tu jane na - 3 books and stories free download online pdf in Marathi

तू जाने ना - भाग ३

भाग - ३

आज ऑफिसमध्ये सुहानी कबिरशी जे काही वागली होती, ते आठवून ती थोडं विचित्रच फील करत होती... कोणाला असं घालून पाडून बोलणं हे तर तिच्या स्वभावात नव्हतं पण वयाच्या १२-१३ व्या वर्षात त्या निरागस डोळयात तो द्वेष, तो राग तिचे बाबाच देऊन गेले होते... आणि त्यात आज भर म्हणजे सकाळीच डॉक्टर अमेय साठे ह्यांनी तिच्या आईच्या खालावत चाललेल्या तब्येतीबद्दल सांगितलं होतं... "त्यांनी जगण्याची आशाच सोडली तर त्यातून त्या वाचणं शक्य नाहीए..." डॉक्टर साठ्यांचे हेच शब्द तिच्या कानात घुमत होते... आपली आई आता जीवन आणि मृत्यूच्या दारावर तिच्या आयुष्याची कमी होत जाणारी वेळ बघत उभी आहे, ह्या जाणिवेनेच तिने आज ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं होतं... सकाळपासून तिच्या त्या वागण्याला संपूर्ण स्टाफ बळी पडत होता... ही गोष्ट राहुललाही माहीत असल्याने तो आज ऑफिसमध्ये पूर्णवेळ तिचं आणि स्वतःचं असं दोन्ही काम बघत होता... नेमकं आज कबिरही ह्याला बळी पडला होता... वेळ खूप महत्वाची आहे, पण ती तिच्या आईजवळ नव्हती... बेडरूमच्या बाल्कनीत उभी राहून ती समुद्राच्या लाटांना बघत त्यांच्याकडे आपलं दुःख मांडत होती... आईची आठवण होताच ती आईच्या रूमकडे धावली... शांतपणे झोपलेली तिची आई एका लहान मुलासारखी तिला भासत होती... डोळ्यात तरळलेलं पाणी तिच्या परवानगी शिवाय बाहेर पडत नव्हतं... काही वेळ आईच्या पायापाशी ती अशीच बसून होती... मनातल्या मनात आई जगण्याची माफक अपेक्षा करत होती... तिला शोधत शोधत काहीवेळाने आजी तिथे आली... तिला असं आईच्या पुढ्यात हिरमुसलेलं पाहून आजीलाही गहिवरून आलं होतं... आजीने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला... ती लगेच आजीला बिलगली, इतका वेळ रोखलेला अश्रूंचा बांध अखेर तुटला... आईची झोपमोड होऊ नये म्हणून आजी तिला बाहेर घेऊन आली...

" त्या माणसाने माझ्या आईचं आयुष्य उध्वस्त केलं... काय हक्क होता त्याला असं करायचा...? एखाद वेळेस त्याचं मरण मी पत्करलं असतं पण असा विश्वासघात करणं... नाही... काय त्या माऊलीची चूक...? कुठे चुकली ती...? त्याच्यावर प्रेम केलं म्हणून की त्याच्यावर विश्वास ठेवून लग्न केलं म्हणून...? " तिचे प्रश्न खूप होते पण त्या प्रश्नांची उत्तरं आजीकडेही नव्हती...

" पोटच्या पोराने असं काही करावं, ह्याहून मोठं दुःखं ते काय...? मीही त्यादिवसापासून तीळ तीळ तुटलेय... माझे संस्कारच कुठेतरी कमी पडले बाळा... तुझी आई तर पतिव्रता आहे, स्वतःच्या आधी इतरांचा विचार करणारी... ती सोडून गेली तर मीही जगणार नाही..." आजी रडू लागली...

" आजी नको ना असं बोलूस... काही होणार नाही माझ्या आईला... मी मोठयातला मोठा डॉक्टर करेन आणि तिला बरं करेन... ती नक्की बरी होईल पण तू धीर नको सोडूस... तू आहेस म्हणून हे घर आहे आणि आम्ही आहोत... तू अशी खचलीस तर आम्ही कोणाकडे बघायचं...? " सुहानीने तिला शांत केलं, समजावलं आणि बेडरूममध्ये नेऊन झोपवलं...

ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून फक्त दुःखच तिच्या पदरात पडत होतं... तिने एकवार संपूर्ण घरावर नजर फिरवली आणि विचार करू लागली... " का असं...? इतकं मोठं घर आणि माझं कुटुंबच असं एकेक करून कमी होत गेलं तर मी काय करू ह्या घराचं...? आज बाबांनाही , बाबा कसले , 😡 तो माणूस.. त्याला इतक्या वर्षात माहित झालं असेलच की त्याच्या मुलांनी किती नाव कमवलंय, किती मोठं घर घेतलंय ते... वाटलं होतं ह्या सगळ्याला भुलून तरी तो परत माझ्या आईकडे येईल पण आता वाटतंय वाट न बघणंच योग्य राहील... शेवटी मेलेली माणसं कुठे परत येतात...?? आईसाठी नसेल पण माझ्यासाठी तो केव्हाच मेला..." विचारचक्रात तिला केव्हाची तरी झोप लागली...

सकाळ होताच कबीर ताडकन उठला... डोकं जड झालं होतं त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटत होतं... तितक्यात रुद्र स्वतः त्याच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आला...

" गुड मॉर्निंग भाई... डोकं दुखत असेल ना...? " रुद्र हसतच म्हणाला...

" गुड मॉर्निंग ... अरे यार खूपच दुखतंय, काल जास्त घेतली ना...!! " कबीर स्वतःचं डोकं दाबत म्हणाला...

" हे घे लिंबू पाणी... मला तर वाटलं कालचं काहीच तुझ्या लक्षात नसेल..." रुद्र त्याला ग्लास देत म्हणाला...

" थँक्स..." तो लिंबू पाणी पीत कालचं सगळं आठवायचा प्रयत्न करत होता पण सुहानीच्या उद्धट वागण्याशिवाय त्याला काही आठवतच नव्हतं...

बराच वेळ तसाच गेला, तेवढयात शमिका त्याच्या रूम मध्ये आली... तिला बघून कबिरने छानशी स्माईल दिली... पण ती मात्र नाक मुरडत गप्पपणे उभी होती... तिची तर त्याच्याशी बोलायची इच्छाही नव्हती पण तरीही भाई म्हणजे तिची जान होता आणि त्याची कालची अवस्था पाहता ती न राहवून त्याची विचारपूस करायला तिथे आली होती...

" तुला काय झालं...? कोणी काही बोललं का...?" कबिरने शमिकाला विचारलं...

" हो आजकाल कोणी काहीही बोलून जातं... तुला सांगून काय उपयोग म्हणा..." शमिका कुश्चितपणे बोलत होती...

" अरे, तू माझ्याशी का वाकड्यात बोलतेस...? मी काय बिघडवलं आता हीचं...? " तो शमिका आणि रुद्रला पाहून म्हणाला... त्याला काही आठवत नाही हे ऐकून शमिकाला खूप वाईट वाटलं होतं, ती नाक मुरडून तिथून निघून गेली...

रुद्रने काल घडलेला सगळा प्रकार कबिरला सांगितला... त्यावर कबिरला स्वतःचीच घृणा वाटू लागली... शमिकाला कसं समजवायचं त्याला चांगलंच ठाऊक होतं... तो स्वतःशीच हसला... " वेडाबाई..."

रुद्र ने कालच्या प्रकरणाचा गांभीर्याने विचार केला होता... त्याला कबिरची काळजी होती, त्याला त्याच्याबद्दल एक आदर होता... त्यामुळे तो त्याला त्याच्या मनात जे काही आलं होतं ते सांगू लागला...

" भाई, मी काल विचार केला... ऐक, बघ तुला वेळ लक्षात नाही राहत आहे, तुला जर विसरायला होतंय तर तू एखादा मॅनेजर ठेव, जो तुझी कामं सोपी करेल... तुझ्या डेट्स वगैरे मॅनेज करेल, म्हणजे तुलाही ते फ्युचर मध्ये उपयोगी पडेल... आता तुझ्या कामाचाही भार वाढलाय, मग सगळं तू करण्यापेक्षा मॅनेजर ठेवणं हे बर पडेल ना...! " रुद्रने एका दमात सांगून टाकलं...

" तू बरोबर बोलतोयस पण तुला माहितीय मी इतर कोणावर अवलंबून नाही राहत... मला ते आवडतच नाही आणि इतर कोणावर विश्वास ठेवणं मला जमणारही नाही..." कबीरला युक्ती तर आवडलेली पण काही भाग पटत नव्हता...

" ओके भाई... हे बघ माझ्यावर विश्वास आहे का तुझा...? " रुद्रने काहीतरी आठवून विचारलं...

" हे काय विचारणं झालं...? यू आर माय ब्रो..." कबीर म्हणाला...

" ओके, मग आतापासून मी तुझ्या सगळ्या डेट्स वगैरे मॅनेज करेन... सो नो टेन्शन..." रुद्र

" नको रे बाबा... माझ्या पूज्य पिताश्रींना कळलं ना तर माझ्यासकट तुलाही घराच्या बाहेर काढतील... तू त्यांचा बिझिनेस बघणार की माझं काम सांभाळणार...? नको मी खातोय ना त्यांच्या शिव्या त्याच खूप आहेत..." कबीर त्यालाच उलट समजावत होता...

" अरे... बस काय भाई , तुझ्यासाठी मला शिव्या खाव्या लागल्या तर त्याही गोड असतील माझ्यासाठी...😊 " रुद्र त्याला त्याच्यापरीने समजवायचा संपूर्ण प्रयत्न करत होता...

" सध्यातरी तू बिझनेस सांभाळ, मला गरज लागलीच तर नक्की तुलाच सांगेन... बाय द वे, तुझे डॅड आणि मेरा फ्रेंड अंकल रोहन हैं किधर...? " कबीर हसत म्हणाला...

" मला तुझी काळजी घ्यायला सांगून ते गेले ऑफिसला... काल त्यांच्यामुळे तुला घरी आणता आलं नाहीतर खरं नव्हतं तुझं...? " रुद्र घाबरतच सांगत होता...

काल रात्री जेवणं आटपून सगळेच हॉल मध्ये बसले होते... कबिरचे डॅड कसली तरी फाईल चाळत होते, तर मॉम दादीशी बोलत होती आणि रोहन अंकल घराबाहेर येऊन फोनवर बोलत उभे होते... तेवढ्यात कबिरची गाडी येताना त्यांना दिसली आणि त्यातून नशेच्या धुंदीत बाहेर पडलेला कबिरही...त्याला ह्या अवस्थेत कोणी बघण्या आधी त्यांनी त्याला मागच्या दाराने त्याच्या बेडरूमपर्यंत आणून बेडवर झोपवलं होतं... तसंच रुद्र आणि शमिकाला कबिरची काळजी घ्यायलाही सांगितली होती... त्यांनी घरातल्यांच्या नजरेतून त्याला कसं वाचवलं ते सगळं रुद्रने कबिरला सांगितलं तेव्हा कबिरला पुन्हा एकदा स्वतःची घृणा वाटली... रुद्र ला एक महत्वाचं काम असल्याने तो ऑफिसला निघून गेला...

कबीर असा विचारातच बेडवर पडून होता... तोच काहीवेळाने त्याचा फोन खणाणला... दीक्षित प्रॉडक्शन मधून कॉल होता... कबिरने वाकडं तोंड करतच कॉल घेतला...

" हॅलो सर, आज तुम्ही किती वाजता येऊ शकता...?" सुहानीच्या पीए ने जो काही प्रश्न केला तो ऐकून कबीर आश्चर्यचकित झाला होता... तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला... तसा तो जरा भानावर आला...

" तुमच्या मॅडमना विचारून सांगा किती वाजता आलं तर चालेल...? मी येईन वेळेवर..." कबीर दात ओठ खातच म्हणाला...

" नो सर, त्यांनी तुमच्याकडूनच वेळ घ्यायला सांगितली आहे... आज त्या संपूर्ण दिवस ऑफिसमध्येच आहेत, फक्त एक वेळ सांगितली तर मला त्यांचं बाकीचं शेड्युल बनवायला बरं पडेल..." ती बिचारी पीए स्वतःचं काम करत होती...

कबिर तर तिच्यावरही डाफरला असता पण त्यात तिची तरी काय चूक म्हणा... त्याने घड्याळात बघून तिला दुपारी १ ची वेळ दिली... तसही बारा वाजलेच होते आणि तिचं ऑफिस हे कपूर विला पासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर होतं... तिने ओके म्हणत फोन ठेवला... काल सारख्या चार गोष्टी ऐकायला नको म्हणून तो पटापट आवरून तयार झाला... रेड टी शर्ट आणि ब्लू जीन्स मध्ये तो खूपच भारी दिसत होता... निघता निघता अंगभर परफ्युम चा फवारा मारला आणि डोळ्यावर गॉगल चढवून तो निघाला... शमिकाच्या बेडरूमपाशी येताच त्याला तिची माफी मागायचं लक्षात आलं होतं पण तिच्याशी बोलत बसलो तर पुन्हा उशीर व्हायचा आणि त्या महामायेला तेवढंच कारण मिळायचं... संध्याकाळी आल्यावर बोलेन शमाशी, असा विचार करून तो आपली कार काढून निघून गेला...

इथे सुहानीने राहुलशी कबिरबद्दल बोलून घेतलं होतं... ठरल्याप्रमाणे आज तीच त्याच्याशी डिल करणार होती... डोकं शांत ठेवेन, ह्या एका अटीवर राहुलही तयार झाला होता... ती फोनवर बोलतच होती की इतक्यात कबिरने "मे आय कम इन...? " म्हणत तिच्या केबिनमध्ये एन्ट्री घेतली... पहिली दहा सेकंद तरी ती त्याच्याकडे एकटक बघतच बसली... त्याने पुन्हा विचारल्यावर ती भानावर आली... तिच्या बोलक्या डोळ्यांनीच त्याला आत यायची परवानगी दिली... चेहऱ्यावर खोट स्मितहास्य करत समोरच्या खुर्चीवर तो बसला... पाच दहा मिनिटं अशीच गेली, ती तिच्या खुर्चीवरून डावी उजवीकडे घिरक्या घेत अजूनही फोनवरच बोलत होती... आता मात्र त्याला तिचा राग येऊ लागला होता... तो वेळेवर येऊनही तिने त्याला हवा तसा रिस्पॉन्स दिला नव्हता म्हणून त्याची चिडचिड वाढत होती... तिने एक दोनदा त्याच्यावर नजर फिरवली पण तो कॉल अर्जंट असल्याने तिला बोलावं लागत होतं... स्वतःला कुल ठेवण्यासाठी त्याचे प्रयत्न चालूच होते... तो कंटाळून तिचा संपूर्ण केबिन न्हयाहळत होता... अचानक त्याचं लक्ष तिच्या टेबलवर ठेवलेल्या फोटोफ्रेम कडे गेलं ज्यात ती, राहुल आणि दोन लेडीज होत्या... कदाचित तो तिचा फॅमिली फोटोच असावा असा विचार करून तो आता तिचं फोनवरच बोलणं केव्हा संपतंय ह्याची वाट बघत बसला... शेवटी एका वेळेला तिने फोन ठेवला आणि त्याच्याकडे वळली...

" सो, मिस्टर.... क... कबीर..." ती त्याचं नाव आठवत म्हणाली...

" येस मिस. सोनी..." तोही तिची जिरवायला म्हणाला...

" excuse me... सोनी नाही मिस. सुहानी... सुहानी दीक्षित... गॉट इट..." ती रोखून पाहत म्हणाली...

" ओह... सुहाssनी... नाव तर छान आहे पणsss...!!! " तो अर्ध्यावर गप्प बसला...

" पण काय...?? " तिने आठ्या पाडून विचारलं...

" Anyways... तसा मी तर वेळेतच आलेलो पण आज तुझं वेळ पाळायचं राहून गेलं बहुतेक...! ठीक आहे, तसा मी खूप कूल आहे, नाकावर राग नाही घेऊन फिरत मी... आपण कामाचं बोलूया..." कबीर जरा उद्धटपणेच बोलत होता... त्याचा कालचा आणि आजचा राग अंतर्मनात कुठेतरी खदखदत होताच...

" ओ हॅलोss... एकच काम नाहीए मला इथे... बऱ्याच गोष्टी असतात... तुझ्यासारखं फक्त गाणं गात बसले ना, तर बघायलाच नको... तुला काय, एक तेवढंच येत असणार, त्याव्यतिरिक्त काही टॅलेंट आहे का...? " तिच्या नाकावर तर राग बसलेलाच होता, फक्त कबिरने आल्या आल्याच त्या रागाची तार छेडली होती...

" हाऊ डेअर यू...? माझ्या प्रोफेशनबद्दल बोलायची तुझी हिंमतच कशी झाली...? समजतेस कोण तू स्वतःला...? " कबीर ताडकन खुर्चीवरून उठत तिच्यावर बोट दाखवत भांडायला लागला...

मग काय आता ज्या गोष्टीची भीती होती तेच पुन्हा घडलं... त्याला आवरणं हे स्वतःलाच कठीण झालं होतं... त्यांच्या भांडणाचा सूरही सा पासून नि पर्यंत लागला होता, जो बाहेरच्या स्टाफलाही ऐकू जात होता... राहुलला कळताच राहुल आणि रितू दोघेही धावत धावतच तिथे गेले... शक्य तितक्या लवकर ती परिस्थिती दोघांनीही हाताळली... रितूने सुहानी ला तर राहुलने कबिरला कसंबसं शांत केलं... बघता बघता सिच्युएशन अंडर कंट्रोल आली होती... कबीर मात्र एकही क्षण तिथे न थांबता निघून गेला... त्याचा पारा तर इतका चढला होता की त्याने रागाच्या भरात थेट घर गाठलं आणि बेडरूम मध्ये जाऊन स्वतःला लोक करून घेतलं...

इथे सुहानी शांत तर झाली होती पण आता राहुल चिडला होता... " दी, काय झालं एवढं चिडायला...? "

तो कशाप्रकारे तिच्याशी उद्धटपणे बोलत होता, ते तिने सगळं राहुलला सांगितलं... आता त्या गोष्टीवर मात्र सुहानी आणि राहुल हे एकमेकांशी वाद घालत बसले... आणि त्या दोघांना शांत करायचं काम रितू करत होती... सगळं निवळल्यावर राहुल ने कबिरला कॉल केला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागितली... त्याच्या घरी येऊनच अग्रीमेंट साइन करण्याचंही राहुलने त्याला सांगून टाकलं... इथे मात्र, " इतकं सगळं झालं तरीही हे लोकं माझ्यासोबतच का डिल करत आहेत...? नक्कीच काहीतरी गडबड आहे..." हा मनात विचार येताच कबिरने त्याच्या जिवाभावाच्या मित्राला म्हणजेच मयंकला कॉल केला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला... त्यावर मयंकच्या तरी एक गोष्ट लक्षात येत होती...

" कबीर, आय थिंक, त्यांना फक्त तूच सिंगर म्हणून हवा असणार... तुझा आवाज याssर, म्हणजे बघ सध्या तू पॉप्युलर आहेस आणि तुझ्या गाण्यांचा त्यांच्या मुव्हीज, सीरिअल ह्या सगळ्यालाच फायदा होणार असेल... त्यामुळेच तर तुला आज तुझ्या वेळेनुसार बोलावलं आणि त्याss सुहानी दीक्षित सोबत इतकं भांडण होऊन देखील त्यांना तुझ्याशिच अग्रीमेंट करायचंय म्हणजे हे क्लीअर आहे... दे ओन्ली निड्स यू... मला तरी असंच वाटतंय बाकी तूही विचार कर..." मयंकने जो काही निष्कर्ष काढला होता, तो बरोबर होता आणि कबिरलाही असंच काहीसं वाटत होतं... त्याला ह्याच गोष्टीचा आता फायदा घ्यायचा होता... जशी हरणाला जाणीव नसते, की कस्तुरी आपल्याच बेंबीत आहे, तशीच अवस्था कबिरची होती... पण आत्ता कुठे तरी त्याला ह्याची जाणीव होऊ लागली होती... त्याने रात्रभर विचार केला आणि एक प्लॅन बनवला...

सकाळी राहुलने स्वतःहून कबिरला कॉल केला... पहिला कॉल कबीरने मुद्दामून उचललाच नव्हता मग दुसऱ्यांदा जेव्हा कॉल आला तेव्हा मात्र तो बोलला...

" हॅलो राहुल, बोल..." कबीर.

" ऐक ना, आज फ्री असशील तर मी स्वतः येतो घरी तुझ्या आपण कॉन्ट्रॅक्ट पेपर्स साइन करूयात..." राहुल

" राहुल मला हे बरोबर नाही वाटतंय... खरंतर माझी इच्छा खूप होती तुमच्यासोबत काम करायची पण जर का माझ्या प्रोफेशनवर कोण बोलणार असेल तर ते मला नाही रे सहन होत... म्हणून मला थोडा वेळ हवाय... कदाचित हे काम करायचं की नाही हे सध्यातरी मी नाही ठरवू शकतय... प्लिज ट्राय टू अंडस्टँड..." कबीर पण तुक्का मारूनच बोलत होता... इतकं मोठं हातात आलेलं काम त्याला सोडायचंही नव्हतं पण त्याने ती रिस्क शेवटी घेऊन बघितलीच... त्याला सुहानीकडून माफी मागवून घ्यायची होती...आणि त्यासाठी केलेला हा त्याचा प्लॅन ...

आता मात्र राहुलला काही शब्दच मिळत नव्हते... तरीही त्याने कबिरला बराच वेळ समजावण्याचा प्रयत्न केला... पण त्याचा काही उपयोग होत नव्हता... तो हर्ट झालाय हे त्याच्या बोलण्यातून सहजच समजत होतं... त्याने फोन ठेवल्यावर राहुलची सुहानीसोबत पुन्हा बाचाबाची झाली...

" हे जे एवढं उभं केलंयस ना, ते लवकरच डबघाईला येताना दिसतंय मला... रागावर नियंत्रणच नाही हीचा... बिझनेस करणाऱ्याला डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते पण हीच्याजवळ ना बर्फ आहे ना साखर... " राहुल रितूसमोरच सुहानीला खरीखोटी सूनवत होता...

" शट अप राहुल, ऐकून घेते म्हणून काहीही बोलायचं नाही मला... एवढा काय नखरे करतो तो, चलं फोन लाव त्याला मी बोलते त्याच्याशी..." सुहानी म्हणाली...

" मला काय कुत्रा चावलाय... आणि काय गं त्याच्या प्रोफेशनवरून का बोललीस तू...? काही असो तो टॅलेंटेड आहे म्हणूनच इथवर पोहचलाय, नाहीतर त्याचा बाप खूप मोठा बिझनेस मॅन आहे , खानदानीच श्रीमंत आहे तो... त्याला गरज पण नाहीए आपल्याकडे काम करायची... आपल्या सारख्या छप्पन कंपन्या तो एकटा विकत घेईल समजलं ना..." राहुलच्या ह्या बोलण्याने सुहानी पण भानावर आली... तिने एवढ्या मेहनतीने उभं केलेलं हे सगळं असंच नव्हतं जाऊ द्यायचं... तिचे डोळे आत्ता खरे उघडले... दोन तीन दिवस सतत होणारी तिची चिडचिड तिलाच थांबवावी लागणार होती...

" राहुल, तू नको टेन्शन घेऊस... मी बघते काय ते...! त्याचा ऍड्रेस दे..." सुहानी

राहुल काही तिला पत्ता द्यायला तयार नव्हता पण रितूच्या सांगण्यावरून त्याने तिला त्याचा पत्ता आणि अग्रीमेंट चे पेपर्स दिले... त्या दोघीही कबिरच्या घरी जायला निघाल्या...

इथे कबीर जरा टेन्शनमध्येच होता... काय करावं काहीच सुचत नव्हतं म्हणून तो शमीकाच्या बेडरूममध्ये गेला... ती अभ्यास करत बसली होती... तो दरवाजा ठोठावत आत गेला...

" हम्मम आज आठवण आली का माझी...? " ती डोळ्यावरचा चष्मा नीट करत म्हणाली...

" सॉरी शमू... त्यादिवशी जरा जास्तच बोललो... काल पण तिने तसंच केलं गं..." त्याने काल जे काही घडलं ते सगळं सांगितलं...

ते सगळं ऐकून आता मात्र शमीकाला सुहानीचा रागच आला होता पण एका गोष्टीचं छानही वाटत होतं ती म्हणजे भाई वेळेवर गेला होता... काल इतक्या दिवसांनी तो वेळेच्या आधी कुठेतरी गेला होता... तिने त्याला शांत व्हायला सांगितलं...

" भाई, तू सॉरी नको म्हणुस, मी तर तुझ्यापेक्षा खूप लहान आहे... पण जिथपर्यंत मला कळतंय तिथपर्यंत हेच सांगेन की जे आपल्या नशिबात असतं तेच मिळतं... जर ते काम तुझ्या नशिबात असेल तर तुला मिळेल नाहीतर नाही... हे नाही तर दुसरं... त्यात एवढं टेन्शन कशाला घेतोयस...? चिल मार... तू इथेच बस मी वीणा मावशींना (घरकाम करणारी बाई) आपल्यासाठी कॉफी करून द्यायला सांगते..."

तिने किचनमध्ये कॉफीची ऑर्डर दिली... हॉल मध्ये मॉम काहीतरी काम करत होती... दादी स्वतःच्या खोलीत आराम करत होती तर बाकी सगळे ऑफिसला गेले होते... रुद्र कसलीतरी फाईलं घ्यायला नुकताच ऑफिसमधून घरी आला होता... खाली हॉलमधला सगळा आढावा घेऊन ती परत वर आपल्या बेडरूममध्ये आली आणि कबिरशी मनसोक्त गप्पा मारत बसली... पण कबीर थोडा टेन्शन मध्येच होता... चूक काय बरोबर काय हे समजण्या पलीकडे त्याचे विचार धावत होते...

" भाई, एक सांगू ती रूप..." शमा बोलता बोलता थांबली...

" बोल शमा... जे काही मनात असेल ते बोल..." कबीर

" रूप मला नाही आवडली... तुझ्या टाईपची नाहीए ती... " ती असं बोलताच तो हसला...

" हम्मम... अगं तू आत्ताच भेटलीस तिला... हळूहळू ओळख झाली तर नक्की आवडेल ती तुला... तशी खूप काळजी घेते हं ती माझी... दिवसातून चार पाच फोन तर असतातच तिचे... खूप केअर करते ती..." कबीर तिच्याबद्दल भरभरून सांगत होता...

" हो का...? पण त्यादिवशी तू नशेत होतास, आणि तुला आम्ही घेऊन आलो तेव्हा एकदाही तिने बाहेर येऊन तुझी चौकशी नाही केली... रुद्रने सगळ्यांना सांगितलं तेव्हा फक्त मयंक आणि सोहम बाहेर आले आणि तो जेव्हा आत बिल पे करायला गेला तेव्हा ती इतरच कोणत्या तरी मुलासोबत नाचत होती... रुद्रने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं म्हणून म्हटलं तुला सांगावं..." शमिका ने त्याला सगळं सांगितलं...

" हे बघ तेवढी स्पेस आम्ही एकमेकांना देतोच... आणि कदाचित ओळखीचं असेल कोणीतरी तिच्या... इव्हन ती ज्या क्षेत्रात काम करते त्यामध्ये पुष्कळ ओळखी होत असतात... बट ती खरंच खूप चांगली आहे... तिचा सकाळीच कॉल येऊन गेला, काळजी करत होती ती माझी..." कबीरला रूपमधल्या चांगल्याच गोष्टी बघायची सवय झाली होती...

" भाई, तू तिच्याशी लग्न वगैरे करायचा विचार तर नाही करत आहेस ना...? बघ म्हणजे आधी पारखून घे मग ठरव... " शमिका चाचपडतच बोलत होती...

" अच्छा...? जे नशिबात असणार तेच मिळणार, हे कोणीतरी आत्ताच मला सांगत होतं..." कबीर तिच्या डोक्यात हलकीच टपली मारत म्हणाला...

" हो ते तर आहेच, तुझ्या नशिबातली तुला भेटेलच पण हिच्यापासून थोडं दूरच रहा... एवढंच सांगेन... बीकॉझ एक औरतही दुसरी औरत को अच्छे से जान सकती हैं...! " शमिका तिच्या परीने त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढत होती...

" हो माझे आई... लांब राहीन... अजून काही... चलं तू अभ्यास कर मी अंकल रोहनला कॉल करतो... काल त्याला पण सॉरी बोलायचं राहून गेलय..." त्याने रोहन अंकलचा नंबर लावत मोबाईल कानाला लावला... पण ते काही फोन उचलत नव्हते... कदाचित कामात व्यस्त असेल हा विचार करून कबिरने फोन बाजूला ठेऊन दिला...

तेवढयात विजू ( वीणा मावशींचा मुलगा) कॉफी देऊन जातच होता तेवढयात कबिरने त्याला हाक दिली...

" विजू, काय रे...? परीक्षा होती ना तुझी...? कसे गेले पेपर्स काही बोलला नाहीस...? " कबिरने सहजच त्याला विचारलं...

विजू एक १८- १९ वर्षाचा तरुण... हुशार आणि बुद्धिमान... त्याचे आई वडील खूप आधीपासूनच कपूर विलाचे केअर टेकर होते... त्याच्या वडीलांच्या निधनानंतर तो आईला कामात मदत करायचा... त्याची शिक्षणाची आवड कबिरने विजूच्या लहानपणीच ओळखून त्याची जबाबदारी उचलली होती... आता तो कॉलेजला जात होता... कबीर त्याच्यासाठी देवापेक्षा काही कमी नव्हता... त्याचा प्रचंड आदर तो करायचा आणि त्याला घाबरायचाही तितकाच...

" हो भाई, छान मस्त..." विजूने जेमतेम उत्तर दिलं ...

" छान की मस्त....? " कबिरने गंमतीने विचारलं...

तसा विजू त्याच्याकडे बघून हसला... तितक्यात अंकल रोहनचा कॉल आला... विजू निघून गेला... कबीर कॉफीचा मग हातात घेऊन फोनवर बोलत शमीकाच्या रूम बाहेर पडला... त्याने त्यांची कालच्या घटनेबद्दल माफी मागितली... कबीरसाठी त्यांचं मनच इतकं मोठं होतं की ते त्याच्यावर रागावले जरी असले तरी कबिरच्या एका फोन ने ते वितळून जायचे... फोन ठेवता ठेवता त्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, जो त्यांनी अखेर कबिरला विचारलाच...

" कबीर... ही सुहानी कोण...? " त्यांच्या अनपेक्षित प्रश्नाने कबीर दोन सेकंद गप्पच बसला... त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला... तो काल नशेच्या धुंदीत तीचं नाव घेत होता... तिला सोडणारच नाही असंच काहीसं बडबडताना त्यांनी ऐकलं होतं...

" अरे, तिच्यामुळेच माझं काल डोकं खराब झालं होतं आणि त्यामुळेच मी ड्रिंक केलं..." कबिरने दीक्षित प्रॉडक्शनमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगितला त्यावर ते हसायलाच लागले...

" म्हणजे भेटली म्हणावं तुला तुझ्या तोडीची..." अंकल रोहन त्याची टेर खेचू लागले...

" काय रे तू पण... ती एवढी घाण वागली माझ्याशी आणि तू हसतोयस काय...? " कबीर त्यांच्यावर थोडा नाराज झाला...

" अरे हसू नाहीतर काय करू... तुला काय वाटतं सगळेच तुझ्या आट्यात येतात, ही पहिली मुलगी मी पाहिली की जिने तुझ्या नाकात दम करून ठेवला... काय तू कबीर...! पण काही म्हण हां तिच्यामुळे आज वेळेत तरी गेलास... " ते हसत हसतच बोलत होते...

" तू गप्प बस हां, माझा आधीच मूड खराब आहे, तू अजून नको करुस... चल बाय ठेवतो मी..." कबिरने वैतागतच फोन ठेवून दिला पण रोहन अंकल अजूनही हसतच होते...

तो त्याच्या रूमकडे जाणार तोच त्याला रुद्र स्वतःच्या बेडरूममधून बाहेर पडताना दिसला... तो रुद्रला घेऊन बाल्कनीत गेला... रुद्र ने काल जो काही प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला होता तो कबिरला कुठेकुठे पटला होता... त्याच संदर्भात तो रुद्रशी बोलत उभा होता... बाल्कनीत ते दोघेही बोलत उभेच होते की तितक्यात त्याला एक कार आलेली दिसली... त्याला ती कार ह्याआधी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती पण आठवत नव्हतं... त्यातून सुहानी उतरलेली पाहताच कबिरच्या काळजाचा ठोकाच चुकला... तो डोळे चोळत चोळत मनाची खात्री करून घेत होता... त्याने रुद्र कडूनही ती सुहानी दीक्षितच असल्याची खात्री करून घेतली... त्याची खात्री पटताच तो जोरात " येस " म्हणून ओरडला... तसा रुद्र त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला...

" भाई काय झालं...? आर यू ओके...? " रुद्र काळजीपोटी विचारत होता...

" रुद्र, मी विचार करतोय तू आजपासून माझा मॅनेजर होच... आज तुला पहिलं काम देतोय मी... सो बी रेडी... " रुद्रला हे ऐकून तर खूपच आनंद झाला पण कबिरने अचानकपणे घेतलेलं हे डिसीजन त्याला कोड्यात टाकत होतं... तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं...

" भाई, काय काम करायचंय मला...? " रुद्र ने विचारताच कबिरने त्याला त्याचा प्लॅन सांगितला...

" अरे पण तू घरीच आहेस ना... मग...? "रुद्र म्हणाला...

" हे बघ, मी सांगतोय तेवढंच कर आणि काही वाटलंच तर मला फोन कर... मी सांगेन मग पुढे..." कबिरने सगळं नीट समजावून त्याला खाली पाठवलं...

सुहानी कार मधून बाहेर येताच ती दोन मिनिटं तो कपूर विलाच बघत बसली... तिच्या बंगल्याच्या दुप्पट मोठा तो विला होता आणि त्यापेक्षा चौपट सभोवतालच लॉन... बाजूलाच हिरवगार गवत, त्याच्या शेजारी स्विमिंग पूल आणि चारही बाजुंनी रंगीबेरंगी फुलांनी वेढलेली बाग... त्यात मधोमध असलेला तो पांढरा शुभ्र कपूर विला... रितू आणि सुहानी क्षणभर तो सगळा परिसर निरखून बघत होत्या...

" चल जाऊया ना आत...? " रितूच्या आवाजाने ती भानावर आली...

" हो हो...चल... " सुहानी ..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED