शेतकरी माझा भोळा - 14 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेतकरी माझा भोळा - 14

१४) शेतकरी माझा भोळा!
दुम्हार लावलेल्या सर्कीनं मातर गणपतवर किरपा केली. सर्की आशी मास्त निघाली की बास! गणपत आन् यस्वदा ज्याम खुस झाले. दुसऱ्यायच्या मांघून लावलेली आसून बी सरकी सम्द्याच्यापेक्सा जोरानं वाढत व्हती.. एकूणीस-ईसचा फरक व्हता. लोकायनं कापसालं खत देयाला सुरुवात केली.
"यस्वदे, आग सम्दे कापसाला खत देयालेत."
"खरं की? मंग आपूनबी देवू की."
"पैका कोठून आणावं?"
"अव्हो, सोसायटीकडं फा की आसल तं आसल."
"सोसायटी मंदी खताचा दाणाबी न्हाई. कालच चेअरमनला ईच्यारलं. तालुक्याच्या हापीसातल्या हामालायचा संप चालू हाय म्हण."
"या लोकायलाबी ह्योच टैम मिळाला न्हव संप कराया. मुडदे जावोत येकेकायचे ! म्हण संप. खाता पिता या लोकायला काय अवदसा आठवली त्ये काय समजत न्हाई. बर मंग, शेहरातल्या शेटजीकडं जावा. त्यो देत्यो म्हन्ला व्हता..."
"त्यो म्हण्ला तर मंग जायाच फायजे का? काय लागट माणूस हाय आसं म्हणील त्यो. फावू काय तरी मारग्ग निंघल. म्या जरास बाहीर जावून येतो." म्हन्ताना गणपत बाहीर पडला.
बिडी शिलगावून त्यो पाराम्होरं ऊबा आसतानाच किसन बिगी बिगी स्टेंडाकडे जाताना फावून गणपत म्हन्ला,
"आर... अर किसानदेवा, येव्हढ्या बिगीन? समद ठीक हाय की?" पाचकान् थुकत गणपतनं ईच्चारलं.
"आरं तिच्या मायला, हाटकीलं का?"
"वारंवा! जसा काय पंतपरधानांच्या भेटीला चालला हाईस रे?"
"तस न्हाई रे बाबा. पर म्या चाल्लो बैंकत..."
"बैंकत? कहापायी?"
"आर तालुक्याची बैंक म्हण शेतकऱ्यायला कराप लोन देती. त्ये लोन आत्ता घेयाचं आन हांगामावर फेडाचं आसत्ये म्हणे."
"मग तर लै चांगलं हाय की.कोन्ला मिळत्ये? मला मिळलं का? म्या बी खतासाठी परेसान हाय."
"काय म्हन्लास? तू आन रिन उचलायची भासा? उपासी ऱ्हाईन पर कोनाम्होरी हात पसरणार न्हाई आशी आण घितली व्हती ना?"
"व्हय रं. म्याच म्हण्लो व्हतो पर आता परस्थिती बदल्ली हाय. रोजमंजुरीवर कसंबसं प्वाट भरत्ये आन् वावरात सरकी लावून बसलो. सरकीला खत देवाव म्हण्तो.."
"आर मंग चाल तर! तुला बी मिळलच की. बैकेला तं करजदारायचीच गरज ऱ्हाते. चल बिगीन..."
"तू येक मिन्ट थांब. मी यस्वदीला सांगून येतो."
"हे बग, येताना चार दोनसे रुपै घिवन ये."
यस्वादाला सांगून दोगबी स्टेंडाकडं निंघले. रस्त्यात मारोती भेटला. दोन दिस म्हन्ता म्हन्ता आठ दिस झाले पर सोनं मिळाल नव्हतं. गणपतला फायल्यावर गणपतन ईच्च्यारायच्या पैले मारोती म्हन्ला, "गणपत, आज सांच्यापारी गावात ऱ्हावा. मी काम करून येत्यो."
"बर." गणपत म्हण्ला.
सम्द्या कागुदपत्तरावर आंगुठे लावून गणपत आन् किसन बैंकेबाहीर पडले. दुसऱ्या दिसी यिवून रिन घिवून जा आसं सायेब म्हन्ले तव्हा गणपत लै खुस झाला.
"किसानदेव, लै बेस झालं. आर, दोन-चार आंगुठे लावले तं धा हजाराच रिन मिळणार. आर येव्हढं सरळसोट काम आसल आसं वाटल नव्हत."
थोडुसी बाजारहाट करुन दोगं बी गावात आले तव्हा आंदार पडू लागला व्हता. मारोती सोनं घिवून आला ही बातमी त्येना स्टेंडावरच कळली. गणपत लगुलग मारोतीकडं गेला. त्यो स्टेंडाम्होरी आसलेल्या केळीच्या बनात बसला व्हता. सम्दा चोरीचा येवहार व्हता. गणपती बनात पोचला. तेथं पैलीच पाच-पंचेवीस मान्स व्हती. समद्यायला मारोती तोलून मापून सोनं देत व्हता. त्यांच्यामध्ये बडबडे गुरजीबी व्हते. गणपत गुर्जीजवळ गेला आन् म्हन्ला, "तुमी पैका देला गुर्जी?"
"होय."
"मग काय हरकत न्हाई. तुमी घेत्ली म्हंजे सम्द चांगलच. पर तुमाला आशी..."
"गणपत, दोन वर्षात दोन पोरी ऊजवायच्या आहेत. काही तरी तजबीज करावी लागेल. आरे बाबा, सोसायटी ऊचलून हा व्यवहार करतो झालं. मारोती तर नाहीच म्हणत होता पण त्याच्या हातापाया पडून मीच त्याला तयार केलं."
गणपतचा नंबर लागला. एका पारड्यात पाटल्या आन् दुसऱ्या पारड्यात सोन्याचं पासंग केलं. सोन घिवून त्यो घरी पोचला. यस्वदीनं सोन घेत्ल. सोन्याला खालीवर फात यस्वदा म्हन्ली, "लई चखोट माल हाय व्हो. बगा तर कस लख-लख चमकत्ये पाटल्यापरीस लै चमक हाय."
दुसऱ्या दिशी गणपत किसनसंग बैंकेत गेला. आर्ध्या - येक घंट्यात धा हजार रुपै मिळाले. गणपतनं खत, औसदी घेतली. यस्वदीला पालीस्टरचे च्यार लुग्डे, सोत्तासाठी दोन धोतरायचे जोड, चार सदरे, आन करकर वाजणारा जोडाबी घेतला. दोन कोंबड्या आनीक मसाला घिवून सात-आठ हज्जाराचा चुराडा करून गणपत खुसीखुसीत घरी पोचला. खतायचे पोटे नीट कोपऱ्यात लावून त्यानं सम्दा बाजार यस्वदीफूडं मांडला. त्ये फाताच यस्वदा म्हन्ली "आव्हो हे काय आणलसा?आसी ऊधळपट्टी कहा पायी ?"
"कहापायी म्हंजी? पैका व्हता म्हून. आग, पुरी जिंदगानी हात आखडू-आखडू गेली."
"त्ये खरं हाय वो पर त्यापायी का बैंकचं रीण काढलसा?"
"व्हय काढलं. सायेबाला हज्जार रुपै देले तव्हा धा हजार मंजूर झाले."
"अव्हो, सर्कीच्या थैयल्याचे पैके देयाचे व्हते. झालच तर पैका व्हता तर मंग येकदाणी सोडून आणायची व्हती."
"घिता यील ग. आग, कापूस कसा नंबर येक हाय. पंच्येवीस कुंटलला मरण न्हाई बग. औंदा भाव बी तीन हजार मिळल आस आबासायेब म्हणत व्हते. सत्तर हजार रुपैयाला फिकीरच न्हाई. तू येका एकदाणीचं घिवून बसलीस. तुला सोन्यानं मढवीन.आन् सम्द्या गावातून फिरवीन. हायेस कुट? चल, आटीप. आज ले मास्त मूड हाय. झणझणीत मटन कर बर. रस्सा जरा जास्ती कर."
"आता गं बया. तुमास्नी काय दसरा वाटला की दिवाळी, रिन काढून मटाण खायाला? रिन किती व्हयालं येचा काय आंदाज हाय का? आपला सोत्ताचा पैका हातात आल्यावर मंग काय बी सोक करा की, तुमाला कोणी नग म्हणायचं नाई. वावरातलं घरात येईस्तोर काय बी खरं न्हाई."
"न्हाई, यस्वदे न्हाई. औंदा सम्द ठीक हाय. त्यो देव बी आपला आता अंत फाणार न्हाई. भरभरुन दिलं बग. पाऊस कसा टेमशीर पडतो, जसं काय मोट्रीचं पाणी.."
"अव्हो, पर लोकायचा पैका किती झालाया?'
"व्हवून-व्हवून कित्ती व्हईल...ईस हज्जार? आजूक पन्नास हजार तर हायेत की."
कोपरापस्तुर वघुळ जाईस्तोर मटणावर ताव मारलेला गणपत फाटे जरा उशीरा ऊठला. यस्वदा पांदीकडं गेली व्हती. गणपतला बी दम निंघला न्हाई. बिडी शिलगावत टमरेल घिवुन त्यो घराबाहीर पडला. गरामपंचातीच्या हापीसाम्होरी पोलीसाची जीप थांबलेली फावून गणपत बी थांबला. जीपीतून पोलीसासंग गावातले दोन-तीन मान्स ऊतरले. त्यासमद्याचे चेहरे काळे ठिकर पडले व्हते. मारोतीजवळून घेतललं सोन खर हाय का न्हाई त्ये फायासाठी त्ये शेहरात गेल्ते. सोनं सराप्याच्या दुकानात देलं. त्येनं ते गरम केल आन काही बी न म्हन्ता लगुलग पोलीसायला बलीवल. आख्खं सोनं नुसतं पितळ व्हतं. वरी वरी सोन्याचा मुलामा व्हता. पोलीसान त्येंला पकडून रातभर ठाण्यात डांबलं आन् फाटे-फाटे सीतापूरला आन्ल व्हतं. "आर, कोतवाल..."
"जी साब..."
"तो कोण मारोती का गणपती. त्याला बोलाव."
"बर. " म्हणत कोतवाल पळाला.
"काय झाल साहेब?" पोलीस पाटलान इच्चारलं.
"पाटील, काय तुमच्या गावी हा खेळ? त्या मारोतीन विकलेलं सगळं सोन खोटं आहे. एकदम पित्तळ !"
"कायऽय?"
"होय. हे सगळे लोक सोनं विकत होते, तेव्हा त्याना पकडलं. तेव्हा कुठे मारोतीचं नाव समजले."
"सायेब, मारोती रातीपासून गावात न्हाई." पळत जावून आलेला कोतवाल धापा टाकीत म्हन्ला.
"त्याच्या घरी कोण आहे?"
"साहेब, नावापरमाने त्यो 'मारोतीच' हाय. ना आगा ना पिछा. येकलाच राहात व्हता."
"आणखी कुणी घेतलं सोन?" फौजदारान ईच्चारलं तव्हा सम्द्यानी कानावर हात ठिवले. फुक्कटची झंझट कोण आगावर घील? गणपत हालकेच घराकडं सटकला. झाला परकार यस्वदाला बी समजला व्हता.
"काय झाल व्हो धनी?"
"यस्वदे, आपून फसलो. लुटलं, त्येन समद्यायला.."
"अव्हो, पर घेताना तुमी तपासून..."
"काय फावू? दुकानात गेल्याबरोबर हातकडी पडत्ये. मला तव्हाच सौंशय आल्ता पर तू आकलेचे तारे तोडाय निंघालती..."
"मला तरी काय ठाव हो, त्यो आस्सा साळसूद आसल त्ये. वाण कसा गाईचा व्हता. हालगटाला का ते पचणार हाये का? रगत वकलं घुबड मेल..."
"यस्वदे त्ये रगत वकल न्हाईतर आजूक कायी. पर आपून तं पार नंगे झालो की.त्येच रगत पडाल म्हून का तुह्या पाटल्या परत मिळणार हाईत."
"आस कावून व्हते हो. आस्सच कोठं येखांदा सुकाचा ढग दिसत्यो न दिसत्यो की लगुलग दुकाचे
पाहाड म्होरी येतात. काय चुकल आपलं. धनी, अव्हो दुकाचे केव्हडाले मोठे डोंगर आपून पार केले. खर तर कोंड्या मेला आन येका आर्थानं सकी बी मेली तव्हाच मझं बी मडं ऊठाय फायजे व्हते पर देवानं कावून जित्ती ठिवली कोण जाणं. त्या मेल्या आबासायेबानं वावराचा पैका बळकावला, जीब बी गिळली. तात्यासायेबान ईज बिलापायी लुटलं, जिमीन बी खाल्ली. ऊस तात्याचा गेला पर कामगारायला वक्कोस्तर आणून खावू घातलं. वा रं वा! ह्यो का न्याव झाला. त्यो तुमचा ईलाश्या... पका दोस्त पर त्यान बी पैक्यानं लुबाडलं. पोराला रांडजोळ घिवून गेला आन्... आन्.... मझ्या फुलावानी पोरीला कुंटाणखान्यात ईकल मुडद्यान. अव्हो, तो कोवळी पोरगी रातीतून पाच-सा जणायसंग..."
"काय? तुला ह्ये कोनी सांगलं?"
"धनी, तुमी लई भोळे हावात व्हो. अव्हो, सकीनं तं दुकान मांडलं हाय पर नौऱ्याच्या मांघारी त्या केंदरावर जावून दिवसाढवळ्या धंधा कर्णाऱ्या बाया बी गावात हाईत व्हो. त्येच्याकडून... या त्वांडान... त्या त्वांडान... करत करत मह्यापरेंत सकीची बातमी येत्ये व्हो. म्हून म्हन्ते आपुनच काय गुन्हा केला? कोन्त्या जलमाचा बदला ह्यो परमेस्वर घेत्यो? समदे करुन सवरुनशानी कसे बगळ्यावानी फिर्तात बगा."
"जावू दे. यस्वदे, नसीबात जे लिवलं हाय ते कसं बी वागलं तरी टळत न्हाई. जावू दे, झाल त्ये झालं. त्ये सपनावानी..."
"सपान? अव्हो, नौ-नौ म्हैने या पोट्टात त्येंना वाडवलं. रगताच पाणी करुन त्येंना पाजलं. कसा धिप्पाड व्हता व्हो मझा कोंडबा. तुमच्यापरीस उच्ची व्हता. पर कोण्या मुडद्याची नदर लागली आन् काय न्हाई ! काय आवदसा आठीवली आन् त्यो ऊपोसणाला गेला. धनी, येव्हढं मोठ्ठ पोरगं नेयाचं व्हतं तं देवानं देलच कावून? त्या ईलाश्याचे आपून काय घोडे मारले व्हते हो, आबासायेबानं म्हणं पैल्यांदा सकीला... केव्हढा तर्रास झाला आसल व्हो मह्या पोरीला. आबासायेबासारका रांगडा गडी आंगावर घितांना तिला काय येदना झाल्या आसतील धनी, त्या तुमाला न्हाई समजणार व्हो धनी. त्येसाठी बाईचाच जलम फायजेत. पर धनी, त्या-त्या ईलाशाला त्येची सजा याच जलमात मिळाली बघा..."
"काय झाल?"
"तुमाला ठाव न्हाई?"
"न्हाई बा..."
"मुडद्याला गरमीचा रोग झाला म्हणं. पुर आंग सडलं त्या वकट्याचं. घ्येतो देव बदला घितो. तुमी बगलं न्हाई, कस लंगडत चालतंय..."
"हां, म्या फायलं. पर मला वाटल पेवून पडलं आसल. बरं झालं गिधाडाला सजा मिळाली. आशीच सजा समद्यायला मिळल बग..."
"मिळायाच फायजेत. येक बी डुकरीचं सुकानं मरायचं न्हाई. किडे पडतील आंगात. आळ्या आश्या वळवळ करतील बगा..."
"जावू दे."
सम्द्याबरुबर गणपतचा कापूस बी जोमाने वाढत व्हता. खत, आवषीद येळसीर देत व्हता, पाऊस बी वक्तसीर आन् मोजल्यावानी जेव्हढा पायजे तेवडाच पडत व्हता. कपाशीची निगा राकल्यान म्हणा की देवाची करणी म्हणा ह्ये टप्पू टप्पू घाट्र लागले व्हते. परत्येक झाडाला न्हाई-न्हाई म्हन्ल तरी तीस पस्तीस घाट्रं व्हते. समदं सीतापूर जाम खुश व्हतं. तिकडे ऊस कारखाना आन त्येच्यापरीस कलाकेंद्र जोरात व्हतं. कलाकेंदरापायी न्हाई म्हन्ले तरी आजुबाजुचे धा-पंद्रा खेडे पुर्ते नंगे झाले व्हते. बड्या बड्या लोकायला नंग केलं व्हतं. लोक बी रीन काढू काढू कलाकेंद्रात जात व्हते. सीतापूरासाठी येणाऱ्या सम्द्या योजना कलाकेंद्रवाले, सरपंचीनबाई आन् गरामसेवकानं फस्त केल्या व्हत्या. गावात कोन्तीच योजना पोचली न्हाई. गरामपंचातीचं हापीस बी केदरातच थाटलं व्हतं.
आस्ते आस्ते बोंड फुटू लागले. समद्या गावात गणपतचा कापूस लै उम्दा आन नंबर येक व्हता. गणपतचं वावर कस पांडर सपेद दिसू लागलं, जसं रानात पांडरं सोनं पिकलं व्हत.
"धनी फा. झाडाला कसं सोनं लागलं हाय".
"व्हय यस्वदे. त्वा तव्हा म्हन्ली, सोताचा दागिना काढून देला न्हाई तर म्या हाईब्रिड लावली आसती."
"ते जावू द्या. धनी कित्ती आसल व्हो ह्ये सोनं?".
"आसल पंद्रा येक कुंटल."
"पंदरा? छे...छे... पंदरा कुंटलला कसं आयकलं? अव्हो, बगा त केवडालं बोंड हाय त्ये.. पंच्चेवीस कुंटालच्या वरच आसल."
"आस्सा सफेद कापुस कोणाचाच न्हाई "
"ते खरं हाय वो, पर आपल शब्द रिन तं फिटल ना ? "
"सम्द फिटल. आजूक दुसऱ्या पाटल्या आन् येकदानी बी व्हईल..."
गणपतन बी कापसाची वेचणी सुरु केली. त्या सांच्याला कापसाचे गठुडे घिऊन त्यो घराकडं येत व्हता. तव्हा ग्यानबाच्या घराफूडं लई गर्दी व्हती तिथ उब्या असलेल्या मान्साला गणपतनं इच्चारलं,
"गुलाबराव काय झाल?"
"गणपत, आर, ग्यानबानं आवसीद पेवून जीव देला."
"जीव देला? कावून?"
"आर बाबा, सम्द्या गावाला ठाव हाय, ग्यानबाला किती कर्ज व्हत ते. आबासायेबांचा पैका, तात्यासायेबाचं रिन, सावकराचे लोन, आजूक बी कोणा कोणाचा पैसा.... सोसायटी हायेच, बैंकचा तगाजा व्हताच. भुईकास बैंक, मध्यवर्ती बँक, स्टेट बैंक... आरं बाबा जेथून कोठून रीन मिळत्ये आसं समजायला उशीर...हो पठ्या हाजीरच...."
"येवडा पैका? पर करायचा काय?"
"गणपतराव, पैक्याच काय? दारू हायेच, मटण बी रोजच... आन.... आन... बाय बी लागायची. मला सांगा त्या कलाकेंदरात गेल्यावर का कोन्हाचं बरं झालं हाय? कला-कलानं लोकायला बेकार करत्ये त्ये कलाकेंदर!"
"ह्ये बी येगळच खूळ निंघाल हाय. गावा-गावात येक तरी शेतकरी आत्महत्या करुन मेला हाय."
"खर हाय. मरायलेत लोक आन् बदनाम व्हयाले सरकार."
"सरकार कावून रे?"
"सालं त्ये सरकारबी येड हाय. येव्हड रीन देवावच कहाला? येथ तेथ त्वांड घालायची सव हाय, त्यापायी रिन म्हून घितलेला पैका बी उडवतात. पैका फेडाची ताकद ऱ्हायली न्हाई आन् सकारचा पैसा फेडायचा नगादा सुरु झाला की मंग आवशीद पेतात न्हाई तं फासी घेतात. काय तर म्हण देण जास्त झाले म्हूण मरतो. वा रं वा! न्याव..."
"आता याच ग्यानबाच फा तर... याला म्हण दोन लाकाचं करज् व्हतं. तेव्हडा कापूस व्हणार न्हाई ह्ये दिसतातच पट्ट्या बसला आवशीद पेवून! करज् काढून आलेला सम्दा पैका सानसौकीत घालवला. कपासीकडं फायल न्हाई, ना खत ना आवसीद... कसा उतारा यील आन रिन फिटाल? बसला मंग जिंदगानी संपवून, याला मरायसाठी सरकारनं येगयेगळ्या योजना काढल्या व्हय? रिन सम्देच काढतात. शिरीमंतातला शिरीमंत माणूस रीन काढतो पर मरतात आसे बेवडे ! फोकनीचे !
हातात दमडा आला की येना आस्मान ठेंगण व्हते. मांघला फुडला ईच्चार न करता वाट्टल तसा पैका उडवतात आन मंग..."
"खर हाय. रिन म्हूण घेतलेला पैका शेतीसाठीच वापरला. येळच्या येळी आवशीद फवारलं, कपाशीची निगा राखली तर ही धरणीमाय काय बी कमी करत न्हाई, भरभरून देत्ये..."
"संबर टका बरुबर हाय. ह्येंना भोसडीच्यांना मुलकाचे हज्जार सोक, मंग कसा पुरल पैका? ह्यात सरकारचा काय बी दोष न्हाई. करणी तसी भरणी... म्हणच हाई..." ह्यो सौंवाद आईकणारा गणपत हालकेच तेथून जड पायाने निंघाला...
०००नागेश शेवाळकर