घुंगरु Ashwini Kasar द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

घुंगरु

जिथे जाणं सभ्य लोकांचं लक्षण नाही असं फक्त बोललं जातं तिथे तो नेहमीच यायचा. त्यानं तिला एकदा बाहेरच्या पडवीत मस्ती करताना बघितलं. त्यानंतर कधी इतरांबरोबर नाचण्याची तालीम करतांना, त्यात तिच्या पायांतील स्वछंद बागडणारे घुंगरु, तिचं खळखळून हसणं, कधी उगाच नखरा करत बघणं, मुक्या प्राण्यांना जीव लावणं.... हे सारं बघुन त्याच्या मनात घर केलेली ती आज निशब्द होती.
बिछान्यावर पहुडलेल्या गुडघ्यातुन दुडलेल्या तिच्या गोऱ्या पायात घुंगरू अधिकच सुंदर दिसत होते. कमरेपासुनवरील शरीर तिनं जवळच असलेल्या उशीच्या ढिगार्‍यावर लोटुन दिलेलं , चेहर्‍यावर नेहमीपेक्षा जास्त तेज होते , डोळे बंद असले तरी ते कसला तरी विचार करत आहेत हे स्पष्ट जाणवत होते, तिच्या केसांची बट गालावरुन ओठांकडे झोके घेत होती, तिची मादकता डोळ्यांनी टिपत असताना अचानक त्याला जाणवले की आपण काहीतरी चुकिचं करत आहे . तो गडबडला आणि मागे फिरला तसा दरवाजावर धडकला. ती दचकून उठली त्याला बघताच थबकली पण हिम्मत करून म्हणाली, क्या हुवा साब, डर गये क्या..
नाही म्हणत तो तिच्याकडे वळून जवळ येऊन बसला.
तिचे ते पाणीदार डोळे जणू त्याचीच प्रतिक्षा करत होते. त्या दोघांची चलबिचल सुरू झाली होती , त्याने तिच्या पायातील नजरबंद घुंगरांकडे बघितले जणू ते केविलवाणे होऊन सांगता आहे की आम्ही सुखात आहोत इथे , तु काळजी नको करू..
त्याचा हात नकळत त्या घुंगरांकडे वळाला , त्यांना स्पर्श होताच तिने पटकन पाय मागे घेतले अन् सावरुन बसली.त्याला तिच्या मनाची चलबिचल अधिकच जाणवु लागली. येव्हाना तिला या सगळ्यांची सवय झाली असावी पण त्याच्यापुढे ती अस्वस्थ का होत होती, कारण तिलाही कदाचित तो आवडत असावा , म्हणुनच त्याच्याशी तिला काय बोलावं हेही सुचेना...
त्याचं नेहमीचं तिला चोरुन लपुन बघणं, तर कधी तिच्या नजरेला नजर देत न्याहाळणं आणि त्यातील खरेपणा तिने केव्हाच ओळखला होता.
तिच्या घायाळ नजरेनं त्याच्या हृदयाची धडधड अधिकच जाणवु लागली तरी हिम्मत करून बोलु लागला, हे बघ मेघना,माझ्याविषयी गैरसमज नको ठेऊ पण मी खरचं विचारतोय , तु किती दिवस अशी घुसमटत जगणार आहे , मला नाही बघवत तुझ्या डोळ्यातुन अलिप्तपणे वाहणार्‍या धारा, काळजी नको करुस मी तुला हात पण लावणार नाही, तु आज तुझं मन मोकळं कर, खळखळुन हस, बिन्धास्त जग , मी आहे तुझ्यासोबत.
तिला आश्चर्य वाटले पण तेवढीच सुखावली ..
हळुहळु दोघांच्या गप्पा सुरु झाल्या, आता ती रमायला लागली होती, विसरुन गेली तिच्या आजुबाजुचं जग तिला एवढंच कळत होतं की इथे फक्त हेच जग आहे ,,फक्त तो आणि ती,,,,, हा अनुभव तिच्यासाठी खुप वेगळा होता , आजपर्यंतची तिची जग विसरण्याची व्याख्याच बदलली होती .. आज खर्‍या अर्थाने ती खुश होती.. न राहवुन त्याने तिला विचारले, "लग्न करशील माझ्याशी...."
क्षणभर शांतता..... ती अडखळली.. तिला माहिती होते की आपल्यासारख्यांशी कोणीच लग्न करायचा विचारही करत नाही.. मग हे असं अचानक?....
हिम्मत करुन ती बोलली, " साब क्यो अपनी जिंदगी बरबाद कर रहे हो, माझ्यासारखीला साथीदार बनाकर..आपके घरवाले और ये जमाना नही मानेगा,, मुझ जैसी वैश्या का यही ठिकाना है"
"जमाना आणि घरचे ह्यांचं मी बघुन घेईन तु तयार आहेस का ते सांग..." त्याने असं म्हणताच ती नकळत त्याच्या मिठीत शिरली......
आता त्या दोघांच्या लपुन छपुन गाठीभेटी होवु लागल्या .. एक दिवस त्याच्या घरच्यांनी बघितले ,,घरचे वातावरण तापलेले पण त्याने शांततेत एकच उत्तर दिले , मी तिच्याशीच लग्न करेन ....
काही समजत नसले की असे परिवार एकाच गोष्टीचा आधार घेतात तो म्हणजे जवळचा, विश्वासु वाटणारा असा -ज्योतिष....
पण तो ज्योतिषिही तिच्या मादकतेचा भुकेला...
त्याला माहिती होते की मी यांना काही सांगितले तरी हे मान्य करतील.
मग त्याने एक युक्ती काढली ....या निमित्ताने मेघनाला रोज भेटता येईल म्हणुन ...
"अतिउत्तम ,,,खुप सुंदर योग आहे तुमच्या मुलाचा ,अहो हीच कन्या असावी याच्या आयुष्यात अन् आपल्या नशीबात... ह्याचं लग्न एका वैश्येशी झालं तर तुमचं सगळ्यांचं नशिबच उघडलं समजा...करोडपती व्हाल करोडपती...
पैशांची भुकेली त्या माणसांना खुप आनंद झाला
लपुन छपुन लग्नाची तयारी सुरु झाली...
काही दिवसांत लग्नही झाले, ,,ते दोघेही खुप खुश होते...खुप छान संसार सुरु झाला...
अधुन मधुन ज्योतिषापासुन ते आजुबाजुचे कोणी न कोणी सारखे त्यांच्या संसारात व्यतय आणत ,पण ते दोघेही खंबीर उभे होते...
लग्नाला वर्ष झालं ...योगायोगाने ज्योतिषाच्या म्हणण्याप्रमाणे घराची आर्थिक स्थितीही बदलली होती...सगळे वरवर का होईना खुश होते...
घरात कुणी नविन पाहुणा येणार याची चाहुल लागली... दोघांची आनंद गगनात मावेना ....
पण बाकीच्यांच्या कुजबुज सुरु झाल्या, कशावरुन हे बाळ याचचं आहे ...जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही....आम्हाला हे नाही मान्य, कुणाचं पाप तुम्ही घरी आणत आहात त्यामुळे घरचेही वैतागले...तिला काहिही बोलु लागले ,त्याचीही चिडचिड होवु लागली...
मग काय पुन्हा घरच्यांनी मार्ग धरला तो ज्योतिषाचा...
घरी आलेला ज्योतिषी संधीसाधु, मला एकट्याला मेघनाशी बोलायचं आहे असा प्रस्ताव मांडला....
प्रस्ताव थोडा विचिञ असला तरी त्यांच्यावर असलेल्या विश्वासाने,श्रद्धेने तो मान्य केला गेला .... तिला नव्हते जायचे पण घरच्यांसाठी ,त्याच्यासाठी मान्य करावा लागला ,,,
त्याचं बोलणं कोणीच ऐकु शकणार नाही या हिशोबाने त्यांना बंदिस्त खोलीत पाठवण्यात आले...
तिथे गेल्यावर तो त्याच्या मुळ चारिञ्यावर आला, तिला ञास द्यायला सुरवात केली ..
"मला माहित आहे की हे तुमचंच बाळ आहे मी बाहेर काहिही बोललो तरी सगळे मान्य करतील हे तुलाही माहिती आहे...
मी या बाळाला जगात आणु शकतो पण एका अटीवर ...(अगदीच जवळ जाऊन)तु तुझा एक संपुर्ण दिवस माझ्या नावे करशील तर....."
तिची तळपायाची आग मस्तकात गेली जवळच असलेल्या लोखंडी सळीने त्याला सपासप मारण्यास सुरवात केली... "फिरसे माझ्या परिवारावर अन् माझ्या बाळावर नजर टाकलीस ना तर देख ले...."
जीवाच्या आकांताने त्याने तिथुन पळ काढला...
घरच्यांना बघितल्यावर स्तब्ध झाला व घाईघाईत बोलुन पळुन गेला....नाही नाही नाही काही चुकीचं नाही हे बाळ यांचच आहे...पण बाकी मी ज्योतिष बघुन उद्या कळवतो....
घरात शांतता होती...
दुसर्‍या दिवशी ज्योतिषाचा फोन ....जर मुलगा असेल तर घरी सोन्याचा पाऊस पडेल पण जर मुलगी असेल तर सगळं घर बरबाद होईल...
सगळ्यांना खुप चिंता होऊ लागली पण जर मुलगा झाला तर....अशा समजुतीनं तिची काळजी घेणं सुरु झाले...
ही खोटी काळजी तिला समजत होती,पण बाळासाठी मनाची समजुत घालत होती....
सगळ्यांच्या प्रतिक्षेचा दिवस उजाडला ... मेघनाला प्रसव कळा सुरु झाल्या....पण दवाखान्यात नेण्याऐवजी घरीच आया बोलवण्यात आल्या....
सगळे देवाजवळ मुलासाठी प्रार्थना करु लागले....
बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि मेघना बेशुद्ध झाली.. घरचे पळतच आले... बाळाला आनंदाने हातात घेणार तोच जाणले की मुलगी आहे....मग तिचा स्पर्शही नकोसा झाला...
त्याने बाळाला अलगद उचलले बाप झाल्याचे आनंदाश्रु वाहु लागले....पण घरच्यांनी त्याला खुप दुशने लावली,बरोबरच ज्योतिषाच्या सल्ल्याची आठवण दिली... ...
त्याने खुप समजावले पण घरचे मानायलाच तयार नव्हते...
आणि तोही जिद्दीला पेटलेला बघुन त्यांनी योजना आखली,,, जर बाळ जिवंत हवे असेल तर मेघनाला मरावं लागेल....
त्याच्या काळजात धस्स झाले....
अनेक प्रयत्न करुनही तो असफल राहिला...
काही तासांनी मेघनाला शुद्ध आली त्याला समोर बघुन खुश होती ...ती उठली अन् त्याला बिलगली ... पुढच्याच क्षणी बाळाची चौकशी करु लागली...तो काहीच बोलेना ..... तिला सगळे समजले,
तिने त्याला खुप मारले ,क्यु...क्यु केलस असं...माझा एकदाही विचार नाही केलास , हिम्मत ही कैसे हुई स्वत:च्या बच्चीला नराधमाच्या हवाली करायची...
ती राञभर मोठमोठ्याने रडली....
खुप विचार केला...कधी मरणाचाही विचार डोकावला...
पहाटे जागेवरुन उठली ...उटणे लावुन स्वच्छ अंघोळ केली ,देवपुजा केली, सगळ्यांना सवयीप्रमाणे प्रेमाने उठवले,, कुणालाच कुठलेच काम करु देईना ,स्वयंपाकाला लागली... जणु काही झालेच नाही..
सगळ्यांना कळेना की अचानक काय झाले..
थोडावेळाने ज्योतिषिही दारात, कारण विचारल्यावर सांगितले की मेघनाने बोलवले आहे....काही असो पण तिचा हा स्वभाव थोडा सुखावणारा ,आदर्श सुन ,आदर्श पत्नी सारखा वाटला...सगळे खुप खुश होते थोडावेळाने मेघना बाहेर आली... तिचं आजचं रुप अप्रतिम होतं...कोणाचीच नजर तिच्यावरुन हटत नव्हती...
तिने सगळ्यांना पानं लावली. सासु -सासरे, ननंद , दीर , नवरा आणि ज्योतिषी प्रत्येकाला प्रेमाने जेवायला वाढले....
सगळे आनंदाने खात होते ,ज्योतिषी मधुन मधुन तिला न्याहाळत होता आणि तिही त्याला भाव देत होती ...एक पाच मिनीटात सगळ्यांना जळजळ सुरु झाली ....क्षणात तोंडातुन फेस यायला सुरवात झाली... ती मोठमोठ्याने हसु लागली ....
तिने आपले घुंगरु परत पायात चढवले...
"आज समझेगा सबको की एक आई काय करु शकते... ए ज्योतिष तुच बोला था नं मेरी बेटी बरबादी लायेगी ....देखलो सबकी बरबादी......."
आणि मोठमोठ्याने हसत ती चालु लागली....आपल्या पहिल्या दुनियेकडे.... जिथे तिच्या आयुष्यात फक्त ती आणि तिचे घुंगरु होते.....