निघाले सासुरा - 6 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निघाले सासुरा - 6

६) निघाले सासुरा!
छाया पंचगिरीचे लग्न ठरले. तिला श्रीपालसारखा अतिशय सुयोग्य जीवनसाथी मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावत नव्हता. 'इंतजार का फल मिठा होता है।' अशी काहीशी स्थिती छायाची झाली होती. ती खूप खुश होती. घरातही अत्यंत आनंदाचे वातावरण होते. बाईआत्या आणि मामा हे आल्यामुळे घरातील उत्साहाला आनंदाचे भरते आले होते. अलका-आकाशला स्वर्ग चार बोटे उरल्यागत् झाला होता. लग्नाच्या निमित्ताने करावयाची खरेदी, कार्यक्रम, कपडा खरेदी, खाण्याचे पदार्थ यासोबतच हौस- मौजीच्या वस्तूंचीही यादी तयार होत होती. अशा याद्यांवर चर्चा होत असताना प्रसंगी घनघोर चर्चाही झडत असे परंतु या चर्चा वादविवादापर्यंत जात नसत. कुणीतरी मधला मार्ग काढायचा आणि चर्चेला पूर्णविराम मिळायचा.
दयानंद आणि दामोधरपंत दिवाणखान्यात बसून गप्पा मारत असताना त्यांचा फोन खणाणला.
"हॅलो, मी पंचगिरी बोलतोय."
"नमस्कार. मी कुलकर्णी बोलतोय."
"नमस्कार. बोला साहेब." पंचगिरी म्हणाले.
"फोन यासाठी केला होता की, सगळं व्यवस्थित चालले आहे ना? काही टेंशन घेऊ नका. काहीही अडचण आली तर निःसंकोचपणे सांगा."
"नाही. तसे काही नाही. तिकडे कसे आहे?" पंचगिरींनी विचारले.
"मजेत आहे. बरे, एक बोलायचे होते..."
"हो. हो. बोला ना..." पंचगिरी म्हणाले खरे पण त्यांच्या पोटात भीताचा गोळा उठला होता.
"त्याचे काय आहे, श्रीपाल हा आमचा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे सारे कसे व्यवस्थित व्हावे अशी आमची इच्छा आहे."
"कुलकर्णीसाहेब, काळजी करू नका. तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही."
"तो विश्वास आहे. पण, त्याचे काय आहे, आमची बायको म्हणत होती, की साखरपुडा- शालमुदी करावी म्हणून..."
"बरोबर आहे त्यांचे. पण,साहेब आता वेळच किती उरलाय? त्यात हा कार्यक्रम म्हटला, की भलतीच घाई होईल. नाही का?" पंचगिरींनी विचारले.
"मान्य आहे तुमचे. एक सांगू का, घाईगडबडीतच कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात." कुलकर्णी समजावण्याच्या सुरात म्हणाले.
"थोड्या वेळाने विचार करून सांगतो." पंचगिरी म्हणाले.
"तसे टेंशन घेऊ नका. साखरपुडा माझ्याच घरी आणि माझ्याच खर्चाने होईल. ठीक आहे. तुम्ही विचार करून दुपारपर्यंत कळवा. प्लीज नाही म्हणू नका. आमच्या गृहमंत्र्यांचा फारच आग्रह म्हणा हट्ट म्हणा..."
"चालेल. एक तासाने कळवतो. ठेवू?" असे विचारत पंचगिरींनी फोन ठेवला. तसे सारे कुटुंबीय त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
"कुलकर्णी साखरपुडा-शालमुदी करायची म्हणतात."
"एवढ्या घाईगडबडीत?" बाईंनी विचारले.
"हो. त्यांच्या पत्नीचा तसा आग्रह आहे म्हणे." पंचगिरी म्हणाले.
"त्यादिवशी तर काही म्हणाले नाहीत हो." सरस्वती म्हणाली.
"काल श्रीपालही म्हणत होते." छाया म्हणाली.
"अग बाई, ही बातमी आधी तुझ्यापर्यंत आली म्हणायची. म्हणजे प्रकरण फारच पुढे गेलंय की..." बाई म्हणाली पण तिच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येताच सारा दिवाणखाना हसण्यात न्हाऊन निघाला.
"कार्यक्रम त्यांच्याकडेच करु असेही म्हणाले." पंचगिरी म्हणाले.
"ते ठीक आहे हो. कार्यक्रम तिकडे काय, इकडे काय किंवा कुठेही असला तरीही मुलाची अंगठी,शाल, कपडे सोबत इतरांचे आहेर हा सारा खर्च आणि तयारी म्हटली, की वेळ..."
"सरस्वती, तुझे बरोबर आहे. पण, कसे आहे, आपली पडली पोरीची बाजू! मम् म्हणावेच लागणार. शिवाय सारा खर्च ते करणार आहेत. गनिमत त्यांनी हा कार्यक्रम तुमच्याकडेच करा असा हट्ट धरला नाही ते. तसा आग्रह केला असता तर आपल्याला नाही म्हणता आले असते का?" बाईंनी विचारले.
"पण वन्स... "सरस्वती बोलण्याचा प्रयत्न करत असताना तिला मध्येच थांबवून बाई समजुतीच्या आवाजात म्हणाली,
"अग,तू असा विचार कर ना की, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्या बाईंनाही वाटत असणार, की मुलाची, त्यांची स्वतःच्या काही हौसमौज व्हावी. तुला तुझ्या मुलीचा साखरपुडा नकोय का? उद्या आकाशचे लग्न ठरले तर तू असाच विचार करशील का?"
"वन्स, तसे नाही हो. मला का हौस नाही? पण, अंथरूण पाहून पाय पसरावेत असे मला वाटते."
"तुझे योग्यच आहे. पण केंव्हा अंथरूण आणि पाय आपलेच असतात ना तेव्हा. एकदा का उखळीत मुंडकं घातले ना, की मग घावांकडे लक्ष जाते का?" बाई म्हणाली.
"बाई, प्रश्न एका घावाचा नाही गं तर एकामागोमाग..."
"दयानंद, मला मान्य आहे. वर्ष- दोन वर्षात अलकाचेही हात पिवळे करावे लागणार आहेत. आकाशचेही शिक्षण चालू आहे. मनात नसताना, स्वतःच्या इच्छेविरुद्ध समाजासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. अजून एक लक्षात घ्या, तुमची बहीण म्हणते त्याप्रमाणे त्यांनी साखरपुडा कार्यक्रम आपल्याकडे करायचा हट्ट धरला असता तर काय आपण लग्न मोडले असते? ठीक आहे. एक प्रयत्न करता येईल. देशपांडे यांना फोन करून बघा." दामोदरपंतांनी रोखठोकपणे सांगितले.
"बरोबर आहे. तसेच करतो..." असे म्हणत पंचगिरी फोन लावून म्हणाले,
"नमस्कार..."
"बोला. पंचगिरी, बोला."
"देशपांडेसाहेब, हा काय नवीन प्रकार ?"
"काय झाले?" देशपांड्यांनी विचारले.
"कुलकर्णींचे असे म्हणणे आहे, की साखरपुडा, शालमुदी करावी."
"चांगलीच गोष्ट आहे की. मलाही त्यांचा फोन आला होता. सारा खर्च तेच करणार आहेत ना?"
"तरीही..." पंचगिरींना बोलू न देता देशपांडे म्हणाले,
"काय हे पंचगिरी? मुलीचे लग्न करताय तेव्हा एकमेकांच्या हौसमौज कराव्याच लागणार. दोन्ही कुटुंब आता जवळ आली आहेत तेव्हा त्यांचाही विचार करा."
"अहो, पण ...."पंचगिरीचे न ऐकता देशपांडे म्हणाले,
"दयानंदजी, शांतपणे विचार करा. गैरसमज नको. काय करणार हो, आम्ही पडलो मध्यस्थ! तेव्हा दोन्ही बाजूंचे ऐकावेच लागणार. होऊन जाऊ देत. असे प्रसंग एकदाच येतात. काहीही टेंशन घेऊ नका. अगदी आनंदाने हे कार्य पार पडणार आहे. ठेवू का?" असे विचारत देशपांड्यांनी फोन ठेवला.
दयानंद फोन खाली ठेवत मनाशीच परंतु सर्वांना ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाले,
"उंटाचा मुका घेऊ नये म्हणतात ते याचसाठी. चला भाऊजी..." दयानंदाचे वाक्य तोडत दामोदर म्हणाले,
"कुठे? मुका घ्यायला? उंटाचाच ना?..." त्यावर सारे खदखदून हसत असताना दामोदरपंत पुढे म्हणाले,
"कशासाठी जायचे? आमचा ज्येष्ठ जावयाचा आहेर घेण्यासाठीच ना?"
"भाऊजी, तो तर मिळेलच हो. पण, तुम्ही तर जणू गुडघ्याला भाशिंग..."
"का? बांधू नको?" दामोदरपंत हसत विचारत असताना बाई म्हणाल्या,
"मी बरी बांधू देईन..." बाईच्या बोलण्याचा आवेश आणि अंदाज पाहून सारे हसत सुटले.
"बाबा, मी येऊ का?" छायाने खाली पाहत विचारले.
"तू कशाला?" दयानंदांनी उलट प्रश्न केला.
"कशाला म्हणजे? अरे, तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा पहिला ड्रेस, अंगठी घ्यायची आहे. तिची पसंती नको का?" बाईंनी हसतच विचारले.
"श्रीपालचीही तशी इच्छा आहे..." हलके हसत छाया म्हणाली.
"बाई गं, बाई! एवढे पुढे गेलात तुम्ही?" सरस्वतीने विचारले.
"रात्री दोन-दोन वाजेपर्यंत फोनवर बोलतात... हळू आवाजातच बोलतात पण यांच्या बोलण्याने मला झोप येत नाही..." अलका हसत हसत तक्रारीच्या स्वरात म्हणाली आणि पुन्हा सारे हसले.
"आणि आजची 'ब्रेकिंग न्यूज' अशी आहे, की छायाताईला श्रीपालकडून नवा करकरीत मोबाईल मिळालेला आहे..." आकाश वेगळ्याच आवाजात म्हणाला.
"मोबाईल? सांगितले नाहीस आणि दाखवलाही नाही गं? आत्तापासूनच चोरी-चोरी, छुपके-छुपके का?" सरस्वतीने विचारले.
"त्यात काय आश्चर्य? आजकाल फॅशनच झालीय गं. ए आक्श्या, श्रीपाल तुझे मोठे मेहुणे आहेत त्यांना भाऊजी म्हणायचे..."
"ए आत्या, आजच कुठे भाऊजी झाले आहेत? होतील.. अक्षता पडतील तेव्हा म्हणेन.." आकाश म्हणाला.
"बाईआत्या, श्रीपालचेही म्हणणे आहे, की या दोघांनी त्याला भाऊजी न म्हणता मित्राप्रमाणे श्रीपाल म्हणूनच बोलवावे..." छाया सांगत असताना आकाश जोराने ओरडला,
"ए हुई बात! जिओ, मेरे जिज्जू..."
"आत्या, मी भाऊजी म्हणू का नको गं?" अलकाने विचारले.
"आता तुझे काय डोके फिरले?" सरस्वतीने विचारले.
"आई, तसे नाही गं. काल रात्री मला खूप झोप येत असताना श्रीपालभाऊजी आणि ताईचे संभाषण
ऐकावे लागले. त्यामुळे माझ्याही हातात एक ब्रेकिंग न्यूज आलीय..."
"अलके, लक्षात ठेव हं, काहीबाही सांगायचे नाही हं. नाही..." छायाला पूर्ण बोलू न देता आकाश पटकन म्हणाला,
"अलके, ताई काय म्हणतेय? तुझे खरेच काहीबाही चालू आहे का?"
"ए चूप रे! ताई, मी काहीही खोटं किंवा असंतसं काही सांगितले तर तू माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकू शकतेस..."
"अलके, कानाखाली आवाज काढीन हं." छाया लटक्या रागाने म्हणाली.
"हा माझा कान. हा कानाखालचा भाग आणि हा तुझा हात! काढ बरं आवाज. अगोदर ऐकून घे आणि मग खुशाल आवाज काढ... तर जगप्रसिद्ध पंचगिरी वाहिनीच्या अत्यंत हुशार निवेदिका अलका यांच्या हाती आलेल्या बातमीनुसार दयानंद नामक सद्गृहस्थाच्या लाडक्या कन्या कु. छाया यांचा विवाह श्रीपाल कुलकर्णी यांच्यासोबत नुकताच ठरला असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे नियोजित वधू छाया ही तिच्याशी सात जन्माच्या गाठी बांधू पाहणाऱ्या वरापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे."
"अलके?"
"ताई, आता तू माझ्या कानाखाली आवाज करु शकतेस..." तिला थांबवत सरस्वती म्हणाली,
"अग, पण हे सारे..." यावेळी सरस्वतीला अडवत छाया म्हणाली,
"आई, अलका म्हणते ते खरे आहे."
"झाले. सारे मुसळ केरात..." सरस्वती त्रागा करीत म्हणाली.
"अग, पण झाले तरी काय?" छायाने विचारले.
"मलाच विचारतेस? वयाने लहान असणाऱ्या मुलासोबत लग्न करतेस..."
"आई, फक्त दोन वर्षांनी तर लहान आहे."
"दोन वर्षे असोत, दोन महिने असू देत की दोन मिनिटांचे अंतर असू देत. लहानच ना..."
"आई, हे त्यांना माहिती आहे..."
"काय? हे श्रीपालला ठाऊक आहे?" सरस्वतीने विचारले.
"होय. त्याच्यासह कुलकर्णी कुटुंबातील सर्वांनाच हे समजले आहे. माझी पत्रिका देशपांडेकाकांनी त्यांना दिली तेव्हाच समजले आहे."
"तरीही कुलकर्णी कुटुंबीय तयार झाले?" सरस्वतीने आश्चर्याने विचारले.
"का होणार नाहीत? आखीर वो हमारे ताईपर फिदा है।" आकाश हसत म्हणाला.
"आई, त्या घरी याबाबतीत असाही विचार झाला, की अशी अनेक जोडपी असून त्यांचा संसार यशस्वीपणे चालू आहे. सचिनची बायको त्याच्यापेक्षा म्हणे चार वर्षांनी मोठी आहे..."
"असेल किंवा नसेल. ती बडी मंडळी! त्यांच्या टी. सी. आपण पाहिल्या आहेत का? मोठ्या लोकांनी काहीही केले तरी त्यांचे कौतुक करण्याची परंपरा आपल्याकडे आहे पण तीच गोष्ट आपल्यासारख्या सामान्य माणसाने केली तर टीकेचे धनी व्हावे लागते..." सरस्वती बोलत असताना बाईंनी अचानक विचारले,
"कोण हा सचिन? आपल्याकडे तर कुणाचे नाव सचिन नाही."
"अग, तुला माहिती नाही? अग, सचिन गं... सच्च्या गं..." दामोदरपंत म्हणाले आणि सारे खळाळून हसले.
"आता कसं हो? तुम्ही अशी कशी पत्रिका पाहिली? तुमच्या लक्षात आले कसे नाही?" सरस्वतीने दयानंदांकडे बघत काळजीयुक्त स्वरात विचारले.
"अग, छायाची पत्रिका तिकडे पाठवली होती. मुलाची पत्रिका आपल्याकडे कुठे आली होती? जाऊ देत, मियाँ-बिबी राजी और साथ मे समधी-समधन राजी तो हम क्या करे? होऊन जाऊ देत..." पंचगिरी वेगळ्याच अंदाजाने म्हणाले.
"शिवाय ही गोष्ट कुणाला कळणार आहे?" दामोदरपंतांनी बाईंकडे बघत विचारले.
"आम्हाला कळलीय बरे ही गोष्ट! 'तोंडात तीळ भिजत नाही' अशी माझी ख्याती असली तरीही ही बाई कुणाला म्हणजे कुणालाही सांगणार नाही..." बाई नाटकी स्वरात म्हणाली.
"आणि तू सांगितले तरी कावळ्याच्या शापाने ढोरं मरत नाही बरे..." दामोदरपंत बाईला चिडविण्याच्या उद्देशाने म्हणाले. नवरा-बायकोचा तो कलगीतुरा ऐकत सारे हसू लागले.
"सरस्वती, दयानंद आता ही गोष्ट इथेच विसरून जा. उगीच त्याचा बागुलबुवा करू नका." बाई काहीशा अधिकारवाणीने म्हणाल्या.
"दयानंद, असे करूया का, आपण दोघांनी खरेदीसाठी जाण्यापेक्षा ... नाही तरी जनरेशन गॅपची हवा आहे, त्यामुळे आपली पसंती कदाचित श्रीपालला आवडणार नाही त्यापेक्षा..." वाक्य अर्धवट सोडत दामोदरपंतांनी सहेतुक आकाशकडे पाहिले.
"या घरातील सर्वात लहान व्यक्ती या नात्याने मी सर्वांना आदेश देतो, की श्रीपालचे कपडे, अंगठी आणि इतर खरेदी करण्यासाठी श्रीपालसोबत छायाताईने जावे. तथास्तु!" आकाशचा खेळकर, खोडकर स्वर ऐकून सर्वांना हसणे आवरणे अवघड जात होते.
"अहो, श्रीपालला फोन करून खरेदीचे सांगा आणि जेवायलाच या म्हणावे."
"आई, त्याची गरज नाही. इतक्यात श्रीपाल येतीलच. शिवाय ते म्हणाले, की बाहेरच जेऊया..." छाया जरा हलक्या, संकोची आवाजात म्हणाली.
"अगबाई, प्रकरण तर बरेच पुढे गेलंय की. यासाठीच तुला मोबाईल गिफ्ट दिलाय का?" बाईंचा स्वर आणि सूर ऐकून सारे पुन्हा हसायला लागले.
काही क्षणातच श्रीपालची मोटारसायकल घरासमोर थांबली. श्रीपाल आत येताच पंचगिरींनी त्याचे स्वागत केले.
"माफ करा हं. मी अचानक... न कळवता आलो." श्रीपाल म्हणाला.
"नाही हं, भाऊजी. तसे मुळीच नाही. तुमचा संदेश मिळालाय की... तुम्हीच घेऊन दिलेल्या मोबाईलवर..." अलका म्हणाली आणि ते ऐकून श्रीपालने मंद स्मित केले.
"काय घेणार? चहा की कॉफी?" सरस्वतीने विचारले.
"अग, जावायाला असे विचारायचे असते का? उपमा, पोहे-शिरा कर. नाही तर पटकन जेवायचेच कर ना." पंचगिरी म्हणाले.
"नको. नको. खरेच नको. आत्ताच पोटभर जेऊनच आलोय. बिलकुल भूक नाही. चहा चालेल."
"बरोबर आहे, भाऊजींचे! मोबाईलवर ताईसोबत बोलून बोलून पोट भरत असेल आणि आता तर काय बाहेर जायचे आहे." आकाश म्हणाला आणि सर्वांसोबत श्रीपाललाही हसू आवरता आले नाही. थोड्यावेळाने चहापाणी झाले आणि नियोजित वधूवर बाहेर गेले.
"काय बाई, आजची ही तरूणाई आणि धिटाई... बघा कसे हसत-खिदळत निघून गेले. नाहीतर आम्ही... आजही नवऱ्यासोबत कुठे जायला मन धजावत नाही." बाई म्हणाली.
"नाही तर काय? तरी बरे, दोघांचीही घरे एकाच गावात आहेत. वेगवेगळ्या गावी असले म्हणजे आजची मुलं चक्क एकमेकांच्या घरी मुक्कामाला जाऊ लागलेत..."
"काय सांगतेस सरस्वती तू?" बाईंनी विचारले.
"वन्स, खरेच हो. गेले वर्षी माझ्या भाचीचे म्हणजे लक्ष्मीच्या पोरीचे लग्न ठरले. सोयरिक झाली आणि लग्न चार महिन्यांनंतर होते. दोघेही अनेकदा एकमेकांच्या गावी... घरी राहायला गेले..." सरस्वती बोलत असताना आकाश म्हणाला,
"आई, तुला पुढचे माहितीच नाही..."
"आणखी काय दिवे लावले त्यांनी?" सरस्वतीने विचारले.
"अग, ते दोघे लग्नाच्या आधीच दोन दिवस महाबळेश्वरला जाऊन आले."
"काय सांगतोस तू? ऐकावे ते नवलच! लग्नाच्या आधी? बाप रे! शीः शीः..." सरस्वती रागारागाने बोलत असताना आकाश-अलकाने नकळत एकमेकांना टाळी दिली.
"अहो, मंगलकार्यालयात जाऊन शिल्लक असलेल्या तारखा बघितल्यात का? कुलकर्णींना तर सावधान मंगलकार्यालयच हवे आहे. थोडे महाग आहे का हो?" सरस्वतीने विचारले.
"थोडे महाग असले तरीही आपल्या सोईचे आहे. शिवाय जाण्या-येण्याचा, सामानाची ने-आण करण्याचा खर्च तर वाचेल की. तू सांगायच्या आधीच कार्यालयात जाऊन आलो. पुढच्या महिन्यातील तीन तारखा शिल्लक आहेत. बाकी हाऊसफुल्ल" असे म्हणत दयानंदांनी लिहून आणलेल्या तीनही तारखा सांगितल्या.
"तीनच दिवस शिल्लक आहेत? याशिवाय दुसऱ्या नाहीत. बाप रे! घोळच झाला की..."
"का गं, काय झाले?" बाईंनी काळजीने विचारले.
"वन्स, आता कसे सांगू? हेच दोन-तीन दिवस छायाच्या अडचणीचे आहेत."
"हात्तीच्या! एवढेच ना? अग, देता येतील, की गोळ्या?"
"अहो, पण दुर्दैवाने गोळीचा फायदा झाला नाही तर?"
"आपण त्या गोळ्यांच्या कंपनीवर फसवणुकीचा दावा ठोकू..." आकाश म्हणाला.
"ए गप्प रे! उगाच बडबड करू नकोस. अहो, एकदा परत जाऊन खात्री करा ना. नाही तर असे करा, फोन तरी लावा. जमले तर जमले सहजासहजी!" सरस्वती काकुळतीने म्हणत असल्याचे पाहून दयानंदांनी अनिच्छेने सावधान मंगलकार्यालयात फोन लावला.
"हॅलो, मी पंचगिरी बोलतोय. काल संध्याकाळी चौकशीसाठी आलो होतो. हो. हो. सांगितले होते तुम्ही. नाही तसे नाही. दहा मिनिटात फोन करतो..." फोन बंद करून सरस्वतीकडे बघत पुढे म्हणाले,
"बघ. तुला म्हणालो होतो. दुसरी तारीख नाही. कुलकर्णींना विचारावे लागेल..." असे म्हणत त्यांनी कुलकर्णींना फोन लावून म्हणाले,
"मी दयानंद बोलतोय. हो. हो. तुम्ही म्हणताय तर आम्हाला नाही कसं म्हणता येईल साहेब? मी यासाठी फोन केला होता, की मी काल मंगलकार्यालयात चौकशी केली, आताही त्यांना फोनवर बोललो असता पुढल्या महिन्यात तीन तारखा शिल्लक आहेत. बाकी सगळ्या तारखा आरक्षित आहेत. कसे करू? करायची का तीन तारखांपैकी एक तारीख बुक? ठीक आहे. लगेच जाऊन आरक्षित करतो..." असे म्हणत दयानंद लगबगीने आत गेले. कपाटातून पैसे काढून पुन्हा बाहेर आले.
"भाऊजी, चला..." दामोदरपंतांकडे बघत म्हणाले.
"अहो, पण छायाच्या अडचणीचे काय?" सरस्वतीने विचारले.
"सरस्वती, अगोदर कुलकर्णींचा हट्ट लक्षात घ्यायला हवा. कार्यालयात दुसरी तिथी शिल्लकच नसेल तर दयानंद काय करेल? राहता राहिला प्रश्न छायाच्या अडचणीचा तर त्यासाठी भारीची, चांगल्या कंपनीची गोळी आणू. आजकाल हे सर्रासपणे चाललंय. कसे आहे, नवरीची नैसर्गिक अडचण पुढे ढकलणं, थोपवणं आता सहज शक्य आहे परंतु कार्यालयाचे तसे नाही. तिथे कोणतीच गोळी चालत नाही. चालतो फक्त पैसा. अग, आजकालच्या पोरींच्या नशिबाने गोळ्यांची व्यवस्था तरी झाली आहे. आपल्या काळात काय होते?" बाईने समजूतीच्या स्वरात विचारले.
"वन्स, मला सगळे पटतेय हो. परंतु त्यामुळे प्रसंग फार वेगळे यायचे. एकदा असाच प्रसंग घडला. माझ्या चुलत भावाचे म्हणजे कृष्णादादाचे लग्न होते. ठरलेल्या दिवशी सायंकाळी वधूवरांचे बिऱ्हाड, इतर पाहुणे मंडळी कार्यालयात पोहचली. सीमांतपूजन झाले परंतु वाङनिश्चयासाठी वधू यायलाच तयार नव्हती..." सरस्वती सांगत असताना आकाश म्हणाला,
"मामी रुसली होती काय? बनारशीसाठी की..."
"आकाश, किती वेळा सांगू, भलतंसलतं बोलू नको म्हणून. सीमांतपूजन चालू असताना तिला तिकडे कावळा शिवला... " बोलताना सरस्वती थांबल्याचे पाहून दामोदरपंतांनी विचारले,
"धत् तेरे की! मग काय झाले? बिऱ्हाडं वापस गेली की काय?"
"नाही. चर्चा आणि चर्चा! दोन्हीकडील गुरु एकत्र बसले. त्यांनी काही तरी मार्ग काढला आणि ठरलेल्या वेळी लग्न लागले."
"झाले तर मग. तू कशाला टेंशन घेतेस? गोळीने नाही जमले तर गुरूंना गळ घालू." दयानंद म्हणाले.
"अग, हे काहीच नाही. माझ्या लग्नानंतर पाच-सहा वर्षानंतर माझ्या नणंदेचे लग्न झाले. वराकडील वरात पोहोचली. आपलेही सारे पाहुणे पोहोचले. त्याकाळातील प्रवास म्हणजे महाकठीण काम! सीमांतपूजनाची गडबड सुरू असताना 'नवरी बाजूला बसली!' ही बातमी वाऱ्यासारखी पसरली."
"मग?"
"मग काय? चौथ्या दिवशी लग्न लागले. दोन्हीकडील जमलेली पाहुणेमंडळी तीन दिवस डेरा टाकून होते." बाई म्हणाल्या.
"अग बाई, तीन दिवस पाहुण्यांची व्यवस्था? केवढा ताप?" सरस्वतीने विचारले.
"भाऊजी चला. इथे आपण 'कावळा शिवला रे शिवला' या गोष्टी ऐकत बसलो तर तिकडे मंगलकार्यालयात एखादा डोमकावळा चोच मारून शिल्लक तारीख बळकावून बसायचा." पंचगिरी म्हणाले आणि दोघेही हसतहसत निघाले...
"बरे झाले वन्स, तुम्ही आणि भाऊजी सहज आलात ते. फार मोठी चिंता मिटलीय माझी. आता तुम्हीच आमच्या लग्नासाठीच्या पहिली सवाष्ण..." सरस्वती बोलताना बाई मध्येच म्हणाली,
"तो मान दुसऱ्या कुणाला देऊन तर बघ. मग मी आहे नि तू आहे..." बाईंचा आवेश पाहून सारे हसायला लागले.
"चला. तयार व्हा. आज अंतिम सामना आहे."
"आक्या, सामना बिमना विसर हं. लग्न घर आहे. शंभर कामे आहेत." सरस्वती म्हणाली.
"आकाश्या, सचिन फलंदाजीला आला की सांग बरे." बाई म्हणाली.
"आत्या, तू सामना बघणार आहेस?" आकाशने आश्चर्याने विचारले.
"तुला त्यात आश्चर्य का वाटले?" बाईने विचारले.
"तसं नाही गं. मागे तू आली होतीस तेव्हा मी सामना बघतोय म्हणून कितीतरी वेळा झाप- झाप झापले होते आणि आज तुच सामना बघायचा म्हणतेस?"
"अरे, तेव्हाची गोष्ट वेगळी होती रे. तेव्हा सचिन एवढा चांगला खेळतो हे मला कुठे माहिती होती रे?" बाईंनी हसत म्हटले.
"अग आई, घोळच झाला, की ग. तीन तारखेला लग्न? बाप रे, बाप!"
"का रे, काय झाले? तुझी परीक्षा आहे का?"
"परीक्षेचे सोड गं. अग,परीक्षा असती ना तर ड्रॉप घेऊन सामना बघितला असता पण त्यादिवशी वर्ल्डकपची फायनल आहे गं. पण आता ताईचे लग्न आहे आणि आपण पडलो मुलीकडचे. वराकडील लोक म्हणतील तीच पूर्वदिशा! त्यांची आज्ञा शिरसावंद्य! आत्या, तुला सांगतो, तीन तारखेला जर माझे लग्न असते ना, तर तारीख बदलायला लावली असती..."
"कोणती तारीख? सामन्याची तारीख पुढे ढकलली असती ?" बाईने हसत विचारले. तसा हसतहसत आकाश म्हणाला,
"माझ्या लग्नाची तारीख ग..."
"आणि नवरीकडील तारीख बदलली नसती तर?" अलकाने विचारले.
"ती नवरी,तो वधूपक्ष, आणि ती तारीख गेली असती उडत! लग्नापूर्वीच घटस्फोट..." आकाश म्हणाला आणि दिवाणखान्यात झालेल्या हास्यस्फोटात बाई म्हणाल्या,
"अरे, आकाश, एक कर ना रे..."
"ते काय?"
"अरे, मंगलकार्यालयात मोठ्या टीव्हीची व्यवस्था कर आणि तो पडदा वधूवराच्या पाठीमागे लाव म्हणजे सर्वांना दिसेल." बाई उत्साहाने म्हणाली.
"व्वा! आत्या, व्वा! ग्रेटच!..." आकाश खुश होत म्हणाला. पाठोपाठ तो आणि अलका आतल्या खोलीत गेले.
"पण वन्स, तुमचा आणि क्रिकेटचा तसा छत्तीसचा आकडा! असे असताना तुम्हाला लागलेली क्रिकेटची आवड म्हणजे पाकिस्तानाने काश्मीरचा हक्क सोडल्याप्रमाणे!"
"बोडक्याची आलीय आवड आणि कशाचा आलाय काश्मीरचा प्रश्न? ते म्हणतात ना, 'सभा हसली, की माकड हसलं'! असे माझे क्रिकेटचे प्रेम! वेळ जावा म्हणून सुरुवातीला इतरांनी टाळ्या वाजवल्या, की मी वाजवायला लागायची! पाहणे आणि समजणे यात फार फरक आहे. नुसता आपला टाइमपास! सून आल्यापासून घरात मला काही काम नाही. सामना सुरू झाला, की घरातले सारे सामना बघतात. जप, तप, व्रत करावे तरी किती आणि तशात सचिन नावाचं रत्न झळाळू लागताच त्याच्या चौकार, षटकाराची, शतकाची आणि द्विशतकाची मजा लुटते."
"खरे आहे तुमचे. वन्स, आमच्याकडे तीच स्थिती आहे. हे चौघेही सामना बघतात. मला क्रिकेटचे ओ का ठो कळत नाही. सुरूवातीला तर गंमत यायची. मी गांगुलीला सचिन, सचिनला द्रविड समजत असे. झेल घेतल्यानंतर खेळाडू नाचू लागले की, सचिनने षटकार ठोकला का असे विचारत असे. अंपायरला कॅप्टन आहे का? असे विचारले, की हे सारे हसत सुटायचे. पण त्यातही मजा यायची." सरस्वती म्हणाली आणि चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली...
**