shantata books and stories free download online pdf in Marathi

शांतता..... वादळापूर्वीची आणि नंतरची.....

एक निवांत दुपार.... निवांत एवढ्यासाठी कारण माझ्या ऑफिस ला सुट्टी होती तेही चक्क चक्क 4 दिवस..... दुपारचा वेळ सत्कारणी लावायचा म्हणून पेन व नोटपॅड हातात घेतले, विषय तर काही सुचत नव्हता, मग सुरू झाली उजळणी भूतकाळाची…… ते पण का कारण कालच मी अक्षय सोबत (माझा मित्र) बोलत असतां तो म्हणाला होता , ' खूप लोकांना भूतकाळात रमायची सवय असते, माझ्या आठवणी मी कुलूपबंद ठेवतो, हवं तेंव्हा ते उघडायचे आठवणी जगून घ्यायच्या आणि परत कुलूपबंद करायच्या , त्याचा वर्तमानकाळावर परिणाम होऊ द्यायचा नाही ' आता वाक्य ही नव्हती पण अर्थ मात्र असाच काहीसा होता. काल बोलताना मला त्या गोष्टीचा अर्थ इतका काही उमजला नव्हता तर म्हणलं चला प्रयत्न करून पाहू काही सापडते का आठवंणींच्या डोहात..,.,… मस्त निरव शांततेची दुपार होती, कोठेतरी गाड्यांचा आवाज येत होता , कोणाच्या तरी घरी कुकर ची शिटी ऐकू येत होती , मध्येच पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. प्रयत्नपूर्वक हे म्युझिक बॅकग्राऊंड ला सुरू ठेवत मी शांतता एन्जॉय करायला सुरुवात करणार,
तोच त्या न अनुभवलेल्या गोड शांततेचा भंग करत माझा फोन व्हायब्रेटरला ( हे आपलं ते तरुणाई ची भाषा ओ😊)………

ह्या फोनचे पण आपलं भारी आहे हा, ज्यावेळेस आपण कंटाळलेले असू , कोणाशी तरी बोलायची तलफ आलेली असेल त्यावेळेस अजिबात वाजणार नाही किंबहुना आपल्याला पण कोणाशी बोलावं हे सुचत नाही. पण ज्यावेळेस आपल्याला शांतता हवी असते , शांत झोपायचं असते अथवा निवांत पडून स्वतःशीच हितगुज करायचे असते , त्यावेळी बरोबर कर्णकटू आवाजात कोकलायला लागलाच म्हणून समजायचे.. आता ती कर्णकटु रिंगटोन मीच सेट केलेली असते 😅.

मी पण काय फोनपुराण सांगत बसलेय त्याबद्दल नंतर बोलू… उठून पाहिलं तर माझ्या वर्गमैत्रिणीचा फोन जी सध्या माझ्याच शहरात रहायला आहे.

" हाय, स्नेहा , बोल ग "

" अग काय करते आहेस ? " पलीकडून विचारणा झाली,

" काही नाही ग , आता लिहायला बसणार तोच तू टपकलीस "
" असुदे , आपण 5 वाजता बाहेर जातोय, मार्केट स्टॉप ला भेटू , ओके ना ? "

" तू मला विचारते आहेस की सांगते आहेस ग? " माझी स्नेहा ला विचारणा…

आणि आम्ही दोघी खळाळून हसू लागलो. हीच हे नेहमीच आहे समोरच्याला स्पेशली मला गृहीत धरणे, ही सवय कधी बंद होणार काय माहीत, आणि समोरच्याला नाही कस म्हणू , काय वाटेल त्यांना ? हा मला भाबडीला नेहमी पडणारा प्रश्न..,. हे असच असतं त्यामुळे मी म्हणाले ,

" बरं, ह्याला विचारते … "

तोच तिने बोलणं मध्ये तोडलं, " त्याला विचारायला तू काय कुक्कुल बाळ आहेस का ग ? सारख काय त्याला विचारायचं? लग्न झालं आहे म्हणजे आता बाहेर जाऊ का मैत्रिणी सोबत हे पण तू तो सांगेल त्याप्रमाणे करणारं का ? "
इति स्नेहा.

" अगबाई , ब्रेक लाव जरा, भेटले ना की भांड , पण आता कशाला त्या फोन कंपनी ची गंगाजळी भरते आहेस , भेटू 5 ला.… बाय " असे बोलून ठेवला कॉल मी.

आता ह्याला सांगायचं पण थोडं अवघड झालेलं मला, आधीच ह्याला माझी व तिची मैत्री किंबहुना तिचे वागणे तितके काही रुचत नाही, काही गोष्टीमध्ये अति तत्ववादी आहे नवरा माझा , पण माझे म्हणणे असायचे कोणी कसे असावे हे आपण थोडी ठरवू शकतो.

फोन करण्यापेक्षा थोडा सोयीचा पर्याय म्हणून मी मेसेज करायचे ठरवले, पण त्याआधी थोडी आवराआवर करावी लागणारं होती , नाहीतर आयतच कारण मिळणारं होत त्याला. आता वाजले 3.30 म्हणजे घर आवरून ह्याला खायला करून ठेवून निघायला सहजच 4.30 होणार होते. मनातल्या मनात वेळेच गणित मांडून आवरायला सुरवातं केली.

आवरताना गेल्या ऍनिव्हर्सरी ला मी दिलेले कोलाज सापडले आणि गेल्या 4 वर्षांचा संसार डोळ्यासमोरून सरकू लागला, पण वेळ होईल म्हणून पॉझ बटन प्रेस केलं आणि मस्त तयार होऊन एक मेसेज केला,

' Going with sneha , will come till 7 pm, snacks is ready , plz consider. love u.......'

सेंड बटन प्रेस करणार तोच परत ' love you ' इरेझ केल … मेसेज सेंड केला व निघाले.

मार्केट स्टॉप ला पोहोचले, तर मॅडम आधीच हजर होत्या, मी गाडी थांबवायची वाट न पाहता तिथून हातवारे करत, माझ्यासोबत आणि 4 लोकांचे लक्ष वेधून घेत स्नेहा ने माझ्या दिशेने धाव घेतली व म्हणाली,

"ए पागल, कशी आहेस? आणि काय ग हे किती उशीर ?" , आता ह्या प्रश्नावर माझं घड्याळ तर मला 4.55 ही वेळ दाखवत होत पण ही लवकर आली असेल तर समोरचा हा उशिराच आलेला असतो………😂

"हाय, ए पागल काय इतकं छान नाव आहे माझं आणि तुझं काहीही असतं हा सुरू, बरं मी मस्त मजेत आहे , तू बोल, तू कशी आहेस?" इति मी.

"अग माझं सोड ग, तुझं बघ, काय अवस्था केली आहेस स्वतःची , काही लक्ष देते क नाही तू स्वतःकडे? " ही स्नेहा बरं का…

" ए जरा श्वास घे… आधी खाऊया काहीतरी मग बोलू"

एक गाडी आम्ही पार्क केली व एका गाडीवर निघालो भटकायला. थोडं थांबून आमच्या फेव्हरिट ठिकाणी सँडविच व पाव भाजी हादडली आणि वारा प्यायलेेल्या वासरांसारखे उधळलो आम्ही. 5 -6 दुकानात विंडो शॉपिंग, 4 - 5 दुकान पालथी घालून, काहीच न घेता कस जायचं म्हणून स्ट्रीट शॉपिंग केली आणि 3-4 गांधीजी व तास पण खर्ची केले.

वेळ कसा गेला हे कळलं नाही, सहज घड्याळ पाहिलं तर 8 वाजत आलेले, आता जाऊन जेवण करायला उशीर होणार म्हणून स्नेहा ला म्हणले चल नेहमीच्या दुकानातून भजी ब्रेड घेऊ आणि मला स्टॉप ला सोड मी जाते पटकन.

तिने मला सोडलं, आता भात आमटी केली की झालं जेवण, म्हणून मी माझ्याच तंद्रीत गाडी स्टार्ट केली , स्नेहा ला बाय करून निघाले घरी .

लॅच की ने दरवाजा उघडला व आत पाय टाकते नाही टाकते तोच समोर सोफ्यावर बसलेला राहुल उखडला … " कोठे गेलेलीस भटकायला ? " (आता गेलेले तर खरच भटकायला पण कोणी अस रागाने विचारलं की आपली पण सटकते ना जरा 😃)

" अरे असे काय , तुला मेसेज केलेला ना मी, स्नेहा सोबत शॉपिंग ला गेलेले मी " हातातले सामान ठेवत मी बोलले.

" ती एक भटकभवानी आहे, तिचा नवरा इथे नसतो सो तिला काय काम नसतात, तुझं तसं आहे का ? आहे ना तुझा नवरा इथे ? तिच्या नादाला लागून संसार धोक्यात आणशील एक दिवस."

" अरे वेड्या, हे काय नवीनच डोक्यात आले तुझ्या , दिवसभर घरी आहे गेले 2 दिवस म्हणून नुसतं फिरायला गेले तिच्यासोबत तर डायरेक्ट संसार अँड ऑल … काय झाल कंपनी मध्ये काही झाले का? सगळं ठीक आहे ना ? नको रे टेन्शन घेऊ, होईल सगळं ओके…" असे म्हणत मी त्याच्या डोक्यावर हात ठेवून शेजारी जाऊन बसत होते तोच माझा हात पटकन झिडकारत तो म्हणाला ,
" प्लिज , तुझं लेक्चर नको सुरू करू आता, चूक करायची आणि वर तुझं ऐकून घ्यायचं, तू का ऐकत नाहीस मी सांगितलेले ?

नशीब मी सावध होते नाहीतर जरा कमी मी खाली पडलेच असते , झालं माझं पण डोकं सटकले, विषय काय हा बोलतो काय ……मी ही तणतणत आत किचन मध्ये गेले निघून.

तो तिथे शांतपणे मोबाईल हातात घेऊन काहीतरी करत बसला, मी पण तोंडाला कुलूप घालून भात डाळीचा कूकर लावला. जेवताना पण दोघेही शांतपणे जेवलो अगदी शहाण्या बाळासारखे , न जाणो तोंड उघडल्यावर काय काय बाहेर पडेल म्हणून कदाचित.……

जेवून आवरताना मनात विचार आला, ' दुपारी न अनुभवता आलेली गोड हवीहवीशी शांतता हीच तर नाही ना ? पण काय उपयोग ह्या शांततेचा……… मनात खळबळ आणि बाहेर शांत…………'

समाप्त

आरती जाधव - भादवणकर
19/ 11/ 2018

( नावासह फॉरवर्ड करण्यास काहीच हरकत नाही, धन्यवाद.)


इतर रसदार पर्याय