अरे बाबा देव गण आहे माझा, मला काही होणार नाही. ह्या सुनीलचे आपले काहीतरीच. म्हणे अजय अमावस्येला जास्त भटकू नकोस इकडे तिकडे. मित्र आहे म्हणुन ठीक नाहीतर दोन शिव्या घातल्या असत्या. भित्री भागूबाई.
तरी पण डोक्यात टाकलेच ह्याने काहीतरी. जाऊ दे, घरी जाऊन दोन पेग मारून झोपून जाऊया. आदितीला पण आजच जायचे होते माहेरी. बघितले हे असे होते. उगाच डोक्यात भरवले काहीतरी. तोपर्यंत ठीक होते. पण मी कशाला विचार करतोय. हा सुनील पहिल्यापासून घाबरट. डोंबिवलीत लहानपणी बिल्डिंग मध्ये लपाछपी खेळताना रात्र झाली की घाबरायचा. ह्याचे काय मनावर घ्यायचे.
ते ठीक आहे. पण दरवाजा उघडा कसा. चोर तर घुसले नाहीत ना. नाही आत तर सर्व ठीक आहे. आदिती एक नंबर धांदरट आहे. घरी जायची घाई दुसरे काय. 12.30 झाले, झोप काही येत नाहिये. टीव्ही बघता बघता झोप येईल.
रात्रीचे कसले काम करतात शेजारचे की दरवाजा कोणीतरी ठकठक करतंय. काय समजत नाहिये. जाऊ दे. कितीही हुशार वाटत असलो तरी मोक्याच्या क्षणी घाम फुटतो आहे. रामरक्षा म्हणावी पण येते कुठे, मारुती स्तोत्र सोपे आहे. पण काय झाले काय घाबरून जायला. सगळे मनाचे खेळ आहेत.
पण घर घेताना जास्त विचारपूस केली पाहिजे होती का? आधीचे राहणारे कमी किमतीत द्यायला तयार झाले, तेव्हा तर किती आनंद झाला होता. ते अमेरिकेत स्थायिक असतात. आजी आजोबा राहायचे. म्हणजे दामू अण्णा आणि आजी. दोघेच. बरीच वर्षे एकटी काढली. मुलगा सून नातू अमेरिकेत, इकडे सुट्टीत यायचे कधीतरी. बाकी वेळ एकटेच. आता काही दिवसा पूर्वी गेले दोघे अचानकच. मुलाने घर विकायला काढले. त्याला जास्त वेळ नव्हता. पडेल त्या किमतीत विकून निघून जायचे होते. बरे झाले, आपल्याला काय. आमच्या नशिबात होते असे म्हणायचं. आणि परवडले म्हणुन नाहीतर मुंबई मध्ये घर घ्यायचे म्हणजे झालेच.
दामू अण्णा आणि आजींना बघता नाही आले प्रत्यक्षात पण त्यांचा एक फोटो मात्र आहे घरात.का कुणास ठाऊक दामू अण्णांचा फोटो बघून आपुलकी वाटते त्यांच्यासाठी.
असो, पण आता विचार कशाला असले. झोप येत नाहिये आणि रिकामे घर म्हणुन मन भटकते आहे दुसरे काय. सुनीलला बोलावतो घरी. तेवढाच गप्पा मारण्यात वेळ जाईल. उद्या काय रविवारच.
“अरे सुनील घरी ये ना… बॉटल घेऊन ये. सकाळी लवकर जा वाटल्यास.” लगेच बरा तयार झाला हा, मला वाटले भाव खाईल. येईल इतक्यात तोपर्यंत गाणी लावूया.
आत कोण खेळते आहे? बॉल चा आवाज येतो आहे. “कोण आहे तिकडे?”. काय चालू आहे, बघावे का जाऊन. खरेतर भिती वाटत आहे, कशाला विषाची परीक्षा. पण बघावे तर लागेल. थोड्या वेळा नंतर बघुया, सुनीलला येऊ दे. कुठे राहिला हा, इतका वेळ लावेल यायला.
बेल वाजली. आला वाटते. “ये सुनील, कुठे राहिला होतास.” ह्याला काय सांगाव आता, निघून जाईल हा घरी घाबरून. “पेग बनव ना आपला, तुझ्यासाठीच थांबलो होतो. “
“अरे हे काय चढली वाटते आधीच की घरून घेऊन आलास. तीन ग्लास काय बनवतो वेडा आहेस का?”
सुनील : हे काका नाही घेणार का?
मी : कोण काका?
सुनील : कोण म्हणजे. हे सोफ्यावर बसले आहेत ते आणि कोण?
माझ्या पायाखालची जमीन सरकली. कोणी आहे का इथे. मला का दिसत नाही.
“सुनील, चल निघू या इथून लगेच. उद्या सकाळी काय ते बघूया. आदिती पण घाबरेल हे ऐकून. तिला आत्ता नको सांगूया काही.“
सुनील : अरे किती घाबरट आहेस. मस्करी केली. तू घाबरत नाहीस ना म्हणत होतास मघाशी. आता काय झाले?
मी : काय माणूस आहेस तू. हीच वेळ घेतलीस तू मस्करी करायला. नाही नाही ते विचार आले डोक्यात.
(काय सांगू तुला, मघाशी मात्र मला खरच आवाज आला होता खेळण्याचा आतल्या खोलीमधून)
तुला खरेच कोणी दिसले नाही ना?
सुनील : नाही बाबा. गंमत केली मी थोडी. तसेही तू म्हणतोस ना तुला काही दिसणार नाही. देवगण आहे म्हणुन मग झाले तर.
अरे माझे पाकीट राहिले गाडीत. घेऊन आलो पटकन.
मी : कोण घेऊन जाणार तुझे पाकीट. राहू दे. काही नाही होत.
सुनील : आलो लगेच. 5 मिनिटात. उगाच टेंशन नको.
15 मिनिटानंतर…
हा आला कसा नाही अजून. घरी गेला की काय. फोन पण नॉट रिचेबल येतोय. काय माणूस आहे. जाऊन पहावे का खाली? जातोच एकदा. बघुया कुठे गेला तो.
पण हा दरवाजा उघडेल तर ना. सुनीलने बाहेरून लॉक केला की काय. उघडत का नाहिये. नंबर पण नाहिये शेजाऱ्यांचा.
टक टक… परत आतून आवाज. बघुया आता चल बस झाले. आपले घर आहे. घाबरून कसे चालेल.
आत तर कोणी दिसत नाही. मग आवाज कसला येत होता? काय चालू आहे सगळे. डोके दुखायला लागले.
पण आवाज परत आला. कुठून येतो आहे. दिसत तर काही नाही. माळ्यावरून? नीट ऐकू. हो माळ्यावरून.
दामू अण्णांचा मुलगा सामान पण घेऊन नाही गेला सगळे. माळ्यावर असेच पडले आहेत 3-4 बॉक्स. तुम्ही बघा काय ते म्हणत होता. सकाळी ते काढून टाकेन आधी.
बापरे पण हे काय आता नवीन. काय करावे. कोणी सोबतीला नाही. सकाळ पर्यंत जीव जाईल भीतीने.
आता इकडे थांबणे शक्य नाही. “हॅलो आदिती, प्लीज घरी ये लगेच. मला माहित आहे रात्रीचे किती वाजले आहेत पण तसे काही नसते तर फोन केला असता का मी? आणि हो तुझ्या बाबांच्या ओळखीचे पंडित आहेत ना त्यांचा नंबर दे. अग झाले काही नाहीये पण होईल केव्हाही. तू घरी ये आधी, मला खूप भीती वाटते आहे.”
घर सोडून जावे तर बाकीचे लोक वेड्यात काढतील, फ्लॅट विकायला गेलो तर कोणी घेणार पण नाही. काहीतरी तोडगा आपणच काढावा.
“हॅलो पंडित, नमस्कार. मी अजय सबनीस, ओळखले का? आदिती आणि मी भेटलो होतो तुम्हाला सासू सासर्यांच्या एनिवर्सरीला. सॉरी आता एवढ्या रात्री फोन केला पण परिस्थिती तशी आहे. प्लीज या लवकर तुम्ही. मी ऍड्रेस पाठवतो.”
बेल वाजली. आदिती आली वाटते. बरे झाले. अरे सुनील तू आलास. कुठे होतास इतका वेळ. अरे आतून आवाज येतो आहे मला. तुझी मदत लागेल रे जरा. मी आदितीला बोलावले आहे आणि आणखी एक येणार आहेत आमच्या ओळखीचे.
सुनील : नीघ इथून आताच्या आता.
मी : अरे काय बोलतो आहेस. आदिती येते आहे. येईलच इतक्यात.
फोन वाजतो आहे. कुणाचा नंबर आहे हा?
“हा शोभा. अग सुनील ना आला आहे इथे. तुला सांगितले नाही त्याने. कमाल आहे त्याची.
काय… काय बोलते आहेस?”
सुनीलला हार्ट अटॅक आला आणि तो गेला? अजय च्या घरी जाऊ नकोस असे काहीतरी बोलला म्हणे.
मग इथे घरात कोण आहे सुनीलच तर आहे. मागे वळून बघितले तर कोणी नाही.
आदिती आली. “अरे अजय काय झाले काय? इतका घाबरला का आहेस तू?”
“अग बरे झाले तू आलीस. खूप विचित्र गोष्टी घडत आहेत इथे. अग सुनील माहिती आहे ना, माझा मित्र, तो अचानक गेला. अग आता बोलत होता माझ्याशी इथे आपल्या घरात, आणि त्याची बायको म्हणते तो घरी हार्ट अटॅक ने गेला म्हणून.”
कहर झाला आता मात्र. सुनील अचानक कसा काय गेला. काय पाहून इतका घाबरला की अटॅक आला त्याला? आणि मला इथे कसा काय दिसला आत्ता? आत्मा 13 मिनिटे फिरत असतो शरीर सोडल्यावर…. खरे आहे का?
“पंडित येईपर्यंत सांगतो मी तुला काय झाले आहे ते…अग आतून आवाज येत आहेत लहान मुलाच्या खेळण्याचे. मी पण घाबरलो आहे. थोडा वेळ इथेच बसुया बाहेरच्या खोलीत.”
थोड्या वेळानंतर…
बेल वाजली. “या पंडित या. सॉरी तुम्हाला त्रास दिला या वेळी. पण तसेच काहीतरी घडते आहे इथे”
पंडित म्हणजे एक रुबाबदार व्यक्तिमत्व. भरदार शरीर, गोल चेहरा पण सदैव कसल्यातरी विचारात. देव, दानव, आत्मा, पुनर्जन्म यावर त्यांचा प्रचंड अभ्यास. आयुष्यात वाटले नव्हते ह्यांची कधी मदत लागेल म्हणुन. तेही अशा अवेळी. पण आले आत्ता ते बरे झाले. खरे खोटे बाहेर येईल.
“पाणी हवे का तुम्हाला?”
“नको.”
फक्त एक शब्द. नजर घरात इकडॆ तिकडे.
पंडित : चला, आतल्या खोलीत जाऊया.
“ह्या माळ्यावर कसले बॉक्स आहेत?”
मी : माहित नाही. जुने आहेत. आधी राहण्यारांचे, काढायचे आहेत टाकायला.
पंडित : आत्ता काढावे लागतील.
आमची पाचावर धारण बसली. आता काय होणार. उद्याचा दिवस पाहणार की नाही.
एक एक बॉक्स खाली काढला. विशेष काही नव्हते. लहान मुलाचे कपडे, खेळणी आणि बॉल.
पंडित : इथे आधी कोण राहायचे?
मी : म्हातारे आजी आजोबा होते. दामू अण्णा आणि आजी. गेले काही दिवस आधी. नंतर त्यांच्या मुलाने घर विकले आम्हाला आणि तो निघून गेला अमेरिकेत.
पंडित : त्यांचा एखादा फोटो आहे का?
अदिती : हो आहे ना. एक फोटो सापडला होता आम्हाला. हा घ्या तुम्ही.
पंडितांनी देवासमोर दिवा लावला. आणि ते मांडी घालून खाली बसले ध्यान मुद्रेत. बराच वेळ झाला.
नंतर त्यांनी डोळे उघडले. आणि ते जे काही बोलू लागले….
दामू अण्णा आणि आजींना एकच मुलगा. लाडात वाढवले. मोठे केले, लग्न करून दिले. मध्ये मध्ये काहीतरी कुरुबुरी ऐकायला यायच्या. पण बाकी छान चालले होते. एक गोष्ट सोडून. लग्नाला 8 वर्षे झाली तरी मुलबाळ नाही. कुठेतरी काहीतरी कमी पडत होते. खूप डॉक्टर केले तरी उपयोग नाही झाला. शेवटी मूल दत्तक घ्यायचे ठरले. ठरल्याप्रमाणे तो दिवस आला. गाजावाजा करून त्या इवल्याशा बाळाला घरी आणले. सगळे एवढे खुश होते. नाव पण छान ठेवले चिन्मय. अशीच वर्षे सरली. चिन्मय आणि आजी आजोबा हे एवढेच काय ते समीकरण. चिन्मय ला आजोबांचा लळा जास्त. कधी चस्मा लपव कधी त्यांच्या मांडीत बसून गोष्टी ऐक.
एके दिवशी मुलाने बातमी दिली. अमेरीकेत नोकरी मिळाली म्हणून. दामू अण्णा आणि आजी हिरमुसले. आता हा बाळ चिन्मय कधी भेटणार, घर अगदी खायला उठेल. पण काय करणार शेवटी नाईलाज झाला. अमेरिकेत गेल्यावर फोन यायचा नेहमी चिन्मयचा. तुमची आठवण येते म्हणायचा.
सुट्टीत इकडे घेऊन यायचे त्याचे आई बाबा. दामू अण्णा आणि आजींना तर काय करू आणि काय नाही असे व्हायचे. असेच एकदा सुट्टीत आले होते तिघेही.
एका रात्री भरभरून ताप आला चिन्मयला. तापाने फणफणला अगदी. डॉक्टरने काही गोळ्या दिल्या पण ताप काही उतरेना. आणि अचानक तो डोळे उघडेना. साध्या तापाचे निमित्त आणि बिचारा चिन्मय गेला. हसरा गोंडस चेहरा, निरागस पोर.
दामू अण्णांना वेड लागायला लागले. दिवस भर चिन्मय चिन्मय करत बसायचे. रात्री झोपेत बडबडायचे. मध्येच उठून बसायचे काय तर म्हणे चिन्मय चा अभ्यास घेतोय.
मुलाने सांगितले माझ्या बरोबर अमेरिकेला चला. पण हे दोघे नाही म्हणजे नाही. आम्ही इथेच बरे. तुम्ही राहा तिथे. काळजी करू नका. दिवस सरु लागले. मुलगा आणि सून अमेरिकेत मजेत जगू लागले. शेवटी ते दत्तक मूल. किती दुःख करून घ्यायचे असे म्हणायचे.
आता दामू अण्णा आणि आजी पण खुशीत असायचे. चिन्मय सतत सोबत असतो असे त्यांना वाटायचे. तो हे जग सोडून गेला आहे विसरून गेले ते. दिवस रात्र म्हणे त्याच्याशी खेळण्यात जायचे.
आणि एकदा बोलता बोलता आजी चुकून बोलून गेल्या. चिन्मय बाळा तुझे खरे आई वडील कोणी तरी दुसरेच आहेत. आणि तिथून सुरुवात झाली सगळ्या गोष्टींची.
आजी म्हणायच्या अरे बाळा चुकून बोलले मी. काय मनावर लावून घेतले रे. किती कट्टी करणार आमच्याशी. कुणास ठाऊक काय झाले पण दामू अण्णा ना कळून चुकले आता चिन्मय पहिल्या सारखा नाही वागणार. त्यांना जाणवायचे हा एकटाच बसलेला असतो. काही बोलत नाही. त्याचे सतत एकच वाक्य. माझे खरे आई बाबा कोण… त्यांना भेटायचे आहे मला…
दामू अण्णा आणि आजी ने मुलाला बोलावून घेतले. त्याला सांगितले त्यांना चिन्मय दिसतो ते. जोपर्यंत ह्या मुलाचे खरे आई वडील कळत नाहीत तोपर्यंत हा चिन्मय काही आमच्याशी बोलणार नाही. आमची एकच इच्छा.तुला खोटे वाटत असेल तर वाटू दे पण ही एक इच्छा पूरी कर. मग तुला काही परत त्रास देणार नाही. मुलाने खूप शोधाशोध केली. अनाथ आश्रमात फेऱ्या घातल्या, वशिला लावला आणि शेवटी नाव आणि पत्ता मिळाला चिन्मयच्या खऱ्या वडिलांचा.
काही वर्षे सरली. चिन्मय पण रोज घरी नसायचा. अधे मध्ये दिसायचा त्यांना. दामू अण्णा आणि आजीना आता मानवेना. तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. आणि अचानक एक दिवस दोघे ही गेले. एक पत्र मात्र मागे ठेवले होते त्या बॉक्स मध्ये.
पंडित जागेवरून उठले आणि त्यांनी ते बॉक्स मधून पत्र काढले.
“आमची शेवटची इच्छा. खरेतर चिन्मयची इच्छा. हे घर आमच्या नंतर त्याच्या खऱ्या आई वडिलांना विका. कळू दे त्यांना मूल टाकुन देणे काय असते ते. त्याचे खरे आई वडील त्याला दिसतील आणि त्याला शांती लाभेल.”
त्या पत्राबरोबर एक कागद पण होता. त्यावर नाव लिहिले होते. श्री. अजय सबनीस. पत्ता डोंबिवली मुंबई.
“ह्या जन्माचे कर्म ह्याच जन्मात भोगावे लागते. प्राक्तन म्हणतात त्याला.” पंडित एवढेच बोलले आणि निघून गेले घरातून.
मी हादरून गेलो होतो. अदिती विचारत होती काय अर्थ आहे ह्या सगळ्याचा. सगळे विचार डोक्यात कांगावा करू लागले .
कसे काय विसरेन मी. पण माहित नव्हते असे बाहेर येईल हे सगळे.
कॉलेज चे दिवस. तारुण्य. प्रेमात केलेल्या नको त्या गोष्टी. तिला दिवस गेले आणि एका बाळाला जन्म देऊन ती देवाघरी गेली. माझ्या घरी काहीच माहित नाही. तिच्या आई वडिलांकडे मी दयेची भीक मागितली. त्यांनी अब्रू जाऊ नये म्हणून मोठा वशिला लावला आणि ही बातमी दाबली. मग बाळाचे काय करायचे? अनाथ आश्रमात सोडून आले.
……अदिती सोडून गेली. आठवण येते आहे तिची कधी तरी. पण चिन्मय बाळ आहे सोबतीला. त्याच्याशी खेळण्यात वेळ कसा जातो काही कळत नाही. कधी तो दामू अण्णांच्या बरोबर मस्ती करतो तर कधी माझ्या बरोबर.
घर कसे भरलेले वाटते आहे.