he bandh rashmache - 1 books and stories free download online pdf in Marathi

हे बंध रेशमाचे (भाग 1)

नुकतेच लग्न झालेली कविता तिच्या संसारात रुळण्याचा प्रयत्न करत होती. लग्नाचे नवीन नवीन दिवस कसे आनंदाचे आणि उत्साहीपुर्ण असतात. कविताचं ग्र्याज्युएशन पूर्ण झालं होतं आणि ती एका प्रायव्हेट कंपनीत जॉबला होती. लग्नासाठी तिने एक मागिन्याची सुट्टी घेतली होती. लग्न होऊन आता 10 दिवस झाले होते. अजून 10 दिवसाची सुट्टी शिल्लक होती.

कविता आणि विनोदचं तसं अरेंज म्यारेज झालं होतं. त्यामुळं कविता आणि विनोदला एक मेकांचा स्वभाव अजून पूर्णपणे माहित नव्हता. लग्नानंतर मस्त हनिमूनला जायचं असा विचार करूनच कविताने 1 महिन्याची सुट्टी घेतली होती. पण इकडे परिस्तिथी काही वेगळीच होती. लग्नाच्या 3 सऱ्या दिवसापासूनच विनोद पुन्हा जॉबला जात होता. विनोद एका आय. टी. कंपनीत मॅनेजर होता. स्वभावानं अगदी शांत, समंजस, समजुतदार असा विनोद आपल्या करिअर बाबतीत फारच सिरीयस होता. नोकरीला तो नेहमीच टॉप प्रायोरिटी द्यायचा. प्रत्येकाला आपले करियर घडवण्याचं स्वातंत्र आहे अश्या मताचा विनोद होता आणि म्हणूनच त्यानं कविताला लग्नानंतर हि जॉब सुरु ठेवण्याचा सल्ला दिला होता.

याउलट कविताचा स्वभाव म्हणजे अगदीच दंगेखोर, थोडीफार हट्टी, शॉर्ट टेम्पर आणि नेहमी मजा मस्ती करण्याचा मुड. त्यामुळे ही सासरी कशी काय रुळणार हे टेन्शन कविताच्या आई बाबाला होतं. पण लग्नानंतर आपण आपला स्वभाव बदलू अशी कविताने आई बाबांना खात्री दिली होती. पण म्हणतात ना, अंगातले काही गुण हे जाता जात नाहीत.

विनोदाच्या घरी त्याचे आई बाबा आणि एक लहान भाऊ एवढेच लोक होते आणि आता कविताही त्या घराची मेंबर झाली होती. विनोदाच्या घरचे सगळेच अगदी शांत स्वभावाचे होते. घरात लोकं असूनपन नसल्यासारखं वाटायचं. कविताची मात्र जाम पंचाईत झाली होती. एवढ्या शांत वातावरणाची तिला सवय नव्हती. तिला घरात कोंडल्यासारखं वाटत होतं.

हनिमूनला जाणं तर सोडाच पण विनोद कविताला घेऊन साधा बाहेर हि गेला नव्हता. त्याला त्याच्या ऑफिसच्या कामातून वेळच मिळत नव्हता. घरची आणि नवऱ्याची अबोल शांतता यामुळे कविताला सासरी राहणं कठीण होत होतं. संध्याकाळी विनोद कामावरून आला की थोड्याफार गप्पा गोष्टी व्हायच्या पण दिवसभरात मनात साठलेल्या गोष्टी संध्याकाळच्या तुटपुंज्या वेळेत बाहेर पडत नव्हत्या त्यामुळे कविताची घुसमट वाढत होती.

रोज रात्री कविता आणि विनोद मध्ये जवळीक व्हायची. शरीराला शरीराचं मिलन व्हायचं पण मनाचं काय? संसार फक्त शारीरिक सुखाने होत नसतो मनाचं मिलन होणं हि तितकच गरजेचं असतं. मात्र अजून तरी कविताच मन विनोदाच्या मनाशी मिलन करायला तयार होत नव्हतं.

कविताची 10 दिवसाची सुट्टी एकदाची संपली आणि कविता जॉबच्या निमित्ताने घराबाहेर पडली. एवढ्या दिवसांच्या घरच्या शांततेमुळे कोंदटलेले कविताचे मन बाहेरच्या मोकळ्या वातावरणात येताच एखाद्या पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या पोपटासारके सैरभैर फिरू लागले. 10 वर्षांची कैद संपवून बाहेर पडलेल्या एखाद्या कैद्याला जसा आनंद होईल अगदी तसाच आनंद कविताच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

थोड्याच वेळात कविता ऑफिस मध्ये पोचली. सगळ्या ऑफिस स्टाफला भेटली. प्रत्येकानं तिला लग्नाबद्दल शुभेच्या दिल्या. सगळ्यांचे आभार व्यक्त करताना मात्र कविताला जाम आंनद होत होता. इतक्या दिवसांचा कंटाळवाना प्रवास तिला आता संपल्याची जाणीव होत होती. विनोदने आपल्याला जॉब करण्याची मुभा दिली ती एका अर्थाने बरीच झाली असं तिला वाटत होतं. निदान ऑफिसमधला वेळ तरी चार लोकांशी बोलण्यात आणि हासण्या खिदळण्यात घालवता येईल अशी तिची समजूत होती.

सगळ्यांच्या शुभेच्या स्वीकारून आपल्या सीटकडे वळणाऱ्या कविताला तिची मैत्रीण म्हणाली, "काय ग कवे, नवरा जाम सतावतो वाटत? रात्री भरपूर दंगा घातलेला दिसतोय.. " मैत्रिणीच्या ह्या वाक्यानं मात्र कविता पुरती अबोल झाली होती. तिच दुःख तीला कुणालाही सांगण्याची इच्छा नव्हती. इतकावेळ ऑफिसच्या वातावरणात रमलेल्या कविताला मैत्रिणीच्या बोलण्याने परत घरातील वातावरण आठवलं आणि ती खिन्न मानाने आपल्या सीटवर जाऊन बसली.

कविताच्या बाजूच्या सीटवर एक मुलगा बसला होता. जेमतेम कविताच्या वयाचाच असावा. कविता सीटवर बसताच तो आपल्या सिटवरून उठला आणि कविताच्या जवळ येऊन म्हणाला, "हाय कविता... मी निखिल... 4 दिवस झाले कम्पनी जॉईन करून. तू सुट्टीवर होतीस म्हणून भेट झाली नव्हती...बाय द वे... तुमच्या लग्नाबद्दल खूप खूप शुभेच्छा... happy married life.." कविताच्या समोर, एक हात पुढे करून उभ्या असलेल्याला निखिलला न्याहाळत त्याच्या हातात हात मिळवत कविता म्हणाली, "thank u so much... तुम्हाला पण तुमच्या नवीन जॉब साठी खूप खूप शुभेच्छा." असं म्हणून तिने त्याच्या हातातील आपला हात सोडवून घेतला. कविताला थँक्स म्हणून निखिल आपल्या जागेवर गेला आणि कविता हि आपल्या कामात गुंतली.

पण कविताचं कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून घरच्या वातावरणाचा विचार तिच्या मनात घोळत होता. अश्या निरस वातावरणात आपण कसा काय संसार करायचा हेच तिला कळत नव्हतं. संध्याकाळी परत घरी जाऊन पुन्हा मन मारून जगायच तिच्या जीवावर येत होतं. मधेच विनोदाचा विचार यायचा. हा माणूस इतका शांत आणि निरस आहे हे आधीच माहित असत तर बरं झाल असतं निदान लग्न तरी टाळता आलं असतं पण आता काही पर्याय उरला नव्हता.

विचारांच्या तन्द्रितच कविता स्वतःला कामात गुंतवण्याचा खटाटोप करत होती. जवळपास दोन तास होऊन गेले होते. आता कुठे तीच कामात लक्ष लागलं होतं तोच निखिल तिच्या जवळ आला "काय ग कविता? सगळं काम आजच संपवणार कि काय? चल कॉफी घेऊ?" निखिलच्या आवाजाने मान वर करत कविता म्हणाली, "नको, तुम्ही घ्या कॉफी कामं फार पेंडिंग पडलेत." असं म्हणून ती पुन्हा कामात गुंतली.

"कामं तर नेहमीच असतात ग... चल ना तुला पण फ्रेश वाटेल... आणि मला पण सोबत मिळेल... एकटं कॉफी पिण्यात काही मजा नाही बघ..."

निखिलच्या अश्या बोलण्याचं कविताला थोडं नवलच वाटत होतं. एक तर दोन तासापूर्वी आपली भेट झाली होती आणि एवढ्यात हा आपल्याला एकेरी नावाने बोलतो याचा तिला जाम राग आला होता.

"प्लिज यार तुम्ही घ्या कॉफी... खरच माझी इच्छा नाही कॉफी घेण्याची.." कविता नाराजीच्या स्वरात म्हणाली..

"बघ हेच तर तुला सांगतोय मी... अग आता कुठे 2 तास झालेत आणि एवढ्यातच तू थकल्यासारखी वाटत आहेस... कॉफी पिली कि थकवा निघून जाईल तुझा... चल चल चल लवकर.." असं म्हणून निखिलने तिचा हात धरला आणि तिला वर उठवू लागला.

आता मात्र कविताचा पारा जाम चढला, आपल्या गळ्यातील मंगळसूत्र दाखवत ती निखिलवर ओरडली... "ओ मिस्टर माझं लग्न झालंय ओके.. फालतूची जवळीक करण्याचा प्रयत्न करू नका... गाल रंगायच्या आधी निघा तुम्ही." कविता जाम भडकली होती.

कविताला असं अचानक चिडलेलं पाहून निखिल म्हणाला, "ओके ओके.. जातो मी, पण एवढं ओव्हर रिऍक्ट का होतेस तू? तुला काही टेन्शन आहे का?" निखिल परत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. कविता मात्र आपली जळजळीत नजर निखीलवर रोखुन उभी होती. तिच्या नजरेतली नाराजी निखिलने ओळखली आणि तो म्हणाला, "ओके ओके कुल डाऊन... जातो मी.. एन्जॉय युअर वर्क." असं म्हणून निखिल कॅन्टीनच्या दिशेने निघून गेला.

किती निर्लज्य मुलगा आहे हा. एवढं बोलला पण सॉरी काही म्हणाला नाही. याच्यापासून शक्य तितकं दूर राहिलेलचं बरं असा विचार करून कविता पुन्हा आपल्या कामात गुंतली.

थोड्यावेळाने कॉफी पिऊन आलेला निखिल आपल्या कामात गुंतून गेला. पण कविता मात्र निखिलचा विचार करत होती. 'आपण खरचं जास्त ओव्हर रिऍक्ट केलं का? तसं हि प्रोफेशनल लोकं नेहमी एक मेकांना एकेरीतच बोलत असतात. मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये असच कल्चर असत. तिथं वयाचा काही समंध नसतो. एकत्र काम करणारे आपल्या कलीग्सना एकेरी नावानेच बोलवतात भले हि ते वयाने लहान किंवा मोठे असतील. कदाचित निखिल हि अश्याच वातावरणात काम केलेला असेल म्हणून तो मला एकेरी बोलवत असेल. पण त्यानं आपला हात धरला त्याचं काय? त्याला ह्या गोष्टीचं पण काहीच वाटत नसेल. जाऊदे नको जास्त विचार करायला. पण दिसायला तर अगदी सभ्य दिसतो. खरचं त्याच्या मनात काही नसेल आणि आपणच चुकीचा अर्थ काढत असणार. पण तरी ही त्याने थोडी मर्यादा बाळगायला हवी.' स्वतःच्या विचारात गुंतलेली कविता कामावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करत होती पण मन काही केल्या शांत रहात नव्हतं. कधी घरचा विचार तर कधी निखिलचा विचार ह्याच दुहेरी मनसतिथीत कविता घुटमळत होती.

जवळपास 2 च्या दरम्याने निखिल पुन्हा कविता जवळ आला, "अग कविता, बास कर. किती काम करशील? घड्याळकडे बघ, पोटाची काही काळजी आहे की नाही. चल लंच करू." निखिलच्या बोलण्याने भानावर आलेली कविता घड्याळाकडे पहात म्हणाली, "हो हो तुम्ही व्हा पुढे मी येते."
यावेळी मात्र निखीलने जबरदस्ती केली नाही तो गप गुमान कॅन्टीनच्या दिशेने निघून गेला.

'मघाशी आपण याच्यावर एवढे रागावलो तरी हा पुन्हा आपल्याजवळ आला आणि लंचची आठवण करून दिला. याच्या मनात नेमकं आहे तरी काय? कदाचित आपणच याच्या विषयी चुकीचा विचार करत नसेन ना? गेल्या 10 दिवसात विनोदने एकदाही आपल्या जेवण्याची चौकशी केली नाही आणि हा मात्र आजच भेटला आणि तरी ही कॉफी साठी आग्रह आणि आता जेवणासाठी. हाच थोडासा स्वभाव विनोदमध्ये असता तर किती छान झालं असत यार....' परत स्वतःशीच बडबडत कविता आपल्या सिटवरून उठली. बॅग मधून आणलेला टिफिन घेतला आणि ती कॅन्टीनच्या दिशेने चालू लागली.

कॅन्टीनमध्ये बरेच लोक जेवत होते. त्या लोकांच्या गर्दीत कविता चोर नजरेने निखिलला शोधत होती. निखिलला न दिसता एका ठिकाणी बसायचं आणि जेवायचं असं तीच मत होतं. पण कॅन्टीन मध्ये शिरताच "कविता इकडे ये इकडे..." असा आवाज आला आणि उभा राहून हात हलवणारा निखिल कविताच्या नजरेत पडला. एवढ्या गर्दीत त्याने कविताला आवाज दिल्याने कविताला थोडं आवघडल्यासारखं झालं पण तरी ही नाइलाजने ती त्याच्या दिशेने चालू लागली.

दोघे एकाच टेबलवर समोरा समोर जेवायला बसले. कविताने आपला टिफिन उघडला. निखिलने कॅन्टीन मधूनच जेवणाची थाळी मागवली होती. कविता काही न बोलता खाली मान घालून जेवत होती. पण निखिलची चुळबुळ चालूच होती. कविताच्या डब्यात पहात निखिल म्हणाला, "अरे वा... मेथीची भाजी? मला फार आवडते.." ह्या वाक्याने कविताच्या तोंडातला घास तोंडातच राहिला. गडबडीत जेवण्याच्या उद्देशाने कविताने समोर निखिलला भाजी हवी का हे विचारलं सुद्धा नव्हतं. तिचं तिलाच थोडं वाईट वाटलं पण आता निखीलनेच इनडायरेक्ट भाजी खाण्याची इच्छा दर्शवल्यामुळे तिचा नाईलाज झाला होता.

"सॉरी यार मी विचारायची विसरले.. पण आता मी उष्टी केली." कविताने आपली नाराजी व्यक्त केली. यावर एक छानसं स्माईल देऊन निखिल म्हणाला, "मला चालले... आणि तसं हि भाजी कधी उष्टी होते का? त्यात थोडीच आपण डायरेक्ट तोंड घालतो." असं म्हणून निखिलने आपलं ताट किंचित पुढं केलं. मग काय कविताला भाजी देणं भाग पडलं. तीनं चमच्याने आपल्या डब्यातली थोडी भाजी निखिलच्या ताटात वाढली. तसा निखिल म्हणला, "तुला जर काही हवं असेल तर घेऊ शकतेस हा माझ्या ताटातलं तस हि मी अजून काही उष्ट केलं नाही." असं म्हणून निखिल गालातल्या गालात हसू लागला.

आज कॅन्टीन मध्ये वांग्याची भाजी केली होती. कविताला वांग्याची भाजी फार आवडायची. मनात इच्छा असून ही ती म्हणाली "नको मी बाहेरचं जास्त काही खात नाही." यावर निखिल म्हणला, "बरं नको खाऊ पण आज मी तुझी भाजी घेतली ना मग तुला भाजी कमी पडेल म्हणून ही थोडी भाजी घे असं म्हणून त्याने आपल्या ताटातली वांग्याची भाजी जबरदस्ती तिच्या डब्याच्या एका टोपणात वाढली. कविता नको नको म्हणत होती पण ऐकेल तो निखिल कसला.

निखिलच्या अश्या बिंदास वागण्याचं कविताला मात्र जाम आश्चर्य वाटत होतं. आपण हि लग्नाआधी असच बिंदास वागायचो पण लग्न झालं आणि आपलं पूर्ण जीवनचं बदलून गेलं. एक वेगळीच शांतता आपल्या आयुष्यात आली. आता तर भीती वाटतेय कि कदाचित मी हि विनोद सारखीच होईन कि काय. शांत, गंभीर आणि निरस.

"वा... यार कविता, भाजी झक्कास झालीय हा.. तू बनवलीस?" निखिलच्या या बोलण्यानं विचारांच्या दुनयेत भरकटलेली कविता भानावर आली आणि म्हणाली "हो. मीच बनवलीय."

"ठरलं तर मग. जेव्हा पण मेथी बनवशील ना तेव्हा माझ्यासाठी हि घेऊन येत जा. आनशील ना?" निखिल ने परत कविताला कोड्यात पाडलं.

"हो आणीन कि.. नक्की आणते." असं म्हणून कविताने हि छोटीसी स्माईल दिली. तिचं स्माईल पाहून दिल खुश झाल्यासारखा निखिल जेवणावर तुटून पडला होता त्याला पाहता पाहता कविताच्या मनात पुन्हा विचारांचा पाऊस चालू झाला होता.

'असा कसा मुलगा आहे हा. अगदीच बिंदास, मघाशी मी याच्यावर इतकी रागावले पण त्याचं त्याला काहीच वाटलं नाही. खरचं उगाच रागावलो आपण याच्यावर. मनाने चांगला दिसतोय. थोडा अल्लड आहे पण याच्या पर्सन्यालिटीला इतका आल्डपणा सूट करतोय हां. देवाने याच्यातले थोडे गुण विनोदमध्ये घातले असते तर फार बरं झालं असतं. त्यापेक्षा याच्याशीच माझं लग्न झालं असत तर?.... हा कसला विचार करत आहेस कविता.. तुझं लग्न झालंय हे लक्षात असुदे. लग्नाला अजून महिना पण झाला नाही आणि एवढ्यात तू तुझ्या नवऱ्याला कंटाळलीस. असं वागणं शोभत नाही तुला.' कविताचं मन कविताला सत्याची जाणीव करून देत होतं. हे सत्य आता बदलणार नव्हतं आहे त्याचा स्वीकार करणे हा एकच मार्ग शिल्लक होता. विचारांच्या दुनियेत शिरलेली कविता एक टक समोर बसलेल्या निखीलकडे पहात होती.

"काय ग कविता असं काय पाहतेस माझ्याकडे? आता खाऊन टाकतेस कि काय मला. पोट भरलयं ना तुझं कि अजून काही मागवू?" असं म्हणून निखिल मोठ्याने हसायला लागला.

"तुम्हाला एक विचारू काय?" हासणाऱ्या निखीलकडे पहात कविता म्हणाली.

"अग एक का दहा विचार. तू फक्त विचार. वाट्टेल ते विचार. पण एक अट आहे हां..."

"कोणती अट?" कपाळाला आट्या पाडत कविता म्हणाली.

त्यावर एक मोठा श्वास घेत निखिल म्हणाला, "तू मला आहो जावो करायचं बंद कर आधी. मला अरे तुरे केलेलं जास्त आवडेल."

"बरं, चालेल."

" विचार मग काय विचारणार होतीस."

"अरे हेच कि, मघाशी मी तुझ्यावर एवढी रागावले त्याचं तुला काहीच वाटलं नाही? मला वाटलं माझा राग पाहून तू बोलणार नाहीस माझ्याशी. पण तुझ्यावर तर काहीच फरक पडला नाही. असा कसा रे तू?"

"असाच आहे ग मी. माणसं कधीच चुकीची नसतात फक्त वेळ चुकीची असते ह्या मताचा मी आहे. तू जेव्हा माझ्यावर रागावलीस तेव्हा माझी तुझ्याशी वागण्याची वेळ चुकीची होती. समज आता मी जर तुझा हात धरला तर तू रागावशील का? नाही ना? कारण आता आपण एकमेकांना चांगलं ओळखतो. म्हणजेच आता वेळ बदलली पण माणसं तीच आहेत. तसा माझा एक प्रॉब्लेम आहेच मी लोकांना लगेच आपलंसं करून घ्यायचा प्रयत्न करत असतो. समोरच्याचा मुड समजूनच घेत नाही बघ. पण तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी हां..." निखिलने आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊन टाकलं.

"सॉरी वगैरे राहूदे रे. माझीच तुला ओळखायला चुकी झाली. आपली वेळ खराब होती ना? तशी मी चुकीची वागले नव्हते हा वेळ चुकीची होती." असं म्हणून कविता हसायला लागली.

"आता हे बरं आहे. मघापासून शांत शांत असणारी तू आता बरं माझ्या लॉजिकची खिल्ली उडवतेस हा. चालायचं माझ्यामुळं तुझ्या चेहऱ्यावर हासू आलं त्यातच सगळं आलं." असं म्हणून निखिल हि हासू लागला.

"बास कर तुझे फिल्मी डायलॉग हा. मोका बघून बरोबर सुचतात हा तुला..." कविता अगदी मनमोकळं हासत होती. लग्नानंतर आज पहिल्यांदाच ती इतकी मनसोक्त हासत होती. निखिल मात्र कविताच्या गालावर पडलेली खळी पाहण्यात हरवून गेला होता.

जेवून झाल्यावर दोघे हि आपल्याला कामात गुंतून गेले होते. संध्याकाळचा चहा दोघांनी एकत्र घेतला. ऑफिस सुटायची वेळ झाली आणि दोघे हि घरी जायला निघाले. दोघांनी एकमेकांना बाय केलं आणि दोघे हि आपापल्या रस्त्यांनी निघून गेले.

निखिलच्या डोक्यात आता फक्त कविताचे विचार फिरत होते. कविताला पाहताच क्षणी तो तिच्यावर फिदा झाला होता. कविता होतीच तशी. गोरा गोरा रंग, त्यात हातावर काढलेली मेहंदी, काळेभोर आणि लांबसडक केस, अगदी मेंटेन ठेवलेली फिगर. एखाद्या हिरोईनला लाजवेल असं तीचं सौन्दर्य होतं. त्यात हसताना तिच्या गालावर पडणाऱ्या खळी मुळे तर निखील तिचा पुरता दिवाना झाला होता. आता रात्रभर निखिल तिच्या आठवणीत तळमळत राहणार हे मात्र नक्की होतं.

इकडे कविताचा चेहरा मात्र पुरता पडला होता. परत घरी त्याच शांत वातावरणात जायचं. तेच सगळ्यांचे निरस असे चेहरे पहायचे. त्याच कोंदट वातावरणात रहायचं. तोच नवऱ्याचा निस्तेज चेहरा पहायचा आणि शेवटी मन मारून रात्री एकमेकांच्या जवळ जायचं. अश्या निरस जगण्याला काहीच अर्थ नाही असं तिला वाटत होतं. पण नशिबात जे आयुष्य आलय ते जगण्याशिवाय आता कोणताच मार्ग नव्हता. आज ऑफिसमध्ये निखीलमुळे थोडाफार विरंगुळा झाला होता पण आयुष्यभराचा हा निस्तेजपणा घालवण्यासाठी तो कितपत पुरेसा पडणार होता. खरचं विनोद जर निखीलसारखा असता तर किती मजा आली असती जगण्याला. ह्याच विचारात कविता घरासमोर पोचली.

दाराची बेल वाजवली वाजवली. थोडयावेळाने विनोदाच्या लहान भावाने म्हणजे विपुल ने दरवाजा उघडला. समोर कविताला पाहून तो गालातल्या गालात हसला आणि निघून गेला. ह्या घरात तोच एक असा होता जो कविताशी थोडाफार हसून खेळून असायचा. वैनी आणि दिराचं नातं एक वेगळच असतं. त्यात लहान दीर असला तर मात्र सोन्याहून पिवळं. पण ह्या घराला असा कोणता शाप होता कोण जाणे. घरातील लोकांचा पडलेला चेहरा मात्र कधी खुलत नव्हता.

रात्री जेवणं झाल्यावर कविता आणि विनोद आपल्या बेडरूममध्ये बसले होते. कविता कसलसं पुस्तक उगाचच चाळत बसली होती. विनोद आपल्या लॅपटॉपमध्ये ऑफिसचं काम आवरण्यात गुंतला होता. कविता चोरून चोरून विनोदकडे पहात होती. पण विनोदमात्र आपल्या कामात गुंग होता. निदान आजचा दिवस कसा गेला एवढं तरी त्यानं आपल्याला विचारावं एवढीच तिची निरागस इच्छा होती पण विनोद काही तिच्याकडे लक्ष देत नव्हता. शेवटी कविताच म्हणाली, "विनोद आवरलं का? तुला वेळ लागत असेल तर झोपू का मी? आज खूप कामं होती रे ऑफिस मध्ये." निदान आता तरी विनोद ऑफिसविषयी विचारेल असं तिला वाटत होतं. पण विनोद म्हणाला, "सॉरी यार कविता. मला वेळ लागेल थोडा तू झोपलीस तरी चालेल." कविताचा पूर्णपणे हिरमोड झाला होता. हातातलं पुस्तक ठेवून ती बेडवर आडवी पडली.

तिच्या डोळ्यात पाणी साठलं होतं. मन भरून आलं होतं. पण विनोदला कळेल म्हणून ती गळ्यात आलेला हुंदका मोठ्या कष्टाने आवरण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी रडू आवरणं कठीण झालं म्हणून गडबडीनं उठून कविता बाथरूम मध्ये गेली. पाण्याचा नळ चालू केला. दबक्या आवाजात मनभरून रडून घेतलं आणि शेवटी तोंडावर थंड पाण्याचा हात फिरवला. डोळयातून ओघळणारे अश्रू पाण्यासोबत सम्पूर्ण चेहऱ्यावर पसरले गेले आणि जणू काही झालचं नाही असं दाखवतं कविता पुन्हा बेडवर येऊन पडली.

काही केल्या कविताला झोप लागत नव्हती. आपण आपलं आयुष्य कसं ह्या घरात काढायचं हाच प्रश्न तिला सतावत होता. ती डोळे मिठुन झोपेचं सोंग घेऊन पडली होती. मनात मात्र विचारांनी थैमान घातलं होतं. जवळपास तासाभराने विनोदचं काम संपलं. त्याने कविताकडे पाहिलं. तिचे बंद डोळे पाहून ती झोपली असेल या विचाराने विनोद हि बेडवर आडवा झाला. कविता मात्र मनातल्या मनात तळमळत राहिली. अगदी रात्रभर.

दुसऱ्या दिवशी पुन्हा कविता कामावर गेली. रात्रीच्या अपुऱ्या झोपेमुळे तिला थोडा थकवा आला होता. पण ऑफिसच्या कामात गुंतल्यावर तिला थोडं बरं वाटलं होतं. टी ब्रेक मध्ये पुन्हा निखिल आणि कविता कॅन्टीन मध्ये बसले होते. दोघांच्या समोर ठेवलेल्या कपातुन गरम गरम कॉफीच्या वाफा निघत होता. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर निखिल म्हणाला, "काय मॅडम रात्री फारच उशीर झाला वाटत झोपायला? डोळ्यातुन झोप पडायला लागलीय तुझ्या म्हणून विचारतोय." असं म्हणून निखिल गालातल्या गालात हासू लागला. त्याच्या बोलण्याचा अर्थ कविताला कळाला होता पण आपल्याला काहीच कळालं नाही असं दाखवत ती म्हणाली, "नाही रे तसं काही नाही. सकाळी लवकर उठले ना म्हणून जरा थकवा आहे एवढंच."

"हो का? बरं... मला वाटलं विनोदरावांनी जास्तच सतावलं कि काय?" असं म्हणून निखिल परत मोठ्याने हासू लागला.

कविता मात्र आवक होऊन त्याच्याकडे पहात होती. तिला काय बोलायचं तेच कळत नव्हतं. दोन दिवसांची तर आपली ओळख आणि एवढ्यात हा कोणत्या लेवलच्या चेष्टा करतोय याचं तिला आश्चर्य वाटत होतं. पण निखिलचा बिंदास स्वभाव पाहता हे स्वाभाविक आहे हे तिनं ओळखलं आणि ती म्हणाली, "अरे कसली चेष्टा करतोस रे? जरा तरी काही मर्यादा ठेव. अजून आपण एकमेकांना नीटसं ओळखत पण नाही." कविता थोड्या नाराजीच्या स्वरात म्हणाली.

"हे बघ कविता माणसाने कसं मन भरून जगावं. मन भरून हसावं. आणि मैत्री मध्ये असं मर्यादा वगैरे ठेऊन जगायला मला कधीचं जमणार नाही. काल तुझा जो सडेतोड स्वभाव पाहिलं ना तेव्हाच मी तुला पूर्ण पणे ओळखून गेलो. मी माणसं लगेच ओळखतो. म्हणून तर तू इतकी रागावली असताना हि मी तुला जेवायला बोलावलं. तू किती हि रागावलीस तरी तुझा राग तेवढ्यापुरताच असतो हे कालच पाहिलं मी नाहीतर तू, मी बोलवल्यावर जेवायला आली नसतीस. तुझा स्वभाव पाहिला आणि तेव्हाच ठरवलं की तुझ्याशी मैत्री करायचीच. मग करशील माझ्याशी मैत्री?"

अरे काय मुलगा आहे हा. कोणता विषय याने कुठे नेवून पोचवला हेच कविताला कळत नव्हतं. पण निखीलचा हा अजब स्वभाव तिला हि आता हळू हळू कळत होता. निखीलशी मैत्री करण्यात तिला हि आता हरकत वाटत नव्हती. गालावर एक नाजूक स्माईल देत कविता म्हणाली,

"ठीक आहे मला ही आवडले तुझ्याशी मैत्री करायला पण माझी एक अट आहे हा?"

"कोणती अट?" कपाळाला किंचित आट्या पाडून निखिलने विचारलं.

यावर हासत हासत कविता म्हणाली, "तू कधीच माझी चेष्टा करण्याची नाही हा."

यावर मोठयाने हात हालवत निखिल म्हणाला, "हे मात्र मला जमणार नाही हा. आता तर प्रत्येक दिवशी तुझी चेष्टा होणार. तुला पण कळलं पाहिजे की निखिलशी मैत्री टिकवणं किती कठीण काम आहे ते." असं म्हणून तो मोठ्यानं हासू लागला. त्याच्या हासण्यात आता कविताचा आवाज हि मिळाला आणि दोघे हि मैत्रीच्या बंधनात अडकले गेले.


इतर रसदार पर्याय