भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २० Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २०

गप्पा -टप्पा मारत दुपारपर्यंत पुढे चालत गेले. आकाश - पूजा ग्रुपच्या पुढे , बाकी सर्व मागे. सुप्री - संजना - कादंबरी रमलेल्या गप्पात. जणू काही जुन्या मैत्रिणी.
" तुम्हाला कसं जमते ... शहरापासून दूर राहायला. " संजनाने विचारलं कादंबरीला.
" सवय झाली .... निघाले तेव्हा घाबरली होती. आता चालून जाते सर्व .. " ,
" आकाशला कधी पासून ओळखते तू ... " आता सुप्रीचा प्रश्न.
" तुम्ही आलात ना .... त्याच्या आदल्या दिवसापासून... पूजाचा जुना मित्र आहे तो... " ,
" तरी तुम्हाला कधी वाटतं नाही ... शहरात परत जाऊ असे ... " सुप्री.
" आधी एक -दोनदा वाटलं ... त्या सोयी-सुविधा या अश्या ठिकाणी मिळत नाहीत. तेव्हा वाटलेलं ... कशाला आले इथे.. नंतर कळलं , हेच खरं जगणं... मनात काहीच राहत नाही अश्या वातावरणात, मुक्त जगायचं.... त्या पाखरांसारखं.... " एक मोठ्ठा थवा वर उडत जात होता.
" किती छान वाटतात ना ते उडताना... आपणच वाईट , त्यांना पिंजऱ्यात पकडून ठेवतो. " सुप्रीही पाहत होती त्या थव्याकडे. आणि नजर गेली आकाशकडे. कसा हसतो आहे ना ... चालता चालता... तोही तर पक्षीच आहे ना .... स्वतंत्र... त्यालाही उडायचे असते नेहमीच ... बंधनात तर स्वार्थी लोकं अडकवतात त्याला. आपल्या सारखी माणसं .. सुप्रीच्या मनात विचार येऊन गेला.


आणखी काही पावलं चालून त्यांनी थांबवायचा निर्णय घेतला. आकाशने सांगितल्याप्रमाणे , अर्ध्या लोकांनी जेवणाची तयारी सुरुवात केली, उरलेल्या लोकांनी साऱ्यांचे तंबू उभे करायचे काम हातात घेतले. सुप्रीही तंबू उभे करण्यात मदत करत होती. सरतेशेवटी आकाश सुप्रीचा तंबू उभा करण्यासाठी सुप्रीजवळ आला. थोडावेळ तर पाहतच राहिले दोघे एकमेकांना. जणू काही अनोळखी दोघे. आकाशने तंबूकडे नजर टाकली. दोघे मिळून काम करत होते. एकही शब्द न बोलता. काम झालं.
" कशी आहेस थकली असशील ना ... आराम कर ... नंतर जेवायला ये ... " आकाशने सुप्रीला सांगितलं.
" तू नाही दमलास का ... " आकाश फक्त सुप्रीकडे पाहत होता. काहीच न बोलता आणखी कोणाला मदत हवी का ते बघायला पुढे गेला.


दुपारी जेवण झाली सर्वांची आणि सर्व पाय मोकळे करायला आजूबाजूला भटकू लागले. अचानक अंधारून आले. पावसाची चिन्हे . आकाश अंदाज लावत होता पावसाचा. यांच्या कॅम्प पासून पुढे काही अंतरावर सुप्री बसलेली होती एकटीच. जुनी सवय तिची. काही झालं कि अशी एकटी जाऊन बसायची , सर्वापासून दूर . आकाशने पाहिलं तिला. तिच्या जवळ आला.
" सुप्री ... एकटी काय बसली आहेस .... पाऊस येतो आहे ... tent मध्ये जाऊन बस ... " ,
" एकटीच बसणार ना ... तुला कुठे वेळ आहे माझाशी बोलायला. या प्रवासाला निघताना सुद्धा बोललास ... पूजा सोबत रहा, आधी किती प्रवास एकत्र केले आपण तेव्हा तर कधी बोलला नाहीस असं .... तेव्हा तुझ्या सोबतच पाहिजे असायची मी... असा का वागतो आहेस ... " ,
" सुप्री ..... काहीच गैरसमज करून घेऊ नकोस ... मला फक्त हा प्रवास पूर्ण करू दे ... तुला बघितलं कि सारखं वाटते ... तू मला इथून दूर घेऊन जायला आली आहेस ... त्यासाठीच हे .... फक्त हा प्रवास .... मला जगू दे यात , नंतर कधीच नाही थांबवणार तुला ... तू जे सांगशील ते करिन .... पुन्हा सांगतो .... गैरसमज आणू नकोस या मध्ये कुठेच ... मी तोच आकाश आहे ... तू ज्याला ओळखतेस तो ... ",


" पण .... " सुप्री पुढे काही बोलणार होती . आणि एक थंड हवेचा झोत आकाशकडे झेपावला. सवयी प्रमाणे आकाश त्या दिशेने पुढे चालत गेला. प्रत्येक नात्यात काही त्रुटी असतात , नात्यांच्या भिंती कितीही सुंदर असल्या तरी काही भेगा असतात त्यात . आकाश खूप सांभाळून घेतो आपल्याला , आपणच त्या भेगा वाढवतो आहे का .... सुप्री त्याला दुरूनच पाहत होती. पुढे एका उंच ठिकाणी जाऊन पावसाचा अंदाज घेऊ लागला.

पूजानेही सुप्रीला बघितलं होते. तीही सांगायला आली. " अगं एकटी का बसली आहेस ... वादळ येते आहे बघ. चल लवकर खाली .... " सुप्रीने पूजाकडे पाहिलं. " चल लवकर ... बाकीचे सर्व त्यांच्या तंबूत जाऊन बसले आहेत .... तुला बघितलं म्हणून इथे आली .. चल पट्कन ... वादळ येते आहे ... " सुप्री उभी राहिली. एकदा तिने वर आभाळात पाहिलं . शिवाय समोर असणाऱ्या डोंगररांगांकडे बघितलं. " वादळं काय फक्त आभाळात आणि समुद्रात येतं असतात का .... मनातल्या वादळांचे काय करायचे मग ... कोणी थोपवायची ती वादळं .... " सुप्रीने दूर उभ्या असलेल्या आकाशकडे नजर टाकली. तो तर त्या वातावरणात मग्न झालेला होता. सुप्रीने पुन्हा पूजाकडे पाहिलं.


वाऱ्यानेही आता जोर धरला होता. केस उडून उडून चेहऱ्यावर येतं होते. तरी सुप्रीच्या डोळ्यात काय सुरु आहे , पूजाला कळलं. सुप्री निघून गेली कॅम्पच्या दिशेने. पूजा तिथेच उभी राहून कधी पाठमोऱ्या सुप्रीकडे पाही तर कधी वादळाचा अंदाज लावणाऱ्या आकाशकडे. बरोबर दोघांच्या मध्ये उभी होती ती. तिचे हि लक्ष समोर गेले. समोर असलेल्या डोंगररांगा आता जवळपास दिशेनाश्या झाल्या होत्या. दिसत होते ते फक्त त्यांच्या आकाराचे मनोरे .... इतके काळे ढग चाल करून येत होते समोरून .. अधे - मध्ये विजांचा प्रकाश आणि त्यानंतर येणारा आवाज मनात कालवा करत होता. सोबत सोसाट्याचा वाराही येणार... खरच मोठे वादळ येते आहे .... पूजा अजूनही सुप्री - आकाश कडे पाहत होती.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: