Penting books and stories free download online pdf in Marathi

पेंटिंग...

कथेचे नाव: पेंटिंग

(आयुष्याच्या कॅनव्हास मध्ये रंग भरणारी संघर्षमय प्रेम कहाणी)

'पावसाळा…. पावसाळा आला की प्रेमाला उत येतो.. 'उत' म्हणणं बरोबर नाही 'उधाण' येत असे म्हणूयात.. परंतु शब्द बदलले तरी भावना थोड्याच बदलतात, भावना त्याच राहतात. प्रेमाला कितीही शब्दांच कोंदण लावलं तरी प्रेमाच्या सौन्दऱ्यात भर ही पडत नाही आणि प्रेम कमीही होत नाही. प्रेम हे इतकं सुंदर असत की ते फक्त आपण करायचं असतं आपण कधी सुंदर होऊन जातो हे आपलं आपल्याला कळत नाही.'

समोर अचानक सुरू झालेली संततधार पाहत पाहत समीर स्वतःची डायरी लिहीत होता. टपरी वर अचानक त्या पावसात ही गिऱ्हाईक आल्याने त्याची तंद्री भंग पावली होती. गिऱ्हाइकाकडे पाहत त्याने डायरीत पेन ठेवला आणि डायरी बंद केली आणि म्हणाला,

"काय रं गणपा...एवढ्या पावसात काय करतोय…"

"लै वाईट रं बाबा लै वाईट….पानाची सवय लै वाईट… एवढ्या पावसात यायला लागलं बग तलब झाल्यावर…" गणपा म्हणाला.

"बर थाम्ब तुझ्या आवडीचं पान बनवतो..." अस म्हणत समीर मसाला पान बनवू लागला..

"बनीव लवकर.. भिजाया लागलोय मी इथं..." गणपा घाईत बोलला..

समीर ने पान बनवलं आणि गणपाच्या हातात दिलं..पानाचे पैसे देता देता गणपा बोलला…

"काय र सम्या कुठवर आलाय अभ्यास…"

"सुरू ये…" शेजारी ठेवलेल्या तात्यांच्या ठोकळ्या वर हात ठेवत समीर शांतपणे म्हणाला..

"कर कर जोरात अभ्यास कर...अधिकारी हो मोठा...लका कव्हर पान इकतो…" गणपा गेला आणि समीर ने ठोकला उघडला.. बाहेर पाऊस सुरूच होता.

समीर… गरीब घरातला हुशार मुलगा. गरिबांची पोरं हुशारच असतात. म्हणजे त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. अभ्यास करून घरात अठराविश्व असलेलं दारिद्र्य संपवण्याची जबाबदारी ही त्यांच्यावरच असते. समीर ही त्यातलाच. आई-वडील मोलमजुरी करून घर चालवत आणि समीर पानाची टपरी चालवून त्यांना छोटासा हातभार लावत. आई, वडील, छोटी बहीण आणि समीर असा त्यांचा चौकोनी कुटुंब विस्तार होता. बापाने केलेले कष्ट समीर लहान पानापासून पाहत आलेला होता. आई बापच म्हातारपण सुखात जावं म्हणून तरी आपल्याला शिकायलाच पाहिजे असं त्याने शाळेत असतानाच ठरवलं होतं. कॉलेजात असताना तसा तो जेमतेमच होता. BA त्याने कसबस उरकलं होत. मित्र आणि कॉलेजच्या सरांकडून MPSC आणि UPSC बद्दल त्याला समजलं होत. ह्या परीक्षा देऊन अधिकारी व्हावं अस स्वप्न तो पाहू लागला होता. त्यासाठी गेले वर्षभर तो तयारी करत होता. अनेक टवाळक्या म्हणता येतील अशा सवयी त्याने सोडल्या होत्या आणि अधिकारी व्हायचं हे वेड घेऊन तो त्याच्या स्वप्नांच्या मागे जीव खाऊन पळत सुटला होता.

कॉजेल संपल्याने घर, टपरी आणि अभ्यास एवढाच त्याचा दिनक्रम होता. त्यामुळे विशेष असे त्याला मित्र नव्हते. तो त्याचाच मित्र होता. म्हणूनच त्याला डायरी लिहायची सवय लागली होती. त्याच सगळं म्हणता येईल असं 'सगळंच' त्या डायरीत तो लिहिती असे.

तो प्रेमाचा ही भुकेला होता. तो मनोमन एका आकृतीवर प्रेम करायचा. ती आकृती सुंदर होती, काळजी घेणारी होती. त्या आकृतीचा चेहरा त्याने कधीच पहिला नव्हता. अनेक वेळा डोळे घट्ट बंद करून तो तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करायचा पण त्याला यश येत नव्हतं. अशीच एखादी आकृती मुलीच्या रुपात आपल्या ही आयुष्यात येईल असं त्याला मनापासून वाटायचं.

जितका तो त्याच्या अधिकारी होण्याच्या स्वप्ना बाबत फोकस्ड होता तितकाच तो त्याच्या आयुष्यात येणाऱ्या त्या आकृती साठीही आतुर होता.

अभ्यास करता करता कंटाळा आला की तो टपरीतला रेडिओ लावत असे. रेडिओ वर गाणी ऐकणे हाही त्याचा एक छंद.अभ्यास करता करता, गाणी ऐकता ऐकता दिवसा मागून दिवस जात होते. विशेष काही घडत नव्हतं.

आजाचाही दिवस असाच होता. पावसाचं मात्र त्यात वेगळेपण होतं. गणपा गेल्या पासून तो वाचतच होता. वाचता वाचता नोट्स काढत होता. त्याचा हा नित्य क्रम होता. त्याच तंद्रीत असताना अचानक गाडीचा हॉर्न जोरात वाजला आणि त्याची तंद्री भंगली.

बऱ्याच दिवसा पासून बंद असलेल्या टपरीच्या समोरील घरात एक कुटुंब राहायला आलं होतं. त्याने गाडीच्या दिशेने पाहिलं एक पन्नाशीतलं दाम्पत्य गाडीतून उतरत होत. दररोजच्या त्याच त्याच माणसांना पाहून समीर ही कंटाळला होता. त्यामुळे आलेल्या ह्या नवीन मंडळींकडे तो निरखून पाहत होता. त्यातील पुरुष माणसाने गाडीच्या डिकीतून तीन बॅगा बाहेर काढल्या आणि त्यातील दोन बॅगा घेऊन तो घराकडे जाऊ लागला, जाता जाता गाडीतील कुणाला तरी त्याने आवाज दिला, त्या आवाजासरशी गाडीचा मागचा दरवाचा उघडला गेला. समोर विशेष काही घडत नाही हे कळल्यावर समीरने आपलं लक्ष पुन्हा ठोकल्याकडे वळवलं पण अचानक पणे समोरच काही तरी सुटतय हे त्याच्या लक्षात आलं. आणि गपकन त्याने मान वर केली आणि गाडीकडे पाहू लागला.

हवेत उडणारे केस चेहऱ्यावर आले होते, हाताने ते मागे सारले जात होते. कानातले केसांच्या नाचाबरोबर ताल धरत होते. त्या नाचकामात हातांचा व्यत्यय सुरूच होता. हातातलं एक्या बाजूने डोलणारं ब्रेसलेट लखलख चमकत होतं. स्वतःची ओढणी सावरता सावरता ती पाच, साडे पाच फूट उंचीची सडपातळ तरीही भक्कम बांध्याची मुलगी बॅग उचलण्याची धडपड करत होती. बॅग कदाचित जड असावी म्हणून ती मुलगी दातांच्या मध्ये ओठांची पिळवणूक करता करता बळेच बॅग उचलत होती. तिने कशी बशी बॅग उचलली आणि घेऊन जाऊ लागली.

हे सगळं पाहता पाहता समीर पार हरवून गेला होता. त्याला त्याच्या स्वप्नातली आकृती आठवू लागली होती त्या आकृतीचा चेहरा त्याने कधीच पाहिला नव्हता. तो आज स्पष्ट दिसत होता. हिरव्यागार डोंगरावरुन ती पुढे आणि तिच्या मागे त्याला तोच पळताना दिसत होता. प्रेमाने भरून ओसांडणारं दुष्ट होतं ते…. पळताना तिने वळून समीर कडे पाहिलं...तो तोच चेहरा होता जो आज टपरी समोरच्या घरात राहायला आला होता. बॅग घेऊन ती बरीच पुढे गेली होती.. समीर तिला पाहत होता…

त्याच्या दोन स्वप्नांपैकी त्याच एक स्वप्न त्याच्या समोर उभं होतं… याला ते मिळवायचं होतं… तसा त्याने पक्का निश्चय केला होता….

टपरीवर बसून पान विकणे, अभ्यास करणे, डायरी लिहणे या व्यतिरिक ती दिसलीच तर तिला चोरून चोरून पाहणे ह्या एका अधिक कामाची त्याच्या ऐकून कामात भर पडली होती. इमान इतबारे तो ये काम करत होता. पण तीच दर्शन त्याला क्वचितच होत होतं..

त्याने एकदा डायरीत लिहल होत….

तिला पाहिलं की पाहतच राहवस वाटतं.. ती आल्या पासून टपरीवर मी फक्त अभ्यासाला आणि काही पैसे मिळतील म्हणून येत नाहीये. तिला पाहायला ही येतो. प्रेम सुंदर असत हे मला माहीतच होत...पण ते इतकं सुंदर असेल याची मला कल्पना नव्हती. प्रेम ही भावना खूपच गोड आहे.. आयुष्य हे तिखट, खारट अशा अनेक चवींनी भरलेलं आहे. त्याचा आस्वाद आपल्याला आवडत नसला तरी घ्यावाच लागणार असतो. परंतु अस जरी असल तरी देवाने प्रेमाचीही निर्मिती केलेली आहे. तो तिखटपणा जाऊन गोडवा यावा म्हणून प्रेम...

घरी ही समीरचं वागणं बदललं होतं. दररोज 10 वाजता टपरीवर जाणारा समीर सकाळी आठ वाजताच जाऊ लागला होता. 'सकाळी लवकर गेलं की दोन चार गिऱ्हाईक जास्तीची मिळत्यात…' अस काही बाही खोट सांगून तो घरातून निघत असे. त्याच्या लहान बहिणीला त्याचा डबा मागून घेऊन जायला लागायचा. तिच्या बिचारीच काम वाढलं होतं.

ते बिऱ्हाड येऊन जवळ पास आठवडला उलटला होता. गेले चार पाच दिवस समीरला ती दिसली नव्हती. ती जास्त घरा बाहेर येत नव्हती. त्यामुळे समीर जरा अस्वस्थच होता. अभ्यासात आणि डायरी लिहिण्यात त्याच मन लागत नव्हत. सकाळ पासून कुणी गिऱ्हाईक ही फिरकलं नव्हतं. डायरीवर डोकं टेकवून तो त्या समोरच्या घराकडे, घराच्या बाल्कनीकडे एकटक पाहत होता. पण आज त्याच नशीब फळफळल होतं. सकाळचे नऊ वाजले होते. ती बाल्कनीत येऊन स्वतःचे केस सुकवीत होती. टॉवेलने केस सुकवताना ती भलतीच सुंदर दिसत होती. इतक्या दिवसाने ती दिसल्याने समीर पार हरकून गेला होता. तिच्या केसांमधून उडणारे तुषार समीरला स्पष्ट दिसत होते. त्यांचा गारवा त्याला इतक्या लांबूनही जाणवत होता. तो तिच्याकडे एकटक पहात होता. एव्हाना समोरचा मुलगा आपल्याला पाहत आहे हे त्या मुलीला समजलं होतं… तिने हळूच एक कटाक्ष समीरच्या दिशेने टाकला. ती आपल्याकडे पाहत आहे हे समीरच्या लक्षात आल्यानंतर त्याची गरबड उडाली. त्याला काय करावं हेच समजत नव्हतं.. त्याने पटकन तात्यांचा ठोकळा समोर घेतला आणि त्यात तोंड खुपसून घेतलं. हळूच चोरून तो बाल्कनीकडे पाहत होता..तिला तिथे पाहून पटकन खाली पाहत होता… नंतर ती आत गेली… समीरने सुटकेचा निश्वास सोडला. खुर्चीवर तसंच स्वतःच शरीर सैल सोडून तो गालातल्या गालात हसू लागला...तो इतका सुखावला होता की, डबा घेऊन आलेल्या त्याच्या छोट्या बहिणीकडे, तिच्या आवाजाकडे ही त्याच लक्ष नव्हतं.

आता दिवस असेच जात होते. तिने बाल्कनीत यावे, याने तिला एकटक पाहावे, तिने पुन्हा त्याच्याकडे पाहावे, त्याची गरबड उडावी, तिने आत जावे आणि यांनी याने पुन्हा हरवून जावे. समीर तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता.
एकदा त्याने डायरीत लिहल होतं…

तिला आता मी दररोजच पाहत होतो. बाल्कनीत येऊन ती कधी केस सुकवते, कधी कपडे सुकवायला येते, कधी उगाच येऊन सूर्याकडे एक टक पाहण्याचा प्रयत्न करते, कधी कधी कॅनव्हास घेऊन त्यावर कसलं तरी पेंटिंग काढत बसते.. तिची ही वेगवेगळी रूपे पाहून ती मला आधीच आवडायला लागली आहे. आयुष्यात जर काही कमी असेल तर ती हीच… पण मला तीच नाव ही माहीत नाही...याच मला दुःख वाटतंय… पण एक दिवस येईल ती माझी होईल...आणि तेव्हा मी तिला तीच नाव विचारेल… त्या दिवसाची मी सध्या आतुरतेने वाट पाहत आहे…

समीरची डायरी आता तिच्या शिवाय पूर्ण होत नव्हती.. तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. एवढं असूनही त्याने त्याचा अभ्यास सोडला नव्हता… कारण एक स्वप्न त्याच्या समोर जरी असलं तरी दुसरं स्वप्न तो विसरला नव्हता… विसरणार नव्हता….

तिचाही दिनक्रम आता बदलला होता. ती बाहेर येऊ लागली होती. तिच्या छोट्या भावाला घेऊन ती त्याला सोडायला त्याच्या क्लास वर जाऊ लागली होती. समीरच्या टपरी समोरून जाताना ती सायकलची घंटी वाजवायची.. पुढे जाऊनही मधे मधे वाजवायची… कधीकधी टपरीच्या दिशेने पाहायची… समीरची आणि तिची नजरा नजर व्हायची… समीर गडबडून जायचा.. तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नसायचे. ती आपल्या कडे पाहते आहे का इतरत्र याचा अंदाज समीरला बांधता येत नव्हता… तसा तो वेंधळाच होता.

बरेच दिवस असेच निघून गेले.. समीरची एवढ्या दिवसात एकदाही तिच्याशी बोलायची हिम्मत झाली नव्हती. तस म्हणायला त्याला तशी संधीही मिळाली नव्हती. त्याच संधीचा तो वाट पहात होता.
सकाळचे नऊ वाजून चालले होते परंतु आज ती काही बाल्कनीत आली नव्हती. तो आतुर नजरेने त्या बाल्कनीकडे पाहत होता. तेवढ्यात तिथे त्याची छोटी बहीण डबा आली.. समीरच तिच्याकडे लक्ष गेलं.

"दादा...डबा…"समीरची बहीण पूनम म्हणाली.

"ठेव ना तिथे पुने… आणि बाहेरच बस…" समीर रागावूनच बोलला.

"मी बाहेर बसणार नाय...आईने मला आज इथेच थांबायला सांगितलंय..." पूनम म्हणाली.

"का….. ?" समीर

"आई आणि आप्पा गेल्यात सरीच्या वावरात… घरी नाय कुणी...म्हणून…" पूनम

"बर बर...ये आत बस.."

टपरीच्या बाहेर येत समीर बोलला… डबा एकासाईटला ठेवत समीर ने तात्यांचा ठोकळा वाचायला घेतला. पूनम आत टपरीत जाऊन काहीतरी टाइम पास करू लागली.
बाहेरच्या बाकड्यावर बसून समीर ठोकळा वाचू लागला.. वाचनात त्याची लवकर तंद्री लागत असे…..

बराच वेळ असाच गेला…. अचानक हवा थोडी वेग घेऊ लागली. ठोकळ्याची पाने फडफड आवाज करू लागली.. वातावरण पावसाचं होऊ लागलं… पूनम समीरला टपरीत बोलावू लागली… तिच्या आवाजाकडे लक्ष देत समीर उठला...आता जाणार इतक्यात एक पांढऱ्या शुभ्र रंगाची ओढणी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याने स्वतःला सावरलं आणि ओढणीकडे पहिलं… ती तिचीच ओढणी होती. त्याने इकडे तिकडे पाहिलं. बाल्कनीत ती उभी होती… ती समीर कडेच पाहत होती. समीर कडे पाहतच ती मागे फिरली… ती आपल्याकडेच येत आहे, हे समीरने जाणले.

हीच ती संधी, हाच तो क्षण… समीर मनाशीच बोलला.. आणि पळत तिच्या घराकडे निघाला. पुनमला काय होतंय ते कळायच्या आत समीर समोरच्या तिच्या घराच्या दरवाजा पाशी धडकला.. स्वतःचे वाढलेले श्वास त्याने शांत केले. एक आवंढा गिळला..आणि दरवाजावर टकटक आवाज केला..काही वेळाने आतून दरवाजा उघडला गेला. एक प्रौढ महिला दारात उभी होती. ही त्या मुलीची आई आहे हे समीरने ओळखले होते… तो बोलता झाला,

"काकू… ही ओढणी वाऱ्याने खाली पडली होती…"

"अरे ही तर स्नेहाची ओढणी….ही मुलगी पण ना…"
स्नेहाची आई बोलली…

स्नेहा…..तीच नाव स्नेहा होत...हे आज इतक्या दिवसात पहिल्यादा समीरला समजलं होतं. त्या नावातच तो हरवून गेला… त्या स्नेहा हे नाव मनोमन खूप आवडल होता…

"थँक्स बरका बाळा… "स्नेहाची आई बोलली. त्यांचं बोलणं नीटस ऐकू न आल्याने समीर काचरतच बोलला.

"अअअ…क..क..काय..म्हणाला का आपण.."

"अरे थँक्स म्हणाले…" स्नेहाची आई पुन्हा बोलल्या.

समीर मात्र अजून तिथेच होता… त्याचा दम काही गेला नव्हता. कमरेवर हात ठेवून तो मोठ्याने श्वास घेत होता.. त्याला पाहून स्नेहाची आई पुन्हा बोलली,

"तुला पाणी हवंय का…"

समीरला खूपच दमल्यासारख वाटत होतं म्हणून तो 'हो' म्हणाला.

स्नेहाच्या आईने त्याला घरात बोलावून घेतले. समीर आत गेला.. घरातल्या भिंतींवर सर्वत्र सुंदर सुंदर पेंटिंग्ज लावलेल्या त्याने पाहिल्या.. तो संपूर्ण घर भर त्याची नजर फिरवत होता.. भिंतीच्याच्या मध्यभागी मोठ्या आकारात देशाचे राष्ट्रपती कुना एका छोट्याशा चुणचुणीत मुलीला कसलं तरी पारितोषिक देतानाचा फोटो अडकवला होता. त्या फोटो कडे समीर एकटक पाहत होता. तेवढ्यात स्नेहाची आई तिथे पाण्याचा ग्लास घेऊन आली.. तो ग्लास समीरकडे देता देता समीरला म्हणाली,

"माझी स्नेहा… सहावीत होती तेव्हा… नॅशनल पेंटिंग स्पर्धेत तिचा त्या वेळी देशात पहिला नम्बर आला होता.. तेव्हा तिला हे पारितोषिक मिळालं.. तेव्हापासून ती चित्र काढते...आज ती एक प्रोफेशनल पेंटिंग आर्टिस्ट आहे…. ही तिला मिळालेली मेडल्स…." भिंतीवर एका ओळीत सुबक रित्या अडकवलेल्या मेडल्स कडे हात करत स्नेहाची आई मोठ्या अभिमानाने सांगत होती…

तोपर्यंत तिथे स्नेहा आली सोफ्यावर ठवेलेली ओढणी घेत ती समीरला थँक्स म्हणाली...आणि तिथून निघून गेली…. तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते… तिचा चेहरा वाचणं समीरला शक्यच झालं नाही. ग्लास तिथेच खाली ठेवत समीरने स्नेहाची आईचा निरोप घेतला.. त्या फोटोंकडे, त्या मेडल्स कडे पुन्हा येकवार नजर टाकून समीर घरा बाहेर पडला...पाऊस सुरू झाला होता...त्या चांगला जोर पकडला होता. समीर मात्र शांत होता.. तसाच जड पावलांनी अत्यंत संथ गतीने तो टपरीकडे चालला होता.. त्या भिजत येताना पाहून पूनम जोर जोरात ओरडत होती. परंतु तिचे शब्द समीर पर्यंत पोचतच नव्हते….

'तिच्यात आणि माझ्यात खुप अंतर आहे… हे अंतर मी कितीही प्रयत्न केला तरी पार करू शकत नाही. इतक्या लहान वयात ती यशाच्या शिखरावर पोहचलेली आहे. आणि मी… फक्त धडपडत आहे. ठेचकाळतो आहे..पडतो आहे…. का…? का… म्हणून ती माझ्यासारख्या टपरीवाल्यावर प्रेम करेल… ? तिच्या आयुष्यात जाऊन तिच्या आयुष्यातला गोडवा मी कसा आणि का म्हणून हिरावून घ्यायचा… ? तिच्या आयुष्यात ती सुखी आहे… मला कुठलाही अधिकार नाही तीच सुख हिरावून घ्यायचा. मला माझ्या प्रेमाचा त्याग करावाच लागेल…. मला तो कितिही जड गेला तरीही…'

समीरने पेन खाली ठेवला आणि डायरी बंद केली. डोळ्यातली असावं त्याने पुनमला दिसणार नाहीत इतक्या शिताफीने पुसली. संध्याकाळ झाली होती. टपरी बंद करून दोघेही घरी गेली..

समीरचे जीवन पुम्हा पूर्वपदावर आलं होतं. आज तो 10 वाजता टपरीवर जाणार होता. त्यामुळे तो सकाळची सर्व काम हळूहळू उरकत होता.. आईने विचारलं तर म्हणाला,

'काही नाही...एवढ्या सकाळी पाऊसकाळ्यात कुणी येत नाय टपरीवर म्हणून…'

सगळं उरकून दहा वाजता तो टपरीवर गेला. टपरी उघडली आणि तात्यांचा ठोकळा घेऊन बसला. पण वाचनात त्याच मन काही केल्या लागत नव्हती.. कितीही ठरवलं तरी एका फटक्यात स्वतःच्या प्रेमाला विसरणं त्याला काही केल्या जमत नव्हतं. सतत बाल्कनीकडे लक्ष जात होतं. पण बाल्कनीत कुणीच नव्हतं. त्याच मन त्याला सतत सांगत होत..सावध करत होत… स्नेहाच्या विचारातून ते समीरला बाहेर खेचून आणत होतं…

बराच वेळ असाच गेला. बाल्कनी वरून समीरची नजर काही केल्या हटत नव्हती. तो स्नेहाची वाट पाहत होता पण ती काही केल्या बाहेर येत नव्हती. बाल्कनीचा दरवाचा बंदच होता.. तेवढ्यात वाऱ्याने हलकासा वेग पकडला.. वाऱ्याचा वेग वाढला तसा बाल्कनीतून एक कागद खाली पडताना समीरने पहिला.. असलेच कागद घेऊन स्नेहा चित्र काढत बाल्कनीत बसलेली असायची हे समीरला माहीत होतं. म्हणून तो जोरात घराच्या दिशेने पळत सुटला.. बाल्कनीतून खाली पडणाऱ्या कागदाकडे पाहत समीर पळत सुटला होता…. तो कागद खाली पडला….त्याच क्षणी समीर तिथे पोहचला.. आणि तो लागत उचलला.

कागदाला पाहून त्याचा भ्रमनिरास झाला. सायन्सची कुठलीशी एक डायग्रॅम त्यावर काढली होती. तोच कागद घेऊन तो घराच्या दरवाजाच्या दिशेने निघाला..दरवाजाला कुलूप होतं… समीर मागे फिरला… गेट पर्यंत आला.. रस्त्यावरून जाणाऱ्या एकाला 'ह्या घरातले कुठे गेले' अस त्याने विचारलं तर ती सर्व जण कायमस्वरूपी बंगळूरला गेल्याचे त्याला समजले. आता मात्र समीर पुरता कोलमडून गेला.. स्नेहा आली काय आणि गेली काय….

तो तसाच जड पावलाने टपरी समोर आला. बाल्कनीतून पडलेला कागद अजूनही त्याच्या हातातच होता. त्याने तो उलटा करून पाहिला….आणि त्याला जबरदस्त धक्काच बसला.. त्या कागदावर समीरचे पान बनवतानाचे एक सुंदर पेंटिंग तिने काढलं होतं… ते पेंटींग पाहताच समीरच्या डोळ्यात आसवांनी दाटी केली. त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.

बाल्कनीत उभं राहून आपल्याकडे पाहता पाहता लाजून आत जाताना त्याला ती दिसत होती, टपरी पाशी येऊन सायकलची घंटी वाजवण्यातला अर्थ त्याला आता समजत होता… तिने टाकलेली ओढणी आपल्याच साठी होती हे त्याला आता समजत होत… ती ही त्याच्यावर प्रेम करत होती… हे समीरला आता लक्षात आलं होतं...पण उशीर झाला होता. तीच प्रेम कळायला समीरला उशीर झाला होता. ती गेली होती कायमची….. तिची आठवण म्हणून एक पेंटिंग ठवून…

पण समीरच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं… अश्रूंना केव्हाच बंदी घालण्यात आली होती… हरणे आणि रडणे यांना आयुष्यात आता कसलच स्थान नव्हतं… समीरने पेंटिंग हृदयापाशी कवटाळलं होतं आणि नजर तात्यांचा ठोकल्यावर स्थिर झाली होती….

समाप्त…

शुभम संदीप सोनवणे, पुणे.


इतर रसदार पर्याय