Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 14 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १४


पहिल्या दिवशी जो पाऊस झाला, त्यानंतर ३ दिवस पाऊस झालंच नाही. आज सकाळी जरा वाटतं होते पावसाचे. तरी काही चिन्ह दाखवून पुन्हा पसार झाला तो. कदाचित कुठे दूरवर पडत असेल पाऊस. या भागात यायचे नसेल त्याला, असा विचार करत कादंबरी सकाळ सकाळीच तिचा कॅमेरा घेऊन जरा लांब आलेली. त्यांच्या ग्रुप मध्ये आणखी काही लोकं सर्दी - खोकला ताप घेऊन बसले होते पावसाचे. ते काय दरवर्षीचे , म्हणत कादंबरी फोटो काढत चालली होती. एका ठिकाणी उभं राहून कॅमेऱ्याच्या लेन्सने, जरा zoom करून दूरचे काही दिसते का ते पाहू लागली. कॅमेरा डावीकडे वळला आणि तिला एक जण हातात कॅमेरा आणि पाठीला सॅक, असा काहीसा दिसला. लगेच तिने कॅमेरा खाली केला. खरच , तिथे कोणीतरी होती फोटो क्लिक करत. इतक्या दूरवर ... कोणी खास फोटो साठी तर येत नाही, हे कादंबरीला एवढ्या वर्षाच्या भटकंतीतून कळलं होते. नक्कीच हा वाट चुकला असेल, जाऊया का त्याला विचारायला... नको ... एकटी नको... पूजाला घेऊन जाऊ.. असा विचार करत धावतच कादंबरी पूजाला आणायला पळाली.

" अगं .... पण मी कशाला... " पूजा वैतागत म्हणाली.
" चल नाआआआआ .... !!!! " ,
" कशाला पण आणि असेल कोणी .. ज्याला फोटोची आवड असेल... काढू दे त्याला फोटो... त्या खालच्या गावातला सुद्धा असू शकतो. " ,
" तुला बोलवायचे म्हणजे आधी अर्धा किलो मस्का लावावा लागतो तुला ... त्यानंतर तयार होते तू... कोणी वेगळा दिसतो आहे म्हणून आले ना सांगायला. एकटी गेली आणि किडनॅप केले तर मला त्याने... " पूजाला हसायला आले त्यावर.
" हा .. हे मात्र होऊ शकते हा ... एवढी गोड आहेस ना , कि कोणालाही मोह होईल तुला पळवून नेण्याचा.... लाडाची बाय माझी ... " पूजाने कादंबरीचा गालगुच्चा घेतला.
" चल ना गं पटकन ..... एकतर तो वाट हरवला आहे त्याची.. पुन्हा कुठे पुढे गेला तर अजून चुकेल ... चल पटापट ... " ,
" हो .. माझी आई ... हो ... " पूजाने हातातले काम बाजूला ठेवलं आणि उभी राहिली. " इतकं काय विशेष वाटलं तुला त्यात.. " असं बोलत होती आणि अचानक आभाळात लक्ष गेलं. मघापासून मोकळं असलेलं आभाळ अचानक अंधारून आले. " कमाल आहे ना. आता तर काहीच नव्हते ना... लगेच कुठून आले हे ढग.. " कादंबरीही वर पाहू लागली.
" बघ ... सगळं तुझ्यामुळे ... !! आता पाऊस आला तर तो निघून जाईल. " ,
" चल बाबा चल ... तू ना .... ऐकणार नाहीस कधी, मी सांगते ना .. गावातला असणार तो.... ",
" गावातले लोक काय पाठीवर सॅक आणि गळ्यात कॅमेरा लावून फिरत नाहीत.. " कादंबरीच्या या वाक्यावर पूजा थांबली. " तो " आलाय का पुन्हा , नसेल ... तो नसावा... असेल तर.. पूजाने चालण्याचा वेग वाढवला. दोघी त्याठिकाणावर आल्या. जिथे कादंबरीने त्या व्यक्तीला पाहिलं होते. आता तर कोणीच नव्हते तिथे.

" कुठे आहे कोण ... " पूजा आजूबाजूला नजर टाकत म्हणाली. कादंबरीही कोड्यात पडली. " गेला असेल का तो ... पावसाला घाबरला असेल... " कादंबरी बोलली. मग तिचं लक्ष पुढे असलेल्या देवळाकडे गेलं.
" त्या देवळात बघूया का .. " ,
" तिथे का जाईल तो ... " म्हणत पूजाच पुढे गेली. ५- ६ पावलं पुढे गेली असेल आणि लख्ख प्रकाश झाला. वीज चमकली होती. जोराचा पाऊस येणार आता, असा विचार मनात आला आणि समोर कोणीतरी उभा.. त्याचे हि लक्ष यांच्याकडे होते. " तो बघ ... त्यालाच पाहिलं होते मगाशी.. " कादंबरी बोलत होती, पण पूजाच लक्ष कुठे होते तिच्याकडे..

आणि रिमझिम पाऊस सुरु झाला. कादंबरी कॅमेरा वाचवण्यासाठी त्या मंदिरात शिरली. पूजा आणि "तो " मात्र तिथेच .. .... आकाश !! आकाशच आहे ना ... हो ... तोच असणार ... पाऊस आणि तुझं नातं तसं जुनंच... बघ तुझ्या सोबतीनेच फिरतो आहे... घेऊन आलास ना पावसाला ... पूजा कधीची आकाशला पाहत होती. तोही कधीपासून पूजाकडे पाहत होता. पावसाचे थेंब रिमझिम रिमझिम पडत होते दोघांवर .... पूजाला मात्र ते सर्व क्षण थांबल्या सारखे वाटतं होते.आजूबाजूला पडणारे पाण्याचे थेंब गोठलेले भासत होते. झाडे - झाडांची पाने ... दूरवर चमकणारी वीज ... वारा ... सारेच थांबले होते. समोर घडणारा प्रत्येक क्षण गोठला होता. धावत जावे आणि मिठी मारावी त्याला, असं वाटतं होते पूजाला. पण तीही गोठली होती जागेवर. आकाशच पुढे आला मग. दोघे एकमेकांसमोर. किती वेळ, पावसाचा वेग जरा वाढला तसा कादंबरीने आवाज दिला.
" ये ... दोघांनी आत या आता .... भिजून आजारी पडलात तर मला एकटीला ताकद नाही एवढी .. तुम्हा दोघांना उचलून आणायची. " दोघीही भानावर आले. आणि धावतच देवळात आले.

देवळात आले तरी तसेच दोघे. शेवटी कादंबरी वैतागली.
" पूजा ... काय सुरु आहे... त्याला ओळखते का तू... किती वेळ बघते आहे मी, नुसते एकमेकांकडे बघत आहात ... हॅलो .... मीही आहे इथे ... " पूजाला हसू आलं.
" थँक्स ... बबडू ... तुझ्यामुळे मला माझा डब्बू भेटला ... इतक्या वर्षांनी.... " पूजाने कादंबरीला मिठी मारली. कादंबरीने त्याला न्याहाळून पाहिलं.
" डब्बू .... कोण ??" कादंबरी विचारात पडली.
" कशी आहेस निर्मला... " त्याने पूजाकडे पाहत विचारलं.
" निर्मला कोण आता ... काय सुरु आहे नक्की ... वेडी होणार वाटते मी ... " कादंबरी आणखी confused ...
"बस बस ... खाली बस आधी... डोक्याला इतकं tension नको देऊ.. तू जरा बस शांत ... मला डब्बू ला भेटू दे... इतक्या वर्षांनी पाहते आहे त्याला... " ,
" एक मिनिट ... " कादंबरीने पूजाचा हात पकडला. " मला सांग आधी , काय सुरु आहे हे.... मला तो दिसला , वाट हरवला असेल म्हणून तुला घेऊन आले. तर लगेच ओळखीचा निघाला ... असं कुठे घडते का कधी ... खरं आहे कि कोणता प्रॅन्क आहे हा .... " कादंबरी आता आकाशकडे संशयाने पाहू लागली.
"अगं ... प्रॅन्क कसला... तुला सांगत असते ना याच्याबद्दल ... "तो " .... हाच ... डब्बू ... माझा डब्बू ... " ,
" हा ... ' तो '... तो आहे ... हा " कादंबरी आकाशकडे पाहत राहिली. त्याच्याजवळ गेली. " Hi ... मी आकाश.. " आकाशने कादंबरीकडे हात पुढे केला.
" डब्बू कोण मग आणि मघाशी पूजाला तू ' निर्मला ' का बोललास " आकाशला हसू आलं. बाहेर पावसाने छानच सुरुवात केलेली.
" बसूया का खाली. आता पावसात तरी तुम्ही दोघी बाहेर जाणार नाही. " आकाशसुद्धा खाली बसला.
"हम्म ... आता सांग .. हि काय भानगड आहे नावांची. "..... कादंबरी ...
" याचे खरे नाव आकाश.. याची आई याला लहानपणापासून डब्बू बोलते लाडाने. म्हणून मीही तेच बोलते ... " .....पूजा ...
" आणि हिच्या आजीचे नाव निर्मला .... आजी सोबतच छान जमते हिचे ... लहानपणापासूनच स्वतःच तिने स्वतःचे नाव ' निर्मला ' ठेवले. मलाही तेच नाव जास्त आवडते. बाकी लोकांसाठी पूजा .. माझ्यासाठी मात्र निरू .... " आकाश पूजाकडे पाहत म्हणाला.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश:

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED