Swapnacha Pathlag ---2 books and stories free download online pdf in Marathi

स्वप्नाचा पाठलाग!-----भाग २

"स्वराली, मी तुम्हाला मुद्दाम एकटीला बोलावलंय. काही गोष्टींचं स्पष्टीकरण आणि निनादच्या मानसिक अवस्थे संबंधी तुमच्याशी चर्च्या करायची आहे." डॉ. मुकुल निनादचे केस पेपर पाहत म्हणाले.
"बोला डॉक्टर." स्वराली डॉक्टरांचा गंभीर टोन एकून अस्वस्थ झाली होती.
"प्रत्यक माणसाला कशाची ना कशाची भीती वाटतच असते. त्यात काही वावगं नाही. एका ठराविक मर्यादेपर्यंत 'भीती' हे नैसर्गिक कवच असते. कारण ते धोक्याची सूचना देत असते. पण हीच भीती जेव्हा मर्यादेबाहेर जाते तेव्हा, तो 'फोबिया' होतो. "
"डॉ. मला तुमच्या शास्त्रातलं काही कळत नाही! मला फक्त निनादला काय झालाय, तेव्हडंच सांगा!" स्वरालीला डॉक्टरांच्या प्रस्तावनेत काही रस नव्हता.
"निनादला 'चिरोपट्ट फोबिया ' झाला असावा असा माझा अंदाज आहे!"
"म्हणजे?"
"म्हणजे, वटवाघूळांची जीवघेणी भीती!"
"यावर उपाय?"
" उपाय आहेच! तो आपण करूच. त्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे."
" किती वेळ लागेल?"
"तसे नक्की नाही सांगता येणार. कारण आमच्या उपायात पेशंटच्या मनाचे सहकार्य खूप महत्वाचे असते. आणि या केस मध्ये ते माझ्या आणि काही औशी निनादच्याही हाती नाही. त्याच्या मानसिक जडणघडणावर ते अवलूंबून असेल!"
"तरी? साधारण चार- पाच महिने?"
"नाही! किमान एक वर्ष! किंवा अधिक हि लागतील!"
" मला तो 'भीती'मुक्त झालेला हवाय! पण इतका वेळ म्हणजे खर्च पण खूप येईल ना?" स्वरालीला आर्थिक बाजू समजून घ्यावयाची होती, म्हणून तिने विचारले.
" हो, त्या साठी बराच खर्च येतो. पण मी या केसचे पैसे घेणार नाही! माझ्या संशोधनासाठी, मी हि केस हाताळणार आहे. औषधा साठी लागतील तितकेच पैसे. फक्त इतका काळ उपचार करून घेण्यासाठी निनाद तयार झाले पाहिजेत."
न पैसे खर्च करता उपाय होणार असेल, तर स्वरालीची हरकत नव्हती. प्रश्न होता तो निनादचा. आपल्याला काही झालाय, यावरच त्याचा विश्वास नव्हता. त्याला तयार करावं लागणार होत. आणि स्वराली साठी ते फारसे कठीण नव्हते.
" करीन मी त्याला तयार. तो माझे ऐकतो!" स्वराली आत्मविश्वासाने म्हणाली.
"ओके. निनाद आस्तिक आहेत का नास्तिक?"
" तो देवभोळा आहे."
'देवभोळा' म्हणजे अंधश्रद्धेकडे कल असणारी मानिसिकता. डॉक्टरांच्या मनाने नोंद घेतली.
"मला जरा त्यांच्या आई-बाबा बद्दल सांगा. "
" त्याला बाबा नाहीत. आई नाशकात असते. "
"त्यांचा कॉन्टॅकट नंबर तुमच्या कडे असेलच, मला त्यांच्याशी बोलायचंय!"
स्वरालीने नाशिकला, आपल्या सासूला फोन लावला.
"आई, डॉक्टर मुकुल तुमच्याशी बोलू इच्छितात. परवा सिनेमा बघताना निनाद भिले होते ना, त्यावर उपाय योजना करावची आहे. घ्या डॉक्टरांशी बोला." स्वरालीने मोबाईल डॉक्टरकडे दिला.
"नमस्कार आई, मी डॉ. मुकुल. मला निनादच्या एकदोन गोष्टीन बद्दल माहिती हवी होती."
"विचारा. "
"निनाद लहानपणी कशाला भिले होते का? किंवा कशाला भीत असत?"
"नाही! तो लहानपणा पासून धीट आहे."
"साधारण सात-आठ वर्षाचे असताना काही विशेष घटना घडली होती का?"
"आं --धडपड्या होता. त्यामुळे पडणं-झडणे, गुढगे-कोपरे फुटणे, कपाळाला टेंगळ हे नेहमीचेच! पण कधी रडारड नव्हती. अरे, हो ---- एकदा तो घरामागच्या वडाच्या पारंब्याचा झोका झोका खेळताना रडत आला होता! 'काय झालं?' म्हणून विचारलं तर म्हणाला, ' पाकोळीन मला थोबाडीत मारली!' त्या रात्री त्याला खूप ताप भरला होता. त्या नंतर तो झोपेत दचकून उठायचा. आताशा ते कमी झाल्याचं स्वराली सांगत होती!"
"धन्यवाद!" डॉ. मुकुल फोन कट करण्याच्या बेतात होते, तेव्हड्यात त्यांना काहीतरी आठवलं.
"हॅल्लो, आई एक मिनिट. निनादला कोणी, 'शकू', 'शकुंतला' किंवा 'शकी ' नावाची कोणी बालमैत्रीण होती का?"
"नाही! तो एकटाच खेळायचा! एक्कलकोंडा होता आणि अजूनही तसाच आहे!"
"काय? नव्हती?" डॉक्टरानी आश्चर्याने विचारले.
" नाही! स्वराली त्याची पहिली आणि शेवटची मैत्रीण!" आईनी फोन कट केला.
"ओके, स्वराली, आपण येत्या गुरुवार पासून निनादची ट्रीटमेंट सुरु करू. "
"नको! शनिवार पासून करा. आम्हास सुट्टी असते."
" ओके! शनिवारी अकराला जमेल?"
"येते. "
हि 'शकुंतला' कोण? निनाद कधी बोलला नाही! स्वराली या विचारात निघून गेली. डॉ. मुकुल गंभीर झाले. निनादची केस त्यांना वाटत होती, त्यापेक्ष खूप कॉम्प्लिकेटेड होती. लहानपणचा तो 'पाकोळीचा ' प्रसंग एक सत्य घटना होती. त्याची पुष्टी आईनी केली होती. पण 'शकी' हे एक काल्पनिक अस्तित्व निनादच्या मनाने साकारलं होत! आणि ते अजूनही तसेच असण्याची शक्यता होती! त्यामुळे गुंता वाढत जाणार होता!
०००
स्वरालीचा हा हेकेखोर स्वभाव सोडला तर, तिच्या सारखी स्त्री जगात नाही, हे निनादचे मत होते. सुंदर, समजदार, आणि बुद्धिमान बायको हवी असेल तर, तिचा हेका स्वीकारावा लागतो, हे ज्ञान त्याला गेल्या चार वर्षात झाले होते. आत्ताही तिच्या समाधानासाठी तो, त्या बोकूडदाढी मुकुल कडे गेला होता. आणि ते सायकॉलॉजिचे झेंगट मागे लागले होते. काय झालाय, त म्हणे 'चिरपटोफोबिया'! पैसे उकळण्याचे धंदे! पण काही असो तो हिप्नॉटिझमचा सेशन मात्र झकास होता. कसली मस्त झोप लागली! ती नेहमीची झोप नव्हती, जागा नव्हतो हे मात्र नक्की! काही तरी पुन्हा गवसल्यासारखं वाटत होत.का कोण जाणे,शकीची आठवण प्रखरतेने होत होती. ती जवळपास घुटमळत असल्याचा भास पण झाला होता! साल, या सायकियाट्रीस लोकांपासून सावध रहायला हवं. आपल्या मनातून काय काय काढून घेतील, आणि काय काय नवीन भरवतील याचा याचा नेम नाही! आपल्या त्या नेहमी पडणाऱ्या स्वप्नच गुपित तर त्यांनी काढून घेतलं नसेल? आणि शकी! तिच्याबद्दल? शकीच 'सिक्रेट' तर, आपण स्वरालीला पण सांगितलेलं नाही! निनाद आपल्या विचारात इतका गढून गेला होता कि, स्वरालीने आणून ठेवलेला चहा गार होऊन गेला होता.
" हे काय निनाद? कसल्या विचारात गुरफटला आहेस? चहा गार होऊन गेलाय! थांब मी गरम करून आणते." स्वरालीने तो चहाचा कप किचन मध्ये नेला.
"निनाद, आज अकराला डॉक्टरकडे जायचंय! लक्षात आहे ना?" गरम चहाचा कप निनादच्या हाती देत स्वरालीने आठवण करून दिली.
"हो ग आहे! पण खरच त्या डॉक्टरच्या म्हणण्यात काही तथ्य आहे का?"
"हो, आहे! आणि तुझी एखादी 'भीती' तो फुकटात काढून देणार असेल तर तुझी काय हरकत आहे?"
" अग, तस नाही. पण हा माझ्या मनातून काय काय काढून घेतो कोणास ठाऊक? मला त्याचीच भीती वाटती आहे!"
"तो फक्त तुझ्या मनातली ती 'वटवाघूळांची भीती' काढून घेणार आहे! त्या साठी उपचार गरजेचे आहेत!आणि ते तू करून घेणार आहेस! मला यावर अधिक वाद नकोय!" स्वरालीने निक्षून सांगितले आणि ती तरातरा किचनमध्ये निघून गेली. शकी यावेळी जवळ असायला हवी होती! असती तर तो तिला विचारणार होता 'खरच हे उपचार गरजेचे आहेत का?'
'मुळीच नाही!' असे म्हणत शकी गोड हसत दूर पळून जातीयय, असे त्याला वाटले.
खिडकीच्या तावदानावर हलकासा पंखाचा फटका मारून एक वटवाघूळ उडून गेलं!

(क्रमशः )

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED