अष्टविनायक भाग ७
असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.
येथील गणेशमुर्तीच्या डोळ्यांमध्ये माणिक आहेत. हा श्री गणेश डाव्या सोंडेचा आहे. गणपती मंदिरा बाहेरील कुंडात बाराही महिने थंड पाणी असते.
अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते १८ गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८ व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते.
श्री क्षेत्र गिरिजात्मकाची कथा अशी आहे ..
गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले.
भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली.
गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला.
असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला.
दर्शनाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ आहे. या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. ही पूजा अतिशय महत्वाची असते .
इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ षष्टी पर्यंत साजरा केला जातो. या आठवड्यात मंदिरात अखंड हरीनाम साप्ताह आयोजित केला जातो.देऊळ लेण्याद्रीपासून २० किमी आणि ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
येथे गणपतीने विघ्नासुर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात.
विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा असासुद्धा होतो.
राक्षसानी एका रात्रीत ओझर गणपतीचे मंदीर बांधले होते अशी आख्यायिका आहे .
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनीसुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. देवळाच्या भिंतींवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत.
मंदिर २० फुट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल १० फुट लांब आहे. .
देवळात लहान लहान खोल्या आहेत. यांना ओवऱ्या म्हणतात.
हे मंदिर अतीशय प्राचीन आहे .
काळाच्या ओघात स्थित्यंतरे होत होत आज असलेल्या अवस्थेत दिसते .
येथील गणपतीची स्थापना भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्राचीन देवांनी केली असे म्हणतात .
हे मंदिर गावात असून देवळाचे तोंड पूर्वेकडे आहे .
पूर्वाभिमुख असलेला हा गणपती डाव्या सोंडेचा आहे .
गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत
गणपतीच्या डोळ्यात दोन तेजस्वी रत्ने आहेत आणि कपाळावर हिरा बसविलेला आहे .
त्यामुळे गणपतीचे तेज अधिकच झळकते .
गणपतीच्या दोन्ही बाजूला पितळीच्या ऋद्धिसिद्धीच्या मूर्ती आहेत .
सभामंडप आठ बाय दहा फूट मापाचा आहे .
दरवाजापाशी असलेला काळा उंदीर जणू पळतो आहे असे वाटते .
देवळात दोन दिपमाळा आहेत .
त्रिपुरी पौर्णिमेपासून काही दिवस त्या पाजळत असतात .
देवळात लहान लहान खोल्या आहेत. यांना ओवऱ्या म्हणतात. इथे बसून भक्त ध्यान करू शकतात.
श्री क्षेत्र विघ्नेश्वराची कथा अशी सांगतात .
फार पूर्वी एक अभिनंदन नावाचा राजा होता .
त्याला त्रिलोकाधीश व्हायचे होते .
त्यासाठी त्याने मोठा यज्ञ सुरू केला.
यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले.
या राक्षसाने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली.
यामळे ऋषीमूनींनी गणपतीकडे धाव घेतली व विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने स्वतः जाऊन त्याचा पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला.
गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या या अटीवर सोडून दिले.
विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्हीही येथेचे वास्तव्य करावे.
क्रमशः