प्रेमाच्या आणाभाका - हरवलेलं पत्र Kajal Barate द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमाच्या आणाभाका - हरवलेलं पत्र

प्रिय (गत) सख्या,

पत्र लिहिण्यास कारण की,

खरे तर तुझ्याशी बऱ्याच गोष्टी मी समोर बोलण्याऐवजी पत्रांमधूनच बोलले आहे. फार आवड मला पत्रांमधून लिहिण्याची... माझ्या भावना मी तुला नेहमी पत्रांमधूनच मांडल्या. तुला आठवते का? आपल्यात भांडण झाले की मी तुला अगदी ४-५ पानांची पत्रे लिहायचे. तुला ही ते आवडायचे... घरच्यांपासून लपून रात्रभर जागून ती लिहिलेली पत्रे तुला द्यायला माझा जीव फार उत्सुक असायचा. पण हे पत्र मात्र तुझ्यापर्यंत पोहचेल की नाही माहित नाही... मी कधी तुला हे पत्र देईल की नाही ते पण मला माहित नाही... आपल्या प्रेमाच्या प्रवासात आपली गाडी डळमळली ती जेव्हा तुझ्या पाकिटात कुण्या दुसरीचेच पत्र पाहिले... कधी आवड असलेल्या ह्या पत्राची मला त्या वेळेला फार घृणा आली. इतका त्रास एखाद्या पत्राचा मला कधीच झाला नव्हता. खर तर तो त्रास त्या पत्राचा नव्हताच... तू कधी माझी पत्रे नाही पण तिचे ते एक प्रेमपत्र तू जपून ठेवेले होते. माझे असे मानणे आहे की ह्या जगात देवाने प्रेम आणि क्षमा ह्याशिवाय कोणतीच दुसऱ्या सुंदर गोष्टी बनवल्या नाहीत... माझा प्रेमावर खूप विश्वास...प्रेमात खूप ताकत... प्रेम माणसाला सगळे काही शिकवते... प्रेम, लोभ, हेवा, राग, मत्सर, बदला, अगदी सर्व काही... तेव्हा लक्षात आले की तुझ्या मनात भावना कुण्या दुसऱ्यासाठीच आहेत. त्या पत्राचा अव्हेर मी अगदी ते पत्र तुझ्यासमोर फाडून केला. तू पण तो शांतपणे सहन केलास. का वागलास पण तू असा? तुला मी आयुष्यात नको असताना एवढी स्वप्न रंगविली आणि क्षणार्धात “विसरून जा” असे म्हणालास. खूप परिश्रमांनंतर मी ह्या गोष्टींपासून दूर आले.

मग अचानक तुझा एकदा फोन आला की तुला आता जाणवतंय की ती मीच होते जी तुझ्यावर खूप प्रेम करायचे. तेव्हा तुला वाटले की आता आपण एकत्र यावे. त्यावेळी मला जाणवले की, अरे, हे तेच तर आहे जे आपल्याला हवे होते... आपले प्रेम आपल्या जवळ यावे. आणि आज ते आलंय. त्यावेळी मी खूप खूष झाले पण क्षणार्धातच मला जाणवले की मी आतून खूष नाहीये. माझ्या मनाने तुझ्याशिवाय जगणे शिकले होते... खरच ह्या जगात अशक्य असे काही नाही. आणि ते प्रेमाबाबत घडले ह्याचे मला खूप आश्चर्य वाटले. हे सगळे हवे असताना देखील आणि आपले प्रेम आपल्याकडे येत असून आपण नाकारतोय? हेच का आपले त्याच्यावरील जीवापाड प्रेम? खूप अपराधीपणासारखे वाटले म्हणून पुन्हा संधी दिली मी तुझ्या आणि माझ्या प्रेमाला... पण तरी तू मात्र मला तेव्हा सुद्धा गृहीतच धरत आलास. मी पण जणू तू कधी चूक करतोयस आणि मी हे सगळे सोडतीये ह्याची वाट पाहू लागले... मला तेव्हाही जणू तू माझा आहेस का नक्की? असेच वाटायला लागले... म्हणून मी सगळे संपविण्याचा निर्णय तुला स्पष्ट समोर सांगितला. मुद्दाम पत्रातून नाही कळवला... तू सुद्धा थक्क झालास ह्या दोन्ही गोष्टींने... पण त्यानंतर मनाची खूप चलबिचल सुरु झाली. सतत तुझी आठवण, आपल्या आधीच्या आठवणी डोळ्यांसमोर यायला लागल्या. वाटले की आपण काय करतोय? प्रेम काही खेळ नाही. समोरचे जाऊ दे पण आपण ह्याच्या जीवाशी खेळतोय का? म्हणून मी तुझ्याकडे परत आले. तू सुद्धा“अटी” घालून मला स्विकारलेस. पण परत तेच... पालथ्या घड्यावर पाणी... तेव्हा मला जाणवले की प्रेम आणि सवय ह्यात फरक आहे. जो तुला नाही कळला. आणि त्या दिवशी मात्र मी डोळे उघडून तुझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तुला धक्का बसला. तू खूप विनवण्या केल्या. कधी नव्हे ते नेमके आता तू हवे तसे वागायला लागला. पण म्हणतात ना.., “प्रेम संपले की काळजी संपते आणि विश्वास संपला की आशा संपते.” तशीच माझी ह्या प्रेमासाठीची आशा कायमची संपली.

तुला आज एवढेच सांगावेसे वाटते की, खूप जीवापाड प्रेम करते मी तुझ्यावर आणि मरेपर्यंत करेन. आयुष्यातल्या खूप गोष्टी, कविता तुझ्यासाठी केल्यात. खूप पत्रे फक्त तुझ्यासाठी लिहिली. पण प्रेम आणि सवय ह्यातला फरक जाणता आला पाहिजे. कोणा एकावर कधीच हा प्रवास सफल होऊ शकत नाही. तुला आज खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार झाला असेल ही... खरे तर चुकीच्या वेळेला तो बरोबर झालाच म्हणा... मला जाणवला तो... पण वेळ निघून गेली. तू कधीच वेळेला महत्त्व दिले नाहीस. तुझ्यापासून दुरावल्याचे मला फार वाईट वाटतंय. मला माफ कर. माझ्या मनातील तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही हे लक्षात ठेव. आता मी घरच्यांना वचन देऊन खूप पुढे आलीये. इथून मी मागे नाही वळू शकत पण आठवणींचे डाग नेहमी माझ्या मनावर राहतील.

आज ह्या सगळ्या यातना लिहून तुला एवढेच सांगू इच्छिते की, मला समजून घे आणि काळजी घे. शेवटी एवढेच म्हणेन की,

प्रेम वेड्या प्रेमाला प्रेम कधी कळालेच नाही

प्रेम वेड्या प्रेमाला प्रेम कधी कळालेच नाही

सवयीला प्रेम समजून प्रेम कधी गमावले,

हे मला कळालेच नाही...