Shetkari majha bhola - 13 books and stories free download online pdf in Marathi

शेतकरी माझा भोळा - 13

१३) शेतकरी माझा भोळा!
पांदीहून आल्या आल्या यस्वदा गणपतला म्हण्ली, "अव्हो,सम्दे लोक कपासीच्या थैयल्या आणाय चाललेत. तुमी बी जाता का? न्हाई तं ऐक करा..."
"कसं करु सांग. आता तू सांगावं आन् म्या आयकावं..."
"बर! बरं!। लै आले आईकणारे. आस्स करा, पैयले कोन्ला तरी ईच्चारा आन् मंग जा."
"बरं..." आस्सं म्हणत जरा वेळानं गणपत तात्यासायेबाकडे गेला. रामराम करत म्हन्ला,
"मालक, कपाशीची कोणती जात चांगली?"
"का रं?"
"औंदा सरकी लावावं म्हन्तो."
"चांगली गोस्ट हाय की. जिमीन पडीक ऱ्हाण्यापरी काही बाही घेतलंच पायजे "
"मंग येक सांगा, येच्च फोर चांगला की डब्बल फोर?"
"त्याच आस्स हाय गणपत, बियाण कोन्त बी चांगलेच ऱ्हाते पर जिमीन, पाणी, खत, औसद या समद्यावर ऊतारा आवलंबून हातो. तू आस्स कर, येच फोर लाव."
दोपारी गणपत शेहरात पोचला. तेथं बियाणाच्या दुकानी शेतकऱ्यायची तोबा गर्दी व्हती. हिंडता -हिंडता त्येला येका होटलातून बाहीर पडणारं जोडप दिसलं. दोन गोजीरवाणी पोरबी त्येंच्यासंग व्हती. त्या दोघायकडं फात आसताना त्येला येकदम आनंद झाला. त्या दोघायनबी गणपतकडं फायलं पर न फायल्यासारखं करीत लगुलग दुसरीकडं निंघून बी गेले. त्यो रामा आन् त्येची बायकू व्हती. गणपत आवाज देयाच्या पैले ते सम्दे मोटारसायकलवर बसून निंघून बी गेले. रामाचं तसं वागणं फाऊन गणपतला वाइट वाटलं. पर लगेच सावरून त्यो दोन-तीन घंटे फिरला आन् जरासीक पातळाई आसलेल्या येका दुकानात गणपत शिरला. पैले सम्दे लोक झाल्यावर दुकानदार गणपतकडे फात म्हन्ला,
"बोला पाटील..." येव्हढा मोठ्ठा दुकानदार आन् पाटील म्हन्तो त्ये ऐकून गणपत लै. बरं वाटलं.
"एच फोर हाय का?"
"आहे ना. पण शॉर्टेज आहे. बाजारात कुठेच मिळणार नाही. आम्ही डायरेक्ट कंपनीकडून गाडी मागवतो म्हणून माझ्याजवळ आहे नाही तर कुठेच मिळालं नसतं.
"भाव?"
"साडे आठशे."
"बाप्पो रे ! सावकार, लई टाईट मारकीट हाय."
"पोजीशन तशी आहे. काय करणार? शिवाय आता धंदा पहिल्याप्रमाणे राहिला नाही. फार रिस्क झाली हो. सर्वांना हप्ते द्यावे लागतात नाही तर संकटं मागे लागतात. पावती पाहिजे असल्यास कमी भावाची मिळेल."
"पावतीची गरज न्हाई व्हो पर तेव्हढं भावाचं ..."
"पाटील, वेळ दवडू नका. एकच भाव. दाम द्या. माल घ्या. धंद्याचा टाइम हाय. बोला."
येच फोरच्या दोन थैल्या घिवून गणपत गावी परतला. चांगला वाण मिळाला. यस्वदेला बी लै आनंद झाला. येका येगळ्याच समादानात दोघं झोपले. त्या राती पुना पावसाने हाजरी लावली. फाटे उठल्यावर गणपतनं यस्वदाला रामा भेटला पर बोलला न्हाई हे सांगलं. त्येला दोन पोरं हाईत ह्येबी सांगलं. पर यस्वदा काय बी बोलली न्हाई. काय तरी निमित्ये काडून घरामंदी गेली.
त्याच दिशी दोपारी गणपत वावरात गेला. वावरात सम्दीकडं पाणीच पाणी व्हत. शेतामंदी दोन-चार दिस पाय ठिवता येणार न्हवता. आबाळ निंघत आसलं तरी चार पाच दिस पाऊस आलाच न्हाई. लोकायनी सरकी लावाय सुर्वात केलेली फावून यस्वदा म्हण्ली,
"उंद्या आपून बी सरकी लावूत का?"
"आज रातच्याला पाणी पडलं न्हाई तं लावू की."
ती रात बी कोरडी गेली. दुसऱ्या दिशी गणपत आन् यस्वदा फाटे बिगीनं वावरात गेले. दिसभर राबून त्येनी सम्दी सर्की लावली. समद्या शेतकऱ्यायची बी सर्की लावून झाली. दोन-चार दिस आबाळ फिरलं आन् त्या राती जोरात पाऊस सुरु झाला. चांगली तीन दिस झड लागली. मुरवणी पाणी पडल्यानं येक थेंबभर भी पाणी वावराच्या बाहीर गेल न्हाई. सीतापुरचे शेतकरी निसरगाच्या किरपेनं लै आनंदले. सरकी फुटाय लागली आन् त्येंच्या आनंदात भर पडली. इवली इवली पानं सम्द्यायना खिनभर थांबवू लागली. समदं सीतापूर सुकासमादानात असताना गणपतच्या घरी मातर दुकाचं वातावरण व्हतं. समद्यांची सरकी फुटली व्हती पर गणपतच्या वावरातली येक बी सरकी फुटली न्हवती. गणपत आन् यस्वदा दोगांना काळजी लागली व्हती.
"आता व्हो. काय तरी फा की.''
"आता काय फावू यस्वदे. वाणा-वाणात फरक -हातो, फुटाल चार-दोन दिसात."
"तरी बी कोनाला तरी ईच्यारा. काय तरी रस्ता घावल."
सांच्यापारी गणपत गरामपंचातीच्या म्होरं गेला. तेथं धा-ईस लोक टीवी फात व्हते. त्येला फाताच किसन म्हन्ला, "कावून रे गणपती, चेहेऱ्यावर बारा कावून जावले.'
"किसानदेवा, आर सरकी लावून धा दिस झाले पर आजूक येक बी सरकी फुटली न्हाई."
"धा दिस झाले?"
"व्हय बाबा."
"आर मंग निंघल की एखाद दोन दिसात..."
"आर गणप्या, गंडवील रे तुला..."
"बेकार अन् मेलेला वाण तुह्या गळ्यात घात्ला रं बाबा."
"बेपारी लई चालू ऱ्हातात रे बाबा. म्होरल्या माण्साचा वाण फावून त्ये सोत्ताचा माल त्येच्या गळ्यात घालत्यात."
"हा.हा...बेपारी लै चालू हायेत.."
"आर, त्ये सम्द खर हाय पर आता म्होरी करू तरी काय?"
"तू थैयल्या घेतल्या त्येच बील फाडलं व्हतं का?"
"न्हाई बा.."
"काय माणूस रे तू? बील घेत्ल आस्तस तं पोलीसात कंपलेन लिवायची धमकी तं देता आली असती."
"काही व्हत न्हाई रे कंपलेन बिंपलेन लिवून. सम्दे भोसडीचे हापते खावून कानकोंडे आसतेत. समदे येकाच माळेचे मणी राहातेत."
"बराबर, येकदम ! त्येचे त्वांड दाबलेले असत्यात."
"तू आस्स कर, उंद्या जावून पोलीसात जायाची धमकी तं दे. निंघाल्या तं निघाल्या दोनयेक थैल्या. न्हाई त आपलाच दाम खोटा म्हून गप्पी ऱ्हावावं..."
"मातर जास्ती वाद घालू नगस न्हाई तर त्योच पोलीसायला बलवायला बी मांघपूड फायचा न्हाई."
दुसऱ्या दिशी गणपत शेहरात पोचला. दुकानात बरीच पातळाई व्हती. गणपतला फाताच दुकानदार म्हन्ला, "या, पाटील."
गणपत जरा चाचरत बसला तसा दुकानदार पुना ग्वाड आवाजात म्हन्ला, "बोला तर पाटील. काय सेवा करू?"
"मागल्या सुक्करवारी तुमच्या दुकानातून येच्च फोर्रच्या दोन थैयल्या नेल्त्या..." गणपत आडखळल्याचं फावून दुकानदाराचा आवाज बदलला. पैयली नरमी कोठ तरी पळाली आन् त्यो जोरात म्हन्ला, "बर मग?"
"दोन्ही थैयल्यातली येक बी सर्की फुटली न्हाई.''
"फुटली नाही? पिशव्या आमच्याच दुकानातून नेल्या होत्या?"
"व्हय मालक."
"ते शक्यच नाही. डायरेक्ट कंपनीतून दुकानातच गाडी ऊतरवली होती. शिवाय दहा हजार पिशव्या विकल्या पण अजून एकाचीही तक्रार आली नाही."
"मालक, म्या कहापायी खोटं बोलू? तुमची-मझी का दुस्मानकी हाये वो?"
"बियाणं आमच्या दुकानातून नेल याचा काही पुरावा आहे? सोबत कुणी होत?"
"न्हाई बा. म्या येकलाच व्हतो."
"काही पावती बिवती?"
"न्हाई जी. तुमी म्हन्ले व्हते बील कमी भावाच देत्यो पर म्याच म्हन्लो बोल फिल काय नग."
"मग ऊठा. तुम्ही आमच्या दुकानातून माल नेलाच नाही. आम्ही प्रत्येकाला पावती दिलीय. कुणी मागितली नाही तरी आम्ही जुलमाने पावती दिली आहे. बिगर पावतीची आम्ही एकसुद्धा पिशवी विकली नाही."
"ते खरं हाय वो मालक, पर म्या बी खोट बोलत न्हाई व्हो."
"तुम्ही खोटं बोलता का खर याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही."
"मातर म्या सोत्ता तुमच्या दुकानातून थैयल्या नेल्या हायेत. तव्हा तुमीच व्हते."
"ये भडव्या, ऊठ चालाय लाग."
"शेटजी, गुमानं थैयल्या द्या न्हाई तर?"
"न्हाई तर? काय करशील रे हरामखोरा?"
"ठाण्यात जाईल."
"ऊठ. हरामखोर साल्या. ऊठ. पोलीसात जातो? मला धमकावतोस? चोरच्या चोर...साल्या...."
"कोण गणपत? काय झाले रे?" गणपतसग दुकानदाराने आवाजाच्या दिशेने फायल. सीतापुरचे जिमीनदार आबासायेब दुकानात आले व्हते.
"या-या मालक या. बऱ्याच दिवसांनी वाकडी वाट केलीत. आम्हाला विसरलात का? यंदा बियाण्याला पण आला नाहीत? अरे, पाहतोस काय? जा दोन थम्सअप सांग."
"गणपत, काय झाल?" आबाने ईच्चारल. गणपत आन् दुकानदार दोगायचबी आयकुन आबासाब म्हन्ले, "शेट, आमचा गणप्या लई ईमानदार माणूस हाय, कंदी लबाड बोलणार न्हाई."
"पण मालक, तुम्हाला माहिती आहे. आम्ही पावतीशिवाय माल विकतच नाही. आपले संबंध का आजचे आहेत?"
"तुमचं खरं आहे. गणपत खोट बोलणार न्हाई याची जशी आमाला खात्री हाय तसच तुमीबी फसवणार न्हाई हे बी आमीच शपथेवर सांगतो. पर आस्सा फा. त्या आठवड्यात अच्यानक पाणी आलं तव्हा बियाण्यासाठी शेतक-यांची लई गर्दी झाल्ती. तुमी बी आखरीला माणूस हाईता, व्हते एखादे बार. माणूस चुकणार न्हाय तं कोण? जावू द्या. निंघल तुमचा बी पैका कोठं तरी. द्या त्येला बियाणं आणिक गणपत जरा दमानं घेवाव. धीर ठेवावं. पोलीस बिलीसाच नाव घिऊ न्हाई."
"मालक, तुम्ही म्हणता म्हणून एक पिशवी देतो."
"पर म्या दोन थैल्या नेलत्या."
"गणप्या, आस हाय तुव्ह सम्द खर हाय पर आईकणार कोण? त्वा बील घेत्ल न्हाई ही तुही चूक. तव्हा बिलाखेरीज तुव्ह कुणी बी खरं मानायच न्हाई. आता मालक मझ्या वळखीचे हाईत. येक थैयली देयालेत. तेवढी घे. समादानानं जा. आन् पुना सरकी लाव."
"मालक, बर ज्ये झालं त्ये झालं पर आजूक येक थैयली मिळाली तं लई चांगलं व्हईल. तुमी शेटजीला सांगाल तं बरं व्हईल मालक. आजूक येक...."
"आणखी काय हाय?"
"जास्ती काय न्हाई मालक पर येखांद दोन बार फवाराय आवसीद लागलं तं..."
"बर बाबा. मालक काळजी नगा करु. आमचा गणपत म्हंजी लई पारमाणिक हाय तेव्हा देवून टाका."
"ठीक आहे. तुम्ही असल्यावर काय हो मालक. आमचा पैसा बँकेत असल्यावाणी आहे."
दोन थैयल्या घिवून गणपत दुकानाबाहीर पडला आन् आबासाहेबानं दुकानदाराच्या हातावर टाळी देली.
दुसऱ्या दिशी फाटे यस्वदा पांदीहून आली तव्हा गणपत वतलाफूडं बसून बिडी शिलगावत व्हता. आल्या आल्या यस्वदा म्हन्ली, "तुमी ऐकलं का?"
"न्हाय बा. काय म्हणते?"
"तुमी गावात राहाता का न्हाई? जरा बिडी पेयाचं कमी करुनशानी गावामंदी काय चालल हाय ते फा."
"पर झाल तरी काय? आन् पैले मला येक सांग हे तुला पांदीला गेलं की कस काय समजलं? जव्वा फाव तव्हा पांदीहून आली की काय तरी नवाच खूळ आण्तीस?"
"आमा बायांना तेवढाच येक येळ निवांत आसतो. बाकी दिसभर तं चूल-मुलाच बखेट आन तुमा नौऱ्यांच्या फूड-फूड करण्यातच जातू. ते जाऊ द्या पर तुमाला त्यो ठाव हाय का?"
"ह्यो कोण? त्यो तुला कोठं भेटला? पांदीला?"
"काय बी बोलू नगसा. त्यो... मझं टकुर बी... त्यो काय... बायांनी सांगल बरं. त्येच नाव... आस झालय की काय बी ध्यानात राईना झालं. हां.. हां...आठीवलं... त्यो मारोती हाय ना..."
"मारोती व्हय? त्यो मला कावून ठावूक न्हाई? वर्सानुवर्स पारावर मुक्काम ठोकून हाय की. रोज नेमान त्येचं दर्सन घेतो बोवा."
"आज तुमाला झालं तरी काय? त्यो मारोती.. शेहरात सराफाच्या दुकानात हाय न्हवं. गावामंदी सोन ईकत न्हाई का?"
"त्यो व्हय, म्याबी आयकील हाय, सोनं ईकतो त्यो ते. बरं आत्ता त्येच काय?"
"आहो, त्यो सोन ईकतोय..."
"च्यामारी ! ह्याच्यात नव काय? सराप्याच्या दुकानातला माणूस सोन इकणार न्हाई तं का चपला इकल का?"
"आयिका व्हो. मार्त्या म्हण... आर्ध्या किमतीत सोनं ईकणार हाय..."
"छाट्! काय बी बरळतीस झाल. यस्वदे, सोन म्हंजी काय हिरव्या मिरच्या वाटल्या. आजकाल कांद्याच मारकीट बी लै टाईट चालल्येय आन् म्हणं त्यो आर्ध्या किंमतीत सोन ईकतुया. झुठ हाय."
"अव्हो, पर कोन्ला ईच्यारुन तं फा. आबासायेबानं म्हण धा किलू सोन्याची आरडर देली..."
"आग, त्यो गडगंज आसामीवाला. धा किलू घीन न्हाय तं धा कुटल घीन आपल काय?"
"ईलाशानं पाव किलू आणाय सांगलंय म्हणं. तात्यासायेबान पाच किलू आणाय सांगल हाय. समद्या गावात..."
"यस्वदे, सम्दा पैक्याचा खेळ हाय. आर्दी किंमत म्हन्ली तरी बी थोड़ी हाय व्हय? येथं आफ्फू खायाला पैका न्हाई आन् म्हणं सोन घेवुता."
"आव्हो, तुमी आस्स करा, मार्त्याच्या घरी जावून तं फा सम्द समजाल..."
"आन् समजा त्यो आर्ध्या पैक्यात सोन देत आसल तर?"
"आपून बी घेवूत की..."
"खर हाय. आत्ताच मझे दात हालाय लागलेत तव्हा त्ये पाडून घेऊता... दोन- तीन तोळे..."
"तसं न्हाई हो. पर मह्या पाटल्या हायेता का न्हाई..."
"तुह्या मायला! काय न्यारच वारं आंगात शिरलंय गं तुझ्या. आरदीआदीक जिमीन बी गेली, येकदानी बी गेली. आता तेवढा येक वाण ऱ्हायलाय तं त्येला बी ईकून..."
"आहो, ती ईकून त्येच्या पैक्यादून दुप्पाट सोनं ईकत घिता यील की. पारा म्होरी नुस्त्या चकाट्या पिटता झालं. चार सा म्हैन्यापासून ह्यो आर्ध्या भावाचा बेपार चालू हाय म्हणं."
आखरीला गणपत मारोतीला भेटाया निंघला. रस्त्यामंदी गावातीत बैंक व्हती. बैंकत लै भारी गरदी व्हती. किसनवी बाहीरच घुटमळत व्हता.
"काय किसान देवा, बैंकत आज लई गर्दी दिसते..."
"गणप्या, तुला ठाव न्हाई?"
"काय?"
"आर, त्यो मार्त्या अर्ध्या भावात सोन ईकतुया."
"किसनदेवा, ह्ये कस शक्य हाय?"
"हाय बाबा, आजपस्तोर ले सोनं आणून ईकलं त्येन. कैक जण त्ये पारखून फाया शेहरात गेल्ते. आक्शी शंबर नंबरी सोनं हाय बरं."
"पण आज बैंकत येव्हढी भीड कहापायी?"
"त्याचं काय हाय, मारत्याच्या मालकाचा भाऊ तिकड लांब... दूर देसात हाय म्हण, त्यो उंद्या का परवा दोन-तीन कुंटल सोन घिऊन यिणार हाय म्हण..."
"म्हणजे बातंमी खरी हाय तर?"
"संबर टक्यानं खरी हाय."
गणपत लगुलग घरी आला. यस्वदा दारात ऊबी व्हती. त्येचीच वाट बगत हुती. गणपतला फाताच ती म्हन्ली, "काय झाली का चवकसी?"
"झाली. तू म्हन्ली त्ये एकसे एक टका खरं हाय."
"मग आस्सं करा. ह्या पाटल्या घिवून जावा. शेहरात जावून मोडून टाका, न्हाई तं आस्स करा ना त्या मारोतीदाकडं जा. त्येलाच म्हणाव याची काय तरी जाळभाज करा आन त्या किंमतीत डब्बल सोनं आणा म्हून सांगा."
"यस्वदे आस गुडग्याला भासींग बांदण बरुबर न्हाई."
"समदा गाव त्याच्या मांघ लागला हाय. तुमी जा बर." यस्वदा म्हन्ली आन नाईलाज झाल्यावानी गणपत मारोतीकड निघाला.
मारुतीकडे पैलेच दोन-च्यार मान्स व्हते पर सम्दे ताकाला जावूनशानी भांड लपवल्यावाणी फात व्हते. येक-येक करीत सम्दे मान्स निघून गेल्यावर मारोती मन्ला, "बोला."
"तसं ईस्येस काय न्हाई. पर ह्यो डागिणा हाय." पाटल्या देत गणपत म्हन्ला.
पाटल्या फात मारोतीनं इच्चारलं, "याचे काय?
"ह्या ईकून सोनं घेवावं म्हन्तो."
"ऱ्हावू द्या ना. पैलेच लई आरडरी घेतल्यात."
"न्हाई म्हणू नगसा. कारभारणीचा लैच धापशा लागला हाय."
"अस्सं कर्तो हे ठिवून घेतो. परवा सांच्याला या. पैका बिक्कयाचं सोडा पर येच्या डब्बल सोनं देत्यो."
"तुमच्या मरजीनं. बर मंग यिवू का?"
"परवा सांच्याला या. गावा-बिवाला जावू नगसा बरं."
"बरं." आसं म्हणत गणपत घराकडे निघाला.
०००नागेश शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED