शेर पुन्हा एकदा. (शेरकथा संपूर्ण ) निलेश गोगरकर द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

शेर पुन्हा एकदा. (शेरकथा संपूर्ण )

प्रिय वाचक मित्रांनो ,

बऱ्याच वाचकांना शेर बद्दल मनात संभ्रम होता. ती अशी बंद व्हायला नको होती. खरंतर शेर कधीच बंद झाली नव्हती. फक्त तात्पुरती काळाच्या पडद्याआड गेली होती.
शेर पूर्वार्ध च्या भागात तुम्ही वाचलेत की , कसा शेखर सुकन्याच्या प्रेमात पडला. आणी तिच्या प्रेमा खातर मनात नसताना पण त्याला शेर बंद करावी लागली. शेखरने स्वतःला शेर ला वाहून घेतले होते. शेर म्हणजे त्याचा श्वास , आत्मा आणी जगण्याचा अर्थ होता. पण त्याच्या माणसानी शेर बंद करायला दाखवलेला कल बघून त्याच्या पुढे कोणताही पर्याय राहिला नाही. आणी शेवटी शेर बंद झाली. आणी शेखर आणी सुकन्याचे ही लग्न ही झाले...............

तिथून पुढे...


शेखर आणी सुकन्याच्या लग्नाला आता सहा महिने उलटले होते. सुकन्या नावाप्रमाणेच होती. तिने लग्ना नंतर घर आणी ऑफिस ह्या दोन्ही जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे सांभाळल्या होत्या. त्याच बरोबर ती शेखरला मनमुराद सुख देत होती. त्यामुळे हळूहळू शेखरला शेर चा विसर पडायला लागला. तिच्या घरातील वावरामुळे सरू पण खुश झाली होती. सुकन्या पण अल्पावधीत त्या घरात चांगलीच रुळली होती.
पण तिला कधी कधी जाणवूंन जातं असे की , शेखर शेर बंद केल्यामुळे खुश नाही आहे. रोज पहाटे पाच वाजता उठून मार्शलआर्टस् चीं प्रॅक्टिस करणारा , नंतर योगा करणारा शेखर आता सकाळी आठ वाजे पर्यंत उठत नसे . त्याला जाग येत नसे असे नाही पण आता उठून तरी तो काय करणार होता. शेर तर बंद झाली होती . त्यामुळे बिचारा बेड वरच तळमळत राहात होता.

त्याचे दुःख तिला कधी कधी बघवत नसे. आपल्या प्रेमाखातर त्याने शेर ला बंद केली ह्याचे तिला कधी कधी वैफल्य यायचे. पण काय करणार जर कोणत्या मोहिमेत , कामगिरीवर त्याला काही झाले तर तिचे काय होणार ह्या भीतीने ती अजूनही गप्पच होती.

आपले सगळे आवरून शेखर डायनींग टेबल वर आला. त्याला बघताच सुकन्याने त्याच्या साठी उपमा आणी कॉफी आणली .

" वाह... आज छानच झालाय उपमा..." पहिला घास खाल्ल्याबरोबर शेखर म्हणाला. मनमुराद तारीफ करत शेखर खात होता. सुकन्या खरोखर सुगरण होती. वेगवेगळे पदार्थ बनवणे आणी त्याला खायला देण्याची तिला खूप आवड होती. त्याच्या आवडी निवडी तीने आठवणीने लक्षात ठेवल्या होत्या. त्यामुळे शेखर पण तिच्यावर खुश होता. तिला कधी कोणती गोष्ट सांगावी लागली नाही. सकाळी अंघोळ झाली की त्याचे कपडे बेड वर काढलेले असायचे. त्या सोबत रुमाल , पाकीट , घड्याळ , पेन सगळे त्याच्या बाजूला ठेवलेले असायचे. तो सगळे आवरून खाली येई पर्यंत त्याचा नाश्ता आणी कॉफी तयार असायची . दुपारी घरचा टिफिन त्याला ऑफिसला जातं होता. त्यात वेगवेगळे पदार्थ असायचे. रात्री साधं पण पचायला सोपे असे जेवण असायचे.
बरं एव्हडे सगळे असून पण तिची कोणतीही मागणी नसायची. बाकी बायकांनसारखी मला फिरायला जायचे आहे , पिक्चरला जायचे आहे , बाहेर जेवायला जायचे आहे. असे काही नव्हते. तरीही शेखर तिला कुठे कुठे नेत असे पण रविवारी... तो दिवस स्पेशल तिच्या साठी राखीव असायचा. असे बघायला गेले तर दोघांचे एकंदरीत छान चालले होते. फक्त शेर बंद झाल्याचे दुःख त्याच्या मनात सलत होते.

" ठीक आहे मी निघतो..." शेखर म्हणाला..

" ह्या रविवारी आपल्याला वैष्णवीला आणायला जायचे आहे लक्षात आहे नां ? "

" हो माझ्या लक्षात आहे. अजून आठवडा आहे." शेखर म्हणाला.

" नाही आधीच आठवण करतेय. नाहीतर अचानक काही मिटिंग वैगरे निघाली तर वैष्णवी चिडेल. कालच माझे बोलणे झाले तिच्या बरोबर. सुट्टी पडल्या पडल्या तुम्ही न्यायला या असे तिने निक्षून सांगितले आहे. "

" बरं.... मी लक्षात ठेवीन..." असे म्हणून शेखर ऑफिस ला निघाला...
ऑफिस मध्ये पण मागील सहा महिन्यापासून शेखर पंचरत्न चा सगळा कारभार बघत होता. सोबत बाबा आणी परेशभाई होते. त्यामुळे मागील सहा महिन्यात त्याने बिझनेस चांगलाच वाढवला होता. शेखरचीं धंद्यातील सच्चाई , दिलेला शब्द पाळण्याची पद्धत त्यामुळे लवकरच हिऱ्याच्या व्यापारात पंचरत्न हे नाव ब्रँड म्हणून घेतले जाऊ लागले. सकाळी अकरा वाजल्या पासून कधी कधी रात्री नऊ वाजेपर्यंत शेखर काम करीत असे. सुरवातीला त्याला हे फार जड गेले. पण पुढे पुढे त्याला त्याची सवय झाली. त्याला लेट झाला की सुकन्या कुरकुरायची..... पण तिला प्रेमाने जवळ घेत , तिची समजूत काढत हेच आता आपले जीवन आहे हे शेखर पटवून देत असे.

शुक्रवार होता... संध्याकाळचे सात वाजले होते. सुकन्याने दोनदा फोन करून त्याला वेळेवर घरी येण्यास बजावले होते. त्यामुळे हातातली कामे पटापट आवारण्यावर शेखरचे लक्ष होते. आज सुकन्याने पापलेट फ्राय बनवले होते. त्याला आवडते म्हणून... आज जर तो वेळेवर घरी गेला नाही तर त्याचे काही खरं नव्हते.
आणी त्याच वेळेला त्याचा मोबाईल वाजायला लागला. त्रासिक मुद्रेने त्याने एक नजर मोबाईल कडे टाकली. आणी मोबाईल हाती घेतला .
वैष्णवीच्या शाळेतून फोन होता.

" हॅलो....." शेखर म्हणाला.. समोरून शाळेचे फादर बोलत होते. त्यांचे बोलणे मिनिटभर ऐकून शेखर ताडकन खुर्चीतून उभा राहिला.

" काय ?... मी लगेचच तिकडे येतोय. कोणालाही शाळेतून बाहेर जाऊ देऊ नका . कोणतीही गाडी बाहेर जाता कामा नये. " फोन वर सूचना देत शेखरने मोबाईल खाली ठेवला . त्याचा चेहरा पांढरा पडला होता. कपाळावर घाम जमा झाला होता पटकन मोबाईल खिशात टाकून त्याने केबिन बाहेर धाव ठोकली.

" इस्माईल...s..s" बाहेर आल्या आल्या त्याने जोरात हाक मारली. त्याच्या आवाजावरुन काहीतरी गडबड आहे हे इस्माईलच्या लक्षात आले. शेखर कार मध्ये बसायच्या आधी इस्माईल कार चालूही केली होती.

" महाबळेश्वरला वैष्णवीच्या शाळेत जायचे आहे. एक गडबड झालीय. आज तुला पूर्ण सूट आहे. लवकरात लवकर महाबळेश्वर गाठायचे आहे. "

" सर... " असे म्हणून इस्माईलने कार गिअर मध्ये टाकली. आणी क्षणात कार वेगाने गेट बाहेर पडली. इस्माईल कसलेला ड्राइव्हर होता. शिवाय शेखरची ही कार आलिशान आणी खूप ताकत असणारी होती. अर्ध्या तासात त्यांनी वाशी ओलांडले आणी पनवेल हाकेच्या अंतरावर होते.

" सर.. "

" ह्म्म्म.... " आपल्या विचारातून बाहेर येत शेखरने विचारले.

" कळंबोलीला पेट्रोल भरून घेऊया... म्हणजे मध्ये कुठे थांबायला नको... "

" ह्म्म्म... गाडी कुठून काढणार आहेस...? "

" मुंबई - पुणे मेगा हायवेने खोपोली मग तेथून एक रोड थेट महाड पर्यंत जातो. जुन्या मुंबई गोवा मार्गांवर ट्रॅफिक लागू शकतो. रात्रीची वेळ आहे इकडून रोड खाली मिळेल... "

" ठीक आहे..." शेखरने मनातल्या मनात इस्माईलचे कौतुक केले. परिस्थिती बघून त्याचे पण डोके धावत होते. पेट्रोल भरल्या नंतर इस्माईल ने मेगा हायवेवर गाडी सुसाट काढली. स्पिडोमिटरचा काटा... 120/140 च्या खाली जातं नव्हता. काही वेळातच ते खोपोली फाट्यावरून छोट्या रोड वर आले. इस्माईलचा अंदाज बरोबर होता. रस्त्यावर तुरळक गाड्या होत्या. पण रस्ता लहान असल्याने कारच्या स्पीड वर बंधन आले. प्रयत्नांची पराकाष्टा करत इस्माईल कार शंभर वर ठेवायचा प्रयत्न करत होता. तेव्हड्यात शेखरला सुकन्याचा फोन आला.

" कुठे आहेस तु ? मी कधीची वाट बघतेय ? "

" मी खोपोलीला आहे. वैष्णवीच्या शाळेत जातोय..."

" अरे पण आपल्याला रविवारी जायचे होते नां ? "

" सुकन्या.... सुकन्या.... अग तिच्या शाळेत काही प्रॉब्लम झालाय. मला फादरच फोन आला होता. "

" काय झाले शेखर... मला खरं खरं सांग... " सुकन्याने धास्तावलेल्या आवाजात त्याला विचारले.

" हे बघ घाबरू नकोस... मी आहे नां ? पण अजून मला ही माहित नाही. मी तिथे गेल्यावर तुला फोन करतो. पण तु ही गोष्ट कोणाला सांगू नकोस... कळलं नां.. "

" ह्म्म्म...." सुकन्या म्हणाली. पण तिच्या आवाजावरून तिच्या मनस्थितीचीं कल्पना येत होती.

पुढे चार तासात इस्माईल ने गाडी महाबळेश्वरला टच केली.... आता रात्रीचे साडे अकरा वाजले होते. सगळे महाबळेश्वर निद्रेच्या आधीन झाले होते. लिटल एंजल हायस्कुल मध्ये मात्र गडबड उडाली होती.
वैष्णवी आणी तिच्या सोबत आणखीन तीन मुलीनां किडनॅप केले गेले होते. हा सगळा प्रकार कधी घडला ते कोणालाच माहित नव्हते. संध्याकाळी चार मुली गायब आहेत हे लक्षात आल्यावर धावपळ करून पोलीस कंप्लेंट करण्यात आली होती. आता सगळ्या शाळेला पोलिसांचा गराडा होता.

शेखर पोलिसांचे कडे तोडून आत घुसला.

" ओ... साहेब आत कुठे घुसताय ? पोलीस तपास चालू आहे. दिसत नाही. " एक हवालदार त्याला हटकत म्हणाला...

" कोण तपास करतोय ? मला त्याला भेटायचे आहे." शेखर शांतपणे म्हणाला...

" ह्म्म्म... जरा थांबा...तपास पूर्ण झाला की , ते तुम्हाला भेटतील... तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे देतील..." हवालदार त्याला म्हणाला..

" मला आताच्या आता त्यांना भेटायचे आहे.... " शेखर जरा कडक आवाजात म्हणाला. त्यामुळे तो हवालदार काहीसा चपापला.. ह्या शाळॆत मोठ्या मोठ्या माणसांची मुले शिकत होती. ही शाळा खूप प्रसिद्ध होती. सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर इथले शिक्षण होते. हे त्या हवालदारला माहित होते.

" तुम्ही इथेच थांबा... मी साहेबाना विचारून येतो... "
एखाद मिनिटात तो परत आला.
" जा तुम्ही... पण कशाला हात लावू नका.. हॉल मध्ये वाघमारे साहेब आहेत त्यांना भेटा. "

" थँक्स... " आभाराचे शब्द त्याच्या तोंडावर फेकत शेखर आत निघाला.

" कसं झाले हे वाघमारे ?" शेखरनी सरळ सरळ त्याला अरेतुरे करावे हे काही वाघमारेला पसंत पडले नव्हते हे त्याच्या चेहऱ्यावरूनच लक्षात येत होते.

" तु कोण ? " आपला स्पेशल पोलिसी आवाजात वाघमारेने विचारले. जर शेखर कोण हे त्याला कळले असते तर वाघमारेचा एव्हडासा पण आवाज तोंडातून बाहेर आला नसता.

" हे मी. शेखर.... शेखर रत्नपारखी... वैष्णवी जी गायब आहे त्यांचे मामा आहेत हे..." फादर ने मध्येच हस्तक्षेप करत त्याची ओळख करून दिली.

" हे बघा... पोलीस तपास चालू आहे. लवकरच आम्ही त्या मुलींना शोधून काढू.. " खास ठोकळेबाज उत्तर देत वाघमारे म्हणाला.

" मला जरा नीट सांगाल तर मी तुझी मदत करू शकतो."

" सध्या एक मदत करा... त्या तिथे जाऊन बसा... आणी आम्हाला आमचे काम करू द्या..." वाघमारे वैतागून म्हणाला. आधीच त्याच्या रात्रीचे खोबरे झाले होते. घरी जायला निघणार तेव्हड्यात हे प्रकरण समोर आले.

"'वाघमारे आपल्याला उशीर करून चालणार नाही. जेव्हडा वेळ तु तपासात घालवता आहेस तेव्हड्या वेळ कदाचित त्या मुलीच्या जीवावर बेतेल..." शेखर त्याला समजावत म्हणाला.

" हे बघ.... आता जर तु इथून गेला नाहीस तर तपासात अडथळा आणला ह्या गुन्ह्यात तुला आत घेईन. " वाघमारे त्याला घाबरवत म्हणाला.

" काय मला अटक करणार...? " शेखर ने हसून विचारले... त्याच्या हसण्याने वाघमारे आणखीन चिडला. त्याने एका हवालदाराला त्याला तिथून घेऊन जाण्यास इशारा केला.

" एक मिनिट... मी एक फोन लावतो..." शेखरने सरळ CM ना फोन लावला.

" नमस्कार.. मी शेखर रत्नपारखी बोलतोय...." असे म्हणून त्याने सगळी हकीकत त्याला सांगितली. फोन CM चे सेक्रेटरी विकास देसाई होते . ते पण शेखरला चांगले ओळखत होते. शेखर आणी आपल्या साहेबांचे किती चांगले आहे ते त्यांना माहित होते.

" बर... " असे म्हणून त्याने फोन वाघमारेला दिला. तो फोन घ्यावा की नाही ह्या संभ्रमात वाघमारे क्षणभर थांबला.

" घे वाघमारे नाहीतर खूप पस्तावशील..." शेखर म्हणाला.

" हॅलो.. "

" वाघमारे ! मी विकास देसाई बोलतोय.. "

" सर... "

" ते जे शेखर आहेत नां ते जे बोलतात ते कर...प्रश्न विचारू नकोस. अश्या कामाचा त्यांना खूप अनुभव आहे. ठीक आहे.. "

" सर...." वाघमारे निराश मनाने म्हणाला.

" आणी जर आता परत त्यांना फोन करायला लागला तर मुख्यमंत्री साहेबाना आवडणार नाही. कदाचित तुला घरी पण बसावे लागेल..." सोम्य शब्दात देसाईने त्याला योग्य त्या सूचना दिल्या.

" ठीक आहे. सर... "

" ह्म्म्म...." आणी देसाईने फोन ठेवला. आणी वाघमारे मोबाईल शेखरला परत दिला.

" आता सांग काय घडले. "

" दुपार नंतर वैष्णवी आणी इतर तीन मुली डान्स चीं प्रॅक्टिस करत होत्या. हे नेहमीचे होते. संध्याकाळी सहा वाजता प्युन जेव्हा दरवाजा लॉक करायला आला तेव्हा मुली गायब असल्याचे लक्षात आले. " वाघमारे ने थोडक्यात सगळे सांगितले.

" सगळ्यात आधी शहरातून बाहेर जायचे रस्ते बंद कर... कोणतीही गाडी चेक केल्याशिवाय सोडू नकोस... "

" मला कळताच मी नाकाबंदी लावली आहे. " वाघमारे म्हणाला.

" शाब्बास.... आपल्या खबऱ्यांना कामाला लाव... कोठे काही लिंक मिळतेय कां ते बघ... "

" ह्म्म्म... "

" दुपार पासून कोणत्या गाड्या आत आल्या त्याची माहिती काढ. शाळेच्या गेट वर त्याची इंट्री असेल.. "

" ह्म्म्म.. "

" सगळ्या गाड्या आहेत कां ते बघ.. त्या गाडीवरील सगळ्या माणसांना उद्या इथे बोलाव..." शेखर फटाफट हुकूम सोडत होता. त्या नंतर त्याने त्या परिसराचीं बारकाईने तपासणी केली. त्यात त्याला एखाद तास गेला. प्रथम दर्शनी असे लक्षात येत होते की , मुली आपल्या डान्स चीं प्रॅक्टिस करत होत्या. त्या ज्या वर्गात प्रॅक्टिस करत होत्या तो वर्ग एका बाजूला होता. त्याच्या बाजूला स्टोअर रूम होते. तिथे लॉंड्रीचे कपडे , जेवणाचे सामान वैगरे ठेवलेले होते . त्यामुळे येणाऱ्या गाड्या थेट तिथं पर्यंत येत. अश्याच एखाद्या गाडीतून मुलींना शाळेबाहेर काढण्यात आले असावे ह्या निष्कर्षावर शेखर आला.

" मला वाटते की मुलींना कोणत्या तरी वाहनाने बाहेर काढले असावे." शेखरने आपला अंदाज व्यक्त केला.
सध्या शेखर एव्हडेच करू शकत होता. आता एकेक मुलीचे पालक यायला सुरवात झाली. एव्हडा वेळ तर त्यांना लागणारच होता. सगळे माहिती मिळताच धावत आले होते. पण प्रत्येकाकडे इस्माईल सारखा ड्राइव्हर नव्हता.

" मी. शेखर मी प्रॉमिस करतो की मुलींना काही होणार नाही. आम्ही त्यांना सहीसलामत परत घेऊन येऊ..." फादर त्याला सांत्वन देत म्हणाले. पण खरं तर शेखरला त्यांच्या सांत्वनाचीं गरज नव्हती.

" शुड बी फादर... नाहीतर मी पण एक प्रॉमिस करतो. जर मुलींना काही झाले तर , ह्या शाळेची एक वीट जागेवर राहणार नाही." शेखर आपल्या थंडगार आणी स्थिर आवाजात म्हणाला. आणी तो आवाज ऐकून फादर पण घाबरला आणी चुपचाप इतर पालकांना भेटायला वळला.

इतर पालक आले असल्याने आता तिथे खूप गोंधळ वाढला होता त्यामुळे शेखरला शांत विचार करायला होत नव्हते. म्हणून त्याने एका हॉटेल मध्ये एक रूम घेतली.
आणी त्याचवेळी सुकन्याचा फोन आला.

" हॅलो... "

" शेखर ! काय झाले ? "

" सुकन्या... वैष्णवी आणी आणखीन तीन मुलींना कोणी तरी पळवले आहे. "

" काय....? " सुकन्या जोरात ओरडली.

" शांत हो.... बाळू आणी सरूला ह्या गोष्टीचा पत्ता लागू देऊ नकोस... मी शोधायला सुरवात केली आहे. लवकरच काही माहिती मिळेल... "

" शेखर असे कसे झाले रे...? त्या एव्हड्याश्या मुलीने कोणाचे काय वाईट केले होते? "

" सुकन्या... सुकन्या.... अग अशे काय करतेस..?
हे पैश्यासाठी केलेले किडनॅप असू शकते... मी शोध घेतोय नां... पोलीस पण आपल्या परीने तपास करताहेत.. "

" पोलीस काय करणार आहेत..? शेखर तु काही पण कर पण वैष्णवीला शोधून काढ... "

" आय विल ट्रायिंग माय बेस्ट.... काळजी करू नकोस.
आता जरा झोप.... ठेवतो आता मी... मला पण खूप काम आहे." असे म्हणून शेखरने फोन ठेवला.
रात्रभर विचार करून शेखरने साधारण एक प्लॅन बनवला. त्याच्या अंदाजाप्रमाणे किडनॅपर शाळेत येत जातं असणारे असावे.. त्यांना शाळेच्या कारभाराची जाणीव असावी. शिवाय तेथून कसे निघायचे हे त्यांनी आधीच ठरवून ठेवले होते. बहुतेक ते जास्त लांब गेले नसणार. नाकाबंदी लागली होती. शिवाय मुलींना घेऊन फिरण्याचे रिस्क ते घेणार नाहीत. म्हणजे मुली आसपास कुठेतरी असण्याची शक्यता होती. पण कुठे ? आणी हेच त्याला शोधून काढायचे होते.

सकाळीदरवाजा वाजला म्हणून शेखर उठला. दरवाजा उघडला तर दारात सुकन्या , विनू , सारंग आणी त्यांच्या मागे इस्माईल उभा होता. त्यानेच बहुतेक त्याची रूम त्यांना सांगितली असावी.

" या.... सगळे आत या... तु कशाला आलीस ? "
शेखरने सुकन्याला विचारले.

" अरे माझे पिल्लू नाहीसे झालंय आणी मला कसे स्वस्थ बसवेल ? "

" बरं.... "

" काय माहिती कळली ? " तिने अधीरतेने विचारले.
मग परत सगळे पहिल्या पासून शेखरने सगळ्यांना सांगितले.

" तुझा अंदाज काय ? " विनू ने विचारले. त्याला माहित होते की , शेखरचा अंदाज सहसा चुकत नाही. त्याचा तपासात खूप उपयोग होतो.

" त्यांना एखाद्या गाडीतून पळवले असेल. शाळेत नेहमी वेगवेगळ्या गाड्या येत असतात. पण लॉंड्री आणी भाजीपाल्याचीं गाडी रोज येते. "

" म्हणजे त्यांना तिथली चांगली माहिती असेल. शिवाय रोज येणारी गाडी असल्याने तिची फारशी चेकिंग पण करत नसणार.... " विनू म्हणाला.

" बरोबर... विनू तु त्या दोन्ही गाड्यांचा शोध लाव.. गाड्या सध्या कुठे आहेत ? त्यात मुलींचा काही ट्रेस लागतोय कां ते बघ... "

" ठीक आहे. "

" सारंग तु शाळेच्या पंचवीस km परिघात चौकशी कर. त्या मुलींना कोणी , कुठे पाहिले आहे कां ते बघ... "
" इस्माईल तु मुंबई अंडरवल्ड मधून ह्यात कोणाचा हात तर नाही नां ते शोधून काढ... " शेखरने पटापट निर्णय घेतले. त्याच्या त्या निर्णयावर सुकन्या खुश झाली. ही तर जुनी शेर होती. आणी आता तिला शेरचीच सगळ्यात जास्त गरज होती. शेर बंद झाल्यावर आपण सुखी राहू , कोणतेही विघ्न आपल्या आयुष्यात येणार नाही अशी जी तिची अटकळ होती ती वैष्णवी किडनॅप झाल्याने त्याला तडा गेला होता.

तिघे गेल्यावर रूम मध्ये सुकन्या आणी शेखरच राहिले. आणी आता पर्यंत धरून ठेवलेला अश्रूचा बांध मोकळा करत सुकन्या शेखरच्या कुशीत शिरली.

" कुठे असेल रे माझे पिल्लू? काय करत असेल रे ? जेवायला तरी दिले असेल कां त्यांनी ?" ती रडत शेखरला विचारत होती.

" सुकन्या.. आपण आपल्या परीने प्रयत्न करतोच आहोत नां...? लवकरच काहीतरी सापडेल आपल्याला."

" मला काही माहित नाही तु काही कर तिला शोधून आण... " सुकन्या हट्टाने म्हणाली.

" हो... आपण तिला शोधून काढू... तु नको रडूस..." तिला समजावत शेखर म्हणाला.

" तिला घेतल्या शिवाय मी इथून हलणार नाही." ती ठाम शब्दात म्हणाली.

" अग असे काय करतेस वेड्यासारखे. तिकडे बाळू आणी सरू विचारात पडले असतील.. आतापर्यंत ही बातमी tv वर दाखवत असतील. तु आणी मी घरी नाही म्हंटल्यावर त्यांना लगेचच लक्षात येईल. त्यांना धीर द्यायचा सोडून तूच रडत आहेस. " त्याच्या सांगण्यावरून तिने आपल्या मनावर जरा नियंत्रण मिळवले आणी डोळे पुसले.

" चार दिवसात वैष्णवी मला माझ्या समोर हवी आहे. त्या साठी तुला जे करावे लागेल ते तु कर. आय डोन्ट केअर.."

" हे काय लावलय तु ? अग आता मी शेर नाही आहे. माझ्या पण हालचालीवर बंधने आहेत. माझे सोर्स लिमिटेड आहेत. मनुष्यबळ नाही आहे हाताशी. तुझ्या लक्षात येतेय नां ? मी काय बोलतोय ते ? "

" मग तु पुन्हा शेर चालू कर.." ती भोळेपणे बोलून गेली.

" हा काय खेळ आहे ? एकदा शेर बंद कर , एकदा शेर चालू कर. ते एव्हडे सोपे आहे. मी किती वर्ष खर्च केली तेव्हा कुठे शेर उभी राहिली होती. तुला कळतेय कां ? आणी तु म्हणतेस की दोन चार दिवसात शेर पुन्हा चालू करायची. "
" जेव्हा लोकांना शेरची गरज होती तेव्हा तुला तुझ्या संसाराची पडली होती. आज तुझ्यावर वेळ आली तर तुला शेर हवी आहे. किती ग तु स्वार्थी आहेस ? " शेखर अगदी कडक शब्दात तिची हजेरी घेत होता. आणी तो म्हणतो त्यात तथ्य असल्याने तिला काहीच बोलायला जागा राहिली नव्हती.

" हे बघ जशी वैष्णवी तुला प्रिय होती तशीच मला पण.. जीव गेला तरी मी तिला शोधून काढीनच..." शेखर ठाम शब्दात पुढे म्हणाला.

संध्याकाळी सगळे परत शेखर कडे जमा झाले.

" शेखर मी चौकशी केली. लॉंड्रीच्या गाडीवर दोन माणसे नवीन होती. ड्राइव्हर जुना होता. त्या नवीन माणसानी हे काम केले असावे. गाडी ड्रायव्हर सह गायब आहे. भाजीपाल्याची गाडी आणी माणसे दोन्ही ही शहरातच आहेत. "

" लॉंड्रीच्या गाडीवरील जुनी माणसे कुठे गेली? "

" एकाला गावी जायचे होते म्हणून तो कामावर नव्हता दुसरा आजारी पडला होता. म्हणून त्यांच्या जागी ही दोन माणसे गाडीवर ठेवण्यात आली होती. तसें ते ह्या आधी पण कामाला आले होते. "

" ह्म्म्म... म्हणजे आपला अंदाज बरोबर आहे तर. "

" मी सगळी कडे चौकशी केली. पण त्या मुलींना कोणीही पाहिले नाही. त्यांचा कुठेही ट्रेस लागत नाही. "

" मुंबई अंडरवल्ड मधून कोणाचाही ह्यात सहभाग नाही. मला वाटते की हे एखाद्या लोकल गुंडांचे काम असावे." इस्माईल आपली माहिती सांगत म्हणाला.

" ह्म्म्म... एक काम करा... सर्वप्रथम शहरात सगळी कडे शोध घ्या... ती गाडी कुठेतरी लपवली असेल. "
" मी उद्या पुन्हा एकदा शाळेत चक्कर मारून येतो. "

दुसऱ्या दिवशी शेखरने शाळेत पुन्हा एकदा तपास केला. त्याला नोटीस बोर्ड वर डान्स मध्ये भाग घेणाऱ्या मुलींचे नाव आणी वर्ग ह्याची माहिती असणारा कागद लावलेला आढळला... स्टोअर रूम आणी तो वर्ग शेजारी शेजारी असल्याने मुलींना सहज गाडीत टाकता येऊ शकत होते.
त्याला गेट वरुन दोन्ही गाड्याच्या वेळा मिळाल्या. त्यातून
एक गोष्ट अजून त्याच्या लक्षात आली.

" मुलींना कसे पळवले आहे ते माझ्या लक्षात आले आहे. "

" काय ? " सगळे चमकले.

" हो... भाजीपाल्याची गाडी सकाळी साधारण आठ एक वाजता येते. ती गेल्यानंतर मुली शाळेत होत्या म्हणजे भाजीपाल्याची गाडीवर संशय नाही. लॉंड्रीचीं गाडी साधारण एक वाजता येते. धुवायचे कपडे म्हणजे बेडशीट्स , पिलो कव्हर , मुलींचे कपडे , पडदे वैगरे धुवायला घेऊन जाते. ते सगळे स्टोअर रूम मध्ये एका बाजूला ठेवलेले असते. पण.....
त्या दिवशी लॉन्ड्रीची गाडी संध्याकाळी चार वाजता आली. "

" कां ? "

" त्याची दोन्ही माणसे कामावर गैरहजर होती. म्हणून बदली माणसे घेण्यात वेळ गेला असे कारण सांगण्यात आले. "
" पण मला वाटते की मुद्दाम ती वेळ निवडण्यात आली असावी. कारण नोटीसबोर्ड वर मुलींची नावे , वर्ग , वेळ सगळे लिहलेले आहे. जर ते नेहमीच्या वेळेवर आले असते तर त्या वेळी मुली शाळेत , वर्गात असत्या. तेथून त्यांना पळवणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून मुद्दाम चार वाजताची वेळ निवडण्यात आली. तेव्हा मुली डान्सचीं प्रॅक्टिस करत असतात त्यांना हे माहीत होते. मग त्यांनी मुलींना बेशुद्ध करून गाडीत टाकले असेल आणी वर कपड्याचीं गाठोडी ठेवली असतील. गाडी रोजची म्हणून वॉचमन ने पण फार काही तपासले नसेल. आणी हे मुलींना घेऊन बाहेर पडले असतील. "

सगळे शेखरनी सांगितले ते ऐकत होते. सगळा घटनाक्रम त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला.

" बरोबर आहे....पण ती लॉन्ड्रीची गाडी गेली कुठे मग ?"
सारंगने विचारले.

" मला माहित आहे." विनू म्हणाला. आणी सगळे चकित झाले.

" काय ? "

" हो... मी आज त्यांच्या शोधात फिरत फिरत शहाराबाहेर गेलो होतो. तेथे एका चहाच्या टपरीवाल्याने ती लॉन्ड्रीची गाडी पहिली होती. तिचा वेगळा रंग ठळक अक्षरांत लिहलेले लॉंड्री हे नाव त्यामुळे त्याच्या लक्षात राहिले. ती गाडी तेथूनच पुढे गेली होती. म्हणून मी पुढे असलेल्या फ़ॉरेस्ट चेक पोस्ट वर चौकशी केली . पण ती गाडी तिथवर गेलीच नाही . ते सगळ्या गाडीचे नंबर लिहून ठेवतात. चेक करतातं. "

" मग ? "
" मी पुन्हा मागे आलो तेव्हा तो चहावाला म्हणाला की एखाद km वर एक कच्चा रस्ता थेट नदी पर्यंत जातो. कदाचित ती गाडी त्या रस्त्याने जंगलात शिरली असेल तर...? कारण गाडी परत गेली नाही हे निश्चित. "

" छान विनू आपण आताच जाऊन त्याची शहानिशा करून घेऊ... सारंग तु इन्स्पेक्टर वाघमारे ला घेऊन डायरेक्ट स्पॉट वर ये. कदाचित तिथे काही मुडदे पाडावे लागतील.. आम्ही पुढे जातो. "

शेखर , इस्माईल आणी विनू त्या चहावाल्याने सांगितलेल्या कच्या रॊड कडे निघाले. त्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले होते. ठिकठिकाणी रोड उखडून त्यातील दगड रेती बाहेर आली होती. बऱ्याच वर्षात हा रस्ता वापरात नव्हता हेच त्याचे कारण होते. तिघे आपले पिस्तूल सावरत एकमेकांना कव्हर करत पुढे चालले होते. तिघांच्याही नजरा चोहीकडे फिरत होत्या. कान लहानात लहान आवाज टिपायला तयार होते. तेव्हड्यात त्यांना एका गाडीचा आवाज ऐकायला आला. कानोसा घेतल्यावर त्यांना हा आवाज आपल्या मागून येतोय हे लक्षात आले. कदाचित इन्स्पेक्टर वाघमारे येत असावा. पण ते कोणतीही रिस्क घेऊ शकत नव्हते. कदाचित ते किडनॅपर पण असू शकत होते. तिघांनी एकमेकांना नेत्रपल्लवी केली आणी तिघे पटकन आडोश्याला लपले. पण खरोखर मागून वाघमारे आपल्या पोलीस जीप मधून येत होता. त्याला बघून तिघे पुन्हा रस्त्यावर मधोमध आले. त्यांना बघून वाघमारे ने जीप थांबवली.

" काय झाले ? "

" कदाचित त्यांनी मुलींना इथेच कुठेतरी लपवून ठेवले असेल. " शेखर पुढे होत म्हणाला. पण वाघमारेचे लक्ष त्याच्या हातातील पिस्तूल कडे गेले. असे सरळ सरळ हातात हत्यार घेऊन फिरणारा हा इसम नक्की कोण असावा. ज्याची पोहोंचं सरळ CM साहेबानं पर्यंत आहे. वाघमारे विचार करत होता. पण त्याचे लक्ष शेखरच्या हातातील पिस्तूलवर एकवटले होते.

" त्याची काळजी करू नकोस..." आपल्या हातातील पिस्तूल त्याच्या समोर नाचवत शेखर म्हणाला.
" माझ्या कडे त्याचे लायसन्स आहे. "

" ह्म्म्म... मग आता काय करायचे? "

" आम्ही चौघे पुढे जातो... तु आणी तुझी पोलीस पार्टी आम्हाला मागून कव्हर करा. "

" ठीक आहे चला..." सगळे सावकाश चालत पुढे निघाले. आता ते जास्त जण होते आणी जास्त नजरा सगळी कडे लक्ष ठेऊ शकत होत्या.

थोडया वेळात ते त्या लॉंड्री व्हॅन च्या समोर आले. आता ती लॉंड्री व्हॅन त्याच्या दृष्टीक्षेपात होती . आजूबाजूला खुप सन्नाटा होता . पक्षी मोकळ्या पणाने ओरडत होते. उडत होते. काही मिनिटे शेखरने परिस्थितीचे निरीक्षण केले. पण कुठे ही कोणतीही हालचाल दिसत नव्हती.

" सारंग ! तु आणी मी दोघे पुढे जाऊया... विनू इस्माईल डाव्या उजव्या बाजुने पुढे सरकतील... लक्षात ठेवा.. आत कदाचित मुली असू शकतात म्हणून व्हॅन वर गोळ्या चालवू नका. वाघमारे तु आणी तुझी माणसे आम्हाला मागून कव्हर कर... ओके.. "

" ओके सर... " वाघमारे पहिल्यांदा त्याला सर म्हणाला.

मग सावकाश चौघे पुढे सरकू लागले. व्हॅन बरोंबर त्यांचे लक्ष आजूबाजूला पण होते. हात पिस्तूल वर स्थिर होते. वाघमारे आणी त्याच्या माणसानी पण जमिनीवर पडून आपापली हत्यारे सज्ज ठेवली होती.

हळूहळू करत शेखर आणी सारंग व्हॅन जवळ पोचले. शेखरने हळूच व्हॅनच्या खाली वाकून पाहिले. कोणताही बॉम्ब वैगरे लावला नव्हता नां ह्याची त्यांनी खात्री करून घेतली. मग एक लांब पात्याचा नाईफ काढून त्याने मागील दरवाज्याची काच हळुवार फोडली. फार कमी आवाज होईल ह्याकडे त्याचे लक्ष होते . काच फुटल्यावर त्या होल मधून त्याने पुन्हा दरवाज्या जवळ काही लावलेले नाही ह्याची खात्री करून घेतली.
सगळे काही ठीकठाक आहे ह्याची खात्री झाल्यावर त्याने सारंग ला इशारा केला. तसा सारंग काहीसा मागे सरकून त्याला कव्हर करत उभा राहिला. दोघांच्या पिस्तूल वरचे सेफ्टी लॅच तर कधीच निघाले होते.

सावकाश हॅण्डल फिरवत शेखरने दरवाजा उघडला. किंचित आत डोकावत त्याने पटकन आत पाहून घेतले. आत चार मुली शिवाय कोणी नव्हते... क्षणाचा ही वेळ न घालवता. शेखर तीरा सारखा आत शिरला... आत मुलींना डोळे , तोंड , आणी हातपाय बांधलेल्या ह्या अवस्थेत ठेवले होते. त्याने पटकन सगळ्या मुलींचे हातपाय सोडले. डोळ्यावरील पट्टी मुलींनी आपल्या हाताने काढली.

" मामा... " असे रडत वैष्णवी त्याच्या मिठीत शिरली. ती खूप घाबरली होती. तो पर्यंत उरलेल्या सगळ्या मुली त्याला बिलगल्या.. विनू आणी इस्माईल ने ड्राइव्हर ला त्याच्या केबिन मधून मोकळे केले.

आजूबाजूला कोणीच नव्हते. हे एकदम विचित्र होते. कोणी ना कोणी असायलाच हवे होते. पण खूप शोधून पण कोणी सापडले नाही. म्हणून मग सगळे परत निघाले.

संध्याकाळी सगळे पोलीस स्टेशन वर जमले. त्यात मुलींची जबानी घेण्यात आली. पण त्या किडनॅपर बद्दल काही सांगू शकल्या नाही. ते तोंडावर जोकरचा मास्क लावूंन समोर येत असत. आणी त्यांनी मुलींची योग्य ती काळजी घेतली होती. त्यांना योग्य वेळेला जेवण , व्हॅन च्या आत गाद्या टाकून त्यांना झोपायचीं सोय. त्यांना कोणत्याही प्रकारे इजा केली नव्हती.

" मला वाटते की हे कोणी लोकल गुंड असावेत.. त्यांनी खंडणी साठी मुलींना किडनॅप केले पण वाघमारेच्या समयसुचकतेने त्यांना महाबळेश्वर बाहेर पडता आले नाही. शिवाय आम्ही पण त्यांच्या मागे लागलो म्हणून त्यांनी मुलींना सोडून दिले. " शेखर आपला अंदाज सांगत होता. आता तिथे सगळ्या मुलींचे पालक हजर होते.

" पण आपण त्यांना असच कसं सोडायचे ? आपल्याला जो मनस्थाप झालाय त्याची शिक्षा त्यांना व्हायला नको." मुली परत आल्या तसें आता सगळ्यांना कंठ फुटले होते.एकच गोंधळ तिथे उडाला होता. काल पर्यंत मुलीनं साठी हवा तेव्हडा पैसा द्यायला तयार असणारे हे लोक आता बदल्याची मनीषा बाळगून होते.

" बरं ठीक आहे...." शेखरने आपले दोन्ही हात वर उचलत सगळ्यांना शांत केले.
" ठीक आहे आपण त्या सगळ्यांना धडा शिकवू या... कोण कोण माझ्या सोबत आहे? " त्यावर सगळ्यांनी मोठ्या उत्साहात हात वर केला...

" मग ठीक आहे... हे पिस्तूल घ्या... कदाचित ते शरण नाही आले तर आपल्याला त्यांना मारावे लागेल... " असे म्हणून शेखरने आपले पिस्तूल सगळ्यांच्या समोर टेबलवर टाकले . आणी कोणाला मारायचं ह्या कल्पनेनेच त्यातले अर्धे मागे हटले. उरलेलं काय करावे ह्या संभ्रमात होते.

" माझे ऐकाल...?" शेखर शांतपणे सांगू लागला.

" बघा मी त्यांना सोडणार नाही. आणी माझ्या साठी हा रोजचा खेळ आहे. मी पोलीस स्टेशन मध्ये असून पण पिस्तूल ठेवू शकतो ह्या वरुन तुम्ही काय ते समजून गेले असाल ? "
" मी तर असे सुचविन की तुम्ही ह्या सगळ्या पासून लांब राहा. आता खूप खूनखराबा होणार आहे. आणी मी त्यांना सोडणार नाही. पण तुमच्या साठी ही नवीन गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या मुलांबाळा सोबत शांतपणे राहा. बाकीचे माझ्यावर सोडून द्या.... काय ? "
बराच वेळ विचार करून मग सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. शेवटी सगळे आपापल्या मुलीला घेऊन गेले. आणी शेखर पण निघाला.

" सर... सर..." वाघमारे त्याच्या मागे धावत आला.

" काय वाघमारे...? अरे हो.... काळजी करू नकोस ह्याचे क्रेडिट पूर्णपणे तुला देण्यात येईल. कदाचित तुला प्रमोशन पण मिळेल. " शेखर त्याला आश्वस्थ करत म्हणाला. आणी त्यावर वाघमारे पोलिसी खाक्याला न शोभणाऱ्या पद्धतीने गोड लाजला...

अश्या प्रकारे अजून एक प्रकरण काहीही विघ्न न येता पार पडले. वैष्णवीला बघून सुकन्यानी तिला आपल्या छातीशी लावले. किती तरी वेळा तिचे चुंबन घेतले. दुसऱ्या दिवशी सगळे परत मुंबईला निघाले.
आता वैष्णवी आपल्या आई बाबा सोबत आणी आपल्या प्रेमळ आणी खमक्या मामा मामी च्या सानिध्यात होती. सध्या तिचा रात्री मुक्काम मामा मामीच्या बरोबरच होता. सुकन्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचे लाड करत तिला झोपवत असे. वैष्णवी परत आल्या पासून सुकन्याला जाणीव होत होती की शेर सामान्य लोकांसाठी किती गरजेचीं आहे. आता पर्यंत तिने स्वतःचा स्वार्थ बघितला होता. पण आता तिला लोकांचा विचार करायचा होता.

" शेखर ! आपण पुन्हा शेर चालू केली तर ? तुला ते शक्य आहे कां ? " वैष्णवी झोपली असल्याची खात्री झाल्यावर तिने विचारले.

" अग तुला शेर नको होती ना ? मग आज अचानक तुला शेरचीं आठवण का यावी ? "

" आता तु पण मला नको शब्दाचे मार मारू ? मला कळून चुकले आहे की , शेर सामान्य लोकांच्या किती कामाची आहे. आधी मी फक्त स्वतःचा विचार करत होते पण तु तर सगळ्या गरीब , सोशीत , अन्याय झालेल्या लोकांचा विचार करत होतास.... प्लिज... शेर पुन्हा सुरु कर नां ? "

" अग त्यात परत काही महिने जातील . शिवाय परत तुझा मूड बदलला तर म्हणशील बंद कर... मग मी आयुष्यभर हेच करत राहायचे काय ? "

" मी तुला वचन देते की , मी ह्या पुढे कधी तूझ्या आणी शेरच्या मध्ये येणार नाही. जमलेच तर मी शेरचा एक भाग होईन...." त्याचा हात आपल्या हातात घेत तिने त्याला वचन दिले.

" ठीक आहे. उद्या पासून शेरचा नवीन अध्याय चालू होईल... " तो खुश होऊन म्हणाला आणी ती पण आनंदाने त्याच्या मिठीत शिरली .

दुसऱ्या दिवशी शेखर एकटाच केबिनला बसला होता. विनू , सारंग , इस्माईल किडनॅपर ला शोधात होते. आणी शेखर गालातल्या गालात हसत होता.

आपल्या प्लॅन मध्ये कोणती त्रुटी तर राहिली नाही. ह्याचा तो विचार करत होता. अपेक्षेपेक्षा जास्त त्याला ह्या कामात यश मिळाले. शेर परत कार्यान्वित झाली होती. पण त्या साठी त्याला बैष्णवीला डावाला लावावे लागले होते. कधी कधी समजावून सांगण्यापेक्षा अनुभव माणसाला जास्त शहाणे करून जातात... आता काय करणार त्याला इलाज नव्हता.....

आता पुढे शेरकथा सिरीज रूपाने अधूनमधून प्रकाशित करत जाईन.


=========== समाप्त ============

© सर्वाधिकार लेखकाकडे....