निघाले सासुरा - 8 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निघाले सासुरा - 8

८) निघाले सासुरा!
'आहेर द्यायचे आणि घ्यायचे!' सरस्वतीच्या हट्टापुढे सर्वांनी माघार घेतली. सर्वांनी एकत्र बसून पत्रिका, निमंत्रणं कुणाला द्यायची यासंदर्भात यादी तयार केली. ते काम अंतिम टप्प्यात असताना सरस्वती आकाशाला म्हणाली,
"आकाश, त्या नमुन्याला... अरे, मला म्हणायचे होते, तुझ्या दिगुकाकांना फोन कर. पत्रिकांचे चांगले नमुने घेऊन ये म्हणावे..." सरस्वतीच्या स्पष्टीकरणानंतरही तिथे चांगलीच खसखस पिकलेली असताना छायाने एक पत्रिका सर्वांना दाखवली. तिने विचारले,
"आई, आत्या, ही पत्रिका कशी वाटतेय..." तसे आकाश- अलकाने एकमेकांकडे सहेतुक पाहिले.
"व्वा! व्वा! छान! सुरेख! अशी पत्रिका मी तर प्रथमच पाहतोय." दामोदर म्हणाले.
"अग, पण फार भारीची वाटतेय ग." सरस्वती म्हणाली.
"आई, आपल्या लाडक्या छायाताईचे लग्न म्हटल्यावर असं हजार-पाचशे रुपयाकडे पाहून कसं चालेल?" आकाशने विचारले.
"श्रीपालकडे ह्याच पत्रिका छापणार आहेत." छाया म्हणाली.
"दॅटस् इट! मला वाटलेच होते." आकाश म्हणाला.
"मलाही संशय आलाच होता." अलका म्हणाली.
"मग तर नक्कीच महाग असणार. तुझ्या सासरचे काय बाई, सागरातले पाणी घडाभर कमी का जास्त! भरती-ओहोटी चालूच असते." सरस्वती म्हणाली.
"आई, आधी ऐकून घेत जा ग. अग, श्रीपालच्या मित्राचे दुकान आहे. तो मित्र श्रीपालसोबत आपल्यालाही 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर छापून देणार आहे." छाया म्हणाली.
"छाये, तसे काही नसते ग. असे तत्त्व घेऊन व्यापारी वागले ना तर त्यांना दुकानाला टाळे लावावे लागेल..." सरस्वती समजावून सांगत असताना बाहेर मोटारसायकल थांबली आणि पाठोपाठ आत आलेल्या व्यक्तीला पाहताच बाई म्हणाली,
"डिग्या, ये रे बाबा."
"भाऊजी, शंभर वर्षे आयुष्य आहे हो तुम्हाला. आकाशला तुम्हालाच फोन करायला सांगत होते." सरस्वती बोलत असताना आकाशने छायाच्या हातातील पत्रिका घेऊन ती दिगांबरकडे देत म्हणाला,
"दिगुकाका, ही पत्रिका बघ बरे."
"अरे, व्वा! खूप सुंदर! अजून बाजारात मोठ्या प्रमाणात आलेली नाही. बरीच भारी आहे बरे."
"बघ छाये, मी म्हणत होते ना. पत्रिकेचा नट्टापट्टाच सांगतो हो. भाऊजी, काय भाव असेल हो या पत्रिकेचा?" सरस्वतीने विचारले.
"वीस-पंचवीस रुपयास एक पडेल."
"बाप रे! एवढी महाग? नको ग बाई, अशी उधळपट्टी!"
"आई, श्रीपालचे म्हणणे आहे, की दोन्ही कुटुंबीय हीच पत्रिका छापूया. दिगूकाका, श्रीपालच्या मित्राचे पेपरमार्ट आहे." छायाने सांगितले.
"मला माहिती आहे. मी तिथूनच खरेदी करतो. पण त्याचे काय?" दिगांबरने विचारले.
"श्रीपालचा मित्र असल्याने तो म्हणतोय, की त्याने ज्या भावात खरेदी केल्या आहेत त्याच भावात म्हणजे पाच रुपयाला एक याप्रमाणे आपल्याला देतो."
"घेऊन टाका. डोळे झाकून, काहीही विचार न करता आणा. हलक्यात हलकी म्हटली तरीसुद्धा या भावात मिळणार नाही. छापायची जबाबदारी माझी."
"दिगांबर, मुद्दल भावात पत्रिका! तसे ना नफा ना तोटा याप्रमाणे छपाईही..." दामोदरांचे वाक्य तोडत दिगांबर पटकन म्हणाला,
"भाऊजी, पुतणीचे लग्न आहे. 'घरचा आहेर' म्हणून पत्रिकाच छापून देतो..." दिगांबरला पुढे बोलू न देता सरस्वती ताडकन म्हणाली,
"वा रे वा! म्हणे घरचा आहेर! कागदी घोड्यांचा आहेर करून सुटका करून घेता काय?" सरस्वती म्हणत असताना दामोदर म्हणाले,
"पण तुझे बंधूराज आहेरबंदी करायची म्हणतात." .
"चांगलेच आहे. परंतु घरचा आहेर घ्यावाच लागतो. आकाश, घेऊन ये या पत्रिका. आमच्याकडे साचा तयारच असतो. टाकू पटकन छापून." दिगांबर म्हणाला.
"डिग्या, चांगल्या छाप रे बाबा. काही चूक करू नकोस." बाई म्हणाली.
"बाई, चुका केल्याशिवाय, गिऱ्हाइकांच्या शिव्या खाल्ल्याशिवाय आमच्या धंद्यात मजा तर येतच नाही आणि बरकतही येत नाही."
"म्हणजे? मुद्दाम चुका करता की काय?" दामोदरपंतांनी विचारले.
"भाऊजी, करायच्या म्हणून कुणी चुका करीत नाही हो. नकळत होतात."
"त्या कशा रे?" दयानंदांनी विचारले.
"कसे असते, लग्नसराईच्या दिवसात आमचा साचा तयार असतो. कुणाची पत्रिका छापायला आली, की वधूवरांची नावे, विनित, विवाह मुहूर्त, कार्यस्थळ अशा ठळक बाबी बदलून पत्रिका छापून देतो. बाकी पत्रिकेत असतो तो श्लोक, प्रसन्न असलेली देवता इत्यादी सर्व सामान्य बाबी बदलायची गरज नसते. भाऊजी,जे आवश्यक बदल करायचे असतात ना ते करताना असा काही गोंधळ होतो ना की बस्स!"
"एखादे उदाहरण सांगशील?" दामोदरपंतांनी उत्सुकतेने विचारले.
"भाऊजी, एकच उदाहरण का? अनेक आहेत. एकदा गडबडीत एक पत्रिका छापण्यासाठी आली. तो माणूस बसूनच होता. त्या माणसाच्या गडबडीने झाले काय तर जुन्या साच्यात बदल करताना वराचे नाव, वराच्या वडिलांचे नाव बदलले पण जुन्या साच्यातील वधूचे आणि तिच्या पिताश्रीचे नाव तसेच राहिले..."
"म्हणजे?" पंचगिरींनी विचारले.
"दादा, झाले काय तर 'वर' बरोबर छापल्या गेला पण त्याच्यासमोर त्याच्या नियोजित वधूचे नाव न छापता अगोदरच्या पत्रिकेतील वधूचे नाव छापल्या गेले."
"अरे, बाप रे! मोठीच भानगड झाली म्हणायची. पुढे काय झाले?"
"पत्रिका छापून झाल्या. तो माणूसही पत्रिका घेऊन गेला. पत्रिका वाटप झाल्या आणि मग ती चूक कुणाच्या तरी लक्षात आली."
"व्वा! मग वादावादी, भांडणं झाली असतील की."
"ती का टळणार आहेत? एकदा असेच झाले, आधीच्या पत्रिकेत प्रथम वर आणि नंतर वधू अशी रचना होती. परंतु नवीन पत्रिका वधूकडील असल्यामुळे 'वधू-वर' असा क्रम करायचा होता. आम्ही वर-वधूची नावे बरोबर टाकले परंतु झाले काय तर वराखाली वधू आली..." दिगंबर सांगत असताना दामोदर पटकन म्हणाले,
"ती तर खाली येणारच ना? त्यासाठीच लग्न करतात ना?" ते ऐकून सारे हसत असताना स्वतःचे हसू आवरत बाई ताडकन म्हणाली,
"अहो, हे काय? जीभेला काही हाड आहे का नाही? जरा पोरांचा तरी विचार करायचा?"
"अग, ही पोरं आपल्यापेक्षा पुढे आहेत. आपल्याला जे माहिती नाही ते यांना माहिती आहे. का रे आकाश?" दामोदरपंतांनी अचानक प्रश्न विचारल्यामुळे गडबडलेला आकाश अचानक पटकन म्हणाला,
"ह.. ह..हो.. मामा..." सारे पुन्हा हसत असल्याचे पाहून आपण काय बोलून गेलो हे लक्षात येताच आकाश इकडेतिकडे बघत असताना दिगंबर म्हणाला,
"भाऊजी, तसे नाही हो. 'वर' या शीर्षकाखाली वधूचे नाव आले तर 'वधू' या शीर्षाखाली वराचे नाव छापल्या गेले. झाली की बोंबाबोंब!"
"किती भयानक रे." बाई म्हणाल्या.
"अग बाई, एकदा तर पत्रिका जोश्यांची आणि प्रेषक कांबळे असा प्रकार झाला"
"माय गॉड!तो कशामुळे रे डिगुकाका?" छायाने विचारले.
"छाया अग, पत्रिकेचा अगोदरच ढाँचा कांबळे यांचा होता. प्रेषक म्हणून असलेले कांबळे नाव जोश्यांच्या पत्रिकेत तसेच राहून गेले. बदललेच नाही."
"केवढा राडा झाला असेल रे?" आकाशने विचारले.
"अरे, एकदा 'विनित' म्हणून पूर्वीच्या पत्रिकेत दहा पती-पत्नींची नावे होती. योगायोगाने दुसऱ्या पत्रिकेतील विनितांची संख्या तेवढीच होती. नावे बदलताना झाले काय, तर नवरे मंडळीची नावे नवीन पत्रिकेतील टाकली पण बायकांची नावे मात्र पहिल्याच पत्रिकेतील राहून गेली."
"म्हणजे डिगुकाका नवऱ्यांच्या बायकांची नावे पार बदलून टाकलीस की."
"अलके, तुझा डिगुकाका बायकांची नावेच काय पण बायकाही बदलायला मागेपुढे पाहणार नाही."
सरस्वती हसत म्हणाली.
"वहिनी, तुम्हीपण? अहो, एकदा लग्नाची तारीख चक्क सहा महिन्यांपूर्वीच छापल्या गेली."
"डिगुकाका, एवढ्या गंमती घडतात?" अलकाने विचारले.
"तर मग? आपल्याकडे देवतेचा फोटो आणि त्याखाली ती देवता प्रसन्न म्हणून नाव छापण्याची पद्धत आहे. लग्नसराईच्या गडबडीत अनेकदा गणपतीच्या फोटोखाली 'मारोती प्रसन्न' असे छापल्या जाते."
"म्हणजे डिग्या, 'करायला गेलो गणपती, झाला मारोती' असे करताना डोके ठिकाणावर ठेवून कामे करावीत रे." बाई म्हणाल्या.
"बाई, कितीही विचारपूर्वक कामे केली ना तरीही अशा चुका होतात ग. एक तर खूप गर्दी असते. माणसे बसून असतात. शिवाय हा काळ आमचा सिझनचा काळ असतो. रात्र-रात्र जागून कामे करावी लागतात. एकदा तर नवीन पत्रिकेत 'कार्यस्थळ: नांदेड' असे छापायचे होते परंतु जुन्या पत्रिकेतील 'उमरखेड' हे विवाहस्थळ बदलायचे राहून गेले. सारे वऱ्हाडी नांदेड ऐवजी उमरखेडला पोहोचले." दिगंबर म्हणाला.
"पण भाऊजी, तुमची झालेली चूक उमरखेडला पोहोचेपर्यंत कुणाच्याही लक्षात आली नाही हेही एक आश्चर्याच म्हणावे लागेल." सरस्वती म्हणाली.
"वहिनी, हे तर काहीच नाही. मोठ्या शहरातील कार्यस्थळ लवकर सापडावे म्हणून आजकाल कार्यस्थळाचा संपर्क क्रमांक छापण्याची पद्धत सुरु झाली आहे. एकदा काय झाले, हैदराबाद मुक्कामी असलेल्या कार्यस्थळाचा संपर्क क्रमांक छापताना दोन अंक तेराचे झाले बारा.."
"म्हणजे वऱ्हाडाचे बाराच वाजले असणार."
"हो ना.बसस्थानक, रेल्वेस्थानकावर उतरलेल्या लोकांनी पत्रिकेतील संपर्क क्रमांकावर विचारणा करताच तिकडून व्यवस्थित पत्ता सांगितल्या जाऊ लागला. मात्र तिथे पोहोचल्याबरोबर कुणाच्या तळपायाची आग मस्तकात शिरू लागली तर अनेकांचा आनंद गगनात मावत नव्हता."
"का रे? असे काय झाले?" दामोदरपंतांनी विचारले.
"अहो, आम्ही पत्रिकेत छापलेला तो क्रमांक चक्क एका डान्सबारचा होता."
"आई गं आई! डिग्या, तू लहानपणापासूनच बदमाश रे. मुद्दाम करीत असशील अशा गोष्टी."
"बाई, तसे नाही ग. धंद्यात मुद्दाम असे काही करत येत नाही."
"अरे, गंमत केली रे." बाई म्हणाली.
"एकदा तर चक्क वराचा विवाह वराशी अशी पत्रिका छापल्या गेली. त्याचे काय झाले, नवीन पत्रिका जुळवताना डावीकडे असलेल्या वधूचे नाव बदलून नवीन वराचे नाव टाकण्यात आले परंतु, गडबडीत उजव्या बाजूला पूर्वीच्या वराचे नाव तसेच राहिले. तिथे टाकायचे होते ते वधूचे नाव टाकलेच नाही. दोन्ही बाजूस वराचेच नाव छापल्या गेले."
"बाप रे बाप! केवढी मोठी घोडचूक झाली रे." बाई म्हणाली.
"बरे ठीक आहे. असेच बोलत राहिलो तर आमच्या गमतीजमती.... घोटाळ्यांवर चक्क कादंबरी होईल. ह्या पत्रिका एकदम मस्त आहेत. भरपूर स्वस्त आहेत. आपण झक्कास छापूया."
"भाऊजी, डोळ्यात तेल घालून पत्रिका छापा हो. नाही तर आत्ता सांगितले तसे प्रकार करू नका."
"वहिनी, काहीही काळजी करू नका. अगोदर 'प्रुफ' घरी आणतो. मगच छापतो. येतो मी." म्हणत दिगांबर निघून गेला...
"परवा अकरा वाजता साखरपुडा ठरलाय. कुलकर्णी यांनी आमंत्रण दिले आहे. मी त्यांना दहा माणसे येतील असे सांगितले आहे. बाजारातून काय काय आणायचे आहे? अग, छाया आणि श्रीपालचे कपडे, अंगठी कुठे आहे?" पंचगिरींनी विचारले.
"श्रीपालने घरी दाखवायला नेले आहे." छाया म्हणाली.
"आम्हाला न दाखवता?" दयानंदांनी विचारले.
"बाबा, संंध्याकाळी परत घेऊन येणार आहेत." छाया म्हणाली.
"बाबा, श्रीपालसाहेबांना संध्याकाळी भेटायला यायला काही तरी कारण हवे का नको?" आकाश म्हणाला तशी अलका का छायाची फिरकी घ्यायला मागेपुढे पाहणार आहे? ती तात्काळ म्हणाली,
"आने के लिए कुछ बहाना चाहिए। "
"ए, थांबा रे. वन्स, साखरपुड्यासाठी काय काय लागते हो?" सरस्वतीने विचारले.
"संध्याकाळी काढू सारे सामान." बाई म्हणाली.
"आता दोन-तीन दिवस साखरपुड्याच्या गडबडीत जाणार. मग लग्नासाठी उरणार असे किती दिवस? काय करावे बाप्पा, कसे होईल?" सरस्वती काहीशी चिंतातूर स्वरात म्हणाली.
"अग, सारे व्यवस्थित होईल बघ. काळजी करू नकोस. आपण सारे आहोत ना? कशाचीही अडचण येणार नाही." बाई समजुतीच्या सुरात म्हणाली.
"थोडा आराम करा. हसतखेळत कामे करा. काहीही अडचण येणार नाही." दामोदर म्हणाले. तसे सारे उठून आपापल्या कामासाठी निघाले...


**