अष्टविनायक भाग १
श्री गणेशाची असंख्य रूपे आहेत .
गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात.
त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात.
असे असले तरी, महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे.
या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते.
गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक,म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.
गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.
हे नवसाला पावणारे गणपती आहेत असे मानले जाते.
वर्षातून एकदा ही यात्रा करणे हा अनेक भक्तांचा नेम असतो .
अष्टविनायक महिमा व गीते अनेक चित्रपटातून गायली गेली आहेत .
संपूर्ण अष्टविनायक दर्शन व त्याची महती सांगणारी कथा “अष्टविनायक” या चित्रपटात गुंफली आहे .
पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे.
या सर्व देवळांना पूर्वी पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळापासून महत्त्व प्राप्त झाले आहे .
श्री गणेशाच्या असंख्य मूर्ती तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले.
याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते.
अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते.
पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत.
या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे आहेत उजव्या सोंडेचा गणपती कडक मानला जातो .
या सर्व गणपतींचे वर्णन एका श्लोकात केले आहे .
स्वस्ति श्री गणनायकम गजमुखं मोरेश्वरम सिद्धीदम |
बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम ||
लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वरम ओझरम |
ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम ||
शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा अशी करतात .
श्री. मोरेश्वर – मोरगाव,श्री. सिध्दीविनायक – सिध्दटेक,श्री. बल्लाळेश्वर – पाली,श्री. वरदविनायक – महड. चिंतामणी – थेऊर,श्री. गिरीजात्मज – लेण्याद्री,श्री. विघ्नेश्वर – ओझर,श्री. महागणपती – रांजणगाव
अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून मोरगावचा मोरेश्वर किंवा मयुरेश्वर ओळखला जातो.
बारामती तालुक्यात पुणे जिल्ह्यात हे गाव आहे येथून जवळच जेजुरी देवस्थान आहे.
मोरेश्वर हे श्री गणेशाचे हे आद्यपीठ आहे . पुण्यापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगांव या गावी कऱ्हा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. या परिसराला 'भूस्वनंदा' या नांवानेसुद्धा ओळखले जाते. मोरगांव याचा शब्दशः अर्थ मोरांचे गांव असा आहे. कोणे एके काळी या गांवाचा आकार हा मोराप्रमाणे तर होताच शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोरांची वस्ती होती. म्हणून या गांवाला मोरगांव म्हटले जाते. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.
थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी मोरेश्वराच्या पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. श्री समर्थ रामदास स्वामींना 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही आरती याच मंदिरात स्फुरल्याचे म्हटले जाते.
मंदिर आणि मूर्ती दोन्ही प्राचीन आहेत
मंदिराच्या गाभा-यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे, मूर्ती अतिशय नयनमनोहर आहे.
डाव्या सोंडेची ही मूर्ती असून उत्तराभिमूख आहे.
उजवा गुडघा छातीजवळ घेऊन बसलेल्या या श्रींच्या डाव्या हातात मोदक आहे.
या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत.
यामुर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे.
मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळाच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात शमी, मंदार, बेल यांची वृक्ष आहेत. अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फुट उंचीची तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत. मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत.
त्या नंदीपुढे मोठे, चपटी व दगडी असे कासव आहे. या कासवापुढे मुख्य मंदीर लागते. ते दगडी पाषाणातले असून तेथेही एक मोठा उंदीर आहे..
... देवळाच्या सभोवताली त्याच्या संरक्षणार्थ पक्का तट बांधण्यात आलेला आहे.
जमिनीपासून ह्या तटाची उंची साधारण पन्नास फूट असेल.
चार दिशेला चारी कोपऱ्यात मिनारासारखे चार स्तंभ उभे असलेले आढळतात.
तटाच्या आतल्या बाजूला चौकाच्या आठ कोपऱ्यांवर श्रीगणेशाच्या आठ प्रतिमा बसविलेल्या आहेत.
तेवीस परिवाराने या मूर्ती नवीन करून घेतलेल्या आहेत.
मंदिराचे तोंड उत्तरमुखी आहे.
मंदिर उंचवट्यावर असल्यामुळे मंदिरात शिरण्यापूर्वी पायर्या चढाव्या लागतात .
क्रमश: