Double Roti books and stories free download online pdf in Marathi

डबल रोटी


रस्त्याच्या पलीकडे पसरलेल्या झोपडपट्टीत ती अन तो राहायचे. पालिकेच्या पाण्याच्या पाइपलाइनला खेटून त्यांना हक्काचे घर मिळाले होते. तो दोन गल्ल्या सोडून असलेल्या सोसायटीत हाउसकीपिंगचे काम करायचा.ती नुकतीच लग्न होऊन आली असल्याने ती दिवसभर घरीच राही.तिच्या वडिलांनी लग्नात भेट दिलेला एकुलता एक ब्ल्याक एन्ड व्हाईट टीव्ही तिच्या एकटेपणाचा सोबती होता.लग्नाला दोन महिने लोटून गेले होते, पण त्याने तिला शहर सोडा पण साधी समोरची खाऊगल्लीही दाखवली नव्हती.

दिवसभर खिडकीतून खाऊगल्लीतल्या पदार्थांचे रुचकर वास येत.कधी कच्छी डबल रोटीला बटर लागे,मग तव्यावरला त्याचा वितळता वास तिला बेचैन करी;बारीक चिरलेल्या कांद्याचा,कोथिंबिरीचा झिनझिनता,भज्ज्यांचा तेलकट,बटाटावड्यांचा उग्र खमंग,रगड्याचा तिखट असे शंभर प्रकारचे वास तिला मोहवून टाकत.दिवस सरता सरता अंड्यांचा वास येई.ओमलेट-बुर्जीच्या गाडीवर लसणा-तिखटाची फोडणी पडे अन काही क्षणात गरम पावांचा वास सुटे. ती बिचारी आपल्याच घरात फेऱ्या मारी.नाईलाज म्हणून ती घराचे दार उघडत नसे.त्याने तिला ताकीदच दिली होती, घराबाहेर पडायचे नाही. एके दिवशी नुसता दरवाजा उघडा राहिला म्हणून त्याने तिच्यावर हातही उगारला होता.तसा तो प्रेमळ होता. लग्नानंतर तिला इथे शहरात यावे लागणार म्हणून ती नाखूष होती पण त्याला पाहून तिचे त्याच्यावर मन जडले होते. तो रोज येताना तिच्यासाठी डबल रोटी आणायचा. गावाकडे असे काही मिळत नव्हते. म्हणून ती खूष होती. पण बाहेर ठेल्यावर उभे राहून खाण्याची जी मजा होती ती घरात खाण्यात नव्हती. दिवसामागून दिवस जात होते. वास सवयीचा होत होता .पण घराबाहेर जायची इच्छा मात्र दिवसेंदिवस तीव्र होत होती .

संसारही हळू हळू जमत होता. दोघे राजा-राणी तारुण्याच्या भर बहरात होते. थंडीचे दिवस होते .दिवस लौकर मावळे.या दिवसांत चांगलेचुंगले खाण्याची इच्छा तीव्र होते. तोही येताना कधी शेवयांची खीर, अधे मधे बिर्याणी असे काही घेऊन येई. पण त्या साऱ्यांपेक्षा डबल रोटीची चव तिला लाख पट चांगली वाटे. आजकाल ती त्रागा करी. तिच्यावर पूर्वी रागावणारा तो आता तिची प्रेमाने समजूत काढे. गावंढळ बायको मिळाली म्हणून सुरुवातीला मनातून नाराज असलेला तो आता तिच्यात पूर्णपणे गुंतला होता. त्याच्या या वागण्याचा कसा फायदा घ्यायचा हे तीने छान ताडले होते .ती रुसून बसायची, हट्ट करायची. बाहेर जायचेय म्हणून रट लावायची. तो तिला समजावे.पण ती तोंड फिरवून रडू लागायची. मग तो दरवाजा आपटून बाहेर जाई अन दोन सिग्रेट ओढून आत येई अन अंथरुणात तोंड खुपसून झोपी जाई.

एके दिवशी तिने ठरवलेच आज काही झाले तरी बाहेर जायचेच. तिने छान पोळी भाजीचा डबा त्याला दिला. तो कामाला जायला निघणार एवढ्यात तिने त्याला हाक दिली; 'अहो, तुम्ही काहीतरी विसरताय…'

,'काय ? सर्वतर घेतलेय ' ; तो पायात चपला चढवत म्हणाला .

तिने लगेच पुढे येउन त्याच्या गालावर मुका घेतला.


आधी असे कधी झाले नसल्याने तो गांगरला, अन म्हणाला; 'अगं हे काय?...'

'काल जितेंदरच्या पिक्चरमध्ये श्रीदेवीपण त्याला असेच करते कामावर जाताना. कामावरुन कधी याल?'; ती थोडं लाजत पण धीटपणे म्हणाली.


'आज जरा जास्त काम आहे .बघूया किती वाजतात ते.थोडा उशीरच होईल.का गं लौकर येऊ?';तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला…


…तशी ती चटकन म्हणाली; 'नको नको. मी आपले सहज विचारले.तुम्ही काम आटपून या !’

असं म्हणत तिने टाटा केला.

मनातून ती खुश होती -'आता संध्याकाळी लौकर यायचे टेन्शन नाही.हुश्श! '


जरा बरी दिसणारी साडी नेसून अन हलका मेक अप करून ती घरातून निघाली तेव्हा चार वाजले होते. काम आटपता आटपता थोडा उशीरच झाला होता. समोरच्या रस्त्यापलीकडे ती खाऊगल्ली पसरली होती, बाहेर पडताच तिने एक मोकळा श्वास घेतला. वर निळेशार आकाश पसरले होते. दरवाजा बंद करून ती रस्त्यावर आली आणि थबकली. तिच्या पायाखालचा रस्ता तिला भला मोठा भासू लागला. त्यावरून भयानक वेगाने जाणाऱ्या मोटारींना बघून ती भानावर आली. तेवढ्यात गाडीने करकचून ब्रेक मारल्याने ती एक पाऊल मागे आली. एका काळ्या खाम्बापुढे थांबलेल्या त्या गाडी पाठोपाठ बऱ्याच गाड्या थांबल्या. त्या खांबावरच्या दिव्याचा रंग बदलला अन पुन्हा गाड्या फर्रकन निघून गेल्या. ती तो खांब एकटक पाहू लागली. अन दिव्याचा रंग बदलला . अन पुन्हा गाड्या थांबू लागल्या तसा जरासा धीर करून तीने थांबलेल्या गाडीसमोर पाय ठेवला. गाडी बिलकुल हलली नाही. अन मग ती धावत सुटली. ती थेट खाऊगल्लीत घुसली.

जिथे तिथे खमंग घमघमाट. ती अक्षरश: नशेत चालू लागली. बटाटेवडे, पाणीपुरीचे ठेले पाहून पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटले. रस्त्याला प्रचंड वर्दळ होती.माणसेच माणसे ,वेगवेगळ्या कपड्यांतली त्यांची धुडे ,त्यांच्या हातात सूटकेसी,ब्यागा ,चावी लावल्यासारखे धावणारे त्यांचे पाय हे पाहून ती गांगरली.एका कोपऱ्यात अंग चोरून ती उभी राहिली. समोरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या हालचाली टिपू लागली. ते कसे वागतात, कसे बोलतात हे पाहू लागली. बटाटावड्याच्या गाडीवर भली मोठी गर्दी होती ,तीन प्रकारच्या भज्या ,कटलेस ,समोसे पण मिळत होते .पांढऱ्या -तपकिरी पावाच्या लाद्या एकावर एक रचून ठेवल्या होत्या. त्याच्या उजव्या बाजूला पाणीपुरीचा ठेला, डाव्या बाजूला सन्डविचवाला, मग कुल्फी पार्लर, आईस्क्रीमवाला, पिझ्झा-बर्गरचे दुकान ,अन त्याच्या बाहेर डबल रोटीचा ठेला ...

डबल रोटी पाहताच तिच्या तोंडाला पाणी सुटले, खूप दिवसांपासूनची तिची डबल रोटी ठेल्यावर जाऊन खाण्याची इच्छा आज पूर्ण होणार होती. पण तिला थोडी भीती आणि शरमही वाटू लागली .कसे विचारायचे, काय विचारायचे याची ती मनातल्या मनात उजळणी करू लागली.ती ठेल्याच्या दिशेने चालू लागली. जसजसा ठेला जवळ येऊ लागला तशी तिचे पाय जड होऊ लागले.वेग मंदावला आणि ठेल्याकडे ती जाण्याऐवजी समोरच्या झाडाखाली उभी राहिली आणि त्या ठेल्याकडे पाहू लागली .दोन शाळकरी मुले एकमेकांची खोडी काढत डबल रोटीचे घास घेत होती .थोड्या वेळाने एक जोडपे आले ,त्यांनी डबल रोटीचे पार्सल घेतले व दहा रुपयाची नोट काढून त्या ठेलेवाल्या काठीयावाडी ठेलेवाल्याला दिली.त्याने दोन रुपये परत दिले .

‘म्हणजे आठ रुपयाला आहे तर डबल रोटी!’,तिने मनाशीच म्हटले .तिच्या पर्समध्ये शंभर रुपयाची नोट होती,तिच्या आईने पाठवणीच्या वेळी दिलेली. काही सुट्टे पैसे आहेत का म्हणून तिने पर्सचा कप्पा बोटांनी चपापला . त्यात बरोबर पाच रुपयाचे, तीन रुपयाचे आणि एक रुपयाचे अशी बरोबर आठ रुपयाची तीन नाणी होती.तिने ती काढून एका मुठीत घट्ट धरली.


'एक दाबेली दो ! '; तिने त्या ठेलेवाल्याला सराईत असल्याप्रमाणे विचारले.

त्याने तिच्याकडे पाहिले तशी ती बावरली. नजर चोरून घेत ती मुद्दाम त्याच्या ठेल्यातल्या वस्तूंकडे पाहू लागली. एका मोठ्या ताटात भाजी ठेवली होती, त्यावर डाळिंबाचे दाणे, एका वाटीत ताजी कोथिम्बिर, एका डब्यात मसालेदार शेंगदाणे, एका बाजूला शेवयांचा ठीग ...ती पाहतच राहिली .

'म्याडम, बटर के विदाउट बटर?', या अनेपेक्षित प्रश्नाने ती अजून गांगरली .

;'काय? ' तिने विचारले ,

त्याने पुन्हा सांगितले ; 'बटर वाला मंगताय कि विदाउत बटर ?' ,

तिला कळलेच नाही काय बोलायचे ते . 'हो ',म्हणून तिने वेळ मारून नेली .


तव्यावर तो दाबेली फिरवत होता . बटरचा छान सुवास पसरला होता .त्याचा 'चुरर्र ' आवाजाने तिला बरे वाटत होते आणि कधी एकदा घास घ्यायला मिळतोय असे तिला झाले होते .

' लो म्याडम ' ..त्याने एका पेपरमध्ये डबल रोटी, शेंगदाणे, शेव आणि कांदा असे सारे तिच्या पुढे केले .तिने लगेच दुसऱ्या हाताने पैसे देत एका हाताने डबल रोटी घ्यायची कसरत केली .

त्याने तळहातावर नाणी पसरवली आणि तो म्हणाला ,

'म्याडम , दस रुपय्या ...'

तिने घास घेतलाच होता ,मात्र त्याच्या या बोलण्याने तिने डबल रोटी तशीच ठेवली .ती घाबरली. 'हा आपल्याला फसवत तर नाहीय ना. मगाशी आपण नक्की बघितले होते त्या बाईने सुद्धा आठ रुपयेच दिले होते. त्या मुलांनी सुद्धा कदाचित आठ -आठच रुपये दिले होते ...' असा विचार तिच्या मनात आला.


'आठ रुपये है न..'तीने धीर करून विचारले.

'म्याडम विदाउट बटर,आठ रुपया. विद बटर दस रुपया !…’ठेलेवाल्याने निर्विकारपणे सांगितले.


-ती थोडी घाबरलीच.-‘आता काय करायचे ? पर्समधे शंभर रुपये आहेत. तेच द्यावे लागतील आता…’तिला पर्समधल्या शंभर रुपयांची आठवण आली.

तिने एका हाताने पर्स मधे हात घातला. पण तिला काही पैसे मिळेनात.ती थोडी कावली. त्या धांदलीत तिचे डबल रोटीकडे लक्ष राहिले नाही. उगीच आले इथे असे तिला वाटू लागले. घराची आठवण आली तिला. त्याला हे कळले तर तो किती रागावेल या विचारानेच ती गर्भगळीत झाली.

'इथेच तर ठेवले होते पर्स मध्ये गेले कुठे?...'तिला ते शंभर रुपये सापडत नव्हते.


डबल रोटी एवढा वेळ ती डाव्या हातात सांभाळत होती. पण पैसे काढण्याच्या नादात ती घरंगळून खाली पडली.जमिनीवर शेंगदाणे,शेव,कांदे असे सगळे पसरले. हातात फक्त पेपरचा तुकडा राहिला...


ती मटकन खाली बसली.पालथ्या डबल रोटीकडे पाहून तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. पर्स मध्ये हात घालून तिने पैसे शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण शंभर रुपये सापडेनात. तिने वर पाहिले .लोकांच्या नजरा तिच्याकडेच होत्या. तिला तिची लाज वाटू लागली. कशीबशी सावरून,डोळे पुसून ती उभी राहणार तेवढ्यात कोणीतरी तिच्या पुढ्यात उभे राहिले .

'तुम्ही?'

त्याला तिथे उभे असल्याचे पाहून तिच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि भीती दाटली.


...


'हो, आज घरी लौकर आलो,म्हटले तुला सरप्राईझ देऊया. तुझ्यासाठी डबल रोटी आणण्यासाठी इथे वळलो आणि तू दिसलीस ...', त्याने बोलता बोलता तिला अलगद सावरले.


'सॉरी ,मी एकटीच निघाले .मला डबल रोटी खायची होती ,इथे उभे राहून ...पण..'; ती खाली मान घालून थरथरत म्हणाली .

'अ हं ,कळले मला सारे… ', तो समजावणीच्या सुरात म्हणाला.

हाताने तिच्या गालावरचे अश्रू पुसत त्याने ठेलेवाल्याला आवाज दिला ;

'दो डबल रोटी, विद बटर,कडक बनाना. म्याडम को खाने का है ...'


तिच्या चेहऱ्यावर हसू फुटले.


त्याच्या खांद्यावर डोके ठेवताना तिला डबल रोटी खाण्याइतकाच आनंद मिळत होता ...किंबहुना थोडा जास्तच ...

-भावेश

इतर रसदार पर्याय