वृद्धाश्रम नसे योग्य मार्ग... geeta kedare द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वृद्धाश्रम नसे योग्य मार्ग...


आज वृद्धाश्रमाच्या वाटेने मनोहर बरोबर जात असताना कृष्णादास यांचे डोळे भरून आले होते. आपल्यावर कधी हा वेळप्रसंग ओढवेल असे स्वप्नातही त्यांना वाटले नव्हते. आज मनोहरची आई असती तर कदाचित मला हे दिवस बघावे लागले नसते असे विचार वारंवार कृष्णादास यांच्या मनात येत होते की सरोजिनी ही जिवंत असती तर तिलाही माझ्याबरोबर मनोहरने वृद्धाश्रमात धाडले असते का?
कृष्णादास यांचे मन आतल्या आत रडत होते.. लाडाने कृष्णादास मनोहरला मनू म्हणायचे... आज ज्या हातांनी मनूला लहानाचे मोठे केले, वाढवले, शिकवले ते हा दिवस पाहण्यासाठी का? मनूला खेळण्यासाठी बागेत घेऊन जायचो, मनू खेळताना पडू नये म्हणून डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवायचो, त्याला थोडंसं जरी खेळताना लागलं अथवा खरचटलं तरी खूपच मनाला दुःख व्हायचं... मनूला शाळेत प्रवेश घेतला. त्याचा शाळेचा पहिला दिवस... मनू शाळेत बसेल ना की रडत राहिल या विचारातच त्याला हात पकडून विद्यालयात सोडले.. तो रडला तरी त्याचे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे व उच्चशिक्षित होऊन चांगली मानाची नोकरी त्याला मिळाली पाहिजे म्हणून आयुष्यभर मी कष्टच करत राहिलो.. मनू डबल ग्रॅज्युएट झाला.. बँकेची परीक्षा उत्तीर्ण झाला व सरकारी बँकेच्या संचालक पदावर त्याची नियुक्ती झाली... अतिशय आनंद झाला होता मला व सरोजिनीला...
मनू मला म्हणाला होता की, "बाबा, आता तुमचे कष्टाचे दिवस संपले. आता तुम्ही फक्त आराम करायचा. आई, तू आमच्यासाठी छान छान जेवण बनवायचे फक्त. धुणीभांडी करण्यासाठी आपल्याला एखादी कामवाली बाई बघ. आता तू ही आराम कर आई." किती सुखावलो होतो आम्ही दोघेही त्याच्या या बोलण्याने...
खूपच छान दिवस चालले होते.. अशातच सरोजिनी वारंवार आजारी पडायला लागली म्हणून तिने मनूकडे लग्न करण्याची मागणी केली. मनूचे ही लग्नाचे वय झालेच होते. कृष्णादास यांच्या मित्राच्या ओळखीतील नातेवाईकाची एक मुलगी दिसायला फारच सुंदर आहे व सरकारी कार्यालयात नोकरीला आहे असे कृष्णादास यांच्या मित्राने सांगितले. मुलीला बघण्यासाठी जाण्याचा दिवस ठरवण्यात आला. सरोजिनी, कृष्णादास, त्यांचे मित्र व मनोहर मुलगी बघण्यासाठी गेले.
स्वरा दिसायला फारच सुंदर होती. मनोहरला व त्याच्या आईवडिलांना स्वरा खूपच आवडली. स्वरा व तिच्या घरातील मंडळींनाही मनोहर आवडला व लवकरच लग्नाची तारीख ठरवून दोघांचे लग्न झाले. सुरुवातीला स्वरा मनोहरच्या आईवडिलांची खूपच काळजी घेत असे. पण नंतर नव्याचे नऊ दिवस गेल्यावर स्वराने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. ती मनोहरच्या आई वडिलांसाठी दुपारचे जेवण न ठेवताच कामाला निघून जायची. मनोहरच्या आई वडिलांबरोबर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालायची.. त्यांना हिडीस फिडीस करायची..
मनोहरची आई आधीच आजारपणामुळे अशक्त झाली होती .. नंतर जेवणाची आबाळ झाल्यामुळे तिने नंतर हळूहळू अंथरुण पकडले पण दोघांनीही मनोहरला स्वराची तक्रार केली नाही... नंतर आजारपणातच मनोहरच्या आईचा मृत्यु झाला व कृष्णादास एकटेच पडले. वृद्धापकाळात वेळेवर जेवण मिळत नसल्याने व काळजी घेणारे कोणी नसल्यामुळे हळूहळू कृष्णादास यांच्याही पायातील ताकद क्षीण होत गेली व ते व्हीलचेअरवर आले.
मनोहरच्या कामाच्या व्यस्ततेमुळे त्याला वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता त्यामुळे स्वराची चिडचिड होऊ लागली. नंतर स्वराला त्यांचीही अडचण व्हायला लागली. ती रोज मनोहर बरोबर भांडू लागली. मनोहरला कृष्णादास बद्दल खोटीखोटी तक्रार करू लागली. स्वराने मनोहरला सांगितले की, "बाबांना एखाद्या वृद्धाश्रमात ठेव. त्यांच्यामुळे मला माझ्या माहेरी ही जाता येत नाही व माहेरी राहता ही येत नाही. मी किती दिवस यांच्या मध्ये अडकून राहू. यांना सर्व वेळच्या वेळी देऊन ही बाबांना माझी काहीच किंमत नाही. ते त्यांच्या सर्व मित्रमंडळींमध्ये माझी निंदाच करीत राहतात. आता मला या गोष्टी सहन होत नाहीत. एकतर मी तरी माहेरी निघून जाते किंवा तू तरी बाबांना वृद्धाश्रमात ठेवून ये. "
रोजच्या कटकटींना वैतागून अतिशय कठोर मन करून मनोहरने सकाळी सकाळी बाबांची बॅग भरली. व दोघेही गाडीत बसले. कृष्णादासने एका शब्दाने ही मनोहरला विचारले नाही की आपण कुठे चाललो आहोत. गाडी सुरू झाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना मागे टाकत गाडी भरधाव वेगाने धावत होती व तितक्याच भरधाव वेगाने दोघांच्याही मनात विचारचक्र सुरू होते...
गाडीतील शांततेला भंग करीत कृष्णादास मनोहरला म्हणाले, "मनू, आज तुझ्या आईला जाऊन एक वर्ष झाले. किती दिवस भर्रकन निघून जातात नाही! कृष्णादासच्या या शब्दांनी मनोहर भानावर आला.. त्यावेळी तो वृद्धाश्रमाच्या गेटजवळ पोहोचला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. आज जे बाबा आपला हात पकडून आपल्याला शाळेच्या गेटपाशी सोडायला यायचे व मी वर्गात पोहोचेपर्यंत मला टाटा करत उभे राहायचे त्या बाबांना आज मी वृद्धाश्रमात घेऊन आलो आहे.. आज ज्या बाबांनी हातावरच्या रेषा पुसेपर्यंत कष्ट करून मला माझ्या पायावर उभे केले त्या बाबांना आज मी एकटाच इथे सोडून जाणार आहे ते ही आईच्या वर्षपूर्तीच्या दिवशी... अशा कृत्यामुळे आईच्या आत्म्याला शांती मिळेल का.. आई मला कधीच माफ करणार नाही ... नाही.. नाही.. हे मी खूप चूकीचे वागत आहे... मनोहर एकटाच आपल्या मनाला कोसत होता.
मनोहर धाडकन आपल्या वडिलांच्या पायापाशी कोसळला व म्हणाला, "बाबा, मला माफ करा. आज माझ्या हातून खूपच मोठी चूक घडणार होती. बाबा.. मला माफ करा..
कृष्णादास मनोहरला म्हणाले," नाही मनू, तू काहीच चूकीचे वागत नाहीस. तू खरंच मला वृद्धाश्रमात ठेव व तू घरी जा बाळा.. "
मनोहर म्हणाला," नाही बाबा, या सर्व गोष्टींचा योग्य मार्ग वृद्धाश्रम नव्हे.. मी तुमच्या कष्टाचा मोबदला तुम्हाला असा मुळीच देणार नाही. आजपासून तुमची सेवा मी करेन. मी तुमच्यासाठी वेळ काढेल. माझे डोळे आता उघडले आहेत. मला माझी चूक समजली आहे.. चला बाबा, आईच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण वृद्धाश्रमाला देणगी देऊ व घरी जाऊ या...
दोघांनी मिळून वृद्धाश्रमाला देणगी दिली व प्रत्येक मुलाला आपल्या आईवडिलांना सांभाळण्याची बुद्धी देवाने दिली पाहिजे अशी सदिच्छा व्यक्त करून मनोहर बाबांना घेऊन घरी परतला. आता मनोहर बाबांची अतिशय छानप्रकारे सेवा करीत आहे.
... © सौ. गीता विश्वास केदारे....
मुंबई