शेतकरी माझा भोळा - 12 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेतकरी माझा भोळा - 12

१२) शेतकरी माझा भोळा!
मे म्हैयना सुरु व्हता. मे म्हैन्याची आनी ऊन्हाची मैतरी लै दाट. दोघबी येकमेकायचे जीवापाड मैतर! दोघायचं पिरेम आस्स ऊतू जात्ये की सम्द जग त्येंच्या पिरेमाचे चटके सोसत्ये पर त्येंची त्या दोघायलाबी जाण नसत्ये, त्ये आपल्याच नशेत दंग ऱ्हात्यात, सम्द ईसरुन येकमेकाला भरभरुन पिरेम देत्यात.
सीतापूरात वैशाकाच्या ऊन्हाचा कोलाहल माजला व्हता. समद्यांना त्राहीत्राही करुन सोडले व्हते. फाटे नौ वाजल्यापासून बाहीर त्वांड काढायची सोय न्हवती. घरामंदी बसले तरी ऊकडल्यावाणी व्हायचं. आंगाचं नुस्त पाणी-पाणी व्हयाच. पाडवा झाला. नव साल सुरु झालं. मालकायनं गडी बदलले. मालकात आन गड्यायमंदी पुना नया सालचा का करार झाला अन् सम्दे जोमानं कामाला लागले..
शेतामंदी नांगरणीचं काम सुरु झालं आन् यस्वदा गणपतला म्हन्ली, "अव्हो, आपूण बी नांगरुन घेवावं."
"कहाला?"
"कहाला म्हंजी? वावरात हायब्रीड पेरली तर सालभराच्या रोटीची निचिंती व्हईल."
"न्हाई, यस्वदे न्हाई. ती जिमीन आपल्याला धारजिन न्हाईच तव्हा..."
"अहो, आस्सं म्हून कसं चालल? ती आपली धरणीमाय हाय. कव्हा भरभरुन दील येचा नेम न्हाई."
"धरणीमाय हाय पर सावत्तर हाय. आत्तापस्तोर तिनं कित्तींदा दगा देला त्ये ईसरली व्हय?"
"मंग काय जिमीनच पडीक ठिवायची व्हय. उद्या मला बी घराबाहीर काढसाल."
"यस्वदे..."
"वरडू नगा. या व्यक्ती म्या बी वांझोटी हाय न्हवं? तुमच्या वंसाचा दिया म्या..."
"कहाच कहाला बी लावू नगस. दोन पोऱ्हं देलती ना तुवा.."
"तसच त्या जिमिनीनबी ऊस आन् केळी का कमी देलत्या पर तेव्हढा पैकाच आपल्या तकदिरीत लिवलेला नसाल म्हून देवानं आपल्याला.... तकदिरीत नुस्ती हायब्रीडच आसल तर?"
आखरीला यस्वदेचं गणपतला येकावच लागलं. निवडणुकीत पडल्यापासून मातर तात्यासायेब लई नरमले व्हते. गणपतला लै चांगलं बोलत व्हते. गणपतला फाताच तात्यासोयब म्हन्ले,
"ये गणपत. काय काम काढलसा?"
"मालक, काम व्हत जरा..."
"आर, मंग बोलकी..."
"न्हाई म्हण्ल. दोन दिस बैयलं आन नांगर देसाल का?"
"आस म्हन्तोस व्हय. बर. घिवून जाय..."
"पर मालक, तुमचं काम तं आडायचं न्हाई की."
"गणपत, शेतक-यांचं आन् बैलाच काम कधी संपते का? तुह काम आटीप. दुसऱ्या पाच-सात बैलायच्या जोडयात भागवीन मी."
दुसऱ्या दिशी फाटेपासून गणपतनं सोत्ताच रान नांग्रायला सुरूवात केली. दोपारपस्तुर चौथाई रान त्येन नांगरलं. दोपारी यस्वदा रोटी घिऊन आली. दोगं बी डाळ-रोटी खात आसताना यस्वदा म्हन्ली, "काय ऊन हाय आज."
"व्हय. उन्हाचा जोर आज लाई हाय. किती बी म्हन्ल तरी वैशाकाचा म्हैना हाय. ऊन तं पडालच. मिरगाचा दणदण पाऊस पडल्याबिगर ह्येचा जोर कमी व्हणार न्हाई."
"उद्या रान व्हईल का तैयार?"
"हां व्हईल." गणपत म्हन्ला. हात धुवून त्येनं बिडी पेटवली. दोन झुरके घेतले आन् त्यो उठला. बैलायला पाणी पाजून आणलं. त्येंच्याम्होरी कडब्याची पेंडी टाकली आन पुना बिडी फुकु लागला..
दुसऱ्या दिशी दोपारचे दोन वाजत व्हते. गणपतच्या शेतातलं काम व्हत आलं व्हत. आखरीचा येक कोपरा ऱ्हायला व्हता. गणपत आन् यस्वदा आळीपाळीनं नांगर हाकीत व्हते. त्यादिशी ऊन्हाचा मारा कमी वाटत व्हता. जरासक आबाळ बी निंघाल व्हत. ऊन्ह कमी झालं असली तरी गरमी मातर लै वाडली व्हती. दोन-चार रोजात पाऊस यील आस वातावरण अच्यानक तैयार झालं व्हतं. ऱ्हायलेलं काम बिगीबिगी आटीपत आसताना, ध्येनी मनी नसताना अच्यानक जोराचं वारं सुटलं. गणपत आन् यस्वदा नांगर बैयलाला ऊब करून लिंबाच्या झाडाखाली आले. फाता फाता वाऱ्यानं वावटळीचं रुप घेत्ल. जिकड फाव तिकडे धूळ धूळ झाली. गणपत आन् यस्वदाच्या समद्या आंगावर धूळ बसली. दोन-च्यार मिन्टात वावटळ निघून बी गेली. ऱ्हायलेलं काम बिगीनं करुन बैयल नेवून सोडायचे व्हते. बिडी पेटवून गणपत म्हन्ला, "यस्वदे..."
"काय जी?"
"औंदा बरसात बिगीनं येतीया का?"
"व्हय. लक्षाण तर समदी तशीच दिसत्यात पर या भगवंताच्या मनात काय हाय कोन्हास ठावूक?"
"त्ये कोण फायलय. आपून आपलं काम करावं, त्येला येस देण न देणं त्येचं काम. सम्द्या गावाची वावर तैयार हाईत. बास, आता येकदा का जिमीनीची त्हान भागली आन वावरातून पाणी वाह्यल की पेरणीच करायची."
"त्ये बराबर हाय. म्या काय म्हन्ते त्ये ऐकीता का?"
"काय म्हन्तीस?"
"न्हाई. ऊगाच आक्रोस्ताळपणा करुन वरडणार आसल तं न्हाई सांगत."
"आता सांगशील का न्हाई?"
"न्हाई म्हन्ल, औंदा बरसात चांगली व्हईल आसं समदे म्हन्त्यात तव्हा आपूनबी सरकी लावली तं?"
"यस्वदे, तुला कहान झपाटलंत न्हाई. खुळे, कपाशीच्या थैयल्याचे भाव आकासाला भिडल्यात."
"व्हईल तं काही. न्हाई तरी निवडणुकीपासून तात्यासायेब लई खूश हाईत..."
"नग.... नग. कोणाम्होरं हात पसरण्यापरीस त्याच हातानं म्हेनत मंजुरी करुनशानी दो वक्ताची रोटी मिळवता यील. सिवाय थैयल्या आन्ल्या म्हंजी का झालं? कपाशीच येगळं हाय. खत, औसदी..."
"व्हईल व्हो. सम्द व्हईल. तुमी आंदीच नन्नाचा फाडा वाचू नगसा बर."
"मला तर बा, तुह काही समजतच न्हाई बग. आथरुन फावून हातपाय पसरावेत. वरच्याची किरपा व्हती म्हन दोन संकटातून कसं बसं वाचलो."
"आता बी त्योच मारग दाकवील. न्हाई तं आसं करा..."
"आणिक कसं? तु बी काय डोस्क्यात घिवून बसशील याचा नेम न्हाई."
"मझा त्यो दागिना..."
"नगं... नगं ! मझ्या मायची निसाणी हाई ती. आता बाप-दाद्याची तेव्हढीच ईस्टेट ऱ्हायलीया..."
"म्या काय त्येला ईका म्हन्ते व्हो? डब्यात ठिवून का त्यो वाढणार हाय. त्यो मोडू नगा..."
"च्या मारी! थैयल्या बी आणा... डागिणा बी मोडू नगा. मंग त्या डागिन्यानं दुकानदाराची आरती करु व्हय..." पचकन थुकत गणपत म्हणाला.
"तसं न्हाई वो. ऐका तं खरं! त्यो डागिणा त्या सावकाराकडं गाहाण टाका. हंगामावर सोडून घेयाच्या बोलीन. अव्हो, देवाची आन या धरणीमायेची किरपा झाली ना तं सोन पिकाल सोन! मंग तस्से आणिक डागिणे बी कर्ता येतील. तुमी उद्याच सावकाराकडं जा बर."
ऊर्लेलं काम बिगी बिगी करुन दोग बी आंदार पडतानी गावात आले. यस्वदा घराकड गेली आन् गणपतनं बैयलं तात्यासायेबाच्या गोठ्यात बांदले.
गरामपंचायतीच्या हापीसातल्या टिवीवर 'आमची माती आमची मान्स' कारेकरम चालू व्हता. थकले-भागले शेतकरी, शेतमजूर घरामंदी रोट्या होजेस्तोर त्यो कारेकरम रोजच फायाचे. त्या दिशी बी लै मान्स त्यो पोरोगराम फात व्हते. गणपत बी तेथं घुटमळला.त्यो बिडी शिलगावत आसताना किसनन ईचारलं, "गणपत, आटोपलं का रं?"
"व्हय र किसानदेवा. रान तैय्यार हाय. आता त्येचीच वाट फातो. येकदा का बरसात झाली...''
"यील रे बाबा, दोन च्यार दिसात पाणी यील."
"हां, आत्ता त्येचीच येक आस हाय."
"आर बाबा, पाणी आल बी म्हणं. दोपारच्या बातम्यातबी सांगलं म्हणं... त्ये कोन्त वार... त्ये मुंबईला आलं म्हणं. कालपासून मुंबईत मुसळधार पाणी सुरु हाय."
"आँ... बंबईला पाणी आलं? झालं तर मंग ! दोन दिसातच सीतापुरची वावरं बी भिजत्याल. बरं झालं बा, पेरण्या तं व्हतीलच पर ढोरायच्या पेण्याचा पाण्याचा प्रश्न मिटालं. लै परेश्यानी व्हतीया, ढोरायची."
दुसऱ्या फाटे फाटे पाऊस सुरु झाला आन सम्द्या सीतापूरासंग गणपतच घरबी जाग झालं. येकदम थंडगार वारा घरामंदी शिरला. दोगांनीबी येकदुसऱ्याकडं फायलं. दोगांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान दिसत व्हता आन थोडी भोत आशाबी व्हती. यस्वदा म्हन्ली,
"तुमी आता बेगीनं आवरा. पैकाची काय तरी येवस्था करा. कापसाच्या बियाणाचं काय तर फा..."
"यस्वदे, कपाशीची काय तरी गरज हाय व्हय?"
"हे फा. आता ऊगाच मोडशा घालू नगा, आपीस लावू नगा. कव्हा तरी म्हन्ल्यावरुबर हो भरत ऱ्हावा."
"पण..."
"पण बीण काय न्हाय. त्या सावकाराकडं जावून डागिणा ठिवून पैका घिवून या..."
"सावकाराकडं? आगं, त्याच्याकडे गेलं की झालं..."
"कावून?"
"आग गावात येकच घर हाय, जस उंद्रायच्या कळपात मांजर ! ह्यो सावकारबी गावाला खेळवून खेळवून खायाला हाय. त्येच्या जाळ्यात का येकदा फसलं ना तर मंग जिंदगानीभर त्येतच गरगरत ऱ्हावावं लागत्ये."
"अव्हो, गरगरत ऱ्हायला का आपून च्यार-पाच लाक रुपैयाचं रीन घिणार? च्यार- पाच हजार रुपै घेयाचे आन् कपाशीचा पैका आल्याबरोबर दिवून टाकू की."
गणपतचे फाटेचे कारेकरम होईस्तोवर पाऊस उघडला बी. समदीकड पानीच पानी झालं व्हतं.
गावात चिकलच चिकल झाला व्हता. येसीजवळचा नाला फुल्ल भरून वाहत व्हता. त्ये फायला सम्दे जमले व्हते. पोट्टे सोट्टे साचलेल्या पाण्यात नाचत व्हते. येकमेकायच्या आंगावर पाणी उडवत व्हते. आन् पांदीत लैच पाणी साचल्यामुळं बायांना बाहीर बसायची आडचण झाली व्हती. पोऱ्हं- सोऱ्हं जाता येता तिकडेच फात व्हते.
"काय वातरट हाईत मेले..."
"बगना घुबडायच्या नदराबी हिकडच लागल्यात."
"फा तर, कुत्तरे मेले माना मोडेस्तोर हिकडच फायलेत."
"आगं, बसा गं..."
"काय आस्स उघड्यावर बसायचं ती मान्स..."
"आली तं आली. काय कर्णार हायेत आँ? त्येना दिसणार बी काय? बसा."
"काय बायांनी बी लाज सोडली रं. उघड्यावर बसल्या तं बसल्यात आन् ऊठत बी न्हाईत."
"मानसायची ये जा सुरु हाय. त्या तरी कित्ती येळ दम धरत्याल रे?"
"तरी बी आनुदानावर का व्हईना पण सरकार संडास बांदून देत्ये."
"पर त्येचा फायदा कोणाला व्हतुया?"
"म्हणजे?"
"बाबा रं, सरपंचबाई ऱ्हाती कलाकेंदरात! तिनं तेथल्या नाचणारणीच्या नावानं संडास बांदायचे म्हून रकम उचलली हाय."
"खरं हाय. उरले सुरलं बज्येट आबासायेबानं खाल्लं."
"आणिक धा-पाच संडास गावात बांदलेत पर त्येचा कोन्ही बी उपेग करत न्हाय."
"आरं, बाबा त्या टेलरनं संडाससाठी अनुदान उचलल आन् संडासच्या भांड्याच्या जागी कपडे शिवायची मशीन फिट केली. आत्ता बोल!"
"आन् त्यो परश्या काय कमी हाय त्येनं किराणा दुकान थाटलं."
"वा-रं वा, सर्कारी योजना."
गणपतजवळ येकदाणी आन् सोन्याच्या पाटल्या देत यस्वदा म्हण्ली," लौकर जावा आन् पैका घिऊन या."
"यश्वदा, या पाटल्या तं ऱ्हावू दे."
"अव्हो..."
"आता अव्हो नग आन् बिहो नग." आस्स म्हणत गणपतनं पाटल्या यस्वदाकडं देल्या आन् येकदाणी घिऊन त्यो सावकाराच्या वाड्याकडं निघंला. वाड्यात तोब्बा गरदी व्हती. दुसरा कोन्हाचा आदार नसलेले आन त्येंच्या पिढ्या न पिढ्यायला आदार देणाऱ्या सावकाराकडं लोक मावत नव्हते. दरसाली त्येच्याकड दागिने ठिवून, वावर गहाण ठिवून कामापुरता पैका कास्तकार नेयाचे. कैक शेतकरी आस्से व्हते की वरसानुवरसे त्येंचा माल तेथच पडून ऱ्हायाचा. वल्ला दुस्काळ, कोरडा दुस्काळ, नापिकी आश्या या ना त्या कारणाने वावरात काय बी पिकाचं न्हाई आन् सावकाराचं मातर साधायचं. कैकदा शेतकऱ्यायला त्येचं मुद्दल तं सोडा पर याज बी देणं व्हयाचं न्हाई. आशा आडल्या नडल्यायच्या जीवावर त्यो गब्बर व्हत व्हता.
आंदीचे लोक जाताच सावकार गणपतला म्हन्ले, "बोला, गणपतराव. "
गणपत जरासं फुडं सर्कत बोलू का नग बोलू या ईच्यारान चाचरत म्हन्ला, "मालक, औंदा सरकी लावावं म्हन्तो."
"अरे वा ! चांगला विचार हाय की."
"थैयल्या आणाय पैका देसाल या आसेनं..."
"आबाबा! गणपत लै कठीण हाय. आर, तुला ठाव हायेच की, गेलं साली कार्खान्यानं धोखा देला. पराडल्या साली 'करपा' झाला. पैका तस्साच आडकून हाय. संबराची बी वसुली न्हाई. औंदा घरातूनच पैका देवावं लागला. न्हाय देवाव तं लोक पैयला पैका लौकर देत न्हाईत. आन् ज्यांचा येवहार चखोट हाय त्यांना न्हाई म्हन्ताच येईना. तिकडे काय बी झ्याक मारुन त्येची नड भागवावीच लागते."
"मालक, आस नग म्हणूसा, म्या लई आस ठिवून आल्तो..." म्हण्ताना गणपतनं खिश्यात हात घातला. येकदानीची पुरचुंडी बाहीर काढली. तव्हर जणू सावकारनं स्वास रोकला. पुडी सोडताच जसा लक्क परकास पडला आन् सावकाराचे डोळे चमकले. ती खानदानी चमक फावून त्याच्या त्वांडाला पाणी सुटलं...
"शेटजी, ह्ये बासन हाय. मझ्या पंज्यानं पंजीसाठी केल्त. त्ये ठिवून घ्या..."
"पर गणपत..."
"आक्शी शंबर नंर्बी हाय..."
"ये खर हाय बाबा. तू का परका हायेस पर तू जरा देरी केलीस. दोन चार दिस पैले आला आसतास ना तर देले आस्ते"
"सावकार, काय बी करा पर खाली हातानं..."
"गणपत, तू कव्हा न्हाईस त्ये पैल्यांदा आला हाइस तव्हा काय तरी तजबीज कराय फायजे बगू..." आसं म्हणत गणपतच्या हातून तेकदानी घिऊन तिला उल्ट-सुल्ट करत शेट म्हन्ले,
"खरा हाय पर चोरी बिरीचा तं न्हाई ना? न्हाई तं आगावू झेगट मागं लागायचं."
"ह्ये काय भल्तच बोल्ता शेट. मह्यान चोरी व्हईल व्हो?"
"मी तुला वळखतो रे. ठीक हाय. दील येक हजार..."
"फकस्त येक हजार? न्हाई वो मालक, बासन तं फा दोन हजार तरी द्या..."
"खरच न्हाई रे. जावू दे. दिड हजार फायजेत का?"
"बघा बुवा, तुमची मर्जी..."
"दुसर येक, कपाशीचा पैईसा मिळाल्याबरुबर पैले मझे पैसे देयाचे आन् ह्यो इंगोळ घिवून जायाचा. बाबा रे, आश्या वस्तु सांभाळण लै कठिण हाय. आणिक येक चार हजार रुपै देवावं लागतील. मंजूर आसल तं ठिवतो न्हाई तर तू बग..."
"ठीक हाय. मालक, लई उपकार झाले बगा आणिक पैक्याच म्हणशाल तं पैका मिळाल्याबरुबर पैले तुमच्या बैठखीत हाजर मंग सम्दे येवहार..."
शेटजीपासून दिड हजार रुपै घिऊन गणपत घरी आला. दिसभर मस्तवानी ऊन पडलं व्हतं. आसं वाटू लागलं की फाटे पाणी झालं का न्हाई. त्या राती पुन्यांदा बारा-येकच्या सुमाराला मुसळधार पाऊस सुरु झाला तव्हा सम्द्यांना आसं वाटलं की आता दोन-चार दिसाची झड लागतीया पर फाटे कडक ऊन पडले. राती पाणी पडलं का न्हाई आशी स्थिती झाली. दोन खेपीच पाणी चांगल पडलं आन् ऊनं बी निघंले म्हणून बरेच शेतकरी फाटे-फाटे बी आणाय शेहराकडं निंघाले....
०००नागेश शेवाळकर