पार - एक भयकथा
भाग ४
रात्री अडीच वाजता मनीषाची थोडी झोप मोडली. अर्धवट झोपेतच ती अरविंदच्या खांद्यावर हात टाकायला गेली पण तिचा हात थेट बिछान्यावर पडला ती घाबरून उठली अरविंद शेजारी न्हवता. बाकी सगळे शांत झोपलेले होते.तीने हळूच मालती मावशीला उठवले दोघी अंगणात आल्या.
“परसाकड पाहून येते ” मावशी घराजवळील परसाकडे बघायला गेल्या तिथे दरवाजा उघडा होता आत कोणीच न्हवते.
रामन्ना आणि शिर्पाद पहाऱ्यावर बसले होते. बसल्या बसल्या त्यांचा डोळा लागला होता.
“अरविंदला पहिला का ” तीने त्यांना विचारले.
“साहेब साईट वर चाललो एवढंच बोलले बाकी काही बोलले नाय ” रामन्ना डोळे चोळत सांगू लागला.
“ती बॅटरी द्या इकडे आणि घरात पोरं एकटीच आहेत लक्ष द्या झोपू नका ”
“वैनी मी येतो तुमच्या सोबत शिर्पाद थांबेल इथे ” रामन्ना त्यांच्या सोबत जाऊ लागला.
अंगणातून बाहेर पडताच शंभर पावलांच्या अंतरावर झाडी लागली, त्या झाडीमधून पाच एक मिनिटे आत गेल्यावर दोनशे एकर एवढा मोकळं रान असतं. झाडी संपताच समोर वडाच झाड होतं. रामान्नाने बॅटरीचा उजेड झाडावर धरला ते खूप भयाण वाटत होत. तिथे अरविंद पाठमोरा थांबला होता. तो एकटक झाडाकडे पाहत होता. मनीषा त्याच्याकडे धावत गेली आणि त्याला मिठी मारली.
“अरविंद अरे इथे काय करतोयस तू तुला अंधारात काय दिसतंय ” ती रडवेली झाली.
“घरी जाऊ ” तो एवढच बोलतो.त्यारात्री मालती मावशी मनीषाच्या डोळ्याला डोळा लागतं नाही.
परत जाण्याविषयी मनीषा त्याच्याशी बोलूच शकली नाही, आठवडा भरात त्याच्या वागण्यात अजून बदल होत गेला त्याने बोलणे जवळ जवळ बंद केले. रात्री अपरात्री साईटवर जाऊन बसू लागला,स्वताच्या विचारात हरवू लागला, एकटेच बडबड करू लागला.
दुपारी मनीषा विचारात हरवून बसलेली असताना मालती मावशी अंगणातून घरात पळत आल्या
“ताई चला पोरं बघा किती वंगाळ गाणं म्हणत्यात ए ” त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.
मनीषा अंगणात आली ध्रुव आणि आर्या म्हणत असलेलं गाणं ऐकून तिलापण धक्का बसला.
‘'
खेळ सूर-पारंब्याचा वडाच्या झाडाला
वडाच्या झाडाला जीव माझा अडकला
जीव माझं अडकला देह तुझा लटकला
तुझा देह लटकला मी सुटता सोडेना
खेळ सूर-पारंब्याचा वडाच्या झाडाला ”
ते ऐकून मनीषाला चक्कर यायचीच बाकी होती. तिने अरविंदला खूप वेळा फोन केला पण त्याने उचलला नाही.
हळू हळू सगळं अकलनिय होत चाललं होतं.
रात्री दोन वाजता मनीषाला कसला तरी कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला, नाईट ल्याम्प च्या उजेडात तुने पहिले अरविंद खिडकीत थांबला होता आणि बाहेर कोणीतरी थांबल होतं तो त्या व्यक्तीशी बोलत होता. मनीषाला वाटले रामन्ना वैगेरे असेल म्हणून ती झोपून गेली. तरी मनात शंकेची पाल चूक चुकत होती.
सकाळी रोपांना पाणी घालायला गेल्यावर मनीषा पाहताच राहिली कारण काल पर्यंत टवटवित असणारी रोपे आज पूर्ण कोमेजून गेली होती.तिने ते मावशींना दाखवले. तितक्यात रामन्ना चूळ भरायला अंगणात आला.
“रामन्ना काल रात्री साहेब काय बोलत होते तुमच्याशी ”
“काल राती मी पहाऱ्यावर न्हवतो ”
“मग कोण होतं ”
“कोणीच न्हाय ” तो बोलताना नजर चोरत होता.
“म्हणजे ” मनीषाला काहीच समजले नाही.
“परवाच्याला आमी साईट वर काम करत होतो साहेब अचानक आमच्या हितं आले आणि आज पासून कोनी पहाऱ्यावर दिसलं तर कुऱ्हाड डोक्यात घालन म्हणले म्हणून आमी कोणीच दोन दिस झाले पहाऱ्यावर नाय बसत” रामन्ना बोलला.
“काय ” मनीषाने आश्चर्याने मोठा आ वासला. ती गपकन जमिनीवर खाली बसली कारण कल रात्री खिडकीच्या पलीकडे कोणीतरी होतं याची तिला चाहूल लागली होती.
“तिची नुसती सावाली पडली तरी रोपं सुकली,आता तरी काय तरी करा,आज बोलावंच लागेल तुमाला येळ निघून जायच्या आत ” मालती मावशी बोलल्या.
“आताच बोलते ” असे म्हणत मनीषा घरात गेली तिने खुर्चीवर बसलेल्या अरविंदचा हात धरला.
“अरविंद घरी जाऊया बस झालं आता, स्वताकडे बघ काय करून घेतलिये स्वताची अवस्था, पोर बघ सुकून गेलीये सुतकात असल्या सारखं वाटतय घर जाऊयात आपण इथुन प्लीज ” मनीषाला रडू कोसळले
“काय म्हणालीस ” तो डोळे मोठे करून मनीषाकडे पाहू लागला आणि जागेवरून उठला. त्याने तिचे केस डाव्या हातानेओढून धरले.
“आ.... अरविंद दुखतंय सोड ” ती व्हीवळू लागली तिला वाचवायला येणाऱ्या मालती मावशीला त्याने हाताने ढकलून दिले.
“इथच राहायचं काय जर इथून बाहेर पडायचं नाव घेतलं तर कुऱ्हाडीने दोन्ही पाय कापून टाकील आणि ए म्हातारे तुझी पिशवी उचल आणि जा इथून, तू जर इथ राहिली तर तुला उचलून विहिरीत टाकेल कळाल का ” असे म्हणत त्याने मनीषालापण ढकलून दिले आणि मालती मावशीच सामान तो पिशवीत भरू लागला.
बाबांचा तो अवतार पाहून कोपऱ्यात बसून थरथर कपाट होती. रडण्यासाठीपण त्यांच्या तोंडातून आवाज निघत न्हवता. मनीषा आणि मालती मावशी जीव मुठीत घेऊन जमिनीवरच बसून राहिल्या.त्याने ड्राइवरला फोन करून बोलावून घेतले. वीस मिनिटात गाडी घराजवळ आली. त्याने मालती मावशीला हाताने धरून उठवले आणि गाडीत बसवले.
“घरापर्यंत सोडवून ये दोन दिवसांनी परत आलास तरी चालेल ” असे म्हणत त्याने ड्राइवरला भरपूर पैसे दिले.मनीषा पोरांना कवटाळून बसली. घरी आई बाबांला किंवा सासू सासऱ्यान्ना कळवाव असं मनात आलं पण ते घाबरून जातील म्हणून तो विचार तिने तिथेच सोडला. आता मालती मावशीपण सोबत न्हवत्या ती पूर्ण एकटी होती.
रात्रीच्या दोन वाजता अरविंद नेहमी प्रमाणे निघून गेला.आज मनीषाचा निश्चय पक्का असतो ती अर्धा तासाने रानात जायला निघाली.जाताना घराला कुलूप लाऊन घेतलं.अंगण पार करताच दाट झाडी लागली आणि मनिषाचे हातपाय लटलट कापु लागले.जीवघेणी शांतता, गर्द काळोख, पौर्णिमेच्या आधीची रात्र असल्याने रानात थोडा उजेड होता पण झाडी मध्ये अंधार असल्याने मोबाईलच्या batteryच्या प्रकाशात तिला वाट शोधात जायचय होतं.कोण कुठून येईल सांगता येत न्हवतं.एकट्या बाईचं अशा भयाण परीस्थितीत टिकून राहणं अवघड होतं पण मनीषाला एकीकडे तिची पिल्ले आणि दुसरीकडे अरविंद दिसत होता.त्यांच्यासाठी तिला पाऊलं उचलणं गरजेच होतं.एका आईची एका पत्नीची आज परीक्षा होती. तिने सगळं धैर्य एकवटलं. देवाचं नाव घेतलं आणि झपाझप चालू लागली.शंभर पावलांचा हा प्रवास तिच्या आयुष्य भर लक्षात राहील.झाडी संपत असताना तिला गुणगुण्याचा आवाज येऊ लागला. झाडी संपता संपता तो आवाज वाढू लागला तिचा तिच्या कानावर विश्वासच बसत न्हवता कारण ते गाणं तेच होतं जे मुलं गात होते. झाडी संपताच तिला वडाचे ते झाड दिसणार होते.झाडीतून पूर्ण बाहेर न जाता तिथूनच लपून झाड पहायचे हे तिने आधीच ठरवले होते.आणि शेवटी ती पोहोचली एका मोठ्या झुडपामागे लपली आणि मान बाहेर काढून झाडापाशी काय आहे ते पाहू लागली.समोरच दृश्य पाहून एक जोरदार विजेचा झटका बसल्या प्रमाणे ती जमिनीवर कोसळली.तिला दरदरून घाम फुटला.हृदयाचे ठोके कमालीचे वाढले.तिला जोरात श्वास लागला. तोंडातून आवाज निघू नये म्हणून स्वताच्या हाताने तिने स्वतःचे तों दाबले.पाच मिनिटे ती तशीच पडून होती. आपण जिवंत आहोत का मेलोय असा प्रश्न पडावा इतका जबर मानसिक धक्का तिला बसला.सगळा जीव एकवटून ते दृश्य तिने पुन्हा पहिलं आणि घराकडे जायला.वळली.डोळ्यासमोरून ते दृश्य जात न्हवतं.
चंद्राच्या प्रकाशात आज झाड स्पष्ट दिसले आणि बाकीचे सगळे देखील.तिने पहिले अरविंद वडाच्या झाडावर होता आणि सोबत होती एक काळी आकृती, पूर्ण काळी फक्त पांढरे डोळे लांब केस होते.अरविंद ह्या फांदीवरून त्या फांदीवर हसत उद्या मारत होता कधी पारंब्यांना लटकून पुन्हा फांदीवर चढत होता आणि ती आकृती त्याला पकडण्यासाठी झाडावरच त्याच्या मागे फिरत होती आणि सोबत गाणे म्हणत होती
“खेळ सूर-पारंब्याचा वडाच्या झाडाला
वडाच्या झाडाला जीव माझा अडकला
जीव माझं अडकला देह तुझा लटकला
तुझा देह लटकला मी सुटता सोडेना
खेळ सूर-पारंब्याचा वडाच्या झाडाला ”
मनीषा धावत घरी गेली आणि थेट बिछान्यात झोपली. मालती मावशीने सांगितलेली एकूण एक गोष्ट तिला आठवू लागली.काळ वेळ न पाहता तिने मालती मावशीला फोन केला. सुदैवाने त्यांने तो उचलला. कशी तरी हि रात्र काढायला त्यांनी तिला सांगितले.मनीषा मुलांना घट्ट धरून बसली. थोड्या वेळाने अरविंदची तिला चाहूल लागली आणि तिने झोपायचे नाटक केले.वैऱ्याची रात्र सुदैवाने सरली.
दुपारी चार वाजता मालती मावशीचा फोन आला अरविंद सकाळीच साईट वर गेला होता.
“ताई मी गावात थांबले हाय ”
“मावशी....” त्यांचा आवाज ऐकून ती ढसा ढसा रडू लागली
“हे पहा आता अरविंद घरी परतायच्या आत तू इथे ये ”
मनीषाने मुलांना रामन्ना कडे ठेवले आणि ती गावात निघाली.
मीनाच्या घरापाशी मालती मावशी दिसताच ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली.
“सांगितलं होत पोरी वेळीच काय ते बघ म्हणून ”
“मी तुमचं ऐकायला हवं होत ” ती मुसमुसू लागली.
“आता वेळ नका घालवू आत चला ” मालती मावशी तिला आत घेऊन गेल्या.
आत मीनाची आई मीना आणि वृद्ध दामले गुरुजी होते. मनीषा त्यांच्या इथे जाऊन बसली. दामले गुरुजी बोलू लागले
“तुम्हाला सुरवाती पासून सगळं सांगतो, तुम्ही आता राहताय ती जमीन महीपत रावांची होती,माणूस तसा चांगला होता पण बाईच वेड होतं,बगडा बाईने त्याला नादि लावलं होतं त्याने तिला रानाच्या घरात ठेवली होती जिथे आत्ता तुम्ही राहता, बगडाच्या नादानी भाऊ दिनकरच्या वाटेची जमीनपण हडपवायचा त्याने डाव रचला, दम दाटीने काही होत न्हवते आणि सारे गाव पण दिनकरच्या बाजूने होते, म्हणून त्याने बाहेरच करायचं ठरवलं आणि एका बंगाली बाबाला रानाच्या घरात आणून ठेवलं, त्याच्या प्रभावाने दिनकर बगडाकडे ओढला जाऊ लागला हि गोष्ट दिनकराच्या मुलाच्या कानावर पण गेली पण त्याने लक्ष दिले नाही, दिनकर आता रोज रानात येऊ लागला, हळू हळू तो खुळ्यासारख वागू लागला,तो आला की बगडा झाडावर जाऊन बसत असे मला सूर-पारंब्याचा खेळात हरवलं तर मी तुझी असे म्हणून ती त्याला झाडावर चढायला सांगत असे पण ती त्याच्या हाती लागतच नसे,खरतर दिनकरला वेड लागलय आणि वेडाच्या भरात त्याने झाडावरून उडी मारून जीव दिलाय असं गावा समोर त्यांना दाखवायचं होतं त्यासाठी हा सगळा खटाटोप चालला होता,ज्यादिवशी दिनाकारचा खेळ संपवायचा होता त्यादिवशी खऱ्या बगडाच्या ऐवजी बंगाली बाबा जादू सोडणार होता ज्याने बगडा च आकृती तैय्यार होईल जी फक्त दिनाकारलाच दिसेल आणि खरी बगडा म्हणून तो तिला पकडायला जाईल तेव्हा ती आकृती त्याला झाडावरून ढकलून देईल आणि गावाला मात्र वाटेल की त्याने वेडाच्या भरात उडी मारलीये, सगळं ठरल्या प्रमाणे होत होतं पौर्णिमेच्या संध्याकाळी दिनकर रावला झाडावर चढवून महीपतराव गावात गेला आणि सगळ्यांना घेऊन पारावर आला पण समोरचं दृश्य पाहून त्याच्याच पायाखालची जमीन सरकली कारण झाडावर दिनकर नाही तर बगडा होती आणि तिला वेड लागल्या सारखं ती एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर नाचत होती आणि गाणं म्हणत होती, बंगाली बाबाच्या हातून काही चूक झाली का ते पाहायला तो धावत धावत रानाच्या घरात गेला पण बंगाली बाबा गायब झाला होता, दिनकारचा मुलगा महीपत कडे पाहून हसत होता त्याने महिपतचा डाव त्याच्यावरच उलटून लावला दुप्पट किमतीत बंगाली बाबाला विकत घेतले,त्याने बगडालाच वश केले आणि आता बगडा पूर्ण वेडावली होती,तिला वाचवा म्हणून महीपत सगळ्यांना विनवणी करू लागला पण सगळे मागे सरले आणि महीपत स्वता तिला वाचवण्या साठी झाडावर चढला पण ती त्याचाच गळा धरू लागली झाड उंच असल्याने त्याला पटकन खाली उतरता येत न्हवते,तो ह्या फांदीवरून त्या फांदिवर पळू लागला. ती त्याच्या मागे सूर पारंब्या चा खेळ खेळल्या प्रमाणे धावू लागली आणि शेवटी तिने त्याला पकडले आणि झाडावरून ढकलून दिले आणि तिनेपण उडी मारली, अतृप्त इच्छा राहिलेल्या बगडाचे पिशाच्यात रुपांतर झाले ती अजूनही तिथे तशीच आहे ते झाड तुटे तोवर काही नाही होणार, ह्या आधी ते झाड क्रेनने तोडण्याचा प्रयत्न केला पण क्रेन उलटी झाली, ती त्या झाडावर असे पर्यंत काही नाही होणार पौर्णिमेला झाडापाशी येणाऱ्यापैकी कोणालातरी झापाटते आणि झाडापासून लांब जाते तेव्हा ते झाड तोडणे योग्य आहे ”
मनीषा सगळं ऐकून सुन्न झाली.
“हे बघ पोरी, आता ती अरविंदला धरणार हे कोणीही सांगू शकतं, मी हा मंतरलेला धागा आणला आहे अरविंद घरात आला की त्याला आत कोंडून बाहेरून कडे लाऊन हा धागा बाहेर बांधून टाक तो बाहेर येऊ शकणार नाही,पण आज पोर्णिमा आहे आज तिच्या ताकदी समोर धाग्याचा असर काही फार वेळ राहणार नाही तेवढ्यात तुला झाडच काय ते पहाव लागेल एवढ लक्षात ठेव जे काही करायचं ते तुलाच करायचं तुझ्या मदतीला येणाऱ्याच नाहक बळी जाऊ शकतो ”
दामले गुरुजी सांगत असलेली एकूण एक गोष्ट मनीषा कानात प्राण आणुन ऐकत होती. आजच पोर्णिमा होती संध्याकाळचे सात वाजत आले होते.सगळे ऐकल्यावर खरे खोटे करण्याचा तिच्याकडे अजिबात वेळ न्हवता तिने तो धागा दामले गुरुजीनच्या हातातून घेतला आणि स्वताच्या मनगटावर बांधला. ती उठली काहीतरी निश्चय केला आणि थेट घराकडे निघाली.मालती मावशींना सोबत न येण्यास सांगितले. पण मायेपोटी जीवाची पर्वा न करता त्या तिच्या मागे चालू लागल्या.
*****