Ti Ek Shaapita - 9 books and stories free download online pdf in Marathi

ती एक शापिता! - 9

ती एक शापिता!

(९)

कार्यालयाच्या पत्त्यावर आलेलं ते पत्रं किसनने निलेशजवळ दिले. तो जाडजूड लिफाफा पाठवणारा सुबोध आहे हे पाहून निलेशला आश्चर्य वाटले. आत्ताच तिकडे गेलेल्या सुबोधने असे जाडजूड पत्र का पाठवले असावे या विचारात त्याने तो लिफाफा फोडला. त्या लांबलचक पत्रात सुबोधने लिहिले होते,

प्रिय निलेश,

माझे पत्र पाहून तुला आश्चर्य वाटले असणार कारण इथे येऊन मला फार दिवस झाले नाहीत. परंतु काही गोष्टी अशा असतात की, त्या प्रत्यक्ष सांगण्याचे धाडस माझ्याजवळ नाही. हे पत्र लिहिताना माझे हात थयथरताहेत, शब्द हजारो कोस दूर जाऊ बसले आहेत.

ऑडिटर येण्यापूर्वी मी एक आगळावेगळा विचार करीत होतो पण ऑडिट प्रकरणामुळे थोडा वेळ गेला. मी जो विचार करतोय त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. ती साथ मिळेल असा मला विश्वास आहे. कारण संकटसमयी जो धावून येतो तोच खरा मित्र!

निलेश, तुला माझ्या संसारातला कण न कण माहिती आहे. मी कसा आहे, हेही तुला ठाऊकच आहे. लग्न झाल्यावर मी सुहासिनीच्या कुंकवाचा धनी झालो खरा पण त्यानंतरचा तिचा हक्क, तो मोद, तो आनंद मी तिला देऊ शकलो नाही. दुसऱ्या लेकराचा बाप बनत असतानाही मी आजवर तिला एकदाही सुखी करु शकलो नाही. त्यामुळे यापुढे मी सुहासिनीला तळमळताना बघू शकणार नाही. कदाचित आज नाही परंतु काही वर्षांनी तिची ती भूक डोके वर काढणार नाही हे कशावरून? त्यावेळी तिची ती तगमग, ती शारीरिक अवस्था तिला माझ्याशी एकनिष्ठ ठेवेलच कशावरून? त्या सुखाची खरी चव कळेपर्यंत पुरुष किंवा स्त्री मिळेल त्या सुखात मग ते अर्धवट असले तरीही त्यात समाधान मानतात. पण एकदा का त्या व्यक्तीला सुखाची खरी चव समजली आणि आतापर्यंत आपल्याला मिळणारे सुख हे परिपूर्ण नव्हते, मायावी होते हे समजताच त्या व्यक्तिलाही खऱ्या सुखाचे डोहाळे लागतात. ते सुख मिळवण्यासाठी अनैतिकतेचे पंख लावून ती व्यक्ती उंच आकाशी भरारी घेते.

सुहासिनीच्या बाबतीत तसे घडू नये, ती अनैतिकतेच्या मार्गावर जाऊ नये, तिची बदनामी होऊ नये, नसलेली बिरूदं तिला चिकटू नयेत म्हणून मी.. मी.. ठरवलंय, तिला न मिळणारे सुख द्यायचे. ते देण्यासाठी मी अपात्र आहे. परंतु तिला ते सुख देण्यासाठी मी एका व्यक्तीची निवड केलीय. थांब. दचकू नकोस. होय, मी माझ्या पत्नीला ते सुख मिळावं म्हणून तिच्या मार्गातून बाजूला झालोय. मी माझी बदली करून घेतली आहे. मी तिथे नसताना सुहासिनीला आणि 'त्याला' पूर्ण एकांत मिळणार आहे. ती दोघे पूर्वीपासून परिचित आहेत.. आणि.. आणि मी तिथं असतानाच माझ्या पश्चात त्यांचे संबंध नक्कीच जुळून आले आहेत, प्रस्थापित झाले आहेत. परंतु मी तिथे असल्यामुळे त्यांना हवा तो एकांत, तो मोकळेपणा मिळत नव्हता म्हणून त्या संबंधात ते समाधानी नव्हते. त्यांच्यामध्ये मैत्री आहे, संकोच नाही. मैत्रीच्या धाग्यानेच त्यांच्यामध्ये त्या नात्याची वीण घट्ट गुंफल्या गेली आहे. त्याचं मला काहीही वाटणार नाही कारण मी.. मी.. मीच तो एकांत त्यांना देतो आहे. मित्रा, निलेशा, अशा व्यक्तीचा शोध घेत असतानाच अनेक व्यक्तींवर फिरणारी माझी शोधक नजर... तू.. तू.. तुझ्यावर स्थिरावली निलेश, तुझ्यावर! माझ्या योजनेत तू मला अगदी योग्य दिसलास. नव्हे मी तिथे असतानाच तू आणि सुहासिनी नक्कीच एकत्र आले असणार. तेव्हा अंधारात फुलणारे तुमचे संबंध उजागर करण्याची मी तुला विनंती करतोय. मित्रत्वाचे नाते सिद्ध कर. तू संकटसमयी नेहमीच धावून आलास आताही धाव. मी इकडे का आलोय ते समजून घे. तिचं हरवलेले सुख मिळवून दे. मी तिथे असताना तुमच्या संबंधातील चोरटेपणा नष्ट करून तिला भरभरून सुख दे. सुहासिनीलाही मी ही कल्पना दिली आहे. करशील ना एवढे?

तुझाच,

सुबोध.

ते पत्र वाचत असताना निलेशला दरदरून घाम फुटला. त्याची तशी अवस्था पाहून जवळून जाणाऱ्या किसनने विचारले,

"काय झाले हो निलेशसाहेब? पंखा चालू असताना एवढा घाम? सगळे ठिक आहे ना?"

"हो... हो... सारे ठीक आहे." निलेश तसे म्हणत असताना किसन दुसरीकडे निघून गेला परंतु निलेशचे काय? ते पत्र वाचून निलेशला प्रचंड प्रमाणात धक्का बसला. सुबोधच्या संसारातील साऱ्याच गोष्टी त्याला माहिती होत्या. ज्या गोष्टी पती-पत्नीशिवाय इतर कुणालाही समजू नयेत, चार भिंतीच्या आतच राहाव्यात अशा अनेक गुप्त बाबी निलेशला माहिती होत्या. परंतु पत्रात लिहिलेला विचार सुबोध करीत असेल याची त्याला कल्पना नव्हती. ही गोष्ट त्याच्या ध्यानी-मनी नि स्वप्नीही नव्हती. सुहासिनीसोबत निलेशचे संबंध तसे बरेच मोकळे होते, त्यात बरीच सहजता होती. सुहासिनी कार्यालयात प्रथम हजर झाल्यानंतर आणि सुबोधचे प्रेम समजेपर्यंत निलेश तिच्याकडे आकर्षित झाला होता. तिच्या रुपावर भाळला होता. तिला स्वतःकडे आकर्षित करण्याचे प्रयत्नही त्याने केले होते. त्याला कधीकधी असेही जाणवायचे की, सुहासिनीही त्याच्याकडे आकर्षित होत आहे. परंतु तितक्यात सुबोध-सुहासिनीचे संबंध आणि त्यांचे प्रेम लक्षात आल्यानंतर त्याने माघार घेतली असली तरी तिच्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलली नाही. सुबोध मित्र असल्यामुळे नकळत त्या दोघांमध्ये मोकळेपणा वाढतच गेला. सुहासिनीचा स्वभाव मुळात संकोची नसल्यामुळे तिचे सर्वांशीच सहजतेचे संबंध होते. त्याचे कुणाला काहीच वाटत नसले तरीही त्याच काळात साहेबांसोबतच्या संबंधात तिने कमालीची मोकळेपणा दाखविला. त्या संबंधात घनिष्ठता निर्माण झाल्याचे पाहून इतरांप्रमाणे त्याच्याही भुवया उंचावल्या परंतु तो शांत राहिला. परंतु कधीतरी रात्रीच्या वेळी... लक्ष्मी शेजारी नसताना.. ती गावी गेलेली असताना रात्री-बेरात्री त्याला जाग आली की, त्याच्यासमोर लक्ष्मीचा चेहरा येण्यापूर्वी सुहासिनीचा चेहरा येत असे.

लक्ष्मीच्या विरहकाळात का कोण जाणे पण कार्यालयात सुहासिनी असली की, त्याचे लक्ष तिच्याकडेच जात असे. तिच्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलत असे. कुणाचे लक्ष नाही हे पाहून तो तिच्या शरीराचे, सौंदर्याचे निरीक्षण करीत असे. तिच्या संसारातला कण न कण माहिती असल्यामुळे त्याच्या डोक्यात अनेकदा असाही विचार यायचा की,

'सुहा, भुकेली आहे. थोडा प्रयत्न केला तर ती नक्कीच आपल्याकडे आकर्षित होईल. सुहासारखे रसरसलेले सौंदर्य माझ्यासमोर सुकून जाणे हा सुबोधप्रमाणे माझ्याही पुरुषत्वाचा अपमान आहे. सोबतच तिच्या सुंदरतेचाही अपमानच नव्हे का? नाही तरी आज ना उद्या ती भूक सुहासिनीला स्वस्थ बसू देणार नाही. ती इतर कुणाकडे जाण्यापेक्षा आपण का पुढाकार घेऊ नये? ती एक स्वर्गीय आनंदाची अनुभूती असेल पण हे योग्य ठरेल का? सुबोधसोबत असलेल्या मैत्रीचा तो गैरफायदा ठरेल. मैत्रीचा अपमान ठरेल. सुबोध मोठ्या विश्वासाने त्याच्या संसारातील बारीकसारीक गोष्टी आपल्याला सांगतो म्हणून का त्याच्याशी विश्वासघात करावा? त्या दोघांचे लग्न होण्यापूर्वीची गोष्ट निराळी होती... कदाचित माझ्या प्रयत्नांना यश येईलही, सुहासिनी माझ्या मिठीत येईलही कारण अशा असमाधानी स्त्रिया शेवटी त्याच वळणावर जातात. परंतु त्यासाठी सुबोधला धोका देणे गैर ठरेल. कदाचित सुहासिनी तिला मिळणाऱ्या सुखात समाधानी असेलही. माझ्याकडून तिच्या भुकेला हवा मिळाल्यानंतर ती अनेक पुरुषांकडे आकर्षित झाली तर तिला वाममार्गाला लावल्याचे पाप माझ्या माथीच मारले जाणार ना! क्षणिक सुखासाठी सुबोधला धोका देणे नीतीमत्तेला धरून नाही. परंतु ते क्षणिक सुख माझ्यासाठी आणि मुख्य म्हणजे सुहासाठी स्वर्गसुख ठरणार असेल तर काय हरकत आहे?...' पंख्याच्या वाऱ्याने कागदांनी फडफड केली तसा निलेश भानावर आला. त्या पत्रामुळे त्या पत्राप्रमाणेच तडफडणाऱ्या सुहासिनीला मिठीत घ्यायचा परवाना त्याला मिळाला होता. त्याच्या विचाराच्या इमल्यावर किसनच्या आवाजाने पाणी फेरलं. किसन म्हणाला,

"तुम्हाला साहेबांनी बोलावलं आहे."

गडबडीत त्याने त्या पत्राची घडी केली आणि तो साहेबांच्या दालनाकडे निघाला. जाताना त्याची पावले सुहासिनीच्या टेबलाजवळल रेंगाळली. दोघांची नजरानजर झाली. बदललेल्या परिस्थितीत त्याला सुहासिनीच्या नजरेचा सामना करायची हिंमत झाली नाही. तिची नजर म्हणजे अथांग सागरात एक जाळं माशाच्या शोधात असल्याचे त्याला जाणवले. तिच्या नजरतेले भाव बदलले की सुबोधच्या पत्रामुळे तिच्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलली?...

सुहासिनीने वाड्यात प्रवेश केला. वाड्यात तिथे खेळत असलेला अशोक तिला येऊन बिलगला. सुबोधची बदली झाल्यानंतर नवीनच सुरू झालेल्या बालवाडीत अशोक जात होता. सुहासिनी कार्यालयात जाताना त्याला बालवाडीत सोडायची. अशोक त्याच्या मित्रासह.. विलाससोबत घरी यायचा आणि विलाससोबत खेळायचा. विलासचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. तो त्याच्या आईजवळ राहायचा. वेळप्रसंगी ती सुहासिनीची कामेही करीत असे. सुहासिनीही तिला आर्थिक मदत करीत असे. सुहासिनीने दार उघडले आणि एका बंद लिफाफ्याने तिचे स्वागत केले. लिफाफा हातात घेऊन त्यावरील अक्षर पाहताच ती मनाशी म्हणाली,

'आँ! सुबोधचे पत्र? हा काय प्रकार म्हणावा?त्याला जाऊन चारच दिवस झाले आणि लगेच आज पत्र ?' तिने थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला. आतल्या कागदावरील मजकूर तिने वाचायला सुरुवात केली,

'प्रिय सुहासिनी,

पत्र पाहून तुला आश्चर्य वाटलं असणार, तू गोंधळली असणार. मी माझी बदली तुझ्यापासून दूर करून घेतली. हां.. हां.. दचकू नकोस. खरेच त्या प्रकरणामुळे माझ्या बदलीला मीच कारणीभूत आहे. त्याला कारणही तसेच आहे. सुहा, तुला आठवते, त्या रात्री मी तुला एक निर्णय घेतला असल्याची कल्पना दिली होती. त्यानंतर ऑडिट प्रकरण झाले. एव्हाना तू निर्णय घेतला असशील. मला खात्री आहे, तू सकारात्मकतेने माझ्या निर्णयाला स्वीकारण्याचे ठरवले असणार. तुझ्या सुखात बिब्बा घालणं नको म्हणून मी माझी बदली करून घेतली आहे. कारण मी तिथे असताना तुला माझ्या उपस्थितीत त्या सुखाचा आनंद मनसोक्त लुटता आला नसता, माझी उपस्थिती तुमच्या मार्गात अडथळा ठरली असती. एक प्रकारचा संकोच तुला वाटला असता आणि तू त्या संबंधात समरस झाली नसती. मी तिथे नसल्यामुळे तू अधिकाधिक सुख घेऊ शकशील. आता माझा दुसरा निर्णय! तू नक्कीच म्हणशील, सारे निर्णय तूच घेतोस. सुहा, निर्णय जरी मी घेत असलो तरी मी तुझी संमती गृहीत धरलीय. निर्णय तुझ्या हिताचे असल्यामुळे तुझ्या नकाराचा प्रश्नच येत नाही.

निलेश! हा माझा एकट्याचा मित्र नाही तर आपल्या दोघांचाही तो जवळचा मित्र आहे. आपल्या तिघांमध्ये मैत्रीची एक सहजता आहे, एक घट्ट वीण आहे. माझ्या योजनेत मी निलेशला समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जे संबंध पूर्वीपासून तुम्हा दोघांमध्ये स्थापित झाले आहेत तेच संबंध बिनदिक्कतपणे पुढे चालू राहावेत म्हणून मी बाजूला झालोय. दचकू नको, रागावू नको. तुझ्या मनात विचारांचे वादळ उठेल परंतु ते वादळ शमल्यानंतर शांत डोक्याने तू विचार केलास तर माझ्या हट्टाचे तुला महत्त्व पटेल. साहेबांप्रमाणे निलेशची वृत्ती पापी नाही. तुमचे संबंध जरी सामाजिक नीती, नियमांना बाजूला सारुन फुलणारे असले तरीही त्याला विश्वासघाताचे, अनैतिकतेचे काटे असणार नाहीत. विचार मंथनातून घेतलेल्या निर्णयाला अमृताची गोडी असते. सुखाची झालर असते. आजपर्यंत तुमच्या संबंधाला अविश्वासाची किनार होती कारण ते संबंध माझ्या पश्चात फुलत होते. आता तेच संबंध माझ्या संमतीने फुलणार असल्यामुळे त्याला कोणतीही बोचणी नसल्यामुळे तू अधिक समरस होऊन स्वर्गीयसुखाचा आनंद घेशील....

तुझाच,

सुबोध.

'काय म्हणावे या सुबोधला? हा वेडा तर झाला नाही? कुणी याला करणी तर केली नाही? का असा झपाटलाय? सुबोध, तुझी आगळीवेगळी क्रांती होईल रे, तू महान होशील परंतु तुझ्या या क्रांतीची ठिणगी माझे जीवन होरपळून टाकेल कदाचित माझ्या जीवाची आहुती जाईल. आधीच कार्यालयात आणि गल्लीत माझ्याकडे पाहण्याची लोकांची नजर बदलली आहे. त्यात ऑडिटनंतर तर कार्यालयात अशीही चर्चा दबक्या आवाजात परंतु माझ्या कानी येईल अशाप्रकारे चालू आहे की, तू माझ्या शरीराच्या बदल्यात भ्रष्टाचारातून स्वतःची सुटका करुन घेतली आहे. अनेकांनी तसे इशारेही सुरू केले आहेत. आधीच तू मला ते सुख देत नाहीस आणि आता मला ते सुख मिळवून देण्याचे अवडंबर माजवून मला बदनाम करतो आहेस? व्यभिचारी स्त्रियासुद्धा नवऱ्याच्या साक्षीने कुणाच्या मिठीत शिरत नाहीत. मात्र कुंकू कुणाचे मिठी कुणाची या अवस्थेत पतिव्रतेचे नाटक वठविणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. उद्या तुला कुणी समाजसुधारक म्हणतील अथवा म्हणणारही नाहीत पण त्याचवेळी मला मात्र नानाप्रकाराची आभुषणांची विशेषणं चिकटवून मोकळे होतील.

निलेशलाही याच आशयाचे पत्र लिहिले आहे असे लिहितोस. मित्राला माझ्या पत्नीला कवेत घे, तिचे समाधान कर असे लिहिताना तुझे हात का थरथरले नाहीत? तुझे शब्द कागदावर उमटलेच कसे? मित्राच्या भावनांचा विचार केलाय का तू? काय वाटलं असेल त्याला?'... सुहासिनी विचारांच्या सागरात गटांगळ्या खात असतानाच बाहेरून 'अशोक... अशोक...' असा आवाज देत निलेश आत आला. त्याला पाहताच सुहासिनीने सुबोधचे पत्र गडबडीने लपविले असल्याचे निलेशच्या लक्षात आले.

'बाप रे! पत्र मिळताच निलेश लगोलग आलाय. त्याला मी त्याचीच वाट बघत बसलीय असे तर वाटले नसेल की माझ्यासोबत तसे संबंध जोडण्याची तो वाटच पाहत बसला होता. सुबोधचे पत्र म्हणजे त्याच्यासाठी खुला परवाना आहे असे तर समजत नसेल? काही असले तरीही निलेशने एवढी घाई करायला नको होती...'

"सुहा... सुहासिनी..." निलेशच्या आवाजातील बदल सुहासिनीच्या लक्षात आला.

"क.. क..काय?" तिनेही चाचरत विचारले.

"ही..ही..चिंचेची आमटी... लक्ष्मीने मुद्दाम दिलीय."

त्याच्या हातातील डब्बा घेताना दोघांच्या बोटांचा स्पर्श एकमेकांना जाणवला. दोघांच्याही मनात एकच विचार दाटून आला की, समोरून सहेतुक स्पर्श झाला. एकमेकांना पाहण्याचे भावही कसे वेगळेच वाटत होते. माणूस परिस्थितीचा गुलाम असतो याचा प्रत्यय अशा प्रसंगी येतो. परिस्थिती बदलली की, संदर्भ बदलतात, नाते बदलतात. तिथे संबंधाचे काय? परिस्थितीचा ताण जाणून सुहासिनी म्हणाली,

"बसा. चहा करते."

चहा करण्यासाठी सुहासिनी आत गेली. निलेशने खुर्ची अलगद पलंगाजवळ सरकावली. त्याने हळूच सुहासिनीने लपविलेला कागद काढला. तो कागद सुहासिनीने त्याला पाहताच लपवला होता त्यामुळे त्याबद्दलची उत्सुकता त्याला शांत बसू देत नव्हती. त्या कागदावर त्याने एक धावती नजर टाकली. त्या पत्रातील मजकूर लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. सोबतच धक्काही बसला. कागद पूर्वीच्या जागी ठेवत खुर्ची बाजूला घेत त़ मनाशीच म्हणाला,

'सुहासिनीने पत्र पूर्णपणे वाचलेले नसताना माझ्या येण्यामुळे तिला काय वाटले असणार? ती दचकली असणार. सुबोधने मला लिहिले होते की, तिला आधीच कल्पना दिली आहे. म्हणजे या पत्राने तिची मानसिक तयारी तर झाली नसेल? म्हणून तर तिचा स्पर्श, तिच्या डोळ्यातले भाव बदलले नसतील? ती माझी तर वाट बघत नसेल? मी येणार याची तिला खात्री तर नसावी?...'

तितक्यात सुहासिनी चहा घेऊन आली आणि निलेशच्या विचारांचे अश्व माघारी परतले. तो चहा घेऊ लागला परंतु दोघांमधे एक प्रकारची शांतता, मौन होते. चहा संपताच कपबशी तिच्या हातात दिली परंतु यावेळी एकमेकांना स्पर्श झाला नाही कदाचित कुणीतरी तो मुद्दाम टाळला असावा. गुढ शांतता वाढत होती. कुणीही त्या शांततेचा भंग करायला पुढाकार घेत नव्हते. त्याचवेळी वाढलेले दोघांचेही श्वासोच्छ्वास एकमेकांशी संवाद साधत होते. सुपारी तोंडात टाकून सुबोध कसाबसा म्हणाला,

"येतो मी..." तिच्या उत्तराची वाट न पाहता तो बाहेर पडला. सुहासिनी तो गेलेल्या दिशेने मुकपणे पाहत होती...

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED