Premvedyanchi chhotishi prem kahani books and stories free download online pdf in Marathi

प्रेमवेड्याची छोटीशी प्रेम कहाणी

कधीही विसरू न शकणारा तो वर्ग अकरावीचा. का? कारण तिथेच माझ्या जीवनाला नवा अर्थ मिळाला. त्या वर्गात नव्याने प्रवेश घेणारी होती एक सुंदर परी माझा जीव जडला तिच्यावरी! तिचे लांब केस, गोरा गोरा नूर. वर्णन न करता येणारं रुप तिचं. जेव्हा ती कॉलेजला सायकलवर यायची ना! तेव्हा तिची ओढणी माझ्या चेहऱ्यावर अलगत उडून जायची. मन माझं अगदी बेभान व्हायचं. खरी कहाणी तर तेव्हा सुरू झाली जेव्हा ती माझ्या वर्गात आली. मी मुद्दाम तिच्या शेजारी बेंच मागितला. खूप आनंद पण झाला की ती माझ्या शेजारी बसली पण मला काय माहित की पुढे माझी वाट लागणार आहे.

‌ ती अतिशय हुशार वर्गात दर वेळी पहिली येणारी. आणि मी अगदीच मठ्ठ नाही म्हणता येणार पण कमी मार्क मिळवणारा विद्यार्थी. खरंतर कॉलेजचा पहिला दिवस आणि ती माझ्या शेजारी येऊन बसली. मला काहीच उमजेना काय करावं? काय बोलावं? ते म्हणतात ना! सोळावं वरीस धोक्याचं! अगदी तसंच झालं. मन माझं अखेर तिच्या प्रेमात पडलंच. हळूहळू आम्ही बोलू लागलो पुढे मैत्री झाली. आम्ही खूप बोलायचो, एका डब्यात जेवायचो इतकंच नव्हे तर प्रत्येक गोष्ट एकमेकांना शेअर करायचो. मला मात्र कविता लिहायचा फार छंद होता. अजूनही आहे हं! पण खरं सांगू? कवितेचा छंद मला तिच्यामुळे जडला होता. रोज तिला कॉलेजमध्ये एक कविता ऐकवायचो. त्यात च्यामारी गोंधळ असा व्हायचा की, कविता मी तिच्यासाठी म्हणायचो आणि प्रेमात दुसरीच पडायची राव. तिची मैत्रीण कविता ऐकताना म्हणाली अरे तू काय सॉलिड कविता लिहितोस मी तर तुझ्या प्रेमातच पडले. हे ऐकून माझी ही तर संतापाने लाल झाली. म्हटली तो फक्त माझ्यासाठी कविता म्हणतो तुझ्यासाठी नाही. मी एकदा ठरवलं की, आपण तिला कवितेतून प्रपोज करायचं. मनात भिती पण होती की नकार दिला तर तो मी पचवू पण शकतो पण मैत्री तुटायची भीती मनात होती. दुसरा दिवस उगवला. आलो मी कॉलेजमध्ये जसं टवटवीत फुल उमलतं तसं तिचं रुप फुलासारखं फुललं होतं.
‌ रोज सारखं गेलो तिच्याजवळ पण मनात खूप धास्ती होती. मी कसा तिला प्रपोज करु? ती नाही म्हटली तर? पण माझ्या मित्रांनी धीर दिला. जा वेड्या बोल तिला आम्ही आहोत ना! मी गेलो तिने माझ्याकडे पाहिलं न् म्हटली या कवी आज कोणती नवी कविता ऐकवणार? मी सुन्न झालो शब्द अफाट होते मनात पण ते आता कवितेत कसे गुंफणार हा विचार सतावत होता. अखेर गेलो तिच्याजवळ जे मनातले भाव होते ते कवितेतून गुंफले.

काय सांगू माझी अवस्था
पाहताच तुला वेडावलो मी
नयन पाणीदार तुझे
त्या नयनात बुडालो मी...//

होशील का माझ्या तू
आयुष्याची राणी
नाही येऊ देणार सये
कधी डोळ्यात पाणी...//

‌ या ओळी ऐकताच अगदी मन तिचं सुन्न झालं. एकदम ती शांत झाली. पाच मिनिटं तरी काहीच बोलली नाही. मला वाटलं संपलं सगळंच संपली आपली मैत्री ही. पण चक्क तसं काही झालं नाही. तिच्या डोळ्यांत अश्रू धारा वाहू लागल्या पण हो त्या विरहाच्या नाही हं आनंदाश्रु होते. मला ती म्हटली वेड्या मी आतुरले होते रे हे शब्द ऐकण्यासाठी. तुझी पहिली कविता ऐकली तेव्हा तुझ्या प्रेमात पडले होते. आज मला तू असा काव्यमय प्रपोज करशील कधी वाटलंच नव्हतं. आता विश्वास बसला की तू फक्त आणि फक्त माझा आहेस आणि मी तुझी...


वेड प्रेमाचं जडलं
श्वासात माझ्या रूजलं
प्रेम तिचं माझ्या मनात
अजूनही मी आहे जपलं...//


-अनिकेत मशिदकर


इतर रसदार पर्याय