Saguna books and stories free download online pdf in Marathi

सगुणा

""सगुणा""
"सगुणा कोल्हाटयाची पोर, बाप शिरपा आन आई तानी, कोल्हाटयाचा असून शिरपाला नाच गाणी आवडायची नाही, गावात रोजनदारीवर कामाला जाऊन दोघांची भाजी भाकरीची सोय करायचा. दोन वेळच्या भाकरित सुखी संसार बरा होता दोघांचा, त्यातच त्यांच्या सुखी संसारात अजून भर पडली, तानुला दिवस गेल, नऊ महीन नऊ दिवस झाली अण दोघांच्या संसारा च्या वेली वर कळी उमलली.दोघांचा आनंद गगनात मावेना. आता तानु शेतावर जात नव्हती, सगुणा रांगायला लागली,तस कधीतरी भाकरी घेऊन जायची शिरपाच्या. अस करत सगुणा पाच वर्षाची झाली,तानु आता रोज शिरपा संग कामावर जायची, त्यातच पाटलाची नजर तानुवर पडली, तस तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करु लागला. तानु आपल्या संसारात मग्न होती,तिला पाटलाची चतुराई लक्षात आलीच नाही,आता शिरपाच्या घरी काहीतरी काम काढून पाटलच येन जान चालू झाल. आदिच कामाची उचल दे सन वार आला की रोजनदारी सोडून जास्तीच पैस दे, अस बऱ्याच दिवस चालल. एक दिवस पाटिल शिरपाला म्हणाला "आस मोल मजूरी करुण किती दिस खानार, जरा तुझ्या बायकोकड आन पोरिकड बघ, चांगल खायाला नाय का ल्यायाल नाय" शिरपा म्हणाला "खर हाय मालक पर दूसर काय करु म्या" पाटलानी खिस्यामधुन पाच हजार रुपये काढल अन शिरपाच्या हातात ठेवल.' ' नग मालक कश्याला' माझ्या गरीबा कडून कवा फिटायच. राहूदी बघू कस फीटत्याल ते पुन्हा.शिरपा त्या दिवशी अगदी खुशीत घरी आला, तानिच्या हातात पाच हजार ठेऊल,तस तानी म्हणाली, काय व एवढं पैस कुणी दिल! आग मालकानी दिल आपली गरीबी बघून दया आली बघ त्यासनी.आग बाई देव मानुसच म्हणायच की, व्हय ग देव मानुसच हाय.आठ दिवस झाल पैसे देऊन एक दिवस पाटलानी शिरपाला वाडयावर बोलविल. शिरपा गेला दाराबाहेरच उभा राहून,काय काम हूत का मालक माझ्याकड? व्हय, तुला पाच हजार दिल्यात ती मला दोन दिवसात माघारी दे. आव पर मालक म्या दोन दिवसात कुठून आणू एवढं पैक. हे बघ शिरपा मला तर दोन दिवसात पैस पहिजीत तुझ तू बघून घी काय करायच ती. आव पर मालक तुमि तर म्हणलासा कवा बी दे म्हणून. व्हय पन मला आता गरज हाय त्याच काय? बघ काय ते आन मला सांग. शिरपा काळजीत पडला, कुठून दयायच पैसे त्यानी दिल ते तर खर्च झाल, काय कराव या इच्यारात परत फिरला. तेव्हढ़यात पाटलानी हाक मारली, तस शिरपा गरकन माघारी फिरला, शिरपा तुला पैस दयायला जमत नसल तर माझ एक काम कर. बोला की मालक एक काय, तुमच्यासाठी जीव बी तयार हाय माझा. आज राच्याला तानिला वाड्यावर लाउन दी.तसा शिरपा चवताळला 'पाटिल' त्वांड सांभाळा, दिवसा सपान बघताय का? तानीकड वाकडया नजरान बघितल तर डोळ काढून हातात दिल. 'शिरप्या' पाटील अंगावर आला तसा शिरपान त्याला एका झटक्यात आडवा केला.
बाकिच गड़ी मधि पडले आन वाद सोडविला. शिरपा रागात घरी आला.छपराला लावलेल कोयत घेतल आन शेताकड निघाला. माग सगुणा रडत होती, तानी हाका मारायला लागली आव भाकर खाऊन जा की शेतावर. पन शिरपा आपल्याच विचारात निघाला,पाटलाच्या पैश्याच काय कराव, पैस देउस्तवर त्याच्याकडच शेतावर जाव लागल, या विचारात रानात पोहचला. मागून तानी न्यारीदुपरिच्या भाकरी बांधून लागलीच माग निघाली.सगुणा बी सोबत होती.दोघिबी शेतावर पोहचल्या, भाकरी ठेऊन शिरपाकड गेली ' आव न्यारी करा आन मंग काम, चला बर' मला भूक नाय तू खाऊन घी. आव काय झाल हाय का भूक नसाया,बर वाटत नाय का तुम्हास्नी? झाडाखाली जाऊन पाणी घ्या बर. तुला एक डाव सांगीतल समजत नाय व्हय? मला भूक नाय. काय झाल ते तानिला काहीच समजत नव्हतं. बाकीच्या बाया गडी कामावर आल्या तस तानिबी त्यांच्या सोबत कामाला लागली. दुपार झाली तस सगळी जेवायला सुटली.
सगळ्या बाया बापे कामाला शिरपा कड रोज घागरी भरून पाणी आनायच काम असायच. घागर घेऊन शिरपा रागातच निघाला त्याच्या डोक्यातुन पाटलाच बोलण काही जात नव्हत. तो निघाला पाच सहा वर्षाची सगुणा बा च्या माग लागली, सगुणाला खांद्यावर बसवून गडी निघाला विहिरिवर, विहीर बरीच लांब खालच्या अंगला होती. विहिरिवर पोहचल्यावर सगुणाला खांदयावरुन उतरून सावलित उभ केल, आन राहाटाची दोर घागरीला बांधली, घागर आत सोडनार तोवर पाटील तिथ पोहचला. सगुणा सगळ बघत होती,आन काही कळायच्या आत शिरपाला मागून ढकलून दिल. शिरपाला पोहता येत नव्हत. शिरपाला ढकलून दिल्याल बघितल्या वर सगुणा रडायला लागली, तस पाटलानी सगुणा ला उचलून घेतल आन विहिरी जवळ आनल." तुझ्या बा ला टाकल तस तुला आन तुझ्या आईला बी टाकिन रडलिस आन कुणालाबी काय सांगितलस तर" लाहनगा जीव भेदरुन गप बसला. सगुणाला तीथच सोडून शिरपा बुडल्याची खात्री झाल्यावर पाटिल बांधावर जाऊन ओरडू लागला. "पळा पळा लवकर शिरपा हिरित पडला" पाटलाच्या हाकन सगळेच घाबरून पळत सुटले. विहिरिजवळ जाऊन बघतात तर शिरपा बुडालेला, ज्याना पोहता येत होत त्यानी विहिरित उडया घेतल्या. दोरया बांधून त्याला वर काढला,पन बराच उशीर झाल्यामुळ नाका तोंडात पाणी जाऊन शिरपा जग सोडून गेला.तानी च जगच संपल तीथच मटकन खाली बसून धाय मोकलुन हंबरडा फोडला. सगुणा भेदरलेली सगळ बघून पन लहानगा जीव पाटलानी केलेल आन बोललेल तिच्या ध्यानात होत, कुणाला काही सांगव तर आई आन मला पाटील मारून टाकिल या भीतिन पोर गप होती. पाटलाचा डाव फत्ते झाला होता. शिरपाच्या क्रियाक्रमाचा सगळा खर्च पाटलानी केला. दहाव, तेराव झाल. तानी ला काय कराव समजत नव्हतं पोर पदरात तीच आन स्वताच पोट भरायच कस ही पंचाइत. तेव्हड्यात पाटील घरी आला, शिरपा सोबत काय झाल बिचारि तानिला मागमुस ही नव्हता. पाटील म्हणाला ताने काय बी काळजी नको करु,म्या हाय तुला जे पाहिजे ते सांग तुला अस वारयावर नाय सोडायचो. शिरपा माझ्या भावासारखा व्हता. मग असच येन जान चालू झाल पाटलाच.कधी धान्य दे कधी पैसे दे अस करत तानिच्या जवळ जाण्याच चालू झाल, तानी पाटलाच्या उपकाराखाली एवढी दबली की इच्छा नसून सुद्धा तिला पातलाच ऐकाव लागायच. नंतर तिला याची सवय च झाली, यातच सहा सात वर्ष निघुन गेली, आता पाटील साळसुद पणे घरी यायाचा. सगुणा बी आता मोठी झाली व्हती, पन अजुन ही पाठलाच बा ला ढकललेल इसरली नव्हती, पण आई पुढ तीच काहीच चालत नव्हतं.रोज संध्याकाळी ती दारात बसायची लहान होती तेव्हा शिरपा आला की तिला दारतूनच उचलून घ्यायचा,हे तिला आठवायच.तेरा चौदा वर्षाची सगुणा आई सोबत शेतावर जायची. दुपारच्या जेवणाच्या वेळी नदिवर विहरिवर पोरा न सोबत पोहायच पन शिकली.कधी मनात आल तर जात बी नस आईसोबत. एकुलती एक म्हणून तानी बी काही म्हणत नसायची. सगुणा नावाप्रमाणच सगुन,सुंदर देखनी होती,अगदी चवळीची शेंग. हल्ली पाटलाच येन जरा जास्त च वाढल व्हत, सगुणाला त्याचा लई राग येई पण कुणाचा आसरा नाही म्हणून गप गुमान बसायची."सगुणे आग ए सगुणे" आईच्या हाकन सगुणा भानावर आली. काय ग आये,काय झाल. आग काय म्हणून काय इचारतीस तिन्हीसांजला दारात हुभी राहत जाऊ नग म्हणून किती यळा सांगीतल पर तुझी काय सव जात न्हाय, आभाळ भरून आलय परसदारातल धुण काढून आन,करड झापाखाली ठिव. 'व्हय' म्हणून सगुणा परसदारी निघाली. तर समोरून तो आला. तो म्हणजे पाटील, सगुणा न आईला हाक दिली , आय त्यो आला बघ,तस तानु(सगुणाची आई) पदराला हात पुसत बाहेर आली. या की मालक बाहेर कमन हुभे हायसा.सगुणा रागात पाटालाकड बघत राहिली. आग ताने तुझी लेक माझ दार आडवुन बसल्यावर कस यायच. अस म्हणत पाटिल घरात शिरला. सगुणाला पाटिल आल्याल चालायच नाही. पण आईच्या धाकान गप राहायची. ताने तुझी लेक लय हुशार झाली ग म्हणत सगुणा वर पाटलानी नजर फिरवाली.जाउदया मालक बारीक हाय आजुन समज न्हाय तिला. व्हय का?मंग आम्ही दिउ उंदयापासुन चरवी भर दूध,मनजी वहिल लवकर मोठी.सगुणाला त्याच्या बोलण्याची किळस यायची. एक दिवस तानी अंतरुणात पडली लय तापन फणफणत व्हती. सगुणान आईच डोसक दाबल,दोन वाकळा अंगावर टाकल्या पन कमी होईना. सगुणाला काही सूचना.घरात पैस भी नाहीत काय कराव समजना. तेव्हड्यात तानी म्हणाली सगुणे पाटला कड जाऊन पैस घेऊन ये थोड़. म्या नाय जायचे त्याच्याकड, लय वंगाळ हाय त्यो. आग आस काय बी नाय आपल्यासाठी तुझा बा गेल्या पासून किती केलय. पर म्या नाय जायचे. आग बा सारखी मि बी मरल आन मंग काय करशील तू. आईच हे ऐकून आता सगुणाचा नाइलाज झाला. तिन्हीसांज होत आली व्हती,सगुणा निघाली पाटलाच्या शेतात काम करणाऱ्या बाया भेटल्या सगुणाला, तीन इचारल पाटील मळयात हाय का गेल वाड्यावर? त्यानी सगुणाची विचारपुस केली अन पाटील मळयात आसल्याच सांगीतल. तस सगुणा शेताच्या वाटेवरती निघाली. लांबन च पाटील दिसला,सगुणेच्या अंगात राग संचारला पन यायची अवस्था नजरेसमोर होती म्हणून गुमान पाटला जवळ गेली,आईन पैस मागितल्यात बर वाटल की कामावर येऊन फेडते म्हनली. पाटील म्हणाला किती पाहीजेत पैस? मि बी काय इचारतोय तुला आग तू तर आमचीच अस म्हणून सगुणाचा हात धरला. जवळपास कोणीच नव्हतं जवळजवळ अंधार पड़त आलेला. त्यानं हात धरला तस सगुणान त्याचा हात झटकुन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पन त्यानं तिला जोरात धरल, सगुणा घाबरून घामघुम झाली पन पाटील सोडत नव्हता, सगुणाला काय कराव समजना, आरडा ओरड करु लागली पण काहीच उपयोग नव्हता, सगळे कमावरचे बाया बापे कवाच गेले व्हते. पाटलानी तिला खाली ढकलली तशी ती कोवळीच पोर तो कसा तिला ऐकयचा, तीच तोंड दाबून म्हणाला आग तुझ्या आय मंदी आता काय बी राहयल नाय उगाच तिला पोसुन माझ पैस ख़र्ची व्हत्यात, आता तु हायस म्हणा तुला बी काय कमी पडू द्यायचो नाय बग. सगुणाला बा चा चेहरा आठऊ लागला याच पाटलान माझ्या बा ला मारल माझ्या आईच सुख हीरावुण घेतल आन आता माझ वाटोळ,,याला सोडायचा नाय. पाटलानी सगुणाचा हात धरल एक हात तिच्या तोंडावर दांबुन धरला,पन सगुणा पोहताना श्वास रोख़ून धरायचा शिकली होती, त्याचाच फायदा घेऊन तीन श्वास रोख़ून धरला. हालचाल बंद केली, पाटलानी तोंडावरचा हात काढला तर सगुणा शांत पडली होती. पाटील घाबरला त्याला वाटल वयान लहान पोरगी तोंड बंद करतानी नाक बी बंद झाल का झटापटीत. त्यानं नाकाला हात लावला पन सगुणाचा श्वास चालू नव्हता. पाटलाला घाम फुटला, शिरपाचा खून पचवला पन हीच काय? ह्या इच्यारात हिरिकड ध्यान गेल, तस त्यानं सगुनेला उचली आन हिरिकड नेली. कुणी आजुबाजुला नाही न याची खात्री करून घेतली, आन सगुनेला हिरित टाकून दिल.घाम पुसत माघारी फिरला,थोड़ा पुढ गेला असन तवर हिरितून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज झाला, सगुणा तर मेली मग आवाज कसला म्हणून परत हिरीजवळ गेला कुनीबी दिसना! मंग काय व्हत, असा विचार करत वाकुन बघू लागला, तोवर मागून कुणीतरी जोरात धक्का दिला,काही समजन्याच्या आतच पाटिल हिरित पडला, वाचवावाचवा अस वरडाय लागला, हिरिच्या काठावर अंधारात कुणी आसल्याच दिसल पण कळेना, तशी सगुणा वरुण बोली तीन खून केलस तू तवा असा च माझा बा बी वराडला व्हता, पाटलाला काहीच समजेना सगुनी तर मेलि व्हती, व्हाय मि मेले व्हते तुला मारया मि पुन्हा जीवंत झाले मर आता. सगुणाला माहित व्हत पाटलाला पवता येत नाय म्हणून. सगुणा मेलि म्हणून पाटलानी तिला हिरित टाकली पन त्याच्याच रानात जाऊन सगुणा पवायला त्याच हिरित शिकली, पाटील तिला टाकून पुढ होइस्तवर खड़कावरुन सगुणा भराभरा वर आली. पाटील नाकातोंडात पाणी जाऊन बुडला व्हता...
तीथच बसून सगुणा रडू लागली बा च्या आठवणीत....
घरी येऊन बादलिभर पानी अंगावर वतुन घेतल, तानु न इच्यारल यळ का झाला, आज माझ्या बा च सूतक फेडल..... आन सगुणा लेकीच्या कर्तव्यातुन मोकळी झाली..........
@सौ.वनिता स. भोगील@

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED