e baai sitadevi dhya nko mhanu n books and stories free download online pdf in Marathi

ए बाई सीतादेवी घ्या नको म्हणू न....

ए बाई सीतादेवी घ्या नको म्हणू न....

शिर्षक वाचून बुचकळ्यात पडला असाल ना... हो हे उदगार माझ्या आईचे आहेत जे साडे पाच वर्षांपासून माझ्या कानामध्ये अगदी खणखणत होते. साडे पाच वर्षांपूर्वी माझ्या लाडक्या लेकीच्या - आराध्याच्या बारशाचा सोहळा रंगला होता. सगळं घर नातेवाईकांनी भरलेलं होतं. माझ्या बाळांचं इटूकलंस रूपडं खूप गोड दिसत होतं. अगदी लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, सीता या सर्व देवी बालपणी अशाच असाव्यात असं वाटून गेलं क्षणभर.

बारशाचा सोहळा सुरू झाला. आपल्या संस्कृती नुसार मुलींसाठी पाच वेळा वेगवेगळ्या देवींची नाव घेऊन पाळण्यावरून देऊन पाळण्याखालून काढण्याची पद्धत आहे. तसं आराध्याची आत्या एका बाजूला आणि एकीकडे मावशी अशा दोघी उभ्या राहिल्या आणि कुणी लक्ष्मीदेवी घ्या... कुणी पार्वतीदेवी द्या... असं म्हणत म्हणत आराध्याची मावशी शेवटी म्हणाली कुणी सीतादेवी घ्या... ते ऐकलं आणि लगेच आई म्हणाली, "ए बाई सीतादेवी घ्या नको म्हणू न".... मला लगेच आई असं का म्हणाली असेल?? या प्रश्नाने घेरलं पण ती वेळ हे विचारण्याची नव्हती म्हणून मी स्वतःला आवरलं पण आईचं ते वाक्य काही दिवसांपूर्वी पर्यंत माझ्या मनात अगदी वादळासारखं होऊन काहूर माजवत होतं कारण आई तर स्वत:च कित्येकदा आम्हाला रामसीतेच्या गोष्टी सांगायची आणि सीतामातेबद्दल तीला असलेला अकल्पनीय आदर तिच्या शब्दाशब्दातून जाणवत होता.

पण मग आईचं ते वाक्य??

आईला विचारलंही पण ती फक्त एवढंच म्हणाली माझी नात देवी सीतेसारखीच आदर्श चरित्र असलेली आणि संस्कारी अवश्य व्हावी पण तीचं जीवन सीतामातेसारखं वेदनाव्याप्त होऊ नये असं मला वाटलं म्हणून मी असं म्हणाले.

आणि मग या लाॅकडाऊनमध्ये दूरदर्शनने 'रामायण' ही महान कथा आपल्या सर्वांना जणू भेट दिल्यागत प्रसारित करायला सुरूवात केली. या मालिकेचे केंद्रबिंदू अर्थातच आपले आराध्य प्रभू 'श्रीरामलल्ला' होत. पण माझं मन मात्र सदैव सीतामातेच्या पात्रावर केंद्रित राहीलं आणि माझ्या आईच्या त्या एका वाक्यात दडलेला सीतामातेचा करूणामयी खडतर जीवनप्रवास मला एक एका अध्यायात अगदी एखाद्या स्वच्छ दर्पणासारखा ठळक दिसू लागला इतका की अगदी जणू मीच सीता आहे आणि हा माझाच नव्हे तर समस्त स्त्री जातीचाच जीवनपट आहे असं वाटू लागलं. आभाळालाही ठेंगणं करेल... समस्त समुद्रही ज्यासमोर एका थेंबाएवढा भासावा असं अफाट दु:ख का त्या ममतेची मूर्ती असलेल्या वात्सल्य या शब्दाची व्याख्या अगदी आपल्या प्रत्येक आचरणातून जगाला शिकवणार्या जगद्जननीच्या ठायी आलं असावं. आधी वनवास...मग हरण.... मग अग्नि प्रवेश...मग समाजाकडून अवहेलना...मग पतिवियोग....पून्हा वनवासी जीवन आणि शेवटी स्वत:च पावित्र्य सिद्ध करण्यासाठी धरणीमध्येच लुप्त होऊन जाणं. किती हा संघर्ष जो शेवटपर्यंत सीतामातेचा सहप्रवासी बनून राहिला आणि तिच्या सोबतच संपला. ही जरी हार-जीत अशी लढाई नसली तरीही सीतामाई जेव्हा धरणीत लुप्त होतात तेव्हा असं वाटू लागतं ही महान देवी या जीवन यज्ञात हरू कशी शकते तेही एवढा अकल्पित त्याग करून...

पण मग याचं उत्तर मला माझ्या छोट्याशा लेकीने- आराध्याने दिलं... ते असं की तीने 'आई मला सीतामाता बनायचंय' हा लाडीव आग्रह करून. मी विचारलं का तर ती म्हणाली सीतामाता छान आहे खूप... मी तिच्या सारखीच होईल. खूप प्रेम देईन सगळ्यांना.

"सीतामाई तू जिंकली आहेस गं खरचं अगदी तुझं सर्वस्व गमावून ही तू जिंकली आहेस" अगदी पाच वर्षाच्या मुलीलाही जर तू आज एवढ्या युगयुगांतरांनंतरही आदर्श वाटतेस तर तू खरंच या समाजासाठी जे केलं आहेस त्याची भरपाई आम्ही कधीच करू शकणार नाही हे वेगळं सांगायला नको.

"सीते तूम थी और तूम रहोगी
हर नारीको आदर्श सिखलाती
संघर्ष कर अपरिमित मनुष्य जातीको
वात्सल्य एवं ममत्व का पाठ पढाती
सीते तूम थी और तूम रहोगी...
सदैव रहोगी भारत की हर बेटी मे सीता बनकर
तूम थी और तुम रहोगी.... "

जय सीतामैय्या की! !

काही चुकलं असल्यास क्षमस्व कारण सीतामातेसारख्या अतुलनीय महान देवीबद्दल लिहिण्या इतपत मी मोठी नाहीए पण ती माझी आईच आहे जणू म्हणून स्वत:ला अडवू शकले नाही. चुकून एखाद्या ठिकाणी मातेचा एकेरी उल्लेख झाला असल्यास क्षमा करावी.

अभिप्राय अवश्य कळवा. धन्यवाद. पून्हा भेटू अशाच एखाद्या मनाचा ठाव घेणार्या विषयाच्या निमित्ताने.

✍🏻सौ. विदया पवन उन्हाळे
औरंगाबाद.


इतर रसदार पर्याय