालाय बराचं. काही लागलं अजुन तर हक्काने कळवा.” आई-बाबांच्या पायाला हात लावुन अनिता-ताई बाहेर पडल्या.

सदैव तरवडे गावाच्या ऐक्यासाठी, भल्यासाठी झटलेल्या अनिता-ताईंच्या मनात या वेळेस सुध्दा असाच कुणाबद्दल तरी विचार चालु होता. अंधारात झपझप पावलं टाकत त्या चालल्या होत्या. अचानक त्यांना कुणाचीतरी चाहुल लागली. त्यांनी दोन क्षणं थांबुन चाहुल घेण्याचा प्रयत्न केला पण कोणीच दिसलं नाही.

त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली. नक्कीच कोणीतरी त्यांच्या मागावर होते.

अनिता-ताईंच्या वाईटावर अनेक टवाळके टपलेले होते. कित्तेक टवाळखोरांना त्यांनी सरळ केले होते, त्यांच्यापैकीच एखादा घाबरवण्यासाठी हा प्रयत्न करत असेल असं समजुन अनिता ताई चालत राहील्या. त्यांच्या मागावरची पावलं अजुनही त्याच वेगाने त्यांच्या मागेमागे येत होती.

अनिता ताई एका ठिकाणी थांबल्या. मागे पावलांचे आवाज अजुनही येत होते. जवळ जवळ, अजुन जवळ… अगदी जवळ येऊन थांबले.

अनिता ताईंना आपल्या अगदी मागे कोणीतरी उभं आहे ह्याची जाणीव झाली. त्यांच्या मानेवरचे केस ताठं झाले होते. पाठीचा मणका आकुंचला गेला होता, ह्रृदयाची धडधड वाढली होती. शब्द घश्यातच अडकले होते. जोरात किंचाळण्यासाठी त्यांनी तोंड उघडले, पण त्यांची किंकाळी त्यांच्या घश्यातच विलीन झाली. त्यांच्या पाठीतुन एक भलामोठा सुरा आरपार झाला होता. त्या सुर्‍याचा थंडगार धारधार स्पर्श मणक्याला छेदत गेला. अनिताताई मागे वळल्या. समोरच्या व्यक्तीने तो सुरा बाहेर खेचला आणि पुन्हा एका जोरदार झटक्यासरशी पोटात खुपसला, खुपसतच राहीला आणि अनिता ताई गतप्राण होऊन जमीनीवर कोसळल्या.

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED