Nako chandra tare, fulanche pasare - 5 - lat part books and stories free download online pdf in Marathi

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 5 - अंतिम भाग

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे....

(5)

सांगता सांगता त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ऐकून सगळे सुन्न झाले होते. सूर्य डोंगराआड जाऊ लागला होता. म्हातारा उठला. देवळात समई पेटवली. माठातील थंडगार पाणी प्यायला. सगळ्यांना पाणी दिलं. आणि पुढं सांगू लागला.

"चार महिनं झालं व्हतं. सारा गाव हळूहळू इसराय लागला. पुन्हा शनी अमावस्येच्या रात्री म्या एकदा झोपायच्या आधी आरश्यात बगत हुतो. तोच वाहिनीसाचा चेहरा आरश्यात दिसला. म्या लय घाबारलो. गप जाऊन झोपलो पर झोप लागली न्हाई. सारखं सारखं त्यो आरसा दिसायचा आणि वाहिनीसावर होणारा अत्याचार. म्या आरश्यात बगायचं बंद केलं. घर सोडलं आन हिकडं देवळात येऊन राहायला लागलू. पर दर शनी अमावस्या आली, की मला रातच्याला तेच दिसतं. वाहिनीसा दिसत्यात. त्यांचं ते गाणं ऐकू येत. त्यांच्या विनवण्या. त्यांच्या किंचाळ्या. न्हाय बगवत पोरी न्हाय बगवत त्ये. इस वर्षे झाली पर आजूनबी त्यो परसंग शनी अमावशेला सपष्ट पाहतो म्या. त्या चौघांनी मला जित्ता गाडायची धमकी दिली व्हती. आन म्या एकटा तरी काय करणार व्हतो."
हे सांगून म्हातारा ढसाढसा रडू लागला. थोड्यावेळापूर्वी समीर आणि भानुदासच्या चर्चेवेळी बबनरावांच नाव त्यानं ऐकलं होतं.

"तुझ्या बापाचं नाव काय गं?"

"का हो बाबा? काय झालं?"

"सांग तर??"

"बबनराव पिसाळ..."

म्हाताऱ्यानं हुंकार भरला. अन काहीतरी विचार करून म्हणाला,

"जा पोरांनो.. जा आता... उशीर होईल तुम्हाला.. घरी जावा. उद्या येताना तुझ्या बापाला घेऊन ये पोरी."

रात्री दहाच्या आसपास सगळे घरी पोहोचले. भानुदास आणि त्याचे साथीदारही रात्री समीरच्याच घरी थांबले. निताने बबनरावांना फोन करून उद्या आपल्याला काही खरेदीसाठी शहरात जायचे आहे, असे सांगितले आणि सकाळी लवकर तयार राहा म्हणून बजावले.

पुढे समीर आणि भानुदास बसले होते. मध्ये बबनराव, शेजारी निताची आई अन शेजारी निता. भानुदासचे साथीदार आधीच पुढे गेले होते. हायवे वरून कार ढवळेवाडीच्या रस्त्याला लागली. बबनरावांची तगमग होऊ लागली. धाकधूक वाढू लागली.

"बेटा... इकडे कोणत्या रस्त्याने चाललोय आपण?"

"बाबा... माहिती असून सुद्धा विचारताय?"

निताचे खोचक वाक्य ऐकून बबनराव समजून गेले. बरोबर जावई आणि त्याचा मित्र होता. त्यामुळे त्यांना गप्प राहण्यावाचून काहीच गत्यंत्तर नव्हतं. तोच जुना रस्ता, तो ढवळ घाट, घाटातून खाली उतरल्यावर दिसणारा ओढा, ओढ्याजवळच मारुतीचं मंदिर आणि निसर्गाच्या कुशीत पाच पन्नास घरं असलेलं ढवळवाडी गाव. बबनराव आज वीस वर्षांनी गावात येत होते. जुन्या आठवणी मनात गर्दी करू लागल्या. अस्वस्थता वाटू लागली. चेहऱ्यावर घामाचे थेम्ब जमा होऊ लागले. हृदयाची धडधड वाढू लागली. समोर काय वाढून ठेवलंय! बबनराव समजून गेले. शांत राहण्यापलीकडे आता त्यांच्या हातात काहीच नव्हतं. कार पाटलांच्या वाड्याकडे वळली. आणि काही वेळातच कार वाड्याच्या समोर येऊन थांबली. सगळे खाली उतरले. बबनराव मात्र अजूनही कारमध्येच बसले होते.

"बाबा येताय ना?"

बबनरावांनी नुसताच हुंकार भरला. तेवढ्यात भानुदासचा साथीदार ईश्वर धावतच आला.

"साहेब... चला लवकर...!"

"काय रे काय झालं?"

"आधी चला लवकर...!"

सगळे धावले. मुख्य हॉल मधील डावी भिंत फोडलेली होती. तिथून खाली तळघरात जाण्यासाठी पायऱ्या होत्या. सगळे घाईतच आतमध्ये गेले. म्हातारा सोमनाथ आणि दुसरा साथीदार आधीच आतमध्ये होते. खाली खड्ड्यामध्ये एक मानवी सांगाडा होता. अंगावरचे दागिने पाहताच निताला ओळख पटली. तिला रडू लागली. समीरने तिला सावरलं.

"कुठंय तुझा बाप? बोलवा त्याला...", म्हातारा म्हणाला.

"ईश्वर.. जा रे.. बबनरावांना बोलावं...", भानुदास म्हणाला. ईश्वर बाहेर आला. बबनराव त्याच्या सीटवर समोर एकटक पाहत शांत बसले होते.

"बबनराव... ओ बबनराव... तुम्हाला बोलावलंय चला...", बबनरावांचे काहीही उत्तर आलं नाही. ईश्वरने त्यांना खांद्याला धरून हलवलं. आपसूकच बबनरावांची मान कलंडली अन सीटवर कोसळले. ईश्वरला समजले, नक्की काय झालंय!

"साहेब... बबनराव...!"

सर्वजण वर धावत आले. भानुदासने पटकन जाऊन नस पाहिली. पण, बबनरावांचे शरीर कधीच थंड पडलं होतं.

म्हातारा सोमनाथ म्हणाला, "मेला सैतान... तुझं घाण पाय बी इथल्या मातीला लागू दिलं न्हाई तिनं.."

"चला आपल्याला आधी तळघरात जाऊन अग्नी दिला पाहिजे. म्हणजे त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल."

तळघरात त्याच जागेवर चिता रचण्यात आली. गावातील काही लोकांना बोलावून शक्य ते सोपस्कार पार पाडण्यात आले. बटुराणी कित्येक वर्षांच्या अत्याचारातून मुक्त झाली. दुरून कुठूनतरी मंजुळ आवाज येत होता.

नको चंद्र तारे,
फुलांचे पसारे...
जिथे मी रुसावे,
तिथे तू असावे...

तुझ्या पावलांनी,
मी स्वप्नात यावे...
नजरेत तुझिया,
स्वतःला पाहावे...

@स्वलिखित

ईश्वर त्रिंबकराव आगम

वडगांव निंबाळकर, ता. बारामती, पुणे.

+९१ ९७६६९६४३९८

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED