मायाजाल -- ४ Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मायाजाल -- ४

मायाजाल- ४
दुस-या दिवशी प्रज्ञाने इंद्रजीतला कॅन्टीनमध्ये पाहिलं; तेव्हा ती हसली आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणाली,
“ थँक्स! मला तुमच्याबरोबर यायची परवागी मिळाली आहे! काल तू आईला असं काय सांगितलंस? "
इंद्रजीतसुद्धा हसत डोळा मारत म्हणाला,
"तुला यायला मिळतंय नं? बाकी सगळं सोड! तयारीला सुरुवात कर! दोनच दिवस राहिलेत आता!"
त्या दोघांना माहित नव्हतं----- सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या. "सगळ्यांशी जेवढ्यास तेवढं बोलणारी प्रज्ञा याच्याशी एवढं काय बोलतेय? आणि ते सुद्धा एवढ्या सलगीने? यांची एवढी मैत्री कधी झाली?" असे अनेक प्रश्न होते सगळ्यांच्या नजरेत!
" मला खात्री आहे; तू खूप एन्जॉय करशील. आपणा शहरी लोकांसाठी मोकळ्या हवेत रहाण्याचा आनंद वेगळाच असतो. शिवाय गरजू लोकांची सेवा करता येते ही भावना ही खूप सुखकारक असते. तुला एखादं नोटबुक घ्यावं लागेल. गरम कपडे; आणि हवं असल्यास एखादी आवडती खाण्याची वस्तू..लॅपटाॅप आणि मोबाइलला तिकडे नेटवर्क मिळेलच असं नाही, त्यामुळे फोन आला नाही तरी काळजी करू नका; असं घरी सांगून ठेव. मी संध्याकाळी तुझ्या घरी येऊन तुला सगळं काही सांगतो." इंद्रजीत पुढे म्हणाला. ती बरोबर येणार; याचा प्रज्ञापेक्षाही अधिक आनंद त्याला झाला होता.
********
त्यादिवशी इंद्रजीत काॅलेजमधून लवकर निघाला. घरी जाऊन छान तयार होऊन लेटेस्ट फॅशनचा टी-शर्ट -- जीन्स घालून तो संध्याकाळी तो प्रज्ञाच्या घरी जयला निघाला. 'शारदा' सोसायटीजवळ तो पोहोचला तेव्हा समोरून हर्षदला येताना त्याने पहिलं.
"मी आत्ताच आलो! तू अगदी वेळेवर आलायस! चल घरी चल" हर्षद इंद्रजीतचा हात धरून म्हणाला.
इंद्रजीतचा नाइलाज झाला; तो त्याला नाही म्हणू शकला नाही.
आई! बघ मी कोणाला घेऊन आलोय! मस्तपैकी चहा कर! आणि काल चिवडा केलायस; तो घेऊन ये! मला भूक लागलीय; आणि जीतसुद्धा बहुतेक काॅलेजमधून आलाय!" जीतने आईला आॅर्डर सोडली.
"बसा दोघेही! तू एवढ्यात येशील याची कल्पना होती. आताच चहा केलाय! घेऊन येते!" म्हणत माई लगबगीने घरात गेल्या.
चहा - चिवडा झाला. खूप दिवसांनी मित्र भेटल्यामुळे हर्षद गप्पांच्या मूडमध्ये होता;
"खूप दिवसांनी तू आमच्या घरी आलायसा! शाळेत असताना तर आमच्या घरी आल्याशिवाय तुला चैन पडत नसे! पण काॅलेज सुरू झालं; अाणि मित्राला विसरलास! तुझं काॅलेजचं हे शेवटचं वर्ष आहे! पुढे काय करायचं ठरवलंयस? प्रॅक्टिस करणार---की पुढे शिकणार?" त्याचे प्रश्न संपत नव्हते.
"अजून नक्की काहीच ठरवलं नाही! फायनल एक्झॅममध्ये मार्क्स कसे मिळतात त्यावर पुढचा प्लॅन अवलंबून आहे!" जीत भिंतीवरच्या घड्याळाकडे बघत म्हणाला.
"तुला मार्क्सचा प्राॅब्लेम कधी आलाय का? तू आतापासूनच सगळं ठरवून ठेव!" हर्षद म्हणाला
पण जीतची चुळबुळ चालू होती. तो सतत घड्याळ बघत होता. हे लक्षात आलं, तेव्हा हर्षदने विचारलं,
" जीत! एक सारखा घड्याळाकडे का बघतोयस? कुठे जायचंय का?" हसत त्यानं पुढे विचारलं,
" कोणी वाट बघतंय तुझी?"
" तसं नाही रे! प्रज्ञाकडे जायचंय! तिला मी येतो सांगितलं होतं. वाट पाहत असेल!" जीत त्याची नजर चुकवत म्हणाला.
" तिच्याकडे काय काम काढलंस? आजकाल सतत तिच्या मागे असतोस!" इंद्रजीत आपल्या आधी बाजी मारतोय की काय; ही भिती त्याला आता भेडसावू लागली होती. हर्षदच्या तिरकस बोलण्याकडे दुर्लक्ष करत इंद्रजीत स्पष्टीकरण देऊ लागला,
" आदिवासी भागांमध्ये वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आमच्या कॉलेज तर्फे चार दिवसांचं शिबिर होणार आहे. ती पहिल्यांदा येतेय, म्हणून काही सूचना द्यायला आलोय."
"तू खरं सांगतोयस? तिकडे तिला पाठवायला काका काकू तयार झाले? माझा विश्वास नाही बसत! तिला मुंबईच्या बाहेर पिकनिकला पाठवायलाही दोघं कधीही तयार होत नसत; ही गोष्ट आमच्या काॅलनीत सगळ्यांना माहीत आहे!एस. एस. सी.ला असताना शेवटचं वर्ष म्हणून जयपूरला शाळेची ट्रिप गेली होती. तेव्हाही त्यांनी तिला पाठवलं नव्हतं!" हर्षद आश्चर्याने म्हणाला.
" सुरुवातीला त्यांनी नाही म्हटलं होतं; पण मी त्यांना समजावलं. डाॅक्टर म्हणून अनुभव मिळण्यासाठी हे शिबिर उत्तम आहे; हे पटवून दिलं तेव्हा आन्टी तयार झाल्या!" इंद्रजीतच्या स्वरात स्वतःविषयी अभिमान डोकावत होता.
" खरं सांग! मैत्री वाढवायला बघतोयस ना? पण ती सहजासहजी गळाला लागणारी मुलगी नाही. खूप गर्विष्ठ आहे. उगाच स्वतःचं हसं करून घेशील." हर्षदने परत जीतला सावध केलं. खरं म्हणजे प्रज्ञा आणि जीत एकत्र जाणार हे कळल्यावर तो मनातून हबकला होता. त्याच्या बोलण्यानं अस्वस्थ झालरल्या जीतकडे पहात तो पुढे बोलू लागला,
" त्यातून ती खूप नाजूक आहे. लगेच आजारी पडते. तिला घेऊन जाल; आणि ह्याच पेशन्टमध्ये तुमचा सगळा वेळ जाईल! त्यात आता थंडीचे दिवस सुरू आहेत." हर्षद प्रज्ञाचं जाणं रद्द व्हावं म्हणून शर्थीचे प्रयत्न करत होता.
" त्यासाठीच काही सूचना द्यायला आलोय. तिकडे गेल्यावर कोणी आजारी पडलं तर सगळ्यांना लक्ष द्यावं लागतं आणि मग तिथल्या तिकडे जाण्याचा मुख्य हेतू बाजूला रहातो; म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. मी दोन - तीन वेळा जाऊन आलोय म्हणून मला तू म्हणतोस त्या सगळया गोष्टींचा अनुभव आहे! म्हणूनच तिला काही सूचना द्यायला आलोय! आणि तिला त्रास होणार नाही. मिनी बस सकाळी तिला इथूनच पिक-अप करेल; आणि परत येताना इथपर्यंत आणून सोडेल. आमचा तिकडे जाण्याचा रस्ता हाच आहे; त्यामुळे मी ड्रायव्हरला सांगून ठेवलंय. माझी गाडी गॅरेजमध्ये आहे; त्या दिवशी पाण्यातून आणावी लागली. तेव्हापासून इंजिनात बिघाड झालाय! नाहीतर मी माझ्या गाडीतून काही जणांना घेऊन गेलो असतो! आता मलासुद्धा मिनी-बसमधून जावं लागणार आहे! " हर्षद त्याचा हेका सोडायला तयार नव्हता.
" मी तुला सावध करायचं काम केलं. माझं तर असं मत आहे; की तू सुद्धा जाऊ नकोस! तिकडचे लोक चांगले नसतात; डाॅक्टरांवर खुन्नस ठेवतात; असं मी ऐकलं आहे!"
" मला तर जावंच लागणार! मी सिनियर असल्यामुळे शिबिराच्या अनेक जबाबदा-या काॅलेजने मला दिल्या आहेत!" जीत म्हणाला.
" पण तिकडे गेल्यावर त्या प्रज्ञापासून चार पावलं लांबच रहा! " हर्षदने परत एकदा सल्ला दिला.मनातून जीत गाडी घेऊन जात नाही; हे ऎकून त्याला मनात किंचित् समाधान वाटत होतं.
" तुझा एवढा काय राग आहे रे तिच्यावर? ती अबोल आहे; पण ती गर्विष्ठ आहे' किंवा रागीट आहे; असं वाटत नाही. " प्रज्ञाला हर्षद सतत नावे ठेवत होता, हे इंद्रजीतला आवडलं नव्हतं.
हर्षद पुढे काय बोलतो, हे ऐकायला इंद्रजीत तिथे थांबला नाही. उठून तरातरा बाहेर पडला. पुढच्याच मिनिटाला तो प्रज्ञाच्या घरी होता.
*******
आपल्या बोलण्याचा इंद्रजीतला राग आलेला पाहून हर्षदच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली होती. प्रज्ञावरील प्रेम व्यक्त करण्याची संधी त्याला अजून मिळाली नव्हती. त्याची आर्थिक स्थिती पहाता प्रज्ञाला प्रपोज करणं, म्हणजे वेडेपणा ठरला असता. आणि आता तर तो अशा संगतीत फसला होता की प्रज्ञाच्या नजरेला नजर द्यायची त्याची हिम्मत नव्हती. पण सध्या त्याला पैशांची गरज होती. वडील इतका मोठा खर्च करू शकत नव्हते ; आणि पैसे मिळवण्याचा दुसरा कोणताही मार्ग त्याच्याकडे नव्हता. तो त्याच्या मित्रांना त्यांच्या कामात मदत करत होता आणि त्या बदल्यात ते त्याला पैसे देत होते. त्या स्मगलिंग रॅकेटच्या बाॅसशी त्याचा डायरेक्ट संबंध नव्हता; त्यामुळे एकदा एम. बी. ए . होऊन चांगली नोकरी मिळाली की तो कधीही या बेकायदेशीर कामाला रामराम ठोकू शकत होता. मोठा पगार मिळू लागला,की हप्त्याने मोठं घर, गाडी घेऊन त्यानंतरच आपलं मन प्रज्ञाकडे मोकळं करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आता त्याची स्वप्ने पूर्ण व्हायला थोडेच दिवस राहिले होते; अशा वेळी जीत दोघांमध्ये येईल की काय-- अशी भीती त्याला आता वाटू लागली होती.
******** contd---- part V