Hoy, mich to apradhi - 4 books and stories free download online pdf in Marathi

होय, मीच तो अपराधी - 4

४) होय, मीच तो अपराधी!
काही वेळानंतर कामकाजाला सुरुवात झाली. सरकारी वकील म्हणाले, "त..त तू आतापर्यंत अनेकदा स्वतःच्या तोंडाने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे."
"झाले. एवढेच? मी जर न्यायालयात सांगितले की, आत्तापर्यंत... या क्षणापर्यंत माझ्याकडून जबरदस्तीने गुन्हा कबूल करवून घेतलाय तर..."
"असे कसे? तू असे करु शकणार नाहीस." सरकारी वकील म्हणाले.
"का नाही? मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना बचावाची संधी दिली जाते. पोलिसांसमोर दिलेला कबुलीजबाब नंतर न्यायालयात अनेकजण फिरवतात. ते जाऊ देत. समजा मी उद्या अशा एखाद्या व्यक्तिला उभे केले जी व्यक्ती प्रतिष्ठित आहे, सरकारदरबारी वजनदार आहे आणि त्याने असे सांगितले की, गुन्हा घडला त्यादिवशी, गुन्हा घडला त्यावेळी नरेश माझ्यासोबत होता तर..."
"येस मायलॉर्ड! दॅट्स इट! मी सुरुवातीपासूनच आपणास हेच सांगत होतो की, हा गुन्हेगार अत्यंत हुशार आहे. गुन्हा कबूल केल्याबरोबर याला कठोर शिक्षा द्या. आता बघितले हा कसा सरड्याप्रमाणे रंग बदलतोय ते." सरकारी वकील काहीशा उत्साहाने म्हणाले.
"वकिलसाहेब, मी तुम्ही तुमच्या कायद्याला सरड्याचे रंग परिधान करून तुमच्या खिशात कसे बसविले आहेत ते दाखवतोय. अजूनही मी केलेला गुन्हा नाकारलेला नाही. एक शक्यता सांगतोय. जे न्यायालयात वारंवार घडते त्याची..."
"मिस्टर नरेश, इतकाही स्वतःला हुशार समजू नकोस. तिथे उपस्थित असलेल्या शेकडो डोळ्यांनी प्रत्यक्ष घटना बघितली आहे..."
"किती साक्ष देणार आहेत? शंभर जण? न्यायालयाचा ससेमिरा मागे लावून घेणारी एक तरी व्यक्ती पुढे येईल? समजा, एखादा माणूस पुढे आलाच तर तुमचा वकिली खाक्या त्या व्यक्तिचा संबंध त्या घटनेशी जोडणार नाही कशावरून? बाहेर सार्वजनिक ठिकाणी, कॅमेऱ्यासमोर मारे दिमाखात आरोपीच्या विरोधात बयान देताना बेंबीच्या देठापासून ओरडणारी माणसं वेळ येताच फिर्यादीकडे, कायद्याकडे कशी पाठ फिरवतात याचा अनुभव वकिलसाहेब, आपणापेक्षा अधिक कुणाला असणार आहे? एवढेच कशाला प्रत्यक्ष फिर्यादी आणि अन्यायाला बळी पडणाऱ्या व्यक्ती फिर्याद कशा आणि का मागे घेतात? महोदय, कायद्याचे- न्यायाचे प्रतीक म्हणून न्यायदेवता आहे. काय आहे त्यामागची भावना? कायदा डोळे बांधून, आंधळेपणाने न्याय करीत नाही तर वादी- प्रतिवादी दोघांनाही समान, डोळसपणे न्याय मिळेल अशीच त्यामागील भूमिका आहे ना? निदान मी तरी तसा अर्थ घेतो कदाचित तो चूक असेल पण आजची स्थिती काय आहे? डोळ्यावर पट्टी बांधलेली स्त्री म्हणजे कायदा आंधळा आणि हातातील तराजू म्हणजे विकला जाणारा न्याय असा विकृत अर्थ त्या पवित्र प्रतिकाचा समाजात पसरला आहे..." नरेशला पुढे बोलू न देता सरकारी वकील म्हणाले,
"व्वा! काय पण स्वतःचा बचाव आहे. कायद्याच्या पवित्र प्रतिकाचा असा अर्थ लावताना लाज वाटत नाही? महोदय, आरोपीचे विचार अतिविकृत होत चालले आहेत. आपण जर याला कठोर शिक्षा नाही सुनावली तर उद्या हा नराधम आणि अशाच विकृत विचारांची माणसे दिवसाढवळ्या गल्लोगल्ली बलात्कार करीत सुटतील. कायदा, पोलीस यांची भीती..."
"भीती? कुणाला? कुणाची? महोदय, काही महिन्यांपूर्वी दिल्लीत... देशाच्या राजधानीत एका बसमध्ये एका युवतीवर झालेल्या गँगरेपचे काय झाले? त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काय आणि कोणती ठोस पावले उचलली आहेत? एक तर माझ्यासारखा अपराधी आजही कायद्याचाच आधार घेऊन सुटतो आहे..." नरेश बोलत असताना नलिनी अचानक म्हणाली,
"मायलॉर्ड, निकाल केंव्हाही लागो, कसाही लागो परंतु त्यामुळे माझ्यासारख्या तरुणीवर बसलेल्या शिक्क्याचे काय? अपराधी फाशीवर लटकला तरी माझा काय फायदा होणार आहे? गुन्हा घडल्यानंतर काय करता येईल यापेक्षा अशी विकृत घटना घडू नये यासाठी काय करता येईल यावर चिंतन, मनन, मंथन होणे गरजेचे आहे. अशा घटनांनंतर धुरळा खाली बसला की, सारे शांत होईल. मदतीच्या साऱ्या घोषणा हवेत विरून जातील. उद्या जर अशाच एखाद्या घटनेत दुर्दैवाने एखाद्या स्त्रीचा मृत्यू झाला ना महोदय, तर निश्चितपणे एखादी व्यक्ती स्त्रीयांचा मसीहा म्हणवून घेण्याच्या लालसेपोटी त्या महिलेचा पुतळा उभारण्याची घोषणा करण्यासही मागेपुढे पाहणार नाही."
"महोदय, उद्या जर मी या गुन्ह्यातून निर्दोष सुटलो ना तर एखादा पक्ष मला तिकीट देईल, निवडून आणेल. 'बलात्कार कायदा मंत्री' असे नवे खाते निर्माण करून मला त्या खात्याच्या मंत्रीपदी बसवले तर आश्चर्य वाटायला नको. म्हणे कायदा! शहाणा माणूस कोर्टाची पायरी चढत नाही आणि अशा स्थितीत एखादा कुणी माझ्याविरुद्ध साक्ष देईल असे तुम्हाला वाटते? वकिलसाहेब, तारीख पे तारीख ह्या आपल्या न्यायव्यवस्थेच्या चक्रात स्वतःला अडकवून पैसा, वेळ यांचा अपव्यय कोण करेल? सांगा वकिलसाहेब, सांगा..."
"आहे, एक पुरावा आहे. वैद्यकिय तपासणी..." सरकारी वकील बोलत असताना नरेशने जोरात विचारले,
"झालीय का तपासणी? आलाय अहवाल? वकिलसाहेब, बलात्कार म्हणजे काय हो? जबरी संभोगच ना?"
"य.. य.. येस!" गोंधळलेल्या अवस्थेत वकील म्हणाले.
"जिथे साधा संभोग झाला नाही तिथे जबरी संभोग झाल्याचा वैद्यकिय अहवाल तुमच्याकडे आलाय का?"
"व्हाट?" वकिलांनी आश्चर्याने विचारले.
"काय?" न्यायमूर्तींनी अविश्वासाने विचारले.
"कसे शक्य आहे?" कुणीतरी ओरडले.
"बलात्कार झालाच नाही असे तुला म्हणायचे का?" न्यायमूर्तींनी विचारले.
"मायलॉर्ड, हा काय प्रकार आहे? जे सगळ्या जगाने पाहिलंय, आरोपीने ज्याची कबुली दिलीय..."
"वकिलसाहेब, जगाचे सोडा, माझे सोडा पण आपल्या पोलिसांनी या मुलीची त्यादृष्टीने तशी तपासणी झालीय का? महोदय, माझी विनंती आहे की, मला तो अहवाल..." नरेशला थांबवत न्यायमूर्ती सरकारी वकिलाला म्हणाले,
"मिस्टर प्रॉसिक्युटर, तसा अहवाल अजूनही न्यायासनासमोर आलेला नाही."
"ते देऊच शकणार नाहीत. कारण महोदय, पोलिसांनी तशी तपासणीच केलेली नाही. माझ्या ... होय! मी नलिनीसोबत झालेल्या झटापटीत ती जखमी झाली. मी पकडल्या गेलो आणि मी कबुली दिली. गुन्हा वारंवार कबूल केल्यामुळे केस जिंकल्याच्या आनंदात पोलिसांनी नलिनीची 'ती' तपासणी केलीच नाही. एवढेच कशाला महोदय, माझे लिखित बयान तरी आपल्यासमोर आलंय?"
"व्हाट? कुठे आहे आरोपीचे बयान?" न्यायमूर्तींनी विचारले.
"स.. स.. सॉरी! आरोपीने अनेकदा... खुद्द न्यायासनासमोर कबूल..."
"मायलॉर्ड, न्यायासनासमोर उभ्या असलेल्या नलिनीवर मी बलात्कार केलेलाच नाही. थांबा. वकिलसाहेब, थांबा! विचारा, नलिनीलाच विचारा..."
"होय! बरोबर आहे. परंतु..." नलिनी बोलत असताना हाती फार मोठे घबाड लागले असल्याच्या अंदाजात सरकारी वकील म्हणाले,
"ये..स, मायलॉर्ड, येस! हेच ते. हा आरोपी भयंकर क्रुर आहे. याने नलिनीवर बलात्कार करून तशी वारंवार कबुली देताना हस्ते परहस्ते नलिनीवर प्रचंड दबाव आणून तिलाही स्वतःला हवे तसे बोलायला भाग पाडले आहे..."
"मायलॉर्ड, मी खोटे बोलत नाही. माझी शारीरिक तपासणी झाली तर मी याक्षणापर्यंत कुमारिका असल्याचे सिद्ध होईन." नलिनी म्हणाली आणि स्वतः न्यायमूर्तींसह सारेच आश्चर्यात पडले, अवाक् झाले. शेवटी न्यायमूर्तींनी पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले....
०००
नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED