Mi Ani Shevanta..!!! books and stories free download online pdf in Marathi

मी आणि शेवंता..!!!??

मी आणि शेवंता..!!!😊😊

प्रेमात मी पहिल्यांदाच पडलो होतो. म्हणजे अक्षरशः पडलोच होतो. प्रेम करावे , एखाद्या मुलीला बाईक वरून फिरवून आणावं, तिला सोनूल्या, पिटुल्या, पिल्लू, जानू असल्या गुलाबी नावांनी हाक मारावी अस खुप काही मी ठरवलं होतं. अगदी मुलगी पटावी म्हणून आमच्याच शेजारच्या गण्याकडे मी क्लास लावले होते. हो.....गण्या गावातला भारी माणूस..! जे कुणालाही जमत नाही किंवा ज्याचं कुणाकडे ही सोल्युशन नाही तसली काम गण्याला हमखास जमतात.

'असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर नाही', इतका सकारात्मक विचारांचा आमचा गण्या. विहिरीला पाणी सांगण्यापासून ते देशाचा पंतप्रधान कोण होईल इथपर्यंत गण्या स्वतःची मत लोकांना सांगत असतो. एकदा तर पठ्याने 'शिरडीला बोकड होईल तुझ्या, शिरपा....' असा तर्क आमच्या गावातल्या शिरपाला सांगितला होता. झालंही तसच, शिरपाच्या शिरडीला दोन बोकड झाले. तेव्हापासून गाण्याकडे लोकांची लाईन लागली. आमच्या गाईला काय होईल..? आमच्या म्हशीला काय होईल..? आमच्या बकरील काय होईल..? गण्या त्या लोकांना काहीतरी सांगत असे. गाण्याचे कयास बरोबर येत असल्याने लोकांचा गाण्यावर विश्वास बसला होता.

आमच्या शेजारच्या हिराकाकूंनी तर कहरच केला, गाण्याकडे जाऊन गाण्याच्या कानात तीन हळूच विचारलं, " गणपा माझ्या सुनेला काय होईल रं....?"

गण्याला जनावरांना सांगून सांगून कंटाळा आला होता. आता माणसं पण सांगता येतात का ते पाहू म्हणून गाण्याचे ट्राय मारला. आणि हिराकाकुला सांगितलं, "हिरायकाकू तुझ्या सूनला ह्या वेळी पोरगा होईल बर...!"

हिराकाकुला भलताच आंनद झाला आणि तिने अख्या गावात दवंडी पिटवली, " गण्या बाया पाहायला लागला....गण्या बाया पाहायला लागला...गण्या बाया पाहायला लागला..." आता अशी बातमी कानावर पडल्या पडल्या गावातल्या सगळ्या सासवा गाण्याच्या दारात जमा झाल्या. गण्या प्रत्येकीला सांगू लागला. गण्याच्या या पराक्रमाने गावातल्या काही घरात दिवाळी साजरी झाली तर काहींच्या घरात लग्न मोडली. या प्रकाराची गावातल्या एकाने पोलीसात तक्रार केली आणि पोलिसांनी गण्याला चार दिवसाच्या रिमांड वर घेतलं. चार दिवस चांगला सुजवल्यानंतर गण्याला सोडून दिलं पण शेवटपर्यंत गण्याला मी काय गुन्हा केलाय हेच समजलं नाही.
बिचारा गण्या...

गाण्याने हे प्रकार आता सोडून दिले होते. चांगल आयुष्य जगायचं अस त्याने ठरवलं होतं. आणि तस तो जगतही होता.

इकडे मला प्रेमाची खूप गरज भासत होती. दिवस रात्र, उठता बसता माझ्या स्वप्नात मला माझी होणारी " ही " दिसत होती. तिच्या बिगर चैन पडत नव्हती. पण मला काही सुचत नव्हतं म्हणून मी गण्याकडे जाण्याचं नाईलाजाने ठरवलं होतं. तशी मी गण्याची भेट घेतली. त्याने मला भन्नाट आयडिया सांगितल्या.आणि त्या मला पटल्याही... पण प्रश्न हा होता, की लग्नाची तयारी झाली पण मुलगी कोण...?

मुलीची शोधाशोध सुरू झाली. बरेच दिवस अनेक हालअपेष्टा सहन करून ही मनासारखी मुलगी भेटत नव्हती. पण गण्या हार मानत नव्हता. एक एक मुलगी मला दाखवतच होता. गण्याचे दाखवलेल्या मुलीही जरा भयंकरच होत्या.

कुणी हत्तीला लाजवेल इतकी कमनीय बांध्याची.
तर कुणी सरळसोट वाढलेल्या निलगिरीच्या झाडासारखी.
कुणाचा आवाज म्हणजे गिरणीचा भोंगा तर कुणाची नुसतीच चिव-चिव...
एक मुलगी तर गण्याकडे पाहून मला I Love You म्हणाली. साला....त्यावेळी पहिल्यांदा गण्या गांगरून गेलेला मी पाहिला.

परिस्थिती अशी बिकट असताना एके दिवशी ऐन टळटळीत उन्हात थंड हेवेची झुळूक गालावरून जाऊन थेट काळजात घुसली. ग्रीष्मचा तापटा जाऊन अचानक गारठा वाढू लागल्याचं मला जाणवू लागलं. अंगात एक अनामिक ऊर्जा संचारु लागली. तमाशातले नाचे तुणतुणे घेऊन गिटारच्या ठेक्यात नाचताना मला दिसू लागले. त्यांना बाजूला सारून स्वतःच्या केसांचा कोंबडा उडवत मोठ्या तोऱ्यात येताना मला मीच दिसलो. थोड्या अंतरावर थांबत मी शाहरुखछाप अंदाजात हात पसरले आणि एक गोड रंगाची नाजूक मुलगी आपले काळेभोर केस हवेत उडवत पळत येत मला बिलगली. तिला मी घट्ट मिठी मारली........

आणि या मधुर वातावरणात अधिक गोडवा यावा म्हणून मी तिच्या ओठांच्या दिशेने माझे ओठ नेले. ओठांचा मी चंबू केला आणि किस घेणार इतक्यात माझ्या कानाखाली सणसणीत आवाज झाला.

तो हात गण्याचा होता, ते ओठही गण्याचेच होते आणि तिच्या भूमिकेतही गण्याचा होता. झाला प्रकार माझ्या नीट लक्षात आलं होता. पण मी गप्प होतो. इज्जत वाचली म्हणून गण्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहत होता. गण्या त्या तसल्या आनंदातून सावरून मला म्हणाला,

"ये सम्या...... नालायका.... माझी आता तू इज्जत लुटली होती. कुठं तोंड दाखवायच्या लायकीच नसतं ठेवलं तू मला. "

मी अत्यंत साळसूद पणे त्याला म्हणालो , " काय झालं र...?"

आता मात्र गण्या तापला, " व्वा....... घ्या काय झालं र.........
आरं नालायका तू माझा मुका घेत व्हतास मुका..... कुठं फेडशील ही पाप. मला वाटलं होतं तू चांगला असशील म्हणून.पण तू तर तसला निघालास.."

" ये गण्या तसला म्हणजे...काहीही बोलू नको...ते काय मी मुद्दामहून केलं नाही.." मी सावरून घेत म्हणालो.

"मग.... काय भूत बित शिरलं होत की काय तुझ्या अंगात..?"
गण्याचा राग अजूनही गेला नव्हता.

" गण्या ते जाऊदे आता इथून कोण गेलं ते सांग..." मी विषय बदलत म्हणलो.

" ती पाटलाची शेवंता गेली....बर झालं गेली... थांबली असती तर काय काय पाह्यलं असत कोण जाणे..." गण्या म्हणाला.

पाटलाची शेवंता.... गण्याच्या तोंडून हे दोन शब्द फुलांच्या पायघड्यांवरून नाचत येताना मला दिसले.
पुन्हा तो गारठा, पुन्हा ते तुणतुण्या वाले, पुन्हा त्यांचं गिटार समजून तुणतुनं वाजवनं, पुन्हा तो कोंबडा, पुन्हा ती शाहरूखछाप स्टाईल, पुन्हा ती मुलगी, पुन्हा तो ओठांचा चंबू......

माझ्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलल्याने गण्या वेळीच सावध झाला आणि त्याने माझ्या कानाखाली पुन्हा एक सणसणीत ओवली... मी भानावर आलो तसा गण्या मला जरा काळजी युक्त स्वरात म्हणाला, " सम्या... बाळा काय होतंय तुला... बर वाटतंय ना...?"

मी गण्याचे दोन्ही खांदे पकडत त्याला म्हणालो, " गणपतराव मी बरा आहे.... पण मला लव्हेरिया झाला आहे.."

बुचकळ्यात पडत गण्या म्हणला, " आयला...मलेरिया ऐकलं होतं हे लव्हेरिया काय भानगड आहे ?"

" अरे गणपत बाळा, मला प्रेम झाला .... प्रेम माने लव्ह...."
मी मोठ्याने गण्याला म्हणालो.

मला प्रेम झालं हे ऐकल्यावर गण्या आनंदी झाला. पण कुणावर प्रेम झालं असं त्याने मला प्रश्नार्थक नजरेने विचारलं.
मी पाटलाच्या शेवंतांचे नाव घेताच तो हातभार उडाला. आणि मला म्हणाला, " ये.... भावा.... ती पाटलाची शेवंता आहे.. पाटलाला समजलं ना, तर तुझा सैरातच...!!"

" गण्या, मला तू सोपर्ट करायचं सोडून अस घाबरवून सोडू नको.." मी म्हणलो.

"अरे भावड्या, मी तुला घाबरवून सोडत नाही रे...परिस्थिती ची जाणीव करून देतोय." गण्या एकदम माझ्या बापा सारखा बोलला.

त्याला मी म्हणालो , " मला परिस्थिती माहीत आहे पण आता लगीन करील तर हीच्याशीच.. तू मला मदत करणार आहेस की नाही तेवढं सांग..?"

त्यावर गण्या म्हणाला, " हो तर...करणार मदत...तू काळजी करू नको. आपल्याला या शेवंतांचे नाव सोडलं तर काहीच माहिती नाही.आधी तिची माहिती काढू आणि मग भिडू..."

गण्याने थेट भिडायचा विषय काढल्यावर मला थोडी भीती वाटली पण मी ठरवलं होतं आता घाबरायचं नाही.

काही दिवस गण्याने शेवंतांचा पाठलाग केला आणि तिच्याविषयी बरीच माहिती गोळा केली आणि मला ऐकवली,

" तर, समीरराव तुमच्या होणाऱ्या 'ही'ची माहिती पुढील प्रमाणे,
तीच नाव आहे शेवंता रंगराव खुटे पाटील राहणार आपलंच गाव. स्वभाव एकदम फाडु आणि डॅशिंग. हणामारीची भारी हौस.. त्यातल्या त्यात मुलींना त्रास देणाऱ्या मुलांवर तर विशेष डोळा. एकदा भर चौकात तीन पोर दांडक्याने तुडवली होती असा जळजळीत इतिहास... शाळा 10 वी पर्यंत झाली.कॉलेजला गेली पण मास्टरलाच मारून परत आली. तेव्हा पासून कॉलेज बंद. पाटलाची एकुलती एक असल्याने लाडकी. भाऊ नाही पण भावासारखे अनेक बॉडीगार्ड दिमतीला असतात. बुलेट चालवण्यात आर्ची ची पण आई... राजकारणात जाऊन गावाचा विकास करावा असा पिढीजात संकल्प केलेला. आणि शेवटचं पण महत्वाच, लग्न पैलवानाशीच करणार...थोडक्यात तात्पर्य अस आहे, की तुझं जमणं खूपच अवघड आहे..."

गण्याने केलेल्या वर्णनाच्या जोरावर शेवंतां मला दुर्गा माताच्या गेटअप मध्ये दिसू लागली. तिच्या पायाशी बसून मी माझ्या जीवाची भीक मागत आहे असं भयानक चित्र माझ्या डोळ्या समोर उभ राहिलं. माझ्या खांद्यावर हात ठेवत गण्याने मला भानावर आणलं. आणि म्हणाला, " जाऊदे सोड , आपण दूसरी शोधू."

पण मी स्वतःला कसंबसं सावरलं आणि त्याला म्हणालो, "नाही गण्या... काहीही झालं तरी ईलाच पटवायची."

माझं ठरलं होतं पण गण्या चिंतेत पडला होता. पण माझ्या साठी तोही मदत करणार होता. आता व्हेंलेन्टाईन डे च्या शुभ मुहूर्तावर मी तिला प्रपोझ करणार होतो . सगळी तयारी झाली होती.

पण शेवंताला पाहीलवानाशी लग्न करायचं होतं या विचाराने माझ्या डोक्याच खोबर झालं होतं. मी स्वतःलाच उघडबंब होऊन आरशात जरा न्याहाळून पहिलं. माझा तो देह पाहिल्यावर मला एकदम सुकलेला बोंबील आठवला. त्या दिवशी नको तितकं मी स्वतःला निरखून पाहील होत. खुप वेगवेगळ्या , अक्राळविक्राळ पोझ देऊन पाहिल्या पण कुठल्याही अँगल ने मी पहिलवान वाटत नव्हतो. पण तरीही खचून जायचं नाही असं मी ठरवलं होतं.

गण्याच्या म्हणण्यानुसार मी वागत होतो. डायरेक्ट प्रपोझ मारला तर मरत तोवर रट्ट खायला लागतील हे आम्ही जाणून होतो. म्हणून ओळख, मैत्री आणि नंतर प्रेम असा त्रिसूत्री कार्यक्रम आम्ही आखला होता. त्याची अंमलबजावणी लगेच करावी लागणार होती कारण व्हॅलेंटाईन डे पाच दिवसांवर येऊन ठेपला होता. पाच दिवसात पाहिलवान बनणं अशक्य असल्यामुळे सध्या फक्त जिम लावली होती. पहिलवान बनण्याची प्रोसेस ऑन धी वे आहे अस आम्ही सांगणार होतो.
ओळख वाढवण्यासाठी तिला भेटणं आवश्यक होतं त्यासाठी आम्ही थेट पाटलाच्या वाड्यावर धडक मारली.

माझ्या एका हातात पाना दुसऱ्या हातात स्क्रु ड्रायव्हर आणि पाठीवर बॅग त्यात बरेच पान्हे आणि इतर सरत फटर साहित्य होत. गण्याच्या ही हातात तेच साहित्य होतं. पण डोक्यावर कढई उलटी ठेवली होती.
मी गण्याला म्हणालो, " गण्या प्लम्बर म्हणून आपण आत जाणार आहोत हे समजलं पण त्यासाठी ही कढई कशाला."

"बाळा तो प्लॅन बी आहे. प्लम्बर म्हणून आपल्याला आत घेतलं नाही तर आपण आचारी म्हणून आत जाणार आहोत. कळलं...याला दूरदृष्टी म्हणतात.." गण्याने जेम्स बॉण्ड रात्रीच पहिला होता त्याचा हा हँगओव्हर होता हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं. प्लॅन यशस्वी होउदे असं मागणं देवाकडे मागत आम्ही आत प्रेवेश केला. आम्हाला आत येताना पाहून अंगणात तीन चार मैत्रिणींना सोबत घेऊन बसलेल्या शेवंतांने आम्हाला पाहिलं. आणि बोलावून घेतलं.

"कोण र तुम्ही" शेवंताने चढ्या आवाजात आम्हाला विचारलं.

" प्लम्बर" गण्या आदबीने म्हणाला.

शेवंताने तिच्या शेजारीच उभ्या असलेल्या मुलीला विचारलं, " काय ग आर्चे... अप्पांनी बोलवलं का यांना ?"

" नाही ताई साहेब, तस काही असलं तर साहेब सांगून जात्यात." ती मुलगी म्हणली.

"काय र..कोण तुम्ही आणि न सांगता कावून आलात." शेवंता बोलली.

" हे पहा मॅडम, आम्ही जल पिपासू या संघटनेचे कार्यकर्ते आहोत. महाराष्ट्रात सध्या दुष्काळ पडला आहे त्यामुळे लोकांच्या घरोघरी जाऊन त्याचे नळ आम्ही दुरुस्त करून देत असतो . तेवढीच पाण्याची बचत." गण्या हे असलं काहीतरी सांगणार होता हे मला माहित होतं पण संघटनेचं नाव ऐकल्यावर मलाच घेरी आली.

" जल पिपासू.... अस कुठं नाव असत का संघटनेचं." शेवंता हसत बोलली. हसताना ती जाम भारी दिसत होती. तिला हसेलेलं पाहून ती माझ्या हृदयात आणखीन फिट बसली.

मी तिच्याकडे अत्यंत प्रेमपूर्वक नजरेने पाहत असतानाच म्हैस रेकावी अशी एक मुलगी अक्षरशः रेकली, " ये दिडशाहण्यांनो, इथे तुमचं काय बी काम नाय चला निघा.."

तिच्या त्या रेकण्याने मी ताडकन उडालो. त्यावर गण्या तिला म्हणाला, "अहो ताई, आमचं काम खूप थोडं आहे. आम्हाला करु द्या.."

गण्याने बराच वेळ विनंती केली पण त्यांचा नाय चा पाढा सुरूच होता. शेवटी कंटाळून शेवंताने आम्हाला आमच्या पार्श्वभूभागावर लाथ मारून बाहेर काढू नये म्हणून आम्हीच निघून जायचा निर्णय घेतला. त्यानंतर आचारी, सुतार, पेंटर, वेल्डर, घरगडी, ड्रायव्हर अशा एक ना अनेक कौशल्य विकासाच्या योजना आम्ही राबवल्या. परंतु या ना त्या कारणाने त्या सफशेल फेल गेल्या. निवडून न आलेलं सरकार पडायची वेळ येऊन ठेपली. त्यात चार दिवस निघून गेले होते आणि आज व्हॅलेंटाईन डे चा दिवस उजाडला होता. सकाळ पासून सगळीकडे गुलाबी गुलाबी दिसत होतं. गावातल्या लोकांना या दिवसाचे काहीच पडलं नव्हतं. तस कुणाला काही माहीत पण नव्हतं. मलाही ह्या डे विषयी जास्त कल्पना नव्हती आणि ती जाणून घेण्याची हौस पण नव्हती. मला फक्त शेवंतांचे हसरे डोळे दिसत होते. मला ते बोलवत होते. सगळे प्लॅन फिस्कटल्यामुळे आता मी थेट भिडायच ठरवलं होतं. तस माझं प्रेम नवीन होतं. त्याला फुलायला बहरायला वेळ द्यायला हवा होता.परंतु व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त चुकू नये म्हणून चार पाच दिवसातच मी प्रपोझ मरणार होतो. गण्या मला म्हणाला, " साम्य गाढवा, तू लै घाई करतोय. जरा धीर धर."

परंतु मी त्याच काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी भिडणारच होतो.

गण्याला घेऊन मी गावाच्या चावडीवर आलो. तिथल्या एका हॉटेलात शेवंता दररोज सकाळी 9 च्या दरम्यान येत असे. आम्ही तिच्या येण्याच्या अगोदरच हॉटेल मध्ये ठाण मांडलं होतं. बरोबर नऊ च्या ठोक्यावर शेवंता तिच्या तीन मैत्रिणीनं बरोबर आली. तिने चहा मागवून घेतला. चहाचा एक एक झुरका मारत मोठ्या रुबाबात ती काहीतरी सूचना तिथल्या हॉटेल मालकाला करत होती. तोही बैलासारखा मान डोलवत होता. तिच्या बरोबर च्या तिघी छम्मकछल्लो उगाच मकडत होत्या. त्यांचं बोलणं सुरू असतानाच मी मध्ये शिरलो आणि थेट शेवंतांला म्हणालो, " मला तुझ्याशी बोलायचंय..?"

तिला मी थेट तुझ्याशी बोलायचं अस एकेरी बोलल्याने चहाचा नुकताच घोट घेतलेल्या गण्याने कप तसाच खाली ठेवत पळून जाण्याचा पवित्रा घेतला.

इकडे शेवंतांची मैत्रीण माझ्यावर गुरगुरली, " ये शेलपाटा, ताईसाहेब म्हणायचं, एकेरीत बोलला ना तर थोबाड फोडीन."

मला प्रेमरोग जरा जास्तच झाला होता. मी त्या मुलीला म्हणालो , " तू शांत बस मी तिला काहीही म्हणेल, तो माझा प्रश्न आहे.."

मला झालेला प्रेमरोगाचा अतिरेक पाहून तिकडे गण्याची जाम तंतारली. मी दिलेलं उत्तर ऐकून शेवंता माझ्या एकदम जवळ येत बोलली.

" ये बच्चू, तू ना माझ्या एका हाताचा पण नाहीयेस.. त्यामुळे हद्दीत राहायचं कळलं.."

मी तिला जवळ खेचलं, तसा गण्याने दरवाजा पर्यंत पळ काढला. मी तिला म्हणालो, " हे पहा शेवंता, माझ तुझ्यावर जाम प्रेम आहे. तू माझ्या दिलाची राणी व्हशील का..?"

माझं वाक्य संपताच शेवंतांची सणसणीत माझ्या कानाखाली पडली. त्याचा आवाज सगळ्या चावडी भर पोहचला. सगळी कायनात स्तब्ध झाली. सगळी लोकं हॉटेलच्या दिशेने पाहू लागली. इतक्या वेळ धीर धरून बसलेला गण्या आता थेट गावाच्या वेशी बाहेर पळून गेला.
शेवंता माझ्या कडे पाहत कापून टाकीन अस म्हणत निघुन गेली.

शेवंता निघुन गेल्यावर मी तसाच खाली बसलो. कानाखाली मारल्याने अजूनही त्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता. एका रट्यात माझ्या माणगुटीवरून प्रेमाचं भूत उतरलं होत. माझ्या कर्माला हात लावून मी चहाच्या भरलेल्या ग्लासकडे शांत पणे पाहत बसलेलो होतो. तेवढ्यात माझ्या मागून खांद्यावर एक हात पडला. मी मागे वळून पाहिलं तर ती त्या शेवंतांच्या मैत्रिणी पैकी एक होती.तिला पाहताच मी ताडकन उठून उभा राहिलो. आणि तिला घाबरतच म्हणालो, " हे पहा मॅडम मला अजून मार खायचा नाही. पिलीज मला जाऊद्या. मी अजिबात प्रेम ब्रिम करणार माही. मला माफ करा."

त्यावर ती मुलगी अत्यंत हळुवारपणे म्हणाली, "अहो शांत व्हा, आणि खाली बसा."

मी तसाच खाली बसलो. ती बोलत होती, " तुमाला जास्त लागलं तरी नाही ना ? " तिने माझा हात पकडत मला विचारलं, "तुम्ही शेवंतावर खरं प्रेम केलं होतं. मला तुमच्या डोळ्यात ते दिसत."

ती अस म्हंटल्यावर मी माझ्या डोळ्यांना हात लावला तर हाताला चिपड लागलं. ते तसच लपवत मी तिच्या बोलण्यातडे लक्ष देऊ लागलो. ती पुढे म्हणाली, " तुमच्या प्रेमावर शेवंता नाही पण मी भाळले. माझ्या दिलाचा राजा होशील का..?"

मला ही त्यावेळी कोणी तरी प्रेमाचा आधार हवा होता.गण्या केव्हाच पळून गेल्याने मी एकटा होतो. पण ह्या मुलीने माझा एकटे पणा दूर केला होता. त्या मुळे ती मला शेवंतापेक्षा भारी वाटली.मी तीच प्रपोजल स्वीकारत तिला म्हणालो, "मला ही तुझ्या दिलाचा राजा होयला आवडेल."

मी अस म्हणताच ती नाजूक कळी प्रमाणे लाजली. माझी गट्टी जमली होती. प्रेमात मी आता खऱ्या अर्थाने पडलो होतो. हॉटेल मधून आम्ही बाहेर पडलो वाटेत गण्या भेटला.मला आणि त्या मुलीला पाहत जरा घाबरतच तो म्हणाला, " सम्या काय झालं..?"

मी म्हणालो, " गणपतराव आता जमलं बरका. गुलाब नाही पण गुलाबाचा देठ पटला..."

मी अस म्हणताच ती खूप सुंदर हसली.
तो पर्यंत टळटळीत दुपार झाली होती. आम्ही एका झाडाखाली बसलो होतो. सूर्य, झाडे फुले आणि सगळा निसर्ग आमच्याकडे पाहत होता. आम्ही मात्र त्या सर्वांकडे दुर्लक्ष करत आमच्यात आकंठ बुडालो होतो..

ह्या सगळ्या गोंधळात तीच नाव तर सांगायचंच राहील.
तीच नाव होतं .... शेवंता.. घाबरू नका ही दुसरी आहे.....

समाप्त..!!!

#सत्यशामबंधु


इतर रसदार पर्याय