एक होता राजा…. (भाग ९) Vinit Rajaram Dhanawade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक होता राजा…. (भाग ९)

चहाची order दिली मंगेशने. चहा आला." हा… काय झालं नक्की निलम… एकत्र का राहत नाही तुम्ही दोघे.",
"आमचा divorce झाला आहे." मंगेश उडालाच.
"काय बोलतेस तू… " निलम काही न बोलता चहा पिऊ लागली. मंगेश अजून shock मध्ये, निलम शांतपणे चहा पीत होती. मंगेश थोड्यावेळाने पुन्हा बोलला.
" मला वाटते मी काहीतरी चुकीचं ऐकल आहे , बरोबर ना निलम… ",
"नाही, जे ऐकलंसं ते खरं आहे.",
"कधी झालं हे… " ,
" लग्नाच्या second anniversary ला… मी त्याला गिफ्ट दिले divorce papers… त्याने सही केली आणि आम्ही वेगळे झालो.",
"का असं ?".
"जमलं नाही मला… ",
"काय जमलं नाही." ,
"त्याच्या सोबत राहणं जमलं नाही मला.",
"तू काय बोलते आहेस… तुला तरी कळते का… " ,
"सांगते सगळं… पहिला तो चांगला वागायचा.म्हणजे सुरुवातीला… तेव्हाचे दिवस छान होते, तो वेळेत घरी यायचा…. मोठा flat आहे दुबईला त्याचा… छान वाटायचं मोठ्ठ घर तेव्हा. वरचेवर तो दुबई दाखवायला घेऊन जायचा. कधी कधी घरी पार्टी असायची. मज्जा यायची तेव्हा. वाटायचं किती छान life झाली माझी… आता खऱ्या अर्थाने settle झाली मी, असंच वाटायचं. हे फक्त सुरुवातीला हा… नंतर त्याने खरी life काय आहे ते दाखवून दिलं. माझं मुक्त वागणं त्याला आवडायचे नाही. कोणा अनोळखी व्यक्ती बरोबर बोलणं त्याला नको असायचे. उशिरा यायचा ऑफिस मधून. कूठे बाहेर फिरायला जाऊ म्हटलं तर वैतागायचा. वर बोलली मी एकटी जाते तर बोलायचा, दुबई माहित नाही तुला अजून. चडफडत घरी थांबायला लागे. कधी कधी सुट्टीच्या दिवशीपण कामावर तो, मग एकटीच त्या घरात… TV बघून तरी किती बघणार ना… सुरुवातीला आवडणारं ते मोठ्ठ घर, खायाला उठायचे अगदी. वेडी होऊन जायचे मी… मग हा यायचा रात्री उशिरा.…. न बोलता तसाच झोपायला जायचा. नंतर नंतर तर, त्याच्या ऑफिसच्या सिनिअरने काढलेले राग माझ्यावर काढायचा.… भांडणं सुरु झाली ती अशी…. उगाचच कसलेशे वाद काढत राहायचा. रोजच्या रोज भांडणं… भांडण झालं कि हा जाऊन बसायचा त्याच्या reading room मध्ये. तिथेही काम करत बसायचा.… मी एकटी पडली होती.… रडत बसायचे मग. एकदा खूप ताप होता अंगात… मला वाटलं तेव्हा तरी थांबेल तो…बोलला,"डॉक्टर येतील, त्यांना call केला आहे मी… मी थांबू शकत नाही… महत्त्वाची मिटिंग आहे. आणि निघून गेला. ताप खूप होता म्हणून हॉस्पिटलमध्ये होते ३ दिवस…. हा माणूस… ३ दिवसात फक्त एकदा आला,मला बघायला… ते पण कशाला, तर त्याची कार बंद पडली होती आणि माझ्या कारची चावी भेटत नव्हती म्हणून…. चावी कूठे आहे ते विचारलं,डॉक्टरसोबत काही बोलला आणि निघून गेला… म्हणजे मी कोणीच नाही का याची… तेव्हा ठरवलं, बस्स झालं!! बरी होऊन घरी आली. तेव्हा याने पार्टी ठेवली होती. मला वाटलं माझ्यासाठी….तेही चुकीचं होतं. पार्टी होती एक मोठा प्रोजेक्ट भेटल्याची… तेव्हा आपण हे सगळं खोटं खोटं, बनावट जीवन जगतो आहे, याची जाणीव होऊन गेली. पार्टीत आलेल्या लोकांसमोर उगाचच खोटी smile देयाची… आपण किती सुखी आहोत ते दाखवायचं…. कशाला ते.… जीव गुदमरत होता माझा,त्या मोठ्या घरात.… मग एकदा तो लवकर आलेला घरी, वाटलं हीच वेळ आहे बोलायची… बोलून टाकलं मनातलं सगळं… तो शांत होता, आणि शांतपणेच बोलला, divorce papers घेऊन ये… मी sign करतो. सगळे divorce papers तयार होण्यास वेळ लागला आणि बरोब्बर… लग्नाच्या second anniversary ला पेपर्सवर sign झाली…. वेगळे झालो." निलमचं बोलणं संपलं.


मंगेश स्तब्ध झाला होता. आपल्याला काय वाटतं होतं आणि काय झालं हे… काय बोलावं कळत नव्हतं… शेवटी बोललाच मंगेश…
" अगं… मग आम्हाला का सांगितलं नाहीस… मित्र होतो ना… आणि एवढी वर्ष कूठे होतीस मग… ",
"तिथेच दुबईला… माझी पोस्ट वाढली होती ना, मग कंपनीने घराची व्यवस्था केली. तिथेच होती राहत मी.",
"इकडे का आली नाहीस पुन्हा… ",
"कशी येणार होती मी इथे… आणि कोणत्या तोंडाने… सगळं मागे सोडून अगदी अभिमानाने गेली होती India सोडून. सगळे परतीचे मार्ग मीच बंद केले होते ना… कोणत्या वाटेने येणार होती परत… " निलमच्या डोळ्यात पाणी आलं. ते आवरलं तिने. चहा संपवला.
" त्या टपरीवरच्या चहाची सर नाही ना या चहाला… " विषय बदलला मुद्दाम निलमने.
"हम्म… " मंगेश बोलला.
" कधी तोडली रे ती टपरी… ",
"झाली… ३ वर्ष तरी झाली असतील. त्या सोसायटीला त्यांची बाग करायची होती ना आणि टपरीमुळे त्या बागेचं "सौदर्य" झाकलं जात होतं… तोडली म्हणून.",
"आणि तुझा जॉब कसा चालू आहे… ",
"छान… तोही छान आहे… आता इकडे जवळच जॉब आहे आमचा. salary सुद्धा चांगली आहे. प्रवासाचा खर्च नाही कि दगदग नाही.…. ",
"तेव्हाचं आठवतंय… एकत्र यायचो कार मधून…." निलमला आठवण झाली आणि हसली ती.
" राजासाठी थांबायचीस ना मुद्दाम… " मंगेश… निलम काही बोलली नाही त्यावर.
" बोल आता तरी निलम… " खूप वेळाने निलमच्या तोंडातून शब्द आले.
"हो… मुद्दाम त्याच्यासाठीच यायची मी आणि थांबायची… छान वाटायचं बोलताना त्याच्याशी… कायम तो जवळ असावा असं सुद्धा वाटे मला… ",
"मग कधी बोलली नाहीस ती.",
"नाहीच बोलू शकले… माझ्या पप्पांना राजा आवडायचा पण फक्त मित्र म्हणून… त्यांच्या मनात वेगळेच विचात होते…जावयाबद्दल आणि त्यांना भेटला तसाच जावई… मी फक्त त्यांच्यासाठी लग्न केलं हे… राजा मनापासून आवडायचा मला.",
"खूप मोठी चूक केलीस निलम… ",
"हो… म्हणून तर एवढी वर्ष वनवासात होती जणूकाही… एकटीच राहायची तिथे.… पप्पा-मम्मी सांगायचे,परत ये मुंबईला… मीच नाही आले… वाटायचे, राजा समोर आला काय बोलेल… आयुष्यात बहुतेक निर्णय बरोबर घेतले मी… हा एकाच निर्णय चुकला माझा." निलम सांगत होती." एवढी वर्ष, खूप काही मीस केलं मी रे … इकडचे सण, पाऊस, या वास्तू, आपल्या भेटण्याच्या जागा आणि… ",
" आणि राजेशला… बरोबर ना… " मंगेशने तिचं वाक्य पूर्ण केलं.
" हो… आज बोलू शकते मी… राजाला खूप मीस केलं मी… " पुन्हा शांतता… मंगेश निलमकडे पाहत होता आणि निलम बाहेर कूठे तरी.

" राजा… कसा आहे रे… " निलमने विचारलं.
" राजा ना… मस्त आहे अगदी." निलम जरा हसली.
" त्या टपरीवर भेटलो होतो ते शेवटचं. लग्नात सुद्धा आला नव्हता राजा ना. माझा राग आला असेल म्हणून आला नसेल कदाचित.",
"नाही ग… राजाला कधी बघितलस का कोणावर रागावलेलं… आईंना खूप ताप होता त्यादिवशी… तरी ती सांगत होती, तू जा लग्नाला… पण राजा आईला सोडून येणार होता का… नाही ना… तेच कारण होतं, लग्नाला न येण्याचं.",
"तसाच आहे का अजून राजा… ",
"तसाच म्हणजे… स्वभाव तर तसाच आहे, जो लहानपणापासून आहे. फक्त जरासा जाडा झाला आहे बस्स.… तेव्हा कसं, तुझ्यासमोर यायचे म्हणून टापटीप असायचा. जेवणाकडे लक्ष असायचे. बाहेरचं तेलकट, तुपट खायचा नाही. फक्त तुझ्या सोबत असायचा म्हणून हे सगळं करायचा.… तू निघून गेल्यावर कशाला पाहिजे ते… शिवाय कधी आईला बरं नसलं कि बाहेरचं खाणं होयाचे ना… वेळेअवेळी जेवण… सुटला आहे जरासा… ",
"मी नव्हते, पण तू तरी होतास ना…",
" मी… मी कधीच सोडणार नाही त्याला… तशी शप्पतच घेतली आहे मी. बायकोला पण लग्न करायच्या आधी सांगून ठेवलं आहे मी.… कधी काही झालं आणि तुमच्या दोघांमध्ये जर कोणी निवड करायला सांगितली,तर मी राजेशची निवड करणार. अशी माणसं आता दुर्मिळ होत आली आहेत. माझ्यासोबत आहे एक, तेच माझं नशीब… आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याला सोडणार नाही मी, हे नक्की… " निलम सगळं ऐकत होती.
" आणि राजाची family…",त्यावर मंगेश हसला.
"येऊन बघ एकदा… मोठी family आहे राजाची आता… आणि त्यात तो खूप आनंदी आहे, सुखी आहे." निलम गप्प झाली त्यावर.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: