निघाले सासुरा - 16 - अंतिम भाग Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निघाले सासुरा - 16 - अंतिम भाग

१६) निघाले सासुरा!
छायाचे लग्न उत्साहात पार पडले. भोजनकक्षात चाललेली गडबड पाहून दामोदर म्हणाले,
"अरेरे! काय ही गर्दी, म्हणे बफे! हे असे लोटालोटी करून, फतकल मारून खाण्यापेक्षा आणि ताटासाठी एक अधिकची खुर्ची अडवण्यापेक्षा पंगती वाढणे, पंगतीत मानाने बसून खाणे शतपटीने चांगले! त्या पंगतींचा थाट काही निराळाच! हसतखेळत, मौजमजा करत, आग्रह करत खाण्याची मजा औरच असते..!" त्यांना थांबवत आकाशने विचारले,
"पण मामा,एवढ्या पंगती वाढणार कोण?"
"तिथेच तर घोडे अडतेय ना. तुला सांगतो आकाश, आजही खेड्यात लग्न लागले ना, की पहिली पंगत पाच-सहा हजार लोकांची होते. शेवटच मंगलाष्टक होताच तेवढी माणसे खाली अंथरलेल्या सतरंज्या गोळा करून पटापट बसतात. पन्नास-साठ पोरांचा ताफा अगदी शांतपणे तेवढी मोठी पंगत वाढतो."
"बाप रे! एवढी मुलं असतात?"
"हो. आणि हा सुशिक्षितांचा प्रकार पहा. ही प्लेट बघ केवढी छोटी आहे. पण त्यात काकडी, टमाटे, बीट, मीठ, लोणचे, स्वीट, ताक आणि वरणाची वाटी, भजी, भात, पोळी, दोन भाज्या आणि अजून काही पदार्थ यांची रेलचेल होते. गोड खातोय की तिखट खातोय वा आंबट कशाचीही चव न लागता सारा लगदा खातो झाले. हिरव्यागार केळीच्या पानावर किंवा पत्राळीवर खाण्याची मजा येणारच नाही. कुणी-कुणाला विचारत नाही. सारा खेळ 'हाय..बाय' पुरता मर्यादित झालाय."
"मामा, बघा तर ही प्लेट, किती अन्न टाकलंय ते."
"अन्नाची नासाडी ही बफेचीच देण आहे. सुरुवातीला तर असा प्रचार झाला की, बफेमध्ये माणूस हवे तेवढेच घेतो, टाकून देण्याचा प्रश्नच नाही. आग्रह नसल्यामुळे अन्नाचा खराबा होत नाही पण हा प्रकार बघा. अन्न टाकून दिले नाही अशी एक तरी प्लेट आहे का?"
"मामा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पंगतीत एवढी नासधूस होत नाही हो."
"आकाश, त्याला एक कारण आहे. पंगतीमध्ये सारे जवळ, समोरासमोर बसलेले असतात, एकमेकांच्या पानांवर लक्ष ठेवून असतात. एकमेकांना जसा वाढण्याचा आग्रह करतात तसे कुणाच्याही पानात काहीही शिल्लक राहू नये असा कटाक्ष पाळतात. तसे बफेमध्ये कुणाचे कुणावर लक्ष नसते. लोक लागेल तेवढे घेत नाहीत तर पुन्हा पुन्हा घेण्यासाठी रांगेत जायला लागू नये म्हणून एकदाच भरपूर प्रमाणात वाढून घेतात आणि मग हा असा अन्नाचा नासोडा होतो. एखाद्या घरी चोरी झाल्यानंतर घरात पसारा कसा अस्ताव्यस्त पडतो ना तसे हे अन्नाचे होते."
"मामा, यावर उपाय करता येईल." आकाश म्हणाला.
"तो कोणता?" दामोदरपंतांनी विचारले.
"पंगतीचा थाट नको, बफेचा घाट नको तर हातात द्यावे जेवणाचे पाकीट!"
"तू म्हणतोस ते बरोबर आहे. मुंबईसारख्या शहरात ही पद्धत नुकतीच सुरू झाल्याचे ऐकतोय पण ती आपल्याकडे येण्यासाठी, पचनी पडण्यासाठी बराच कालावधी लागेल." दामोदर म्हणाले.
"त्यामुळे काय होईल मामा, ही सांडासांडी, टाकून देण्याची प्रथा मोडीत निघेल. काही प्रमाणात खर्चही वाचेल. मंगल कार्यालय आणि परिसरातील घाण कमी होऊन प्रदुषणासाठी आळा बसेल."
"आकाश, व्वा! तू तर एखाद्या समाजसेवकाप्रमाणे विचार करतोस रे." मामा म्हणाले....
तिकडे व्यासपीठावर वधूवरास भेटण्याचा, त्यांच्यासोबत परिचय करून घेताना आणि फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. तिथेही अक्षरशः झुंबड उडाली होती. छायाला मिळणाऱ्या भेटवस्तू जमा करण्यासाठी बाईआत्या कंबर खोचून उभी होती, तिच्या मदतीला अलका होती.
"अलका, ह्या फोटोग्राफीचेही फार अवडंबर माजतेय ग. लहानथोर, ओळखीचा प्रत्येकजण आणि अतिशयोक्ती नाही परंतु जीपचे ड्रायव्हरही फोटोची हौस भागवून घेतात."
"अगदी बरोबर आहे आत्या. तुला सांगते, आजकाल फोटो, व्हिडीओ शुटिंग हा खर्च पन्नास हजार रुपयांपेक्षा वर जातो."
"अलके, बघ तर, आहेर प्रकरणात आईबाबा कसे अडकून पडलेत ते. छायाचे सासूसासरे बघ कसे आनंदाने सर्वत्र फिरून प्रत्येकाची चौकशी करतात, विनोद करतात..." बाई बोलत असताना जवळ उभे असलेले गुरु म्हणाले,
"झाली का तुमची फोटोग्राफी? आवरा बरे पटापट. अजून आपले बरेच कार्यक्रम आहेत. सप्तपदी व्हायची आहे."
"गुरु, ह्या सप्तपदी मागचे शास्त्र सांगाल काय?" बाईंनी विचारले.
"काकू, ही सप्तपदी करताना वधूवर एकमेकांना आश्वासन देतात की, यापुढे प्रत्येक सुखदुःखात आपण सोबत राहणार आहोत. तसे लग्नसोहळ्यातील प्रत्येक विधीमागे फार मोठे शास्त्र आहे."
"गुरु, होऊ द्या हो. तुमच्या विधी-पूजेला मारा कट! तुमची गाडी घ्या, एक्सप्रेस हायवेवर..." तिथे पोहोचलेला आकाश म्हणाला.
"ए, काहीतरी बडबडू नकोस रे. गुरु, सारे व्यवस्थित व्हायला हवे."
"आत्या, कसे शक्य आहे? तीन वाजता मंगलकार्यालय रिकामे करावे लागणार आहे. उद्या दुसरे लग्न आहे. त्याचे वऱ्हाड येणार आहे. आम्हाला हे नेहमीचेच झालंय. हे फोटोसेशन थांबवता येत नाही त्यामुळे धार्मिक विधी 'सेंसॉर' कराव्या लागतात. काय करणार? कालाय तस्मै नमः।" गुरु बोलत असताना त्यांच्याजवळ कुलकर्णी येत म्हणाले,
" गुरूजी, चला. पुढील कार्यक्रम सुरु करुया."
"मी तयार आहे पण फोटोसेशन..."
"ते चालूच राहणार आहे. नंतर घाई होते. श्रीपाल, अरे, चला आता." कुलकर्णी म्हणाले तसे वधूवर खाली आले आणि गुरुजींनी पुढील विधी सुरू केले. होमहवन, सप्तपदी झाली. श्रीपालने छायाच्या गळ्यात सुंदर असे मंगळसूत्र बांधले. नवरानवरीची गाठ मारण्याचा मान बाईआत्याला मिळाला. श्रीपाल आणि छाया यांच्या अंगावरील शालींच्या गाठ मारताना बाई म्हणाली,
"श्रीपालराव, आता छाया तुमची जन्मोजन्मीची अर्धांगिनी झालीय. तुम्ही दोघे विवाहबंधनात एकत्र बांधल्या गेले आहात. तुमच्या जीवनात येणाऱ्या सुखसागरात दोघांनी मिळून संसारनौका वल्हवायची आहे..."
"आत्या, तुम्ही काळजी करू नका." श्रीपाल म्हणाला.
"आत्याबाई, गप्पांमध्ये गुंगवू नका. गाठ मारलीत तुम्ही. नाव घ्यावे लागेल. अशी बरी सोडीन." सरस्वती हसत म्हणाली.
"अगबाई, आता या वयात सुचेल का? सरस्वती, तू पण ना..."
"पाठ असलेला जुनाच उखाणा घ्या की." कुणीतरी वऱ्हाडीन म्हणाली.
"श्रीपाल-छायाची गाठ मी मारली,
दामोदरपंतांची मी लाडकी बायको !" असे म्हणत बाई चक्क लाजली.
"व्वा! व्वा! मामा, कुठे आहेत? आत्या, तुझ्या याच अदेवर मामा सात जन्म तुझ्यासोबत काढणार असतील ग." आकाश म्हणाला.
"ये आक्या, बहाच्चरा चूप बस!" बाईंनी आकाशला लाडाने दटावले.
"चला. बंधुराज, चला. या आता..." कुणीतरी म्हणाले.
"कान पिळायचा का? व्वा! क्या बात है,अशी संधी पुन्हा येणार नाही..." असे म्हणत दोन्ही हातांच्या तळव्यांवर फुंकर मारत आकाश पुढे आला.त्याच्याकडे पाहणाऱ्या छायाला म्हणाला,
"ताई, बोल. पिळू का सोडू? बता तेरी मर्जी है क्या?"
"आकाश..." छाया हलकेच रागाने म्हणाली.
"ड्रेस हवाय ना?" श्रीपालने हसतच कपड्यांचा डब्बा दाखवत विचारले.
"तर मग? त्यासाठीच तर सारा खटाटोप आहे. भाऊजी, चिंता करु नका. कबड्डीपटूने टचपाटी शिवावी तसा हलकासा, नाजूकसा स्पर्श करतो..." आकाश म्हणाला तसे गुरूंसोबत सारे हसले. तशा हलक्याफुलक्या वातावरणात कार्यक्रम पार पडत गेले. साडे झाले. एकमेकांना मानाचे आहेर करण्यात आले. सारे कसे आनंदाचे, समाधानाचे वातावरण असताना पंचगिरी छायाला घेऊन कुलकर्णी परिवारातीला प्रत्येक सदस्याला सामोरे जात होते. प्रत्येकाने स्वतःच्या हातात असलेला अर्थात गुरूंनी दिलेला खडीसाखरेचा खडा छायाकडे दिला. तो प्रसंग पाहून पंचगिरी परिवाराचे डोळे भरून आले.
"आजवर होती आमची, आज झाली तुमची! कुलकर्णीसाहेब, सांभाळून घ्या माझ्या छायाला..." हात जोडून पंचगिरी म्हणाले तसे त्यांना गलबलून आले. ते पाहून बाई, सरस्वती यांच्यासह अनेक महिलांचे डोळे पाझरू लागले. कुणी काही बोलणार तितक्यात कार्यालयाच्या पडद्यासमोर बसलेल्या क्रिकेट शौकिनांनी जबरदस्त जल्लोष करायला सुरुवात केली. भारतीय फलंदाजी संपली होती. भारताने धावांचा हिमालय उभा केला होता. शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून धोनीने संघाची धावसंख्या साडेतीनशेच्या पार नेली होती. व्यासपीठावर सूनमुख पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. श्रीपाल आणि छाया यांच्या मध्ये कुलकर्णी परिवारातील एक-एक स्त्री येऊन बसू लागली. समोर कुणी तरी धरलेल्या आरशात नवरानवरीचे चेहरे एकत्रित पाहिल्या जाऊ लागले. आरशात विशेषतः नवरीचा चेहरा दिसला की त्या स्त्रीच्या तोंडातून शब्द बाहेर पडे,
"व्वा! छान आहे हं जोडा! नक्षत्रासारखी सून मिळालीय. सोन्यासारखा संसार करेल हो. श्रीपाल, नशीब काढलेस रे बाबा!"
श्रीपालची एक आत्या सुनमुख पाहून म्हणाली, "पहा. पहा. सुनमुख पहा. कसे सत्शील, पवित्र भाव आहेत चेहऱ्यावर!"
"सध्या आहेत. काही दिवसात हेच भाव आठ्यांमध्ये बदलतील.... तुमच्याप्रमाणे..." श्रीपालचे मामा म्हणाले आणि हास्याच्या गडगडाटात ती आत्या स्वतःच्या नवऱ्याला खाऊ का गिळू नजरेने बघत तिथून बाजूला झाली...
तितक्यात कार्यालयाकडून पहिली 'सावधान' घंटा झाली. तशी विहीण पंगत बसली. या पंगतीला सुनमुखी पंगत असेही काही ठिकाणी म्हणतात. ती पंगत सुरू असताना कुणी तरी स्त्री म्हणाली,
"अग, विहीण म्हणा ना."
"कोण म्हणणार? तुम्हीच म्हणा."
"छे ग! मला नाही येत बाई..."
"वन्स, आता तुम्हीच म्हणा बाई..." सरस्वती रडवेली होत म्हणाली.
"बाबुल कि दुवाएँ लेती जा,
जा तुझ को सुखी संसार मिले..." म्हणताना स्वतः बाईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा कधी सुरू झाल्या हे तिला स्वतःलाही कळले नाही. इतर महिलांची स्थिती काही वेगळी नव्हती. वधूवर, कुलकर्णी पतीपत्नी यांच्यासमोर सुबक रांगोळी काढली होती. वेगवेगळे पाच पक्वान्न वाढून समई प्रज्वलित केलेली होती. अगरबत्तींच्या सुवासाचा घमघमाट सर्वत्र पसरला होता. वधूवरांना एक-एक पदार्थ आग्रहाने वाढत असताना श्रीपाल आणि छाया यांना कुणीतरी एकमेकांना घास भरविण्याचा आग्रह केला. त्याप्रमाणे आधी छायाने आणि नंतर श्रीपालने एकमेकांना घास भरविले. तसे अलकाने बाईंच्या कानात हलकेच विचारले,
"आत्या, हे घास का भरवायचे असतात गं?"
"अग, एकमेकांना घास भरविणे म्हणजे एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे. आजपासून आपण दोघे एक झाले आहोत. आपल्यामध्ये कोणतेही अंतर राहिलेले नाही. भविष्यातील सुखदुःखांना आपण या घासाप्रमाणेच एकत्र सामोरे जाऊया हे सांगण्यासाठी घास भरवितात."
घास भरविण्याचा कार्यक्रम संपला न संपला की, एका महिलेने वधूवरांना नाव घ्यायचा आग्रह केला.
"अग छाया, नाव घे ग."
"नको ना. आता नाही आठवणार." छाया म्हणाली.
"काय? इतक्यात नाव विसरलीस?"
"उखाणा नाही ना आठवत." छाया लाजून म्हणाली.
"तू म्हणे कविता करतेस, मग जोड की एखादा उखाणा."
"प्रयत्न करते....
ताट भरलंय पंचपक्वान्नाने
सुखीसंसार करेल श्रीपालच्या साथीने!"
"व्वा! खूप छान! अब बारी है, श्रीपाल की."
"नाही बुवा, मला जमणार नाही. मी नाही कवी, पण छाया माझीच छबी!"
"नाही... नाही म्हणता सुंदर उखाणा घेतला की हो."
सुनमुख पंगत झाली. तिकडे सामानाची आवराआवर झाली. पंचगिरी कुटुंबीयही एक-एक वस्तू घरी पाठवू लागले. दोन्हीकडील बरीच पाहुणेमंडळी कार्यालयातून परस्पर आपापल्या गावी निघाली. तितक्यात अत्यंत सुबकतेने सजविलेली डोली मंगलकार्यालयासमोर उभी राहिलेली पाहून सर्वांना नवल वाटले. डोलीशेजारी असणारे भालदार, चोपदार पाहून अनेकांना इतिहासातील प्रसंगांची आठवण झाली. पाठोपाठ श्रीपालसाठी अतिशय कुशलतेने सजविलेला घोडा पाहून सारेच आनंदले. कुलकर्णी यांच्या नियोजनाला आणि कल्पकतेला सर्वांनी मनापासून दाद दिली. दुसऱ्याच क्षणी परिस्थितीची कल्पना आणि जाण सर्वांना आली. 'आता आपल्याला माहेर परके होणार, ते आपल्यासाठी पाहुण्यांचे घर असणार' ही बाब छायाला प्रकर्षाने जाणवली. ती वेगळ्याच जाणिवेतून दयानंद, सरस्वती, आकाश, अलका, बाई या सर्वांच्या गळ्यात पडून हमसून रडू लागली. भरलेल्या डोळ्यांनी आकाशने छायाचा हात धरला आणि तिला घेऊन तो जड पावलांनी दाराकडे निघाला. शत् पावलांचे ते अंतर जणू शेकडो कोस असल्याप्रमाणे कापल्या जात नव्हते. डोलीजवळ येताच छायाने पुन्हा सर्वांवर नजर टाकली. साश्रू नयनांनी ती डोलीत बसत असताना तिचे लक्ष सर्वांच्या मागे अत्यंत समाधानाने उभे असलेल्या देशपांडे यांच्याकडे गेले. एका वेगळ्याच ऊर्मीने छायाने त्यांच्याकडे धाव घेतली. देशपांडेंजवळ जाताच निःशब्दपणे ती त्यांच्या पायाजवळ वाकली. तिला अर्ध्यातून उठवत ते पुटपुटले,
"एक पुत्रा भवः।" ते ऐकून सारे हसत असत देशपांडे यांचा भ्रमणध्वनी खणाणला,
'लेक लाडकी माहेरची,
होणार सून सासरची...' तो आवाज ऐकताच कुणी काही बोलण्यापूर्वीच सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. कुलकर्णी परिवाराने फोडलेले फटाके नवीन सुनेच्या स्वागतासाठी होते तर शहरात सर्वत्र होणारे गगनभेदी फटाक्यांचे आवाज भारताने सामना जिंकल्याच्या आनंदाचे होते...
**