भाग - ४
दरवाजाची बेल वाजवताच विजूने दरवाजा उघडला... मॉम आणि दादी पण हॉल मध्येच बसल्या होत्या...
" कबीर कपूर आहेत का...? " रितूने विचारताच विजूने कबिरच्या मॉमला कबिरला दोन मुली भेटायला आल्याचं सांगितलं... दादी आणि मॉम एकमेकिंकडे आश्चर्याने बघू लागल्या...
" विजू, येऊ दे त्यांना आत...? " रुद्र जिन्याने खाली उतरत म्हणाला... त्यांना आत घेऊन विजू किचनमध्ये निघून गेला...
" हॅलो मी रितू बर्वे आणि ह्या मॅडम सुहानी दीक्षित, दीक्षित प्रॉडक्शन लिमिटेडच्या एम डी... " रितूने ओळख करून दिली...
" हॅलो... मी रुद्र कपूर... ही माझी दादी आणि ही मॉम (रुद्रची आई नसल्याने तो कबिरच्याच आईला मॉम बोलायचा)... बसा ना...! " रुद्रने शेखहॅन्ड करत ओळख करून दिली... त्या दोघींनीही दादी आणि मॉमला हात जोडत स्मितहास्य दिलं...
" थँक्स..." त्या दोघीही बसल्या... दोघीही संपूर्ण घरभर नजर फिरवत होत्या... बाहेरून जेवढा प्रशस्त आतून तेवढाच विलोभनीय होता तो विला... काही वेळातच विजूने त्यांना पाणी आणून दिलं... त्या पाणी प्यायला...
" काही घेणार...? चहा कॉफी...? " रुद्रने विचारलं...
" नाही काहीच नको... ऍकच्युली आम्ही कबिरला भेटायला आलो होतो... ते अग्रीमेंट साइन करायचं होतं... बोलवालं का त्यांना...? " रितू म्हणाली...
" अच्छा कबिरकडे काम आहे का...? मी विजूला सांगते बोलवायला... तुम्ही बसा..." दादी आणि मॉम कधीपासून एकमेकींकडे बघून काहीतरी वेगळाच विचार करून हसत होत्या... मुलींनी त्यांच्या घरी यावं हे त्या दोघींनाही खूप वाटायचं पण सून म्हणून... त्यामुळे कबिरला भेटायला आलेल्या त्या दोघींनाही त्या नखशिखांत न्ह्याहळत होत्या... पण त्या काहीतरी काम घेऊन आल्या असल्याचं त्यांना कळलं तेव्हा त्यांचा हिरमोड झाला आणि त्या दोघीही आत निघून गेल्या...
कबिरच्या मॉमने ( श्यामल ताईंनी) विजूला कबिरला बोलवायचा निरोप देऊन दादीला घेऊन आत गेल्या... तेव्हा कुठे रुद्रच्या जिवात जीव आला कारण त्यांच्यासमोर त्याला खोटं बोलताच आलं नसतं... तो सावरून बसला...
" ओहह... पण भाई तर घरी नाहीए... तुम्ही येण्याआधी कळवलं होतं का...? " रुद्र म्हणाला...
ह्याच्या मॉमने तर त्या नोकराला वर कबिरलाच बोलवायला पाठवलं ना..? मग हा का तो घरी नसल्याचं सांगतोय...? सुहानीच्या मनात सहजच प्रश्न घोळला... ती आश्चर्याने एकवार रुद्रकडे पाहिलं आणि वर धावत गेलेल्या विजूकडे पाहिलं...
कबीर वरून लपून लपून बघत होता... त्यांचं जे काही संभाषण चालू होतं ते त्याला व्यवस्थित ऐकू येत होतं... त्याला बोलवायला आलेल्या विजूलाही त्याने गप्प राहायला सांगितलं तसा विजू गुपचुप किचनमध्ये परतला....
" कदाचित राहुलने केला असेल त्याला कॉल... त्याला फोन करून विचारून घ्या... नाहीतर तो पुन्हा विसरला असेल..." सुहानी पटकन बोलून गेली तसं रितूने तिचा हात दाबला...
सुहानीला कबीर घरीच असणार ह्याचा अंदाज आला होता...
" म्हणजे...? " रुद्र
" तुम्ही बघाना त्यांना कॉल करून ते कुठे आहेत म्हणजे त्यांना भेटता आलं असतं... आज अग्रीमेंट काही करून साइन करणं गरजेचं आहे... पर्वा पासून रेकॉर्डिंग करायचंय..." रितू त्याला विनंतीपूर्वक बोलत होती...
" हे बघा, त्याच्या एका अल्बमची आज मिटींग आहे , तो तिथेच गेलाय... येत्या एक दोन दिवसात त्याचंही रेकॉर्डिंग सुरू होणार आहे... माझ्या माहितीप्रमाणे तो तुमच्या कंपनीसोबत डिल नाही करत आहे ना...?! " रुद्र फक्त कबिरने सांगितलेली वाक्य बोलत होता...
" काय...? तो असं नाही करू शकत... त्याने शब्द दिलाय... अग्रीमेंट करायच्या आधीच आम्ही त्याच्या डेट्स घेतल्या होत्या... वेळ नाही तर शब्द तरी पाळावा माणसाने... व्हॉट अ रेडिक्युलस...? " सुहानी ताडकन उभी राहून तावातावाने म्हणाली... तो हे मुद्दाम करतोय, हे तिला मनोमन वाटत होतं... रितूने तिला शांत बसायला सांगितलं...
" हे बघा सुहानी जी, मला जे माहितीय ते मी तुम्हाला सांगितलं बाकी तुम्ही त्याच्याशी स्वतःहून बोलून बघा..." रुद्र सौम्यपणे बोलत होता...
" रितू, आय वॉन्ट टॉक टू हीम राईट नाऊ..." सुहानी ला आता त्याचा प्रचंड राग येत होता पण एकबाजूला ती आतल्या आत स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्नही करत होती...
रितूने बाबा पोता करून कबिरला फोन लावायला सांगून तिथे बोलावून घेतलं... रुद्र त्यांना तिथेच बसवून स्वतःच्या कामाला निघून गेला... ऑफिसमधून अर्जंट कॉल आल्याने रितूला परत जाणं गरजेचं होतं त्यामुळे ती सुहानीला चार चांगल्या आणि शांत बसायच्या गोष्टी सांगून तिथून निघून गेली... जाताना ती टेन्शन मध्येच गेली... गेला तासभर सुहानी तिथेच बसली होती आणि कबीर वर खुर्चीत बसून सुहानीची मज्जा बघत होता... इतक्या वेळात तो बसल्याजागी तिथेच झोपी गेला आणि तिची दोन वेळा कॉफी पिऊन झाली होती... संध्याकाळचे पाच वाजत आले तरीही तो काही आला नव्हता... सुहानीचाही बसल्या जागी डोळा लागला आणि इथे कबीरच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला तसा तो दचकून जागा झाला... त्याला शमिकाने उठवलं होतं...
" भाई... काय आहे हे...? ती बिचारी कधीची आलीय आणि तू तिला इथेच बसवून ठेवलंयस...? बदला घेतोयस का...? " तिच्या बोलण्याने तो जरा सावरून बसला आणि पुन्हा खाली वाकून पाहू लागला...
ती सोफ्यावर बसूनच होती... तो शमा ला डोळा मारत हसला...
" आत्ता बघ, हिची झोपच कशी उडवतो ते...! " कबीर हसत खाली गेला...
" हा काय करेल आणि काय नाही... जाऊदे मला अभ्यास आहे बाबा..." शमिका स्वतःच्या कपाळावर हात मारत तिच्या बेडरूम मध्ये निघून गेली...
तो जिन्याने खाली गेला आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला... तिला शांत झोप लागली होती... वाऱ्याच्या झुळुकेने तिच्या केसांची बट अलगद तिच्या गुलाबी गालावर येत होती... तिचा तो झोपतानाचा चेहरा किती निरागस वाटत होता पण जागेपणी मात्र तापट रागीट... तिच्या त्याच चेहऱ्याकडे पाहता कबीर तिच्यात हरवून गेला... करायला एक आलेला आणि त्याच्यासोबत काहीतरी वेगळंच होत होतं... तिच्या गालावरची केसांची बट त्याने हळुवारपणे मागे सारली... तशी ती दचकून जागी झाली... त्याच्या आणि तिच्यात आता एक वित अंतरच उरलं होतं... त्याच्या डोळ्यात बघत ती जरा सावरून बसली... त्याला इतकं जवळ बघून तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं...
तिने घड्याळात पाहिलं तसा तोही भानावर येत मागे सरकला... ती ताडकन उभी राहिली... आपल्याला एवढा वेळ ह्याने मुद्दामूनच बसवून ठेवलं ह्याचा तिला प्रचंड राग आला होता... ती काही उद्घटपणे बोलणार तोच तिला रितूचे शब्द आठवले... तिने तिचे ओठ दाबले आणि दीर्घ श्वास घेतला... तो तिच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या हावभावाकडे बघत मनातल्या मनात हसत होता... तिला काय बोलावं हे सुचतच नव्हतं म्हणून तिने काही न बोलता ते पेपर्स त्याच्या हातात ठेवले... त्याने ते सहजच चाळले... त्याचं लक्ष पेपर्स मध्ये असताना तिने एक दोनदा त्याच्याकडे चोरून पाहिलं... पण त्याने बघताच तिने नजर दुसरीकडे फिरवली... त्याने तेच पेपर्स परत तिच्या हातात ठेवले... तसं तिने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं... त्याने सह्या न करता ते असेच दिले होते...
शेवटी तिने स्वतःचं मौन व्रत तोडलं आणि त्याला म्हणाली... " आपलं बोलणं झालंय कबीर... तू इतर काम नाही घेऊ शकत... "
" असं कुठे लिहिलंय का...? मी तुला शब्द दिल्याचा एकही पुरावा आहे का तुझ्याजवळ...? " कबीर स्पष्टच बोलत होता...
" पुरावा माय फूट..." ती स्वतःशीच पुटपुटली...
" काही म्हणालीस का...? " कबीर
" नाही... होss म्हणजे ते sss..." तिला आज पहिल्यांदाच कसं बोलावं हेच सुचत नव्हतं... तरीही ती पुढे म्हणाली... " गेलेली वेळ आणि दिलेला शब्द परत कधीच येत नाही... त्यामुळे विचार कर आणि ह्या पेपर्सवर सही कर... शेवटी डिसीजन तुझं आहे..." ती ते पेपर्स पुन्हा त्याच्या हातात ठेवून जाऊ लागली तसं त्याने तिला थांबवलं...
" माझं डिसीजन झालंय... मला तुझ्यासारख्या घमेंडी मुलीसोबत काम करण्यात काही एक रस नाहीए... " कबीर तिला उक्सवत होता... जणू काही त्याला आता त्यांच्यामधली तू तू मैं मैं आवडू लागली होती... तिच्याकडून काहीतरी उलट सुलटच ऐकायला मिळेल ह्या उद्देशाने तो तिच्याकडे बघत होता...
पण ती काही एक न बोलता तिथून निघत होती... पण कबिरला तिला असं जाऊनच द्यायचं नव्हतं... त्याच्या अपमानाचा बदलाही त्याला घ्यायचा होता... तिने आपली माफी मागावी हेच त्याला वाटत होतं... तो तिला खिजवत होता पण तिने त्यावर ब्र देखील काढला नव्हता... तो तिच्या मागे मागे बाहेर गार्डन पर्यंत गेला... तरीही ती काहीच बोलत नव्हती...
" बहिरी आहेस का..? मी तुझ्याशी बोलतोय..." शेवटी त्याने तिच्या मनगटाला घट्ट आवळत तिला पुढे जाण्यापासून अडवलं, तशी ती किंचितशी विव्हळली... तिने एकवार त्याने पकडलेल्या तिच्या हाताकडे तसंच त्याच्याकडे पाहिलं... आता मात्र तिच्या डोळ्यात फक्त राग दिसत होता... चेहरा रागाने लालबुंद पडला होता... तिने लागलीच मागे वळून दुसऱ्या हाताने त्याच्या साटकन कानाखाली वाजवली... तसा तोही हादरला... काहीतरी भलतंच होऊन बसलं होतं... त्याचा हात झटकून तिने आपला हात सोडवून घेतला आणि गाडीत बसून निघून गेली...
कबीर ने जो विचार केला त्याविरुद्धच होऊन बसलं होतं... ती चपराक त्याच्या हृदयात खोलवर बोचली होती... तो रागातच आपल्या बेडरूम मध्ये निघून गेला...
इथे सुहानीचे डोळे प्रचंड आग ओकत होते... ऑफिसमध्ये आल्या आल्या ती रितू आणि राहुलला भेटली... घडलेला सगळा प्रकार तिने दोघांच्याही कानावर घातला... आता मात्र राहुललाही कबीरचा राग आला होता... तो त्याला कॉल करून जाब विचारणारच होता पण सुहानीनेच ते प्रकरण न वाढवण योग्य समजलं... तिने तो विषय तिथेच संपवायचा निर्णय घेतला... आता तिचा निर्णय म्हणजे शेवटचा... त्यावर दोघांनीही सहमती दर्शवली होती...
तीन महिने असेच निघून गेले... सहाजिकच त्याच्या हातून ते कॉन्ट्रॅक्ट तर निघून गेलंच होतं... पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात खूप काही बदललं होतं... त्याचं वर्ष - दोन वर्षाचं कामाचं खूप बुकिंग झालं होतं... त्याला आता एकही दिवस फुरसत नव्हती... रुद्र त्याच्या सगळ्या डेट्स व्यवस्थित बघत होता... कामाचा प्रचंड ताण होताच पण त्या घटनेपासून कबिरचा मध्ये मध्ये संताप होत होता... आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या गालावर एका मुलीने श्रीगणेशा काढला होता आणि ते तो विसरू शकत नव्हता...
तो नुकतंच त्याच्या एका अल्बमच्या शूटिंगसाठी तीन दिवस उटीला जाणार होता... रूपलाही त्याच्यासोबत जायची खूप इच्छा होती पण तिच्या नेहमीच्या शुटींगमुळे ते शक्यच नव्हतं... दुसऱ्या दिवशी सकाळची फ्लाईट असल्याने तो रात्री आपली बॅग भरून झोपायची तयारी करतच होता की तितक्यात अंकल रोहन त्याला भेटायला आले...
" सो, रॉकस्टर झाली का पॅकिंग...? " ते म्हणाले...
" hey ये ना, बसं...! " कबीर त्यांना पाहून खूप खुश झाला...
गेले बरेच दिवस तो कोणालाही नीट भेटला नव्हता, ना बोलला होता... सतत कोणत्यातरी विचारात गढून जायचा... त्याच्या वागण्यातले बदल इतर कोणी नाही पण अंकल रोहन ने बरोबर हेरले होते... तिने आपल्या मुस्काटात लगावून दिली ही गोष्ट कबीरने त्यांनाही सांगितली नव्हती...
" मग, कसा आहेस आता...? " त्यांच्या अचानक आलेल्या प्रश्नाने तो बावचळला...
" अं... मीss मला काय झालंय, मी एकदम फर्स्टक्लास...! " तो उगीच हसत म्हणाला...
" हम्म... तसं असेल तर छानच आहे रे...! चल झोप मग आता उद्या लवकर उठायचंय ना...! दादीला पण भेटून घे , विचारत होती तुला... !! " ते त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले...
" अरे हो... बघ आजकाल कामाच्या गडबडीत विसरूनच जातो रे... वेळही मिळत नाही... मी भेटतो तिला आत्ताच..." म्हणत तो दादीच्या रूमकडे गेला...
दादी नुकतीच झोपायची तयारी करत होती की तेवढ्यात कबीरने तिला हाक दिली...
" ओए... माय सेक्सी दादी... इतक्या लवकर झोपतेयस हो..." कबिरचा आवाज ऐकताच दादीच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित झळकलं...
त्याने लगेच दादीला जाऊन एक घट्ट मिठी मारली... तिनेही त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवला... दादीने जवळजवळ वयाची ७५ पार केलेली तरीही चेहऱ्यावर एक वेगळच तेज, मंद हास्य... सलवार कमीज हा तिचा आवडता पोशाख... त्यामुळे कबीर जेव्हा कुठे जायचा तेव्हा तिथून एक तरी सलवार सूट तो दादीसाठी आणायला विसरत नव्हता... दादी म्हणजे त्याची जान... तिने बोलायला आणि ह्याने ते करायला... इतकी छान गट्टी होती दोघांची... कबिरच्या वडिलांना कबिरचं करिअर पूर्ण करण्यासाठी मनवणारी दादीच होती... घरात तिच्या पुढे कोणाचं काहीच चालत नव्हतं आणि त्यामुळेच कबिरचंही फळत होतं... तो जेवढं तिच्यावर प्रेम करायचा तेवढाच तिला घाबरूनही होता... कबीर दादीशी बराच वेळ गप्पा मारत बसला होता... त्यावेळी दादीने त्याच्या लग्नाचा विषय काढला...
" कबीर बेटा, आता फक्त नात सुनेचा चेहरा बघितला म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी..." कबीर दादीच्या मांडीवर डोकं ठेवून पडला होता... पण हे ऐकताच तो ताडकन उठून बसला...
" हे ... तू नको ते काही बोलणार नाहीस हां... तुला किती वेळा सांगितलंय नको असं बोलत जाऊस..." कबीर
" हो रे नाही बोलणार पण नात सुनेची ओढ लागलीय आता त्याचं काय...? "
" त्याचं बघू... मी उटीहून आल्यावर बोलू..." कबीर तो विषय टाळायचा प्रयत्न करत होता...
" दरवेळी मला हेच चुरण देऊन कटव हं... मागच्या वेळेस त्या दीक्षित प्रॉडक्शनचं काम संपल्यावर बोलला होताssस, त्यानंतर दिल्लीवरून आल्यावर म्हणालास... आणि आत्ता हे कारण... अश्याने तर माझी इच्छा अपूर्णच राहणार बहुतेक..." दादी बोलतच होती पण दीक्षित प्रॉडक्शनचं नाव निघताच कबिरचा चेहरा लाल झाला... त्याच्या डोळ्यासमोर त्या सर्व घटना पुन्हा फिरू लागल्या...
" काय रे...? तुझ्याशी बोलतेय मी, लक्ष कुठेय तुझं...? "
" हो आहे इथेच आहे... तुला बरी सगळ्या प्रॉडक्शनची नावं लक्षात...? " कबीरला तिच्या बुद्धीचा हेवा वाटत होता...
" अरे मग शरीराने म्हातारी झालेय, दिलं और दिमाग दोनो अभीभी जवान हैं...! " दादी हसत म्हणाली तसा कबिरही हसला...
" हम्मम... मग उगाच नाही म्हणत मी तुला सेक्सी दादी... अजूनही बाहेर पडलीस ना, तर चार पाच बुढे असेच मरतील... डायरेक्ट हार्ट फेल..." 😜 कबीर
" चल नालायका... " दादीने कबिरला एक फटका दिला... तो हसत हसत तिला बाय गुड नाईट म्हणून तिथून पळून गेला...
जाता जाता मात्र डोक्यात सुहानीचे विचारच घेऊन गेला... सकाळी ७ चा अलार्म लावून तो कसाबसा झोपी गेला...
इथे सुहानी तिची ऑफिसची कामं आटोपून सहज टीव्ही लावून तिच्याच केबिनमध्ये बसली होती... चॅनेल चेंज करता करता तिला एका म्युजिक चॅनेल वर कबीर गाताना दिसला... त्याला पाहताच क्षणभर तो किस्सा तिच्या डोळ्यासमोरून झपकन गेला तसा तिने चॅनेल बदलला... जवळजवळ सगळ्याच म्युझिक चॅनेलवर त्याचीच गाणी दिसत होती, त्याच्या नवीन गाण्यांच्या प्रमोशनच्या जाहिराती झळकत होत्या... आता मात्र प्रत्येक ठिकाणी त्याचं तोंड बघून ती वैतागली होती आणि हे सगळं रितू दरवाजात उभी राहून बघत होती...
" नाही आवडत आहे तर बंद करून बसायचं ना, तेच तेच चॅनेल सतत चाळून तो दिसणारच ना...? " रितू
रितुकडे लक्ष जाताच तिने टीव्ही बंद करून खाडकन रिमोट टेबलावर आपटला...
" बापरे, अजूनही इतका राग आहेच तर...! " रितू हसत म्हणाली...
सुहानीने एक कटाक्ष तिच्यावर टाकला... तशी ती गप्प बसली...
" ओके ते जाऊदे... ही घे तुझी उद्याची फ्लाईटची तिकीट... आता घरी चल उद्याची पॅकिंग करायची आहे ना...! " रितू
" हे लग्न नसतं ना, तर गेलेच नसते... मला एक समजत नाही, लोकं इतक्या लांब का लग्न करतात आणि हे काय आहे डेस्टिनेशन वेडिंग बिडिंग...? एवढं सगळं करून नंतर घटस्फोटच घेतात ना...? " सुहानी नाराजीतच बोलत होती...
" लेटेस्ट ट्रेंड आहे... आपणही आपल्या मालिकांमध्ये दाखवतोच की डेस्टिनेशन वेडिंग, प्रि वेडिंग फोटोशूट, हनिमूनसाठी वेगळं डेस्टिनेशन, बर्फ त्यातला रोमांस आणि बरंच काही... आणि त्यात प्रत्येकाचा घटस्फोट होतोच असं नाहीए... उलट आपल्या कथेत आपण दोन प्रेमींना एक करतो... हॅप्पी एंडिंग..." रितू फुल हातवारे वगैरे करत बिनधास्त बोलत होती... खरंतर तिला हसवायचा प्रयत्न करत होती...
" हो, हे सगळं काल्पनिक कथेत होतं... रिअल लाईफ मध्ये नाही होत... " सुहानी केबिनच्या बाहेर पडत म्हणाली...
" कधी कधी रिअल मध्ये पण असं होतं... जाऊदे तू मस्त संगीत, वेडिंग अटेंड कर... आपण त्यानंतर भेटूच..." रितू.
राहुल पण त्याच्या केबिनच्या बाहेर येत सुहानीला म्हणाला... " काय मग ऑल सेट ना... सांभाळून जा उद्या आणि काही गरज लागली तर कॉल कर..."
" कॉल करण्यापेक्षा तुम्ही दोघेही आला असता तर...? " ती राहुल आणि रितूला म्हणाली...
" दी, तुला माहितीय ना, आईसाठी आपल्या दोघांपैकी इथे एकजण असणं गरजेचं आहे आणि उद्या ते नवीन डॉक्टर संदीप रेगे त्यांच्याकडे आईची अपॉइंटमेंट पण घेतली आहे, मग मी कसा येणार...? आणि बाय द वे, काव्या तुझी चांगली मैत्रीण आहे... माझ्यापेक्षा तू तिथं असणं जास्त महत्वाचं आहे..." राहुल तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला...
" आणि माझं पण काय कामं...? खरंतर तुला जास्त गरज आहे ती ब्रेकची... आपण दोघी इथेही सतत सोबत असतो, तिथेही तेच मग फ्रेश कशी होशील...?? सतत कामाचे तेच तेच विषय होणार आपले... आणि तू नाहीस म्हटलं तर इथली माझी कामं तशीही वाढतातच..." रितू कारणांवर कारणं देतच होती...
" ओके ओके कळलं... चला आता...😊 " तिघंही हसत हसतच बाहेर पडले...
सुहानीने घरी जाताच बॅग पॅक केली... थोडं जेवण करून आईच्या खोलीत गेली... आज बऱ्याच दिवसांनी आई जागी असलेली तिला दिसली... तिने तिच्या तब्येतीची विचारपूस केली... ती आईचा हातात हात घेऊन तिच्या शेजारीच बसली होती... पण तिची आई तिला काहीच रिस्पॉन्स देत नव्हती... फक्त शून्यात नजर लावून बसली होती... ती काहीच बोलत नव्हती... काहीवेळाने ती झोपली तशी सुहानी बाहेर आली... आजीशी काहीवेळ बोलून ती तिच्या खोलीत झोपायला गेली...
फ्लाईट ची वेळ झाली होतीच... सुहानी वेळेतच जाऊन खिडकी शेजारील सीटवर बसली... बोर्डिंग च्या वेळेला कबिरचं नाव पुकारताना तिने ऐकलं होतं त्यामुळे तोही ह्याचं फ्लाईट मध्ये असणार ह्याची तिला पूर्व कल्पना मिळाली होती... म्हणून त्याला बघून तिला धक्का तर नक्कीच बसणार नव्हता... "अजूनही मॅनर्स नाहियेत ह्याला" असं बोलून ती मॅगझीन चाळत बसली होती...
एअरपोर्ट वर कबिरला बघताच बऱ्याच मुली त्याच्याकडे धावून गेल्या होत्या... कोणी त्याच्यासोबत सेल्फी घेत होतं, तर कोणी ऑटोग्राफ... कबीर त्याच्या चाहत्यांना कधीच नाराज करत नव्हता त्यामुळे त्याने बऱ्यापैकी तिथली परिस्थिती हाताळली आणि आणखी गर्दी होण्याआधी तो वॉशरूम मध्ये पळाला... आरशासमोर त्याने बराच वेळ तिथेच घालवला होता, कोणी ओळखू नये म्हणून डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल चढवून तो बाहेर आला...
साहजिकच त्याला तिथून बोर्डिंग गेटपर्यंत पोहचायला थोडा वेळ लागलाच आणि त्यामुळेच त्याच्या नावाची घोषणा सतत होत होती... आता त्याला घेतल्याशिवाय तर फ्लाईट निघूही शकत नव्हतं... नेमका तो तेवढयात पोहोचला आणि घाईघाईत आपली बॅग वर हॅन्ड लगेज कंपार्टमेंट मध्ये ठेवून धापा टाकतच धाडकन सीटवर बसला... पण त्याला आपल्या अगदी शेजारच्याच सीटवर बघून आता मात्र सुहानीला नक्कीच धक्का बसला होता... एकवार त्याच्याकडे पाहून तिने पुन्हा मॅगझीन मध्ये तोंड खुपसलं...
त्याने आजूबाजूचा आढावा घेत, आपल्या शेजारच्या सीटकडे पाहिलं तर त्यालाही ४४० वोल्ट चा झटका बसला... तिला बघताच त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावरचे क्षणातच भाव बदलले... " तू...? " 😲
" व्हॉट ...? " त्याच्या भलत्याच प्रश्नावर तिने असं रिऍक्ट केलं होतं...
" तुला हीच सीट मिळाली का...? की मुद्दामून मला टॉर्चर करायला घेतलीस...? " कबिर तोंडाला येईल ते बोलत होता... त्याचा राग उफाळून बाहेर येत होता...
" व्हॉट द हेल...? मला आधी माहिती असतं ना की ह्या फ्लाईट मध्ये तू आहेस तर मी ह्या फ्लाईटचं बुकिंगही नसतं केलं समजलं ना...!" सुहानी पण कसली मागे हटतेय...
" ए... हे तुझं ऑफिस नाहीए... आवाज खाली करून बोलायचं हां माझ्याशी... you know, who am i...? " कबीर स्वतःच्या टी शर्टची कॉलर ताठ करत रुबाबात म्हणाला...
" माझा आवाज तसाच आहे... and dont you know, who are you...? " सुहानीने त्यालाच प्रतिप्रश्न केला...
" कोणत्या मूर्ख बाईच्या मी पण नादी लागतोय..." तो अजूनही तिच्याकडे रागानेच बघत होता...
" तूच मूर्ख... अँड स्टील यू डोन्ट हॅव मॅनर्स ...?" सुहानी त्याच्यावर बोट करत म्हणाली...
" मला मॅनर्स शिकवायची तुला काहीएक गरज नाहीए, आणि आता काय केलंय गं मी एवढं बोलायला...? " कबीर तिच्या नजरेत रोखून बघत होता... तिला खाऊ का गिळू असंच काहीसं त्याला होत होतं...
" तुझ्यामुळे फ्लाईट लेट झालीय समजलं ना, त्यावेळेसही वेळेचं महत्व नव्हतं आणि आत्ताही नाहीए..." तिने पुन्हा मॅगझीनची पानं चाळली आणि त्याच्यावरून नजर हटवली...
" काही प्रॉब्लेमही असू शकतो एखाद्याला... मुद्दामून नाही कोण करत... एक्च्युली मी वॉशरूमला..." तो तिला घडलेलं सगळं सांगायचा प्रयत्न करत होता पण ती त्याला बोलून देईल तर ना...
त्याचं वाक्य अर्धवट तोडत ती म्हणाली..." ओहह... लूज मोशन्स झालेले का...? हेच फालतू कारण असू शकतं..."
" तू अति बोलतेयस असं नाही वाटत तुला...?? शीट मी कोणाला सांगतोय, ज्या व्यक्तीला ऐकायची सवयच नाही कधी... दुसऱ्यांना ऐकवण्यातच मज्जा येत असेल ना तुला...?" कबिरची बडबड सुरूच होती...
ह्यावर तिने आता दुर्लक्ष करायचं ठरवून गप्प बसण्याचा पवित्रा घेतला...
" excuse me..." शेजारून जाणाऱ्या हवाईसुंदरीला त्याने हाक मारून , त्याची जागा बदलून देण्यासाठी विनंती केली पण बिझनेस क्लास असल्याने सगळ्या जागा आधीच भरल्या होत्या त्यामुळे तिथे बसण्याशिवाय इतर कोणता पर्यायच नव्हता...
त्याची झालेली फजिती पाहून सुहानीला गालातल्या गालात हसूच आलं होतं... ती आपल्यावर मिश्कील हसतेय अशी जाणीव त्याला होताच त्याने पुन्हा एकवार तिच्याकडे रागाने पाहिलं... तीही तोंड मुरडून खिडकीच्या बाहेर बघू लागली... बघता बघता विमान उडालं...
सलग दोन तासांचा सुखद प्रवास आज त्या दोघांनाही जीवघेणा वाटत होता... कबिर मात्र बसल्या जागी कधी हेडफोन वर गाणी ऐकत ती गुणगुणत होता, तर कधी तोंडाने म्युझिक रॅप वाजवत तिला त्रास द्यायचा बराच प्रयत्न करत होता... त्यामुळे तिचीही मध्ये मध्ये झोपमोड होत होती... पुढे जास्त वाद नको आणि फ्लाईटमधील इतर लोकांना शोभा नको म्हणून तिने गप्प राहणच योग्य समजलं... कोईमटूरला उतरताच दोघे वेगळे झाले... दोघेही त्यांना घ्यायला आलेल्या कारने आपल्या आपल्या वाटेला रवाना झाले...
सुहानीच्या मालिकांमधील उभारता चेहरा आणि त्यानिमित्तानेच तिची काव्या मेहरा सोबत झालेली गट्टी... काव्या आता लग्नाच्या रेशमी बंधनात स्वतःला बांधून घ्यायला उतावीळ झाली होती... सुहानीच्या बऱ्याच शॉज मध्ये तिनं काम केलं होतं आणि त्यानिमित्ताने त्यांची मैत्रीही होत गेली होती... तिचं लग्न आणि सुहानी नाही जाणार हे शक्यच नव्हतं... पंकज चोप्रा ह्या नामवंत "PMC फिल्म्स " च्या प्रोड्युसर सोबत ती प्रेमविवाह करत होती... त्यामुळे पंकज आणि काव्या ह्या दोघांकडूनही तिला लग्नाचं आमंत्रण होतं...
कोईमबटूर ते उटी असा अडीज तीन तासांचा प्रवास करून सुहानी खूप थकली होती... काव्या आणि पंकजला भेटून ती तिला दिलेल्या हॉटेलच्या रूमवर आराम करायला गेली... खरंतर तिला आज जास्तीत जास्त दमवलं होतं ते कबिरने... फ्लाईट मधील त्याचं वागणं आठवून तिला हवी तशी झोपही येत नव्हती... त्याच्याच विचारात ती चक्रावून गेली होती... संध्याकाळी मेहंदी आणि संगीतचा कार्यक्रम सुरू होणार होता, त्याचीही आवराआवर करायची होती... संध्याकाळी आपण फ्रेश असायला पाहिजे हा विचार करून ती दुपारी जेवून थोडावेळ कलंडली आणि त्यातच तिला झोप लागली...
क्रमशः-------◆
©दिपशिखा