शेतकरी माझा भोळा - 15 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेतकरी माझा भोळा - 15

१५) शेतकरी माझा भोळा!
दोन-च्यार रोजात गणपतचा कापुस येचून झाला. घर सम्द कपाशीन भरलं. पाचव्या रोजी फाटेचे धा वाजत व्हते. यस्वदा म्हण्ली, "आव्हो, कपासीची सरकारी खरेदी आजूक सुरु झाली का न्हाई?"
"व्हईल, दोन च्यार दिसात."
"काय सांगावं बाई, सम्दा कापुस यीवून पडला पर ह्ये सरकार आजूक बी जाग झालं न्हाई. केंद्र सुरु झाल्यावर बी धा-धा दिस नंबर लागत न्हाई, आज कापुस जाया फायजे व्हता. पर सरकारला सांगावं कुणी?"
"गणप्या... आरं गणपती..."
"कोण? किसान देवा? या व्हो या."
"आता या म्हन्ताल तरी बी आलू. न्हाई म्हण्शील तरी बी आलूच. दोन बातंम्या घिवून आलो हाय."
"कंच्या रे?"
"ऊंद्या कपाशीची खरेदी सर्कार सुरु कर्णार हाय आन् दुसरं म्हंजी औंदा कपाशीला एकतीस्से रुपै भाव देयायचं सर्कान ठरवलं हाय."
"येऽक तीस्से?"
"व्हय. गणपत्या तू लै लकी हायेस. आबे, तुह्या वाणाला ह्योच भाव लागला म्हणून समज."
"आगं, आगं, च्या टाक बर, बिगीनं. ले ग्वाड बातमी आन्ली हाय, बग देवानं."
"गणपत, आज बेपारीबी गावात आले हाईत."
"बेपारीबी आलेत? काय भाव निघाला हाय?"
"ऐ-वन्न कपासीला दोन हजार !"
"दोन हजार म्हंजी लै कमी झालं रं. कोण दिल येव्हढ्या कमी भावात?"
"कोण दिल? आरं बाबा बाहीर जावूनशानी तं बग. लाईन लागली हाय. गणपतराव, आजूक सर्कारी खरेदी सुरु व्हयाची हाय. कपास भरण, केंद्दरावर नेणं, काटा व्हायाला आठ-पंद्रा दीस लागत्यात, आजूक पैयसा कव्हा मिळल, त्ये काय बी खरं न्हाई. सिवा ज्येंच्याकडं करज् हाय, त्ये तेथेच काटतात. त्या परीस बेपाऱ्याकड कपास देली तं सांच्यापारी पैका हातात. कंच बखेड न्हाई काय न्हाई. सम्दा रोकठोक मामला."
"पर त्यापायी कुंटलमांघ हज्जार रुपै कमी घेयाचे म्हंजी?"
"लोकास्नी परवडते रे बाबा..."
"छ्याट्! मी न्हाई आस्स नुक्सान करून धिणार. पंद्रा दिस, म्हैना इकड का तिकडं..."
"बग बोवा, तू आन तुहा कार्भार. " च्या चा कोप ठिवून किसन निंघून गेला. काय करावं आणि काय न्हाई या ईच्चारात त्यो आस्ताना बाहीरुन आवाज आला,
"गणपत,हाय का घरात?"
"कोण हाय?" म्हन्ताना गणपत बाहेर आला आन् आंगणात सावकाराला फावून म्हन्ला,
"आरे बाप्पो, शेटजी तुमी? मला बलीवल आस्त तं म्या आलो आस्तो की."
"बाबा रे, तु मोठा माणूस हाईस. लै मोट्टी कपास झाली हाय. तुला रे कसं बलीवणार?
"कावून गरीबाची टवाळी कर्ता मालक? या बसा. गरीबाचा सिंगलभर च्या तं पेवून जावा."
"नको. आत्ताच चहा झाला. म्हन्ल तुला माझी सय आहे का नाही ते बघावं."
"मालक, तुमची सय नसाल व्हो? आन्नदात्यालं कोणी ईसरल व्हय? तुमी त्या वक्ती पैका दिला म्हून तं कपासीनं घर भरलं हाय. उंद्या सरकारी खरेदी सुरु व्हणार हाय. दोन-च्यार दिसात गाडी-बैयलाची येवस्था करुन कपास घिवून जातो. पैका मिळाल्याबरुबर पैले तुमची बेबाकी करतो."
"पुरे पाच हजार झालेत बरं का."
"काय? पाच हज्जार?"
"मग? किती महिने झाले ते बघ. आपला कारभार, व्यवहार चोख हाय. हिसाब कुणाला बी दाखव, पैक्याची बी खोट निघणार न्हाई. बर चलतो मी, पाच हजार घेवून ये आणि तुझं बासण सोडून घे. मला मोकळं कर रे बाबा." हन्ता म्हन्ता सेटजी निघून बी गेले.
गणपतनं दोन-तीन दिस सम्दीकडे गाडी-बैयलाचा शोध घेत्ला पर हंगामात कोन्ही गाडी बैयलं देत न्हवतं. आखरीला त्यो किसनदेवाकडं जावून म्हन्ला,
"किसानदेवा, तुही कपास धाडली का ? मला गाडीबैयलं देशील का?"
"गणप्या, येका गाडीनं काय तुहा ऊद जळणार हाय? आरं, पच्चीस-तीस कुंटाल कपास येका गाडीनं धाडायला आख्ख साल जाईल."
"मंग काय कराव म्हन्तुस?"
"आर, येखांद टैक्टर त फाय."
"टैक्टर? आर, बाबा येथं येक बैलगाडी मिळाय नाकात दम यितुया. आन् म्हणं..."
"आस्स कर. त्या ईस्वनाथाकडं जाय. त्ये भाड्याने देत्ये. औंदा त्येन कपास बी लावली न्हाई. जा बेगी."
"बर... "आस म्हन्ताना गणपत तेथून निघून त्यो थेट ईस्वनाथा फुडं उबा ऱ्हाऊन म्हण्ला,
"रामराम, ईस्वनाथराव..."
"रामराम, बोला."
"केंदरावर कपास नेयाची हाय. तव्हा म्हण्ल तुमचं टैक्टर मिळाल तं बर व्हईल. किरायाबी देईल..."
"कव्हा फायजेत?"
"जव्हा रिकामे आसल तव्हा. आता धाडलं तरी बी मझी ना न्हाई."
"ठीक हाय, पर हे फाय, टैक्टर किराया हाय सातसे रुपै रोजानं, डिजल, डायवर भत्ता बी आलग."
"ईस्वनाथा लई व्हतय रे. "
"लई? आर, सीजन हाय. दोन दिस थांब. मिळणारच न्हाई. लोक हजार रूपै देयाला तैयार व्हत्यात."
"बरं. मंग कव्हा पाठवता?"
"सांच्याला धाडतो. रातभर कपास भरा. फाटे जा."
"बर. पण पक्क."
"पक्क म्हंजी येकदम पक्क.."
सांच्या पारी बरुबर आठ वाजता ईश्वनाथाचं टेक्टर गणपतच्या घराम्होरी उब ऱ्हायलं. गणपत आन यस्वदान मिळून रातभर टेक्टर कपासीन भरला. फाटे -फाटे गणपतनं सम्द आटीपल आन् त्यो ड्रावरची वाट बगत बसला. धा वाजता डावर आला. यस्वदान टैक्टरला, गणपती आन् ड्रावरलाबी कुकु लावलं, नारळ फोडलं.
ड्रावर म्हन्ला, "गणपतराव, मालकानं भत्त्याचं सांगलं न्हव ?"
"व्हय सांगलं."
"दोनसे रुपै भत्ता हाय बर.''
"दोनसे? पर मालक आस्स काय म्हन्ले न्हवते."
"म्हनूच म्या सांगतो. बादमंदी वांदे नगं. आसल तं व्हय म्हणा न्हाई तर तुमी आन त्यो मालक."
"बर-बर, चला."
घंट्याभरात गणपतचं टैक्टर फेडरेशनच्या यारडात पोचलं. तेथं तोब्बा गरदी. जिकडं फाव तिकडं बैयलगाड्या, टैक्टर, मोटारसायकली आन् माण्संच माण्सं!
"गणपतराव, हजारयेक गाडी आसल का?"
"आस्सल बाबा."
"धा-येक दिसाची निचींती हाये."
"मंग काय? हात काटा हाय. रोजच्या संबर गाड्या बी व्हत्याल की न्हाई. त्या बगा फोल्डरवाला सायेब. त्यांच्याकडून फोल्डर घिवा.. " दोग त्या फोल्डरवाल्याकड गेले.
"रामराम साहेब "
"रामराम बोला..."
"टैक्टर आणलं. फोल्डर फायजेत."
"मिळल की मंग. मी येतो तिकडे. आत्ता पाहिजे आसल तर दोनशे रूपे काढा. गणपत काही बोलण्याच्या पैलेच डावर म्हन्ला, "द्या." गणपतने दोनसे रुपै देले आन् फोल्डर घेतले. दोघांनी मारकीट यारडात चक्रा मारल्या. तेथ माप सुरु व्हतं. फाटेपासून पाच सात गाड्यायचे माप झालं व्हत. गेरडराला गाठून लोक त्येची खुसामत करीत व्हते. तेवढ्यात माप झालेला सीतापुरचा पांडू दिसला. त्येच्याजोळ जावून गणपत म्हन्ला,
"रामराम पांडुदा..."
"रामराम, गणपतदा, रामराम! गाडी आण्लीस? "
"व्हय. ट्रॅक्टर आन्लं हाय. तुहा काटा झाला वाटते."
"झाला की."
"कोन्ता गिरेड मिळाला रे?" पांडुच्या कपाशीकड फात गणपतनं ईच्चारल. वाण बराच वक्टा व्हता. नकीच 'शी' न्हाई तं 'डी गिरेड लावला आसल आसं गणपतला वाटलं.
"गिरेड व्हय..." इकडे तिकडे फात पांडू म्हन्ला, "ए गिरेड मिळालाय.."
"काय? ए... गिरेड?"
"वरडू नगस बाबा, तुही कपास लै गोजिरी हाय म्हणं..."
"व्हय. नदर लागल्याजोगा ढवळाशिपद कापुस हाय. गिरेडर सायेबाचे डोळे गरागरा फिर्तील आस्सा वाण आन्ला हाय. सायबानं गुपचिप ए गिरेड देवावं..."
"गणपता, डोळे दिपाय त्येंना पांडराशिपद वाण लागत न्हाई त त्येंचे हात दाबून पैक्यान भराव लागतात तव्हा आपल्या गाडीजोळ न यिता बी फायजे त्यो गिरेड मिळतो. हास कोठं?"
"छ्याट! हात दाबाची मला काय बी गरज न्हाई. ह्येच काय आजूक मोठे मोठे सायेब आले तरी बी मला ए गिरेड मंजी ए गिरेडच लागल..."
"गणपत, आर येथली रीत न्यारी हाय. येथं फकस्त पैका बोलतो पैका. कुंटल मांघ पाचसे रुपै देले तरी बी मझा साशे रूपैचा फायदा झाला का न्हाई?"
"पांडूदा, तुही गोस्ट न्यारी हाय. तुहा वाण न्यारा व्हता..."
"हेच वळीख. येथ सम्द खालीवर व्हते. डी वाले ए गिरेड घेत्यात आन् ये वाल्यांना डी गिरेड मिळतो. तव्हा तुला पैलेच जागं करतो. नाई तं मंग डोक्यावर हाणून घेयाची येळ यील..."
त्या दिशी गणपत दिसभर यार्डातच थांबला. दिसभरात कोठ आस्सी गाड्याचा काटा झाला व्हता. सम्दा चोरायचा बजार व्हता. फोल्डरपायी पैका, गिरेड लावाय पैका, काटा वाढून घेण्यापायी हमालास्नी पैका. सान्या, पारमाणिक माणसायचं तेथ काय बी चालत न्हवतं. पैसा फेकायचा आन् फायजे त्ये मिळवायचं. गणपताला लै नवल वाटलं आन् त्यो काळजीत पडला. सांच्यापारी गणपत सीतापूरात पोचला. दिसभर ज्येंच्या गाड्यायचं माप झालं व्हत त्येंना त्यो भेटला. सम्दे पांडूदाच्या माळेचे मणी व्हते. सम्द्यांनी काळा येव्हार करुन पांडऱ्याशिपद कपाशीवर काळे डाग लावून पैका कमविला व्हता. गणपत तस्साच घरी आला. त्येला फाताच यस्वदा म्हन्ली,
"का जी लै नाराज दिस्ता, कव्हा हाय माप?"
"माप व्हयाला लागतील आठ रोज."
"आठ रोज? आन् पैसा?
"पैशाला लागल म्हैना."
"म्हैना? काय सांगाव बाई? माणूस येक ईच्चार कर्तो आन् होत्ये येक. का व्हो रिन तं फिटालन सम्द?"
"रिन फिटाल ग. पर नवच संकट आल हाय."
"आता ग बया. काय झाल? सांगश्याल त?"
"आग, सायेबाला पैका देला तरच पैला गिरेड मिळतो न्हाई त मंग डी गिरेड..."
"अव्हो, पर आपली कपास तर येकदम सुप्पर..."
"कपाशीला कोन्बी फाईना, नोटा देल्या तरच ए ग्रेड... "
"काय ऐकाव त नवलच. ह्ये तं येगळच हाय. अन्याव हाय हयो. अव्हो, तुमी वरच्या सायेबाल..."
"काय बी फायदा न्हाई. सम्दे साले येकच हाईत. साले लुटायला बसलेत. फोल्डर घेयाला पैका, कपासीचा काटा कर्णाऱ्या हमालालाबी पैका देवावच लाग्तो. न्हाई तं दांडा मारत्यात. पैका देला तं कुंटलमांघ धा-पाच किलू वाढून लावल्यात..."
"बरं.. बरं.. जावू द्या. हातपाय ध्वा. त्या मारोतीला आपली काळजी हाय. व्हईल सम्द चांग्ल व्हईल. जिऊन घ्या.. फाटेपासून रउपासी आसशाल."
तिसऱ्या दिसापस्तोर दोन-सवा दोनसे गाडयायचं माप झालं पर परिस्थितीमंदी काय बी फरक पडला न्हाई. गणपत फाटे यारडात जायाचा, जाताना ड्रावरचे जेवण घिवून जायाचा. तेथले समदे काळे वेवहार फायाचा आन् डोक्श्यावर हात मारीत गावाकडे यायचा.
त्या फाटे यस्वदा म्हन्ली, "अहो, आजचा सावा दिस हाय. काय बोल्ला का न्हाई सायेबाशी"
"न्हाई. बोल्तो आज."
"काय तरी मिटवून टाका. लोकं बी चकरा मारायलेत... "
"बर." म्हणत गणपत ऊठला आन् तांब्या घेऊन बाहेर निंघणार की शेटजीचा मुनीम आला.
"गणपत, सेठनं पैसा सांगला हाय.."
"आर टाक्टर गेल हाय. आज उद्या काटा व्हईल मंग घिवून येतो म्हणावं."
"आठ हजार झालेत म्हणं, येथून फुड हज्जाराला संबर रुपै याज लागल आसा शेटचा सांगावा हाय."
"बर." गणपत म्हन्ला, मुनीम निघून जाताच गणपत बाहीर गेला...
गणपत पांदीहून आला तव्हा सोसायटीचा कारकून बसला व्हता.
"रामराम."
"रामराम! आज पैका दे रे बाबा. चेरमनसायेबानं खास धाडलं आहे."
"आज तं काय न्हाई. पर आठ दिसात देतो म्हणावं. ट्रॅक्टर उब हाय यारडात. माप झालं की देतो."
"बर."
गणपतची आंघूळ होईस्तोर यस्वदानं रोटया बडवल्या, कोरड्यास घातले. ड्रावळचं गठूड बांदून गणपतच्या हातात देत म्हन्ली, "आज काय त्ये फायनल करुन टाका."
"फातो..." गणपत म्हणला.
"ह्ये फा. ही बाटली ठिवा. ग्यासतेल घिवून या. आस्स करा, यारडात जातानाच घिवून जावा न्हाई तं मंग यितांना विसरून जाशाल."
"बरं " गणपत म्हण्ला आन् फेडरसनकडं निंघला. रस्त्यात कलाकेंदर लागलं. रस्त्यावर उबं ऱ्हाऊन कोणी तरी बाई गणपतकडं फात येगळेच चाळे करीत व्हती, पदर पाडीत व्हती. गणपत जरा जवळ जाताच ती बाई म्हण्ली,
"या हो, पाटील या. फक्त धा रुपयात..." ती दोगं समुरासमुर आले आन् दोग बी दचकले.
"क...क...कोण? सकी तू?"
"व्हय बापू म्या. पर...पर...मह्या हातून हो कोन्त पाप झालं?"
"न्हाई सके, न्हाई. त्वा काय बी पाप केलं न्हाईस. म्याच...म्याच पापी हावो. म्याच तुला या नर्कात फेकल..."
"न्हाई, बापु न्हाई... ह्यो नर्क न्हाई. सोरग हाय. काय कमी न्हाई. सेतातलं न्हाई की घरातल काम न्हाई. दिसभर मास्त झोपायचं आन् रातभर..."
"रातभर?"
"काय न्हाई. तुमाला ते न्हाई समजणार."
"मला ठाव हाय, सखे, सम्द ठाव हाय. पर तू आसं भर रस्त्यावर...."
"ह्यो तं भोग हाय बापू. रातीतून धा-धा..."
"काय धा?"
"व्हय, जव्हर माझं कातडं कोवळं व्हतं तव्हर मालकाने लै कमावलं. रात न्हाई का दिस न्हाई फायला. सम्द्यायला खुस केलं. कोण्या घुबडाची संगत भोवली आन् मला बेमारी लागली. आता कोणी बी जवळ येत न्हाई. राती मालकानं बाहीर काढलं म्हून पोट भराय म्या आसं रस्त्यावर..." म्हणताना दोन्ही हाताच्या वंजळीत चेहेरा लपवत सखी कलाकेंदराकडं पळाली आन् मरेल चालीनं गणपत शेहराकडं निंघाला...
०००नागेश शेवाळकर