tu jane na - 2 books and stories free download online pdf in Marathi

तू जाने ना - भाग २

मागील भागात -
पण त्या परिवारात अनावधानाने शामिल व्हायला आलेला तो कबीर... तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग, तिचं न भूतो न भविष्यति असणारा तिचा एकेकाळीचा प्रियकर... हो प्रियकर... जो आपल्याला प्रिय असतो त्यालाच प्रियकर बोलतो ना आपण...!
______________________________________
तू जाने ना
भाग - २

असाच एक कबीर नावाचा प्रियकर जेव्हा तिच्या आयुष्यात आला आणि आयुष्यातला सगळा खेळच बदलला... कामाशिवाय कशालाच महत्व न देणारी सुहानी कशी काय त्याच्या प्रेमात पडली, हे आजवर ना राहुलला समजलं, ना रितूला... मालिकांच्या माध्यमातून लोकांच्या मनात प्रेम, मोह, माया, निर्माण करणाऱ्या सुहानीच्या स्वतःच्या हृदयात मात्र कधीच इतरांना द्यायला प्रेम नव्हतं... प्रेमात पडायला समोर माणूस पण तसाच लागतो म्हणा... हो, कबीर होता तो... "द कबीर कपूर"..!!!

त्याची गोष्टच काही निराळी होती... स्मार्ट आणि डॅशिंग व्यक्तिमत्व त्याचं... गोड गळ्याचा आवाज घेऊन कपूर घराण्यात जन्मलेला त्यांच्या घराण्याचा कुलदीपक... सुसंगत, सुसंस्कृत घराण्यात तो गेले वयाची तीस वर्ष स्व हट्टाने जगत होता... वडील श्री. राकेश कपूर हे " कपूर मोटर्स" एक भारतातली ग्लोबल लिडिंग ऑटो मोबाईल मॅन्यूफॅक्चअरिंग कंपनीचे सर्वेसर्वा, तर आई सौ.श्यामल कपूर उत्कृष्ट गृहिणी, एकुलतीएक लाडाची बहीण मिस. शमिका कपूर, जी मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती... त्याचे काका श्री. रोहन कपूर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा रुद्र हेदेखील त्यांच्या सोबतच राहत असत... काही वर्षांपूर्वी रंजना काकीचं ( रुद्रची आई) कँसर आजारामुळे निधन झालं होतं तेव्हापासून रोहन काका आपला जास्तीत जास्त वेळ ऑफिसच्या कामात घालवायचे... घरचा एवढा मोठा बिझनेस ते काळजीपूर्वक हाताळत होते... कबीर आणि त्यांची एक वेगळीच मैत्री होती... काका पुतण्या म्हणून ते दोघे कधी राहिलेच नव्हते... कबिरला ते एका मित्राप्रमाणेच, त्यामुळे तो त्यांना "अंकल रोहन" म्हणूनच हाक मारायचा... कबीरचा प्रत्येक शो ते आवडीने बघायचे... कॉन्सर्ट नाही बघता आला तर ते दुसऱ्या दिवशी CD लावून बघायचे... गप्पा मारायला त्याच्याकडे एकमेव माध्यम म्हणजे अंकल रोहन आणि रुद्र, त्यानेही नुकताच फॅमिली बिझिनेस जॉईन केला होता...

फॅमिली बॅकग्राऊंड इतका चांगला असूनही स्वतःमधल्या जिद्दीने आणि चिकाटीने त्याने गाण्यात करिअर घडवलं... वयाच्या ७व्या वर्षापासून त्याची संगीताशी जी काही नाळ जोडली ती कायमचीच... नाव कमवायचं हे एकच स्वप्न उराशी बाळगून त्याने, वयाच्या २५ व्या वर्षी एका "सिंगिंग सुपरस्टार" ह्या रिऍलिटी शो चा 'किताब पटकवला आणि तिथपासून त्याचा सेलिब्रिटी प्रवास चालू झाला... यश त्याच्या मागे होतं आणि तो यशाच्या पुढे अगदी वेगाने धावत होता... त्याच्या आवाजावर आणि दिसण्यावर अनेक मुली फिदा होत्या, त्याच्यावर जान छिडकायच्या... खानदानीच श्रीमंत असल्याने तो रुबाब त्याच्या चेहऱ्यावर आधीपासूनच झळकत होता... तसंच आयुष्यात गर्लफ्रेंडचीही काही कमी नव्हती... ते वयच म्हणा किंवा जनरेशन...!! समोरच्याला जेवढा आनंद देता येईल तेवढा द्यावा, ह्या मताचा तो होता... आयुष्य फक्त एन्जॉय करण्यासाठी असतं आणि ते प्रत्येकाने केलंच पाहिजे... पण त्याला कुठे माहीत होतं, की आयुष्यात तसला एन्जॉय हा शेवटपर्यंत पुरत नसतो, कुठेतरी थांबावं लागतंच...!!!
जेवढं त्याला स्ट्रगल करतानाही आयुष्य कठीण वाटत नव्हतं, तेवढंच ते सुहानीच्या येण्याने झालं होतं... आणि अगदी तंतोतंत सुहानीच्याही आयुष्यात कबिरच्या येण्याने घडलं होतं...

एका वर्षाआधी....
एकीकडे कबिरकडे एकामागोमाग एक कामांचा भडिमार सुरू होता... आणि त्याचप्रमाणे सुहानीलाही चॅनल्सकडून नवनवीन मालिकांची यादीच दिली गेली होती... त्या पूर्ण होत नाहीत तोवर काही चित्रपटांच्या गाण्यांची रेकॉर्डिंग्स करायची होती आणि त्यासाठी साहजिकच सध्या लोकप्रिय असलेला आवाज त्यांना हवा होता... कंपनीच्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे पुढे येणाऱ्या काही मालिका आणि तीन चार चित्रपटांचं गाण्याचं कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट कबीरसोबत करण्यात येणार होतं... आणि त्यासाठीच तो पहिल्यांदाच तिच्या ऑफिसमध्ये तिला भेटायला जाणार होता...

वेळेची पक्की असलेली सुहानी त्यादिवशी बराच वेळ कबीरची वाट बघत बसली होती आणि वेळेचा कच्चा असलेला कबीर दिलेल्या वेळेच्या दोन तासानंतरच तिच्या केबिनमध्ये दाखल झाला होता... खरंतर इतरवेळी ह्या दोघांनी एकमेकांबद्दल फक्त ऐकलं होतं पण नजरानजर होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती... सुहानी केबिनमधून निघायला आणि त्याची आत एन्ट्री व्हायची एकच वेळ... केबिनच्या दरवाजातच दोघांची ती पहिली नजरानजर होणं, अर्धा मिनिट तरी तिथेच उभं राहून एकमेकांच्या नजरेत हरवून जाणं, असाच काहीसा तिच्या टीव्ही मालिकांमधला तो सिन आज प्रत्यक्षात तिच्यासोबत घडला होता... कदाचित त्यावेळी तिथे राहुल आला नसता तर देवजाणे किती वेळ ते दोघे असेच एकमेकांना बघत उभे राहिले असते... राहुलने कबिरला आवाज देताच दोघेही भानावर आले... राहुलने सुहानिशी त्याची ओळख करून दिली... तिने तुटकशी स्माईल देऊन त्याला हॅलो म्हटलं... तिच्या अशा स्माईल मागे एकच कारण होतं, ते म्हणजे त्याचं अवेळी येणं, जे तिला अजिबात म्हणजे अजिबात आवडलं नव्हतं... त्यांचं अग्रीमेंट संदर्भात बोलणं सुरू झालं तशी सुहानी थोडी चिडूनच म्हणाली....
" राहुल, आपल्याला निघावं लागेल उशीर झालाय ना...! प्रत्येकासाठी एवढा वेळ वाट बघत बसलो तर बाकीची कामं केव्हा करणार...? निदान इतरांच्या तरी वेळेला महत्व असतं..." ती कबिरकडे रोखून बघत होती... तिच्या नजरेतला राग कबिर आणि राहुल दोघांनाही जाणवला होता... त्यावर कबीर गप्पच बसला...

" सुहानी इट्स ओके... आपण करू शकतो आत्ता मिटींग... कबीर इतर कुठल्या तरी कामात अडकला होतास वाटतं...? " राहुल परिस्थिती सांभाळून घेत म्हणाला...
" नो... नाही कुठे अडकलो नव्हतो... खरंतर माझ्या लक्षातच नव्हतं, माझी आज तुमच्यासोबत मिटींग आहे ते... सोss...! " तो अगदी आकस्मिकपणे खर तेच सांगत होता... पण ही सहजता सुहानीला त्याची आणखीन चीड यायला प्रवृत्त करत होती...
" ओssह दॅट्स ग्रेट... म्हणजे समजा उद्या रेकॉर्डिंग असेल तेव्हा तर काही बघायलाच नको... हाऊ इररिस्पॉन्सीबल यू आर...?? " ती न राहून शेवटी बोललीच...

" excuse me... हां थोडा लेट झाला मी मान्य करतो पण त्यात एवढं बोलायची गरज काय आहे ना...! माझ्या लक्षातच नव्हतं तर त्याला मी तरी काय करणार...? " कबीर थोडं नरमूनच बोलत होता... तिथलं गरम झालेलं वातावरण थंड करत होता...
" हे एक मिनिट... ते सगळं जाऊदे आपण महत्वाचं बोलूयात ओके... ही अग्रीमेंट कदाचित वाचली असशील, मी मेल केला होता आणि..." राहुल त्याच्याशी अग्रीमेंट संदर्भात चर्चा करत होता तेवढयात सुहानी मध्ये बोलली...
" राहुल स्टॉप धिस... हे बघ मिस्टर sss... काय नाव तुझं...? " सुहानीला त्याचं नाव माहीत असूनही ती तिचा attitude त्याला दाखवत होती...
" कबीर... कबीर कपूर..." आता त्यालाही तिचा राग येऊ लागला होता...
" ओके... सो कबीर कपूर आज नाही करता येणार सह्या... मला निघायचंय, एक महत्वाची मिटींग आहे माझी... आपण उद्या बोलू, माझी पी ए तुला कॉल करून वेळ देईल, त्याच वेळेत आलास तर बरं होईल... नाहीतर गाणी गाणारे बरेच आहेत इंडस्ट्रीत, ज्यांना वेळेचंही महत्व आहे आणि कामाची गरजही... ओके..." ती डोळे वटारूनच त्याच्याशी बोलत होती... ह्यावर राहुल काही बोलणार तोच तिने एका नजरेतच त्याला गप्प केलं...

तिच्या अशा वागण्याचा कबिरला आतल्या आत खूप मनस्ताप झाला होता... वेळेला घेऊन इतकं चिडणारी बाई तो पहिल्यांदा बघत होता... एकतर घाईघाईत तो कसाबसा तिथे पोहचला होता आणि साधं पाणीही न विचारता तिने कठोर शब्दांचा मारा त्याच्यावर केला होता... नवीनच सुरू झालेलं त्याचं ते करिअर इतक्या फालतू गोष्टीमुळे त्याला संपुष्टात नव्हतं आणायचं म्हणून तो काही न बोलता तिथून निघून गेला... पण तिच्या बद्दलचा राग मनात ठेवूनच... " अपना टाइम आयेगा " हे गाणंच जणू तो गुणगुणत तिथून निघून गेला...

तो तिथून गेला खरा पण त्यानंतर मात्र राहुल आणि सुहानीचे खूप वाद झाले...
" किती डोक्यात राग घालतेस दी...? मी करत होतो ना त्याला हँडल... सगळी मिटींग खराब झाली... येत्या दोन दिवसात गाणी रेकॉर्ड करायची आहेत, किती कमी वेळ आहे आणि त्यात तू..." राहुल खूप वैतागला होता...
" राहुल, आयुष्यातला एक एक क्षण किती महत्वाचा आहे ना, हे आपल्याला चांगलंच माहितीय पण ह्या अशा लोकांना त्याची जरादेखील कल्पना नसते... ह्यांना वाटतं ह्यांच्यासाठी सगळं जग थांबून राहणार आहे... बोलल्याशिवाय नाही कळत काही लोकांना..." सुहानी तिच्या केबिनच्या खिडकीतून बाहेर बघून बोलत होती...
" अगं, पण ह्याने आपलंही नुकसान होतंय हे तरी बघावं ना...! त्याने उद्या नाही केलं आपल्यासोबत अग्रीमेंट तर, किती महागात पडेल माहितीय का तुला...? " राहुल तिला समजावत म्हणाला...
" अरे, हा काय एकटाच लागून आलाय का...? सिंगर म्हणे... अरे असे छप्पन आणून ठेवेन... तू दुसरा बघ कोणीतरी... तो नीरज जुनेजा आहे ना त्याला घे... एक तर त्याची स्वतःची चूक, त्यावर सॉरी म्हणायची ही पद्धत नाही साधी त्याला... आणि ज्याला वेळ नाही पाळता येत त्याचं काहीच होऊ शकत नाही..." सुहानीच्या तोंडात फक्त कठोर शब्दांनाच जागा होती...
" दीss यू आर इम्पोसीबल... कबीरची सध्या क्रेझ आहे मार्केट मध्ये... त्याने गायलेल्या गाण्यानेही आपला मुव्ही हिट जाऊ शकतो अँड यू नो एव्हरीथिंग मग का असं बोलतेयस...? तू एक काम कर, तू ह्यामध्ये पडूच नकोस... मी करतो हे सगळं मॅनेज... प्लिज... तू शांत हो आधी..." तो तिला समजावत होता...
" बघ... तुला जमेल ते कर... नाहीतरी मला काही इंटरेस्ट नाहीए... चल निघुया... रितू कुठेय...?" ती केबिनच्या बाहेर पडत म्हणाली...
" अगं, ती आज लवकर गेली ना... आणि हो, तू निघ माझं एक काम पेंडिंग आहे ते करून निघतोच..." राहुल काहीतरी आठवत म्हणाला...
" ओके... सांभाळून ये..." ती तिच्या ड्राइव्हरला कॉल लावत म्हणाली...

ड्राइव्हर गाडी घेऊन केव्हाचाच खाली येऊन उभा होता... ती घरी जायला निघाली... रस्त्याने जाताना एका सिग्नलजवळ तिला कारला टेकून उभा असलेला कबीर दिसला... त्याच्या बाजूला एक मुलगी आणि समोर काही मित्र बोलत उभे होते... ती बराच वेळ त्याच्याकडे बघत होती... तेवढयात त्याचंही लक्ष तिच्या गाडीकडे गेलं पण नेमका तेव्हा सिग्नल सुटला आणि गाडी सुसाट वेगाने निघून गेली... नाहीतरी काळ्या काचा चढवलेल्या गाडीत तसही त्याला काय दिसणार होतं म्हणा...

"अरे कबीर , कुठे बघतोयस..." त्याच्या शेजारी उभी असलेली रूप त्याच्या भिरभिरत्या नजरेकडे बघत म्हणाली...
" अरे यार... तिचीच कार होती वाटत ती..." कबीर म्हणाला...

" कोणाची रे...? " मयंकने विचारलं... मयंक हा त्याचा बालमित्र...
" तीच मॅडम... सो कॉल्ड सुहानी दीक्षित..." तिचं नाव उच्चारायलाही त्याला त्रास होत होता... त्याच्या डोक्यातच गेली होती ती...
" अरे... हिप्नॉटाईज केलं वाटत तिने ह्याला...प्रभाsssव... तुला सगळीकडे दिसतेय मगाचपासून ती... " मयंक त्याला चिडवत होता.... तसे सोहम आणि प्रिन्स हेही मित्र हसायला लागले...

" अरे तू त्याच सुहानी दीक्षितबद्दल बोलतोयस का जी आपल्याच कॉलेजमध्ये होती..." सोहम आठवत म्हणाला...
" हो तिच...पण सुहानी नाही घमंडी सुरपणखा महान तिला..." कबीर म्हणाला...
" घमंडी तर तेव्हापासूनच होती ती, कोणाशीही जास्त बोलायची नाही, फक्त कॉलेजच्या इव्हेंट ला तेवढी पुढे पुढे असायची... shows वगैरे मस्त बसवायचीही... शी इज सुपर टॅलेंटेड हं... कसली क्रिएटिव्ह आहे ती..." सोहम म्हणाला...

" हम्मम... तेव्हाही होती आणि आत्ताही आहेच की, नाहीतर इतक्या मोठ्या कंपनीची मालकीण नसती झाली.... सही ना...! " मयंक म्हणाला...
" तुम्ही माझे मित्र आहात की तिचे रे...? माझ्यासमोर तिची तारीफ करताय... "" कबीर रागातच बोलत होता...
" कबीर, तेव्हा हे तुझेच बोल होते जे आम्ही फक्त आत्ता बोलतोय... विसरलास एकेकाळी तू पण फॅन होतास तिचा... हां तिने कधी तुला भाव नाही दिला ती गोष्ट वेगळी आहे..." मयंक सोहम ला टाळी देत म्हणाला...

" कसली टॅलेंटेड, आज असं वाटत होतं गळा दबावा तिचा... इतकी घमेंड येते कुठून... डोक्यात हवा गेलीय जास्त, खूप नाव आहेना इंडस्ट्रीत, काय म्हणे तर सुपर क्रिएटिव्ह वुमन... माय फूट... अशी सूनवत होती मला जसं काय मला विकतच घेतलंय हीने... तिथेच अग्रीमेंट फाडायची इच्छा झाली होती पण म्हटलं जाऊ दे, आत्ता आत्ता कुठे आपली चलती आहे त्यात अशा लोकांना इग्नोर केलेलंच बरं...! " कबीर मनातला सगळा राग ओकत होता... त्याचे लाल लाल झालेले डोळे त्याला अपवाद होते...

" कुल बेब... ह्या अशा मुली स्वतःला जास्त शहाण्या समजतात... आय नो हर वेरी वेल... हिच्या सिरियल्स मध्ये काम नसते करत ना, तर मीच एक तिच्या कानाखाली वाजवून आले असते तेही फक्त तुझ्यासाठी..." रूप कबिरचा हात हातात घेऊन म्हणाली...

रूप चोप्रा कबिरची सध्याची गर्लफ्रेंड... सुहानीच्या " तेरे घर के सामने " ह्या हिंदी मालिकेत एक छोटीशी भूमिका करत होती... तिच्या स्ट्रगलिंग लाईफमध्ये तिला कबीर सारखा गडगंज संपत्ती असलेला बकरा तरी कुठे मिळणार होता...? तिचं नशीबच म्हणावं किंवा तिने चातुर्याने विणलेलं जाळ ज्यात कबीर सहज फसला गेला होता... तिचं त्याला इतकं समजून घेणं, खोटी खोटी काळजी दाखवणं त्याला खरं वाटत होतं... त्याच्या आयुष्यात मुलींची काही कमी नव्हती पण त्यातल्या त्यात गेल्या काही महिन्यांपासून रूपच तग धरून बसली होती...

घरच्या बिझिनेस मध्ये लक्ष घालायचं सोडून गाणी गाणारा एकमेव मुलगा त्याच्या वडिलांना नेहमीच खटकत होता... ह्यावरून त्या दोघांचे घरात फक्त वादच होत असायचे... एकीकडे वडिलांची बोलणी तर दुसरीकडे आई व दादीची अपार माया आणि इतर सगळ्यांचं प्रेम... पण तरीही तो वडिलांच्या प्रेमाला नेहमीच मुकलेला असायचा... सिंगिंग सुपरस्टार ची ट्रॉफी मिळवूनही त्याचे वडील राकेश कपूर काही खुश नव्हतेच... त्यांच्या तोंडून दोन कौतुकाचे शब्द ऐकायला तो नेहमीच आसुसलेला असायचा आणि आता त्यात भर घातली होती ती सुहानीने... कारण इतका मोठा गायक असूनही तिनेही त्याला किंमत दिली नव्हती... त्यामुळे त्याचा मूड ऑफ झाला होता... पण रूप त्याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याचं सांत्वन करत होती... ती त्याची केवढी मोठी हितचिंतक आहे हे त्याला दाखवत होती...

त्यामुळे साहजिकच त्यालाही रूप बद्दल आत्मियता वाटत होती... पण तरीही का कोण जाणे सुहानी काही त्याच्या डोक्यातून जातच नव्हती... कदाचित त्याला डबल क्रॉस करणारी ती पहिलीच मुलगी होती... ती ना त्याच्या दिसण्यावर भाळलेली, ना त्याच्या आवाजावर... तो तिच्याच विचारात गुंतला होता...

" अरे हे काय...शमिका आणि रुद्र पण आले... चला आता..." प्रिन्स म्हणाला...

शमिका आणि रुद्र आज पहिल्यांदाच रुपला भेटत होते... कबिरचा खराब झालेला मूड फ्रेश करायला म्हणून त्याने ह्या सगळ्यांना बोलावून घेतलं होतं... आणि तशीही त्याची एका नवीन अल्बमची पार्टीही बाकी होती... त्यात तो स्वतःही चमकणार होता... त्याने रूप ची ओळख करून दिली...

" हे रूप... मिट माय ब्युटीफुल सिस्टर शमिका अँड माय यंग ब्रो रुद्र..." दोघांनीही रुपला शेकहॅन्ड केलं...

" माझीही ओळख सांग कबीर...! " रूप जरा लाडातच म्हणाली...

" अरे हो आणि ही रूप... नावाप्रमाणेच आहे ना छान...? आय मिन ऍक्टर आणि मॉडेल आहे... " त्याने अशी ओळख करून देताच शमिका आणि रुद्र एकमेकांकडे पाहू लागले... रूपचं कबिरशी असं लाडात बोलणं त्या दोघांनाही आवडलेलं नव्हतं... कबिरलाही ते कळायला वेळ लागला नव्हता...

ते सगळे द मिंट पब मध्ये गेले... ड्रिंक्स आणि फूड ची ऑर्डर देऊन झाली... काहीवेळाने सगळेच पार्टी एन्जॉय करू लागले होते... त्याच्या त्या अल्बम मध्ये रुपलाही काम करायची इच्छा होती आणि त्यासाठी तिने त्याला मस्का लावायला घेतलाच होता... " कबीर, मलाही तुझ्या अल्बम मध्ये चान्स मिळाला असता तर किती मज्जा आली असती ना रे...! आपण एकत्र एक सॉंग केलं असतं... वाव किती मस्त ना...! काश माझं हे स्वप्न पूर्ण झालं असतं तर...! "ती केविलवाणा चेहरा करत म्हणाली... पण करिअरच्या सुरुवातीला स्वतःचे नखरे, स्वतःच्या डीमांडस् दाखवून उपयोग नाहीए, हे कबीर चांगलं जाणून होता... त्यामुळे त्याने तसं काही आश्वासन तिला दिलं नव्हतं... उलट त्यावर त्याने तिला व्यवस्थित समजावलं...

काही वेळाने सगळे डान्स फ्लोअर वर नाचायला गेले... रूप कबिरच्या गळ्यात हात रोवून डान्स करत होती, जे शमिकाला मुळीच आवडत नव्हतं... पण इतरही फ्रेंड्स असल्याने ती त्याला काहीच बोलली नाही... डान्स करता करता अचानक त्याला सुहानीचा चेहरा दिसू लागला आणि पुन्हा त्याचा चेहरा उतरला... एकाएकी त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव शमिका आणि रुद्रच्या नजरेतून काही सुटले नव्हते... त्याच्याशी बोलायचा निर्णय घेऊन, ती दोघही त्याला त्या पबच्या बाहेर घेऊन गेले आणि काय घडलंय हे जाणून घेऊ लागले... इतरवेळी कधी तो ड्रिंक्स न घेणारा आज इतका प्यायलेला हे पाहताच क्षणी शमिका त्याचं काहीतरी बिनसल्याचं समजून गेली होती... दोघांच्या प्रश्नांचा भडिमार झाल्यावर एव्हाना कबिरही पोपटासारखा बोलू लागला होता... त्याने सुहानीच्या ऑफिसमधील घडलेला सगळा प्रकार दोघांनाही सांगितला... त्यावर तर शमिकाला आधी हसूच आलं पण कबिरच्या एका कटाक्षाने तिने ते हसू दाबलं...

" अरे... बरोबर आहे ना भाई... तुला वेळेचं काही महत्त्वच नाहीए... खर सांगू, जोपर्यंत काहीच नव्हतास ना तू, तोपर्यंत सगळं कसोशीने पाळत होतास, मग ती रिहर्सलची वेळ असो किंवा दादी ला डॉक्टरकडे घेऊन जायचं असो... तू सगळं वेळेतच करायचास... पण जेव्हापासून नाव मिळालंय ना तेव्हापासून बराच बदलला आहेस... एकाही मुलीकडे कधी ढुंकूनही न बघणारा तू, गेल्या वर्षभरात किती गर्लफ्रेंड झाल्या रे तुझ्या...? करिअर अजून आहे भाई ते संपवायचं नाहीए, पुढे न्ह्यायचं आहे..." शमिका हाताची घडी घालून त्याला योग्य तेच सांगत होती... त्याची लहान बहीण आज त्याच्यापेक्षा मोठी झालीय असं त्याला वाटत होतं...

पण मोठ्यांनी जर का लहानांच ऐकलं तर मोठं असल्याचा काय उपयोग ना, अपमान आहे तो... म्हणून तो तिच्या वरचढ बोलू लागला... " शsssमा, मी तसाच आहे अजूनही, मेडिकलssचा अभ्यास जास्तच करायला लागली आहेस... मला नको शिssकवूस... आय एम "दिss कबीर कपूssर" माझ्या नादी नाही लाsगायचं समजलं... त्याss सुsssहानीला तर तिच्या कsssर्माची फळ भोगायचीच आहेत..." ड्रिंक्स घेतल्यामुळे त्याला धड बोलताही येत नव्हतं...

" ए भाई... तू उगाच माझ्या मेडिकल मध्ये घुसू नकोस हा... खर ते बोलतेय... बरं झालं ती सुहानी बोलली ते...! " शमिका पण आता तावातावाने बोलत होती... कबिरही त्यावर प्रत्युत्तर देतच होता...

रुद्र ने मध्यस्थी केली नसती तर कदाचित त्यावेळी शमिका आणि कबिरचं खूप जोराचं भांडण झालं असतं...

" भाई... एक मिनिट , एक मिनिट... आपण भांडत का आहोत, ह्यावर सोल्युशन पण काढता येईल ना..." रुद्र त्या दोघांनाही शांत करत म्हणाला....

" हो तिला तर मीss सोssडणारचं नाहीssए..." कबीर त्याच्याच धुंदीत बडबडत होता...

त्याच्याशी आत्ता काहीच बोलून उपयोग नव्हता हे जाणून रुद्रने पब मध्ये जाऊन बिल पे केलं आणि कबिरची तब्येत ठीक नाहीए असं त्याच्या मित्रांना सांगून त्याला घेऊन तिथून थेट घरी गेला...


क्रमशः----------◆

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED