Savitrichi gost books and stories free download online pdf in Marathi

सावित्रीची गोष्ट

#सावीत्री_ची_गोष्ट....



मिलीटरी हॉस्पिटलमधे सद्ध्या पेशंट्सचा पूर आलेला… व्हायरलची साथ होती…

आज पुन्हा नाईट ड्युटी आहे हे कळल्यावर जरा वैतागच आला तिला...

मुलींचे पडलेले चेहरे आठवले...

आज सकाळीही ड्युटी आणि रात्री पुन्हा!... म्हणजे जेमतेम ४-५ तास मुलींबरोबर घालवायला मिळणार...

घरी जाता जाता तिने त्याला फोन लावला... तो कामात होता... पण त्यातून ती वैतागल्यावर नेहमीसारखं चिडवलं मात्र... “ काय मग आज नवरा गस्तीवर... मुली घरी... तू हॉस्पिटलमध्ये... आज रात्री कुठली मुव्ही बघणारेस मोबाईल वर!... मजा आहे बाबा... ए.सी. त ड्युटी देणारे ऑफिसर तुम्ही!.. आमच्या नशिबी गोळ्यांचे आवाज!!”... ती चिडली तसा खळखळून हसला... पण आज बाकी बोलणं झालंच नाही....

ती घरी आली... जेवली.. जरा आडवी झाली...

शेजारी मुलींचा चिवचिवाट चालूच होता!...

कोणती तरी नवीन क्राफ्ट शिकलेली... बनवून बघणं चालू होत...

ती कौतुकानी बघत होती...

किती शहाण्यासारख्या आणि मिळून-मिसळून राहतात दोघी!...

कधीच कसली तक्रार नाही!...

हे आर्मी चं फिरतीच आयुष्य... त्यातून तिचा पेशा डॉक्टर चा!.. ड्युटी च्या वेळा वेगवेगळ्या... कधी कधी रात्री-अपरात्री इमरजन्सी आली कि यांना तसच सोडून जावं लागायचं... पण अश्याच शिकताएत त्या... मोठ्या होताएत !... नवरा आणि ती जेमतेम २ वेळा एकत्र पोस्टेड होते... नाही तर कायम दोघं दोन टोकाला...

तरी नशीब या वेळी नवऱ्याच्या पोस्टिंग ची जागा इथून तशी जवळ आहे...

नाही तर महिनोंमहिने भेटही होत नाही!....

आणि तरीही ना भेटीची ओढ कमी होते... ना परत जातानाची हुरहूर...

“ so... that’s life!!”... ती स्वतःशी च बोलली....

आज रात्रीही ड्युटी आहे हे आईकून खरंच पोरी जरा वैतागल्या... पण आता सवय झालेली त्यांनाही....

ती तिचं आवरून ... मुलींना नेहमीच्या सूचना देऊन घर बाहेरून लॉक करून निघाली...

डोक्यात विचारांचं चक्र चालूच होतं...

आपल्या मुली ही आपली जबाबदारी ... दोघांचही मत ... त्यातून दोघं आर्मी ऑफिसर ... त्यामुळे बाकी गोष्टीही स्पष्ट होत्या... घरून कोणी सोबतीला येऊन राहायचा प्रश्न च नव्हता... आता थोरली १० वर्षांची आणि धाकटी ८ वर्षांची झालेली... एकमेकींच्या सोबतीने राहू शकत होत्या...

पेपर मधल्या बातम्या वाचून insecure वगैरे होण्याची चैन परवडणारी नव्हती!...

फक्त सध्या तिचं पोस्टिंग बोर्डर च्या जवळ आणि तो तर अगदी LOC जवळ!...

त्यातून आज काल रोजच कुठे ना कुठे छोटे-मोठे हमले होताएत... ती पण खूप बिझी झालेली... त्यातून मुलींच्या शाळांना सुट्ट्या !... कंटाळून जात होत्या त्या पण!...

रात्री फोन आला कि त्याला विचारून त्याच्याकडे पाठवूया मुलींना थोडे दिवस... मग मी थोडी रजा काढीन.. माझी झाली कि तो!... शाळा सुरु होईपर्यंत असंच काहीतरी कराव लागणार होत....

ती मिलिटरी हॉस्पिटल मध्ये पोचली...

पहिला राउंड घेतला..

आज काम जरा कमी होत!..

ती थोडी विसावली... घरी फोन लावला... मुली अजून जाग्या होत्या...

त्यांना थोडं रागावून तिनी झोपायला सांगितलं... दुसर्या दिवशीसाठी काहीतरी आमिष दाखवलं...

आणि फोन ठेवला...

................. १० मिनिटंच झाली असतील.. तेवढ्यात आर्मी लाईन वाजला... इमरजन्सी होती...

तिघंजण होते... १० मिनिटात पोचणार होते... एकाच्या पायाला गोळी घासून गेलेली... एकाच्या हातात ग्रेनेड चा तुकडा गेलेला.... आणि एकाच्या खांद्याला गोळी लागलेली...

तिनी पटापट हालचाली केल्या..

स्टाफ ला सूचना केल्या..

आणखी डॉक्टर्स ना निरोप पाठवले...

तोपर्यंत गाड्या पोचलेल्या होत्या..

ती तयारीतच होती...

पहिल्याच पेशंटला समोर बघितलं..... आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली!!!!............

तो... तोच.... सकाळीच फोन झालेला... त्याचं हसणं अजून मनात होत!... इमरजन्सी आली नसती तर आत्ता फोन वर बोलत असती त्याच्याशी!....

तिनी नकळत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला... तो शुद्धीत नव्हताच!... तिला उगीच वाटलं... त्याचे ओठ हलले का?....

......... चेहऱ्यावर लागल्याच्या खुणा... खांद्याला एक गोळी लागलेली... एक मानेजावळून घासून गेलेली... बरंच रक्त जात होत... ताबडतोब ऑपरेशन करावंच लागणार होत!.... कंडीशन क्रिटीकल होती!...

शेजारी उभा राहून नर्सिंग असिस्टंट पटापट डिटेल्स देत होता....

नशीब!... सगळे व्हायटलस काम करत होते...

एकीकडे तिच्यातली डॉक्टर जागी असताना... मन मात्र जड झालेलं....

मुली आठवल्या... का कुणास ठाऊक ...तिनी घरी फोन केला... उचलला नाही... म्हणजे मुली झोपल्या होत्या...

त्यांचे निरागस चेहरे आठवून तिच्या गळ्यात एकदम कढ दाटून आला....

ती खाली बसली... असहाय्य ... रडत....

कुणीतरी हलकेच पाठीवर हात ठेवला...

तिनी वर पाहिलं...

तिचीच सहकारी डॉक्टर... मगाशी पाठवलेल्या निरोपावरून आली होती...

हातात कॉफीचा कप होता...

तिनी यांत्रिकपणे कप हातात घेतला... नेहमीची सवय... कोणत्याही अवघड प्रोसिजर आधी अशीच कॉफी लागायची तिला!!...

मैत्रिणीच्या खांद्यावर डोकं ठेऊन ५ मिनिटं मनसोक्त रडली...

“are you sure... you want to go ahead and do the surgery yourself???.... please think again.... this one seems to be critical...!!”

.... आता मात्र ती पूर्ण भानावर आली... मनात विचार केला... “ खरंच मलाच करावं लागेल का?... नाही जमणार!... पण मग मी नाही तर आणखी कोण करणार?...दुसऱ्यागावातल्या ... दुसऱ्या हॉस्पिटल मधले ... दुसरे सर्जन येईपर्यंत वाट पाहणं ... खूप मोठी रिस्क आहे!... मला हे करावं लागेल... करावंच लागेल!....”

“yes.... I am sure... Please get the preparations done… I will be there in 10 minutes!” ती म्हणाली..

आता मेंदू मधल्या लॉजिक नी पूर्ण ताबा घेतला..

तिनी तिच्या सासरी आणि माहेरी मेसेज करुन कोणाला तरी काही दिवसांसाठी बोलावून घेतलं...

“कदाचित सकाळी यायला उशीर होईल” असा मुलींना मेसेज करून ठेवला...

मन घट्ट करून ती उठली....

पूर्ण तयारीनि ऑपरेशन थेटर मध्ये गेली....

आता ती कोणी “बायको” नव्हती... कोणी “आई” नव्हती...

आणि तिच्या समोरच्या पेशंटचे प्राण तिला वाचवायचे होते!!!...

कोणत्याही परिस्थितीत!!....

कमावलेलं सगळं कसब पणाला लाऊन ती पुढचे काही तास लढत होती...

झुंजत होती... त्याच्या साठी!....

तिनी प्रयत्न केले... तिच्या परीनी... आता त्याला शुद्ध येईपर्यंत चा वेळ मात्र खूप महत्वाचा होता...

बाहेर उजाडलेलं... मनात अखंड देवाचा धावा... एकीकडे त्याच्या प्रत्येक बाबीवर.. बदलावर नजर ठेवणं चालू होत!....

तिच्या ड्युटी ची वेळ संपलेली... आता घरी मुलींजवळही जायला हवं होत... त्या अजूनही घरात कुलुपात होत्या!...

जाण्याआधी तिने पुन्हा त्याच्या केसांमधून हात फिरवला...

डोळ्यातून पाणी आलं...

आणि यावेळी खरंच.... त्याचे ओठ हलले!...

ती बोलावत राहिली त्याला... त्याचं नाव घेऊन... ते त्याच्या मेंदूपर्यंत पोचत होत... पण ....

अखेर यश आलं...

त्यानी डोळे किलकिले करुन पाहिलं तिच्याकडे!...

हसला... आणि हाताचा अंगठा वर करून सांगायचा प्रयत्न केला... all ok!...

आता मात्र ती ओक्साबोक्शी रडत होती... त्याचा हात हातात धरून....

आता मात्र ती फक्त आणि फक्त त्याची होती...

ती जिंकली होती!..

सावित्री जिंकली असेल... तशीच!!!

©-आदिती भिडे.

आपल्या संस्कारानुसार प्रत्येक लग्न झालेल्या मुलीसाठी तिचं घर.. तिचा संसार आणि तिचं सौभाग्य अर्थात तिचा नवरा... या गोष्टी म्हणजे तिचं जग... तिचं सर्वस्व बनून जातं... माझ्यामते “वटसावित्रीची कथा” म्हणजे अश्या प्रत्येक स्त्रीचं प्रतिक आहे.. जी आपल्या सर्वस्वाला ... जगाला जपण्यासाठी कोणतीही हद्द पार करू शकते.. प्रत्येक स्त्री मध्ये ती शक्ती असते!... आणि सावित्री ची गोष्ट आपल्याला त्याचीच आठवण करुन देते!!

इतर रसदार पर्याय