Love me for a reason.. let the reason be love - 2 books and stories free download online pdf in Marathi

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग २)

तुझे तिच्याशी लग्न झाल्यावर काही महिन्यांनी तु तिचा खुन करायचा. पण हा खुन नसुन एक अपघात होता असे आपण दाखवणार आहोत.

तिच्या मृत्युनंतर तिच्या नावावर असलेल्या कंपन्या आणि मालमत्तेचा सर्वेसर्वा तुच होशील. तीच संपत्ती इतकी आहे की तो पैसा नुसता खर्च करत बसायचे म्हणले तरी तुझे अर्धे आयुष्य खर्ची पडेल. मेहता जो पर्यंत आहेत तो पर्यंतच, त्यानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसही तुच असणार आहेस”

“..पण नैना हे सर्व जरा अधीक तपशीलात सांगीतले असतेस तर बरं झालं असते. हा वरवरचा प्लॅन ऐकुन मला तरी त्याची खात्री वाटत नाही..”, जोसेफ

“सांगेन, सर्व काही प्रत्येक बारकाव्यासहीत सांगेन. आपण तिघंही ह्या प्लॅनबद्दल जो पर्यंत पुर्णपणे समाधानी होत नाही तो पर्यंत हा प्लॅन सुरु होणार नाही. प्रत्येकाला त्याचा ह्या प्लॅनमधील सहभाग प्रत्येक सुक्ष्म गोष्टींनीशी माहीती हवा. एखादी छोटीशी सुध्दा चुक होता कामा नये..” नैना

“..तिघं?? आपण तर दोघंच आहोत नैना..” जोसेफ आश्चर्याने म्हणाला..

“नाही जोसेफ, ह्या प्लॅनमध्ये तिघं आहेत.. तु मी आणि ख्रिस..”
“ख्रिस? हा ख्रिस कोण?”, जोसेफ

“उद्या संध्याकाळी ७.३० वाजता, ’ब्ल्यु वेव्ह’ क्लब मध्ये आपण तिघंही भेटणार आहोत, तेंव्हाच हा प्लॅन पुर्णपणे उलगडला जाईल. त्यातील प्रत्येकाची भुमीका स्पष्ट केली जाईल. त्यातील लुप-होल्स शोधुन त्यावर मार्ग काढला जाईल…आपण करोडपती होणार आहोत जोसेफ.. करोडपती!!”.. असं म्हणुन नैना जागेवरुन उठली, व्होडकाचा उरलेला पेग रिकामा केला आणि जोसेफकडे न बघता बाहेर पडली..

***********************************

सदैव गजबजलेल्या एम.जी.रोडवरच एका अरुंद, अंधारलेल्या बोळातुन थोडे आतमध्ये गेल्यावर एका कोपर्‍यात ’ब्ल्यु-वेव्ह’ क्लब होता. बर्‍याचश्या लोकांना ह्या क्लबबद्दल माहिती नव्हतीच, आणि ज्यांना होती ते सहसा त्या बाजुला फिरकत नसत. ’ब्ल्यु-वेव्ह’ क्लब ही एक अशी जागा होती ज्याबद्दल उघडपणे कोणीच काही बोलत नसे, परंतु न बोलुनही तेथे काय चालते आणि कश्या प्रकारच्या लोकांची वर्दळ तेथे असते हे सर्वश्रुत होते.

’त्या’ दिवशी संध्याकाळी ८ च्या सुमारास मंद दिव्याचे साम्राज्य असलेल्या छोट्या क्युबीक्स पैकीच एका कोनाड्यात तिघं जणं बोलत बसले होते.

गडद काळ्या रंगाचा पेहराव केलेली एक तरूणी, पहाताक्षणी प्रसिध्द मॉडेल ’मिलींद सोमण’ चा चेहरा आणि शरीरयष्टीशी मिळता जुळता भासणारा एक तरुण आणि त्याच्याच बाजुला एक काळा भिन्न, भावनाहिन चेहर्‍याचा एक, कुठल्याश्या क्लब मध्ये बाऊंसर म्हणुन शोभणारा एक दांडगट माणुस असे ते त्रिकुट हळुवार आवाजात कश्याबद्दल तरी बोलत होते.

दोन तास अथक बोलल्यानंतर प्रत्येकाच्या चेहर्‍यावर समाधान पसरले होते.

“.. पण नैना, मला खरच गरज वाटत नाहीये ख्रिसची ह्या प्लॅनमध्ये. माझ्यावर विश्वास ठेव आपण दोघंच हा प्लॅन यशस्वी करु शकु. कश्याला हवाय आपल्या हिस्स्यामध्ये अजुन एक भागीदार?” तो मिलींद सोमण सारखा दिसणारा देखणा तरूण, अर्थात जोसेफ बोलत होता.

“..हे बघ जोसेफ, मला रिस्क घ्यायची नाहीये. ऐनवेळी तु माघार घेतलीस तर आपण सर्वच जण गोत्यात येऊ. माझा ख्रिसवर पुर्ण विश्वास आहे. आजपासुन प्रत्येक क्षणी तो तुझ्याबरोबर असेल. तुला कळणारही नाही ख्रिस आहे.. पण तो असेल… तुझ्या आजुबाजुलाच कुठेतरी नक्की असेल.

काही गडबड झालीच तर तुला त्याची नक्की मदत होईल, पण हेही लक्षात ठेव की तु काही दगाबाजी करायचा प्रयत्न केलास तर ख्रिस ही पहीली आणि शेवटची व्यक्ती असेल ज्याला तु भेटशील..”, नैना

“समहाऊ, आय एम नॉट दॅट हॅप्पी बिईंग धिस बिग कॅट अरांऊड मी ऑल द टाईम”, हाताची बोट अस्वस्थपणे मोडत जोसेफ म्हणाला

“डोंट वरी, यु प्ले युअर कार्ड्स स्ट्रेट, ऍन्ड ख्रिस वोंन्ट बॉदर यु..” नैना ख्रिसचा भलामोठ्ठा दंड थोपटत म्हणाली.

ह्या संपुर्ण भेटीमध्ये ख्रिस एकही शब्द बोलला नव्हता. मात्र अधुनमधुन त्याच्याही होणारी नजरानजर जोसेफला अस्वथ करत होती.

येत्या काही महीन्यातच एका व्यक्तीचा आपण खुन करायचा आहे आणि त्याचवेळेस हा भयानक माणुस सदैव आपल्या आजुबाजुला घुटमळत असणार आहे ह्या विचारानेच त्याचे हाताचे तळवे घामेजले होते.

नैना जायला उठली तसा ख्रिस पाळीव कुत्र्यासारखा उठुन उभा राहीला आणि जोसेफकडे ढुंकुनही न बघता तिच्या मागोमाग बाहेर पडला.

दोघंही निघुन गेल्यावरही जोसेफ तेथेच बसुन होता. “कोण असेल हा ख्रिस? नैना त्याला कशी ओळखते? त्याचा आणि नैनाचा काय संबंध? आपल्यासारखेच नैना त्याच्याबरोबरही बिछान्यात..!!”

शेवटी त्याने त्या दोघांचाही विचार करणे सोडुन दिले. पुढचे काही महीने आणि सर्व काही सुरळीत झाले तर आपण करोडपती असु. आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरत असेल. मग काय करायचे त्या नैना आणि त्या ख्रिसचे. त्याने नैनाने सांगीतलेला सर्व प्लॅन पुन्हा एकदा नजरेसमोरुन घातला. रोशनीच्या विचाराने त्याच्या अंगावर एक काटा आला. नैनाने जसे रोशनीचे वर्णन केले होते त्याप्रमाणे खरंच जर ती असेल तर तिच्याशी लग्न सोडाच, प्रेमाचे नाटक करायचे म्हणजे सुध्दा एक दिव्य वाटत होते.

“जे चालले आहे तेच बरे का?” एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. “प्लॅन फसला आणि पकडलो गेलो तर स्वप्न पुर्ण करणे सोडाच, आत्ताचे स्वच्छंदी जगणे पण नशीबात राहीले नसते. नैना नाही तर नाही, दुसरी कोणतीही त्याला सहज मिळाली असती.” पण मग ख्रिसचा विचार डोक्यात आला. “नैनाने सर्व प्लॅन ओपन केला होता. आता माघार घेणे म्हणजे..”

जोसेफ ’ब्ल्यु-वेव्ह’ क्लबचा दरवाजा उघडुन बाहेर आला. थंड वार्‍याची एक झुळुक त्याच्या अंगाला स्पर्शुन गेली. अंधारात त्याने सर्वत्र नजर फिरवली. कुठेच कोणतीच हालचाल जाणवत नव्हती. जोसेफची नजर ख्रिसचा शोध घेत होती, परंतु त्या अंधारात कोणी असण्याची शक्यता धुसरच होती.

जोसेफच्या मनात नैनाचे शब्द हेंदकाळले…”आजपासुन प्रत्येक क्षणी ख्रिस तुझ्या आजुबाजुला असेल.. कदाचीत तो तुला दिसणार नाही.. पण तो असेल.. नक्कीच असेल..”

“नैनाच्या ’आजपासुन’ ह्या शब्दाचा अर्थ ’आत्तापासुन’ असा असेल काय?” ख्रिस विचार करत त्या अंधार्‍या बोळात शिरला…

सकाळी बरोब्बर नऊ वाजुन पंचेचाळीस मिनीटांनी मिस् नैनाच्या डेस्क वरील इंटरकॉम खणखणला.

“येस्स मॅम..”, नैनाने क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला.

नैनाचा आवाज ऐकल्यावर समोरचा फोन बंद झाला.

“हरामी साली..“, नैना मनोमन म्हणाली..”इतकी वर्ष झाली इथं काम करुन, पण रोज ९:४५ ला फोन करुन मी वेळेवर जागेवर आहे की नाही हे पहाते..”

नैनाने टेबलाच्या खणातुन आरसा बाहेर काढला, स्वतःचे केस एकसारखे केले, ओठांवरुन फिक्कट लाल रंगाच्या लिप्स्टीकचा एक हात फिरवला, टिश्युने चेहर्‍यावरची धुळ झटकली आणि घड्याळात नजर टाकली.. “अजुन दहा मिनीट आणि त्या कुत्रीच तोंड बघायची वेळ येईल. तिला जळवायला, खिजवायला माझं हे सुंदर रुप खुप आहे. चेहर्‍यावरील मेक-अप, अंगाला घट्ट बिलगलेले कपडे, टाक-टाक वाजणारे बुट हे सर्व पाहुन तिची होणारी जळफळाट खरंच खुप सुखवणारी आहे.. तिच्या त्या रुड वागण्याला न बोलता दिलेले हे माझं उत्तर आहे..” नैना स्वतःशीच बोलत होती.

बरोब्बर दहा वाजता टेबलावरील इंटरकॉम पुन्हा एकदा खणखणला.
’नैना..’ पलीकडुन आवाज आला.. ’प्लिज कम इन..’ नैनाकडुन उत्तराची अपेक्षा न करताच फोन बंद झाला होता.

नैनाने नोटपॅड, अपॉंईन्मेंट्स ची डायरी आणि पेन उचलले आणि समोरचे भले मोठे दार उघडुन ती आतमध्ये गेली.

समोरच लांबलचक टेबलाच्या दुसर्‍या टोकाला एक बसकी, जाडजुड आकृती बसली होती. खिडकीतुन येणार्‍या उजेडामुळे त्या व्यक्तीचा चेहरा निटसा दिसत नव्हता परंतु अनुभवाने ती व्यक्ती नैनाकडे आणि तिच्या पेहरावाकडे पहात आहे हे तिने ताडले होते.

नैना सावकाशपणे पावलं टाकत, कमरेला नाजुक लटके देत, वेळोवेळी कपाळावरील केस मागे सारत त्या व्यक्तीपाशी जाउन पोहोचली.

“शुssssट”, ती व्यक्ती, अर्थात रोशनी नैनाला म्हणाली.

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED