Nako chandra tare, fulanche pasare - 4 books and stories free download online pdf in Marathi

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 4

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे....

(4)

ढवळेपाटील वाडीतील बडे प्रस्थ. आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेली पाटीलकी. दुमजली ऐसपैस चौसोपी वाडा. ढवळेवाडा म्हणून पंचक्रोशीत ओळख होती. आजबाजूच्या वाड्यावस्त्यांमध्ये पाटलांचा नावलौकिक होता. दरारा होता. पाटलांचा स्वभाव प्रेमळ. त्यामुळे लोकांना ते हवेहवेसे वाटायचे. पंचक्रोशीतील भांडण तंटा सोडवण्यात आणि न्यायनिवाडा करण्यात पाटील एकदम वाकबगार. लोकं तालुक्याच्या कचेरीत जाण्यापेक्षा पाटलांकडेच यायची. तालुक्याहून एके शनिवारी अमावस्येच्या रात्री माघारी येताना घाटात झालेल्या अपघातात वडीलांचा अकस्मात मृत्यू झाला. सारी जबाबदारी वीस बावीस वर्षांच्या सुभानरावांवर आली. अशाही परिस्थितीत सुभानरावांनी आपल्या वडिलांइतकीच कीर्ती मिळवली. भारदस्त व्यक्तिमत्व, उंचपुरे आणि आवाजातली धार पाटलांना शोभत असे.

मृत्यूसमयी वडिलांच्या इच्छेखातर मित्राच्या मुलीशी कुसाबाईशी पाटलांना विवाह करावा लागला. एक दोन महिन्यातच पाटलांना कुसाबाईचा स्वभाव कळला. एकदम हट्टी स्वभावाची, हवे ते करणारी, कुणाचंही न ऐकणारी, तुसड्या स्वभावाची, हेकेखोर व्यक्तिमत्वाची अशी कुसाबाई पाटलांची डोकेदुखी बनली. काहीच दिवसात गावातील गोर गरीब जनता तिच्या गर्विष्ठ पणाला, तिच्या जाचाला कंटाळून गेली. सुभानरावांच्या न कळत त्यांच्या व्यवहारात अफरातफर करून कुसाबाईने भरपूर धन गोळा केलं. गावकऱ्यांकडून, कामगारांकडून तिच्याबद्दल खूपदा तक्रारी यायच्या. सुभानरावांनी वेळोवेळी सांगूनही तिने तिचा स्वभाव सोडला नाही. हळूहळू तिने सगळा कारभार आपल्या हाती घेतला आणि सुभानरावांना आपल्या हाताचं खेळणं बनवलं.

अशीच पाच सहा वर्षे उलटून गेली.तालुक्याच्या गावी एका नात्यातील लग्नासाठी सुभानराव गेले होते. हुंड्यावरून नवरा मुलाकडच्या लोकांनी लग्नाला नकार दिला आणि भर मांडवातून निघून गेले. मुलीच्या बापाची इज्जत टांगणीवर लागली होती. रडवेल्या चेहऱ्यानं आणि कातरस आवाजात त्याने समोर जमलेल्या मंडळींना आवाहन केले. डोक्यावरचा फेटा काढला आणि हातांची ओंजळ करून समोर धरत म्हणाले.

"मंडळी... आता आमची इज्जत तुमच्या हातात. पोरीचं लगीन या मांडवात न्हाई लागलं तर उद्याचा दिस न्हाई उजडणार माझ्यासाठी. बाबांनो कुणी हाय का हिथं? जो माझ्या पोरीसंग लगीन करायला तयार होईल."

जमलेल्या चार पाचशे लोकांमध्ये एकचं शांतता पसरली होती. कुणीही समोर यायला तयार नव्हतं. लोकांची चुळबुळ वाढू लागली. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. सुभानरावांना नवऱ्या मुलीच्या बापाची अवस्था पाहवेना. सामोरे जात त्यांचा फेटा हातात घेतला, आणि पुन्हा डोक्यावर घातला.

"पाव्हणं.. काळजी करू नका. आपण काहीतरी मार्ग काढू.."

सुभानरावांच पुढचं वाक्य लोकांच्या गलक्यात ऐकूच गेलं नाही. तोच, मुलीच्या बापानं त्यांना घट्ट मिठी मारली. सनई चौघडे वाजू लागले. लोकांनी टाळ्यांचा जल्लोष केला. सुभानरावांना काही कळेना. त्यांना काही बोलायचं होतं. तोच त्यांना मुंडावळ्या घालून नवरी मुली समोर उभं करण्यात आलं. आपण गेलो एक करायला आणि हे भलतंच होऊन बसलं! झाला प्रकार सुभानरावांच्या लक्षात आला. चाललेला प्रकार थांबवायला पाहिजे! तोच, त्यांचं लक्ष समोर गेलं. आंतरपाटापलीकडे उभं असलेलं आरस्पानी सौन्दर्य पाहून सुभानराव भारावून गेले. तिच्यावरून त्यांची नजर ढळत नव्हती. मुलगी पाटलांच्या भारदस्त व्यक्तिमत्वावर कधीच भाळली होती. लाजून तिनेही नजर खाली केली. सुभानराव पुरते घायाळ झाले होते. इंद्राच्या दरबारातील रंभा, उर्वशीही फिक्या पडतील असं लावण्य समोर उभं होतं.

अपघातानं सुभानरावांना राणीशी लग्न करावं लागतं. आईवडिलांनी तिचं नाव राणी ठेवलं होतं. पण आई ठेंगणी असल्यामुळे साऱ्या गावात तिला बटुराणीच म्हणायचे. आणि तिलाही या नावाचं कधीच वाईट वाटले नाही. दयाळू आणि सरळ स्वभावाची नवी पाटलीणबाई काही दिवसांतच साऱ्या वाडीची वहिनीसाब बनून गेली. पाटीलही तिला वेळोवेळी साथ करत. गावातील लोकांच्या समस्या, प्रश्न समजून घेणे. लोकांना अडीअडचणीला मदत करणे. यामुळे वहिनीसाबचा लौकिक पंचक्रोशीत पसरू लागला. पण जाणे, तिला कुणाची नजर लागली. एका शनिवारच्या रात्री वाहिनीसा अचानक गायब झाली ती कायमचीच.

******

सांगता सांगता आजी जरा थांबली. माठातलं पाणी प्यायली अन पुन्हा सांगू लागली.

"त्या रात्रीपासून वहिनीसाब कुठं गायब झाली, कुणालाच पत्त्या न्हाई. कोण म्हणतं त्या, कुसाबाईनचं मारून टाकलं. तर कोण म्हणतं, ती कुणासंग तोंड काळ करून पळून गेली. पण ती पळून जाणारी बाय नव्हती. लय चांगली बाय व्हती."
नंदाच्या बाबतीत घडलेल्या घटना काय असतील याचा अंदाज आजीला आला होता. पण नक्की धागा दोरा काय यासाठी ढवळेवाडीला जायला पाहिजे!

अमावस्येच्या शनिवारी आपल्यासोबत घडणारा तो प्रसंग आपल्याला नक्की काय सांगू पाहतोय? त्याचा बटुराणी गायब होण्याचा काही संबंध आहे का? आरश्यात दिसलेल्या त्या व्यक्तीचा काय संबंध? असे अनेक प्रश्न निताला पडले होते. त्यासाठी तिला आईच्या सांगण्यावरून ढवळेवाडीला जावं लागणार होतं. निता तिच्या घरी गेली. संध्याकाळी समीर घरी आला. घडलेला सगळा प्रकार तिने सांगितला. सुरुवातीला त्याचा या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता पण जेव्हा आज्जीनेच सगळ्या गोष्टींना दुजोरा दिलाय म्हटल्यावर मात्र, त्याची पक्की खात्री झाली. आणि यासाठी त्याला त्याचा पीएसआय मित्र भानुदास चांदगुडे याची मदत घ्यावी लागणार होती.

बरेचसे लोक गाव सोडून शहराकडे गेल्यामुळे गावात जेमतेम लोकं राहत होती. गावाला जाण्याचा रस्ताही दुर्लक्षित झाला होता. ठिकठिकाणी पडलेली, झडलेली, दुर्लक्षित घरं दिसत होती. त्यात झाडाझुडपांनी, उंदीर, घुशी, आणि इतर प्राण्यांनी आपली वस्ती केली होती. म्हणायला गावातली दहा पंधरा घरं फक्त जिवंत होती. आणि ओढ्याच्या काठावरचं पुरातन मारुतीचं मंदिर अजूनही आपलं अस्तित्व टिकवून होतं. गावाचं नाव होतं. ढवळेवाडी.

गावात पोहोचायला निता, समीर, भानुदास आणि त्याचे दोन सहकारी यांना दुपार झाली. गावात कुणीही ओळखीचे नसल्यामुळे त्यांना काहीवेळ मारुतीच्या मंदिरातच थांबावं लागलं. सूर्य जेव्हा मावळतीकडे झुकू लागला तेव्हा त्यांनी शोध मोहीम चालू केली. ढवळेपाटलांचा वाडा शोधायला त्यांना वेळ लागला नाही. एक दोन घरी चौकशी केल्यावर त्यांना वाड्याकडे जाण्याचा रस्ता मिळाला. खूप वर्षांपासून तिकडे कुणीही फिरकत नसल्यामुळे गवत खूप वाढले होते. शिवाय, आजूबाजूला झाडं झुडपांनी सारा परिसर व्यापून गेला होता. अंतर फार नव्हतं. पण जायचा रस्ताच कालौघात नाहीसा झाला होता. त्यामुळे त्यांना वाड्यापाशी पोहोचायला अर्धा पाऊन तास लागला. सगळीकडे झुडपं वेली माजल्या होत्या. वाड्याच्या आजूबाजूला तर भरपूर गवत वाढले होते. कित्येक वर्षांपासून वाडा बंद होता. वरचा मजला अर्धा अधिक मोडकळीस आला होता. वरची गच्चीसुद्धा लाकडं निसटल्यामुळे आणि कुजून गेल्यामुळे मोडकळीस आली होती. वाड्याचा भला मोठा सागवानी दरवाजा फक्त कडी लावून बंद होता. बाहेरील बाजूस तांब्याची नाणी दरवाज्यावर ठोकलेली होती. प्रत्येक कोनाड्यात नागाची वाटोळी नक्षी आणि मध्ये सिंहाचे मुख होते. ठिकठिकाणी नक्षीदार महिरप आणि कमळाची फुलं कोरलेली होती. दरवाजा पाहताच निताला तिच्या घरातील आरश्याची आठवण झाली. अगदी हुबेहूब आरशाच्या चौकटीची नक्षी वाड्याच्या दरवाज्यावर होती. नीता उतावीळपणे समीरला म्हणाली,

"समीर... समीर... अरे बघ ना! अगदी अशीच चौकट आपल्या घरातील आरश्याची पण आहे."

"ओहह... हो यार... नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे."

भानुदासच्या साथीदारांनी महतप्रयत्नाने दरवाजा उघडला. आतून कोंदट हवेचा भापकारा आला. सगळ्यांनी आपापली नाकं बंद करुन घेतली. आतमध्ये पाहिल्यावर आज तरी निदान काहीच हाती लागण्याची शक्यता नव्हती. कारण, आतमध्ये ठिकठिकाणी काटेरी बाभळी, मातीचे ढिगारे आणि गवताचं साम्राज्य होतं. हे सगळं साफ करायला अवजारांची आवश्यकता होती. त्यांनी वाड्याचे फोटो घेतले. वाड्याच्या आजूबाजूने फिरून आणखी काही हाती सापडतंय का पाहिलं. सायंकाळ होत आली होती. पुन्हा माघारी फिरावं लागणार होतं. पण निताचा पाय तिथून निघेना. या वाड्याशी आपलं काहीतरी खूप घनिष्ठ नातं असल्यासारखं वाटत होतं. शेवटी नाईलाजास्तव त्यांना माघारी फिरावं लागलं.

चार पाच दिवसात गावातीलच काही लोकांना हाताशी घेऊन वाड्याची साफसफाई करण्यात आली. एक म्हातारा भिकारी सारखा वाड्याभोवती चकरा मारत होता. एक दोन वेळा निताचं त्याच्याकडे लक्ष गेलं. याला आपण कुठेतरी पाहल्यासारखं वाटत होतं. मारुतीच्या देवळाजवळ बसलेला हाच तो म्हातारा. पण आणखी कुठेतरी त्याला पाहिलं आहे, आठवत नव्हतं. तिला पाहताच तो पळून जायचा. काही जीर्ण झालेले जुने फोटो सापडले होते. ढवळेपाटलांबरोबर असलेला बटुराणीचा फोटो पाहून निताला खात्री झाली, की आपल्या सोबत घडणाऱ्या त्या प्रसंगातली स्त्री ही बटुराणीच आहे. आणि इथेच कुठेतरी तिच्यावर अत्याचार झाला आहे. खूप शोधा शोध केली मात्र, ती जागा काही केल्या सापडेना. वाड्याला कुठे तळघर वगैरे आहे का तेही पाहिलं पण छे! व्यर्थ! हताश होऊन सगळे मारुतीच्या देवळात बसले होते. भानुदास, समीर, नीता चर्चा करत बसले होते. आठवडा उलटत आला होता. अजूनही त्यांच्या हाती सबळ पुरावे, धागे दोरे हाती लागले नव्हते. उद्याचा रविवार फक्त त्यांच्या हातात होता. पुन्हा सगळ्यांना आपापल्या कामावर नेहमीचं रुटीन चालू झालं की, इकडे बघायला वेळ मिळणार नव्हता. निता एक खांबाला टेकून ते गाणं गुणगुणत होती.

"नको चंद्र तारे, फुलांचे पसारे...
जिथे मी रुसावे, तिथे तू असावे..."

बराच वेळ पायऱ्यांच्या बाजूच्या कठड्यावर तो म्हातारा भिकारी यांच्याकडे टक लावून बघत होता. बटुराणी, सुभानराव यांची नाव त्याला सारखी त्यांच्या तोंडून ऐकायला मिळत होती. पण निताच्या तोंडून त्या ओळी ऐकताच तो मात्र, अस्वस्थ झाला. त्याची चुळबूळ वाढू लागली. निताच्या जवळ येत तो म्हणाला,

"हे गाणं... हे गाणं तुमास्नी कसं काय माहीत??", म्हातारा त्याच्या घोगऱ्या आवाजात म्हणाला.

निता जरा दचकलीच. पुढे होत म्हणाली, "का? काय झालं???."

"आधी सांगा त्ये?", म्हातारा हळू आवाजात म्हणाला.

"मी ऐकलं होतं कुठेतरी?"

"कुठं? कधी?"

आणखी जवळ होत तिनं त्या म्हाताऱ्याला निरखून पाहिलं. नीताचा संशय बळावला. कारण, तो दुसरा तिसरा कोणी नसून तोच होता, जो तिला दुसऱ्यावेळी घडलेल्या प्रसंगात आरश्यात दिसला होता. तेच डोळे आणि तेच बसकं नाक. फक्त दाढी मिशा आणि केस वाढलेले होते.

निता अगदी हळू आणि प्रांजळ स्वरात म्हणाली,
"बाबा...! काय झालं? सांगाल काय?"

"पोरी... चार पाच दिस झालं चाललंय बगतुय म्या. तुम्ही पाटलांच्या वाड्यावर काहीतरी शोधताना दिसताय. जरा सांगता का?"

नीता त्याच्या समोर जाऊन विनवणीच्या स्वरात म्हणाली,
"बाबा... दर शनी अमावस्येला माझ्या बाबतीत जे घडतंय ते नाही सांगू शकत तुम्हाला. किती त्रास आणि असह्य वेदना मला भोगायला लागतात बाबा.. तुम्हाला त्याही कल्पना नाही येणार..."

"क्काय???"

हे ऐकताच म्हातारा म्हणाला, " हे तुझ्या बाबतीत घडतंय??"

"होय बाबा... माझ्या घरी असलेला आरसा दर शनी अमावस्येला रात्री अकरानंतर मला या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. बाबा ती अजूनही नरक यातना भोगते आहे. दर चार महिन्यांनी तिच्यावर अत्याचार होतात. तिनं काय काय भोगलंय हे माझ्याशिवाय तुम्हाला कुणीच नाही सांगू शकणार... तिला यातून सोडवलं पाहिजे. तिला मुक्ती हवीय बाबा तिला मुक्ती हवीय. आणि त्यासाठीच आम्ही इकडे आलो आहोत."
सांगता सांगता नीताच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू ओघळू लागले. म्हाताऱ्याच्याही डोळ्यांत पाणी दाटलं होतं.

"पोरी... काय सांगू तुला??? तुला सगळं माहिती हाय का नाही? मला न्हाय माहीत. तरीबी सांगतो सगळं."

म्हाताऱ्याच्या तोंडून शनिवारच्या त्या अमावस्येला काय घडलं होतं ते सगळे ऐकू लागले.

वाहिनीसा दिवसेंदिवस लोकांमध्ये आपलीशी वाटू लागली. मात्र, मोठ्या पाटलीनबाईंना त्यांचं कौतुक आणि लोकांमध्ये असलेली त्यांची प्रतिमा खुपायला लागली अल्पवधीतच बटुराणीला कुसाबाईचे सगळे धंदे माहीत पडतात. तिच्या सगळ्या गैरव्यवहारांवर राणीमुळे चांगलाच चाप बसतो. हळूहळू पाटीलही कारभारामध्ये सक्रिय होऊ लागतात. कुसाबाईकडे दुर्लक्ष करून आपलं काम करत राहतात. मात्र, कुसाबाईच्या डोक्यात एक महा कट कारस्थान शिजत असतं. ज्याची पुसटशीही कल्पना राणी आणि सुभानरावांना नसते. घरकामगार शिरपतला या कट कटकारस्थानाचा सुगावा लागतो. तो सगळं बटुराणीला सांगत असतो. पण न जाणे कोण, हे सर्व कुसाबाईला कळते आणि आजच ती राणीचा काटा काढायचं पक्कं करते. या गोष्टी राणी आजच्या आजच पाटलांच्या कानावर घालणार असते.

तालुक्यावरून निघायला पाटलांना रात्र झाली. शनिवारचा दिवस त्यात अमावस्या. आपल्या वडिलांचं मरण याच दिवशी आलं होतं. हा विचार करून पाटलांनी तालुक्यालाच थांबायचा निर्णय घेतला. पण राणीच्या विचाराने त्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी घरी फोन करून उद्या सकाळी लवकर येण्याबद्दल राणीला सांगून ठेवलं. तरीही शंकेची पाल मनात चुकचुकत होती. जीव टांगणीला लागला होता. जीवाची तगमग वाढू लागली होती. रात्रभर पाटील झोपू शकले नाहीत. कधी सकाळ होतेय आणि आपण गावी जातोय, असं वाटत होतं.

रात्रीचे अकराचे ठोके पडत होते. आज वाड्यावर कुणीही घरगडी नव्हता. बटुराणी तिच्या दालनात एक गूढ कादंबरी वाचण्यात दंग झाली होती. खिडकीतून मंद गार वारा तिच्या केसांशी लगट करत होता. खिडकीच्या जवळ असलेल्या टेबललॅम्पच्या प्रकाशात तिचा चेहरा सुंदर दिसत होता. पुस्तकातील एका गूढ कवितेच्या ओळी ती वाचत होती.

नको चंद्र तारे,
फुलांचे पसारे...
जिथे मी रुसावे,
तिथे तू असावे...

तुझ्या पावलांनी,
मी स्वप्नात यावे...
नजरेत तुझिया,
स्वतःला पाहावे...

डोळे बंद करून खुर्चीला डोके टेकवून मनातल्या मनात ती त्या ओळी गुणगुणू लागली. पण तिच्या मनात एक अनामिक भीती दाटली होती. एक हुरहूर वाटू लागली. खिडकीतून येणारा मंद गार वारा अचानक बंद झाला. बाहेर मिट्ट काळोख पसरलेला होता. रोज येणारा रातकिड्यांचा बेडकांचा आवाजही नव्हता. एक विचित्र शांतता पसरली होती. खिडकीच्या खाली उभा असलेल्या सोम्याच्या कानावर या ओळी पडत होत्या. तोच तिच्या गच्चीवरून काळे कपडे घातलेले चार पाच इसम तिच्या दालनात घुसले. हातात कुऱ्हाडी आणि चेहरा पूर्ण झाकलेला. कुसाबाईही काहीही न सांगता तिच्या भावाकडे बाहेरगावी गेली होती. तसंही ती काही सांगून जात नसे. वाडा सामसूम होता. हीच योग्य वेळ वैऱ्यांनी साधलेली होती. तोच मागून राणीचे तोंड कुणीतरी दाबलं. तिला आरडाओरडा करायलाही वेळ मिळाला नाही. एकानं तसंच तिला अलगद खांद्यावर उचललं अन झपझप पावलं टाकत पायऱ्या उतरू लागले. तिला तळघरात आणलं गेलं. तिथंच तिचा खात्मा करून दफन करायचे असते. पण रूपवान बटुराणीचं सौंदर्य पाहून चौघाजनांची बुद्धी फिरते. तिच्यावर जबरदस्ती करण्यात येते. पाचवा सोम्या त्यांना अडवू पाहत होता, तिला वाचवू पाहत होता. पण त्या चौघांच्या समोर त्याचे काही चालेना.

"आरं.. बबन्या आपुन कशाला आलूय हितं. आणि ह्ये काय चाललंय तुमचं???"

"सोम्या तुझी आई ** **. न्हायतर तुजा बी मुडदा पडाय येळ लागणार न्हाई."

सणकन सोम्याच्या कानाखाली बबन्यानं झापड लगावली. सोम्या चार पावलं भेलकांडतच मागे पडला. तरीही तो त्यांना विनवण्या करत होता.

"संप्या ssss आरं नगु राव... ही पाप हाय."

"सोम्या ssss गपगुमान दारापाशी उभा रहा. न्हायतर तुला बी हिच्या संगट हिथच जित्ता गाडीन. चल निघ..." त्याला काहीच करता येईना.

बटुरणी त्यांना कळकळीने विनंती करीत होती. देवाची, आईची शप्पथ घालत होती. पण कुणालाही दयेचा पाझर फुटला नाही. वासनेचा ब्रह्मराक्षक त्यांच्यावर सवार झाला होता. जेव्हा वासना आणि हवस मेंदूचा ताबा घेते, तेव्हा मनुष्याला काहीही दिसत नाही. आपल्या शरीराची तहान भागवण्यासाठी समोर फक्त स्त्री देह हवा असतो. मग ती कुणाची बहीण, आई, मुलगी, पत्नी कुणी का असेना. कशाचीही पर्वा असत नाही. परिणाम काहीही होवो, त्याचा त्याक्षणी तो विचार करत नाही.

तिच्या आर्त किंकाळ्या तळघरात घुमत होत्या. चौघांनी तिच्यावर तास दोन तास आळीपाळीने अत्याचार केला.

बटूराणीची सर्व वस्त्र त्यांनी अक्षरश फाडून काढली होती. तिचे फाटलेली वस्त्र इतरस्त पडलेली होती. तिच्या नग्न शरीराचा नराधमांनी हवा तसा उपभोग घेतला होता. तिच्या अंगावर ओरखडे उठलेले होते. त्यातून रक्तही आलं होतं. तिची गोरी काया त्या नराधमांच्या अपवित्र हातांनी लाल झाली होती. रक्ताळली होती. सारं अंग, गात्र न गात्र असह्य अशा वेदनांनी ठणकत होतं. बटुराणीवर त्यांनी पाशवी अत्याचारांची सीमा केली. असह्य वेदनेने तिनं अस्फुट किंकाळी फोडली अन बेशुद्ध झाली. तरीही त्यांनी तिच्या बेशुद्ध पडलेल्या शरीरावर पुन्हा आपल्या वासनेची तहान भागवली. बाजूलाच अडगळीत पडलेल्या मोठ्या आरश्यात दारात हतबल उभा राहिलेल्या सोम्याला हे सगळं दिसत होतं. पण तो काहीही करण्यास असमर्थ होता.

ज्या जागेवर बतुराणीच्या अब्रूची त्यांनी लक्तरं केली. त्याच जागेवर दोन तीन फूट खोल खड्डा खोदला. चौघे जेव्हा खड्ड्यामध्ये तिचं बेशुद्ध शरीर गाडण्यासाठी मातीचा ढिगारा ओढत होते. तेव्हा तिचं एकचं अस्पष्ट वाक्य सोम्याला ऐकू आलं.

"एकेकाला सोडणार नाही मी..!"

संप्या तिच्या अंगावर माती टाकत हसत हसत म्हणाला, "अग तू जित्ती तर राहिली पाहिजे आम्हाला मारायला." तिला जिवंत गाडून त्यांनी रातोरात वाडा सोडला.

बटुराणी गायब झाल्याची बातमी हाहा म्हणता पंचक्रोशीत पसरली. पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण तळघरातह दफन झालेल्या बटूराणीचा शोध मात्र कधी लागला नाही. तपास कार्य बंद करण्यात आलं.
बटूराणीचा विरह सहन न झाल्याने पाटीलही काही दिवसांत अंथरुणाला खिळले आणि मृत्यू पावले.
कुसाबाईचं हे कटकारस्थान फक्त त्या पाच जणांशिवाय कुणालाही माहीत नव्हतं. आज ना उद्या कुसाबाई आपलाही काटा काढेल या भीतीने त्या चौघांनी कुसाबाईला निर्जन स्थळी गाठून यमसदनी पाठवलं. वाड्यातील सारी संपत्ती चौघांनी आपसांत वाटून घेतली आणि गाव सोडला तो कायमचाच.

*******

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED