होय, मीच तो अपराधी - 5 Nagesh S Shewalkar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

होय, मीच तो अपराधी - 5

५) होय, मीच तो अपराधी!
पंधरा-वीस मिनिटांनंतर न्यायमूर्ती पुन्हा स्थानापन्न झाले. त्यांनी आधी नरेश आणि नंतर नलिनीकडे रागारागाने बघत विचारले, "व्हाट इज धीस नॉन्सेन्स?"
"सांगतो. मायलॉर्ड, सारे सांगतो. सर्वप्रथम मी आपली, वकीलसाहेब, पोलीस आणि जनता सर्वांची माफी मागतो. बलात्कार वगैरे झालेला नाही. नलिनी आणि माझे एकमेकांवर खूप प्रेम आहे. नलिनी, एक साधी, सरळ मुलगी आहे. आता दिसते तशी बोल्ड मुळीच नाही."
"मला ओळखणारे अनेकजण मला काकुबाई असेच म्हणतात. मी काही रेवपार्टी, डान्सबार, पब अशा ठिकाणी जाणारी मुलगी नाही. माझ्यासारख्या मुलींनाही समाजात नानाप्रकाराने छळ, अपमान सोसावा लागतो. इतर शहरांचे सोडा परंतु आपल्या शहरातही रेवपार्टी, पब, डान्सक्लब अशा ठिकाणी जाणाऱ्या मुलींची संख्या का कमी आहे? कधीतरी एखाद्या ठिकाणी पोलिसांची धाड पडते आणि शेकडो मुली नको त्या अवस्थेत पकडल्या जातात हे कशाचे द्योतक आहे? अशा अनेक पार्ट्या दररोज चालत असतात त्याचे काय? अशा ठिकाणांहून बाहेर पडणाऱ्या मुलींचा पोशाख आणि त्यांची अवस्था यावर चर्चाच न केलेली बरी. अशा मुलींमुळेच नराधमांचे फावते. अशा वाह्यात मुलींसोबत वावरणारी गुंडं मुले, माणसे समाजातील साऱ्याच मुली तशाच वळणाच्या, त्याच चालीच्या आहेत असे समजून आमच्यासारख्या मुलींना त्रास देऊन आमचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. एखादा असा प्रकार घडतो तेव्हा समाज तात्पुरता खडबडून जागा होतो. आंदोलने होतात. मोर्चे निघतात. कँडल मार्च निघतात पण त्यामुळे असले प्रकार थांबतात का? मुळीच नाही. उलट असे प्रकार वाढताना दिसतात. लहान मुलगी असो, वृद्ध स्त्री असो किंवा गतीमंद, दिव्यांग मुलगी असो कुणावरही लैंगिक अत्याचार होतात. त्यामुळे मी आणि नरेशने असा विचार केला..." बोलताना नलिनी एक क्षण थांबलेली पाहून नरेश म्हणाला,
"मायलॉर्ड, आमची ओळख झाल्यापासून आम्ही दोघे एकत्र फिरत होतो त्या उद्यानातही आम्ही नेहमीच जात असतो. तिथले प्रकार, बस-रेल्वे, सिनेमा इत्यादी सार्वजनिक ठिकाणी आम्ही युवक- युवतींचे वागणे- बोलणे न्याहळत असू..." नरेशला थांबवत सरकारी वकील म्हणाले,
"परंतु मायलॉर्ड..."
"वकिलसाहेब, थांबा. ऐकून घ्या. आम्ही सर्वांना फसवलंय, सर्वांचा वेळ वाया घालवला आहे त्यासाठी मा. न्यायालय जी शिक्षा देईल ती भोगायला आम्ही तयार आहोत." नरेश म्हणाला.
"मागील एक महिन्यापासून मी माझ्या पोशाखात बदल केला. हे असले कपडे घालून बाहेर पडत होते. लगेच मला ओळखणारांच्या नजरा बदलल्या. त्यांचे आश्चर्य, उत्सुकता नकळत वासनेत बदलली. काही मुलांनी माझा पाठलाग सुरू केला. माझ्या पाठीमागे परंतु मला ऐकू येईल अशा आवाजात शेरेबाजी सुरू झाली..." बोलता बोलता नलिनी थांबली तिने नरेशकडे पाहिले.
"ती शेरेबाजी एवढ्या खालच्या स्तरावर पोहचली की, चक्क 'नलिनी वाहवली. ती धंदा करू लागलीय.' इथवर पोहोचली. असे टोमणे मारण्यात गल्लीतील तरुण, म्हातारे, पुरुष, महिला सारे होते. त्यादिवशी आम्ही दोघे एकत्र न जाता स्वतंत्रपणे त्या बागेत पोहोचलो. काही क्षणातच असे जाणवले की, नलिनी एकटीच आहे असे समजून दोन-चार तरुणांनी इशारेही सुरू केले. दुःखाची गोष्ट म्हणजे इशारे करणारांमध्ये एक-दोन पन्नाशी गाठलेले मर्दही होते. त्यादिवशी आम्ही दोघे काही ठरवूनच गेलो होतो त्यामुळे मी सोबत चाकू घेतला होता. तो चाकू अर्धवट दिसेल असा हातात धरून मी नलिनी मागे निघालो तशी त्या इशाराबाजांची पाचावर धारण बसली. त्यांची पावले थबकली. मी नलिनीच्या मागे निघालो हे पाहून तिने घाबरण्याचे नाटक केले. ती घाईघाईने चालू लागली. मधूनच धावू लागली. तिच्या पावलावर पाऊल टाकत मीही तिच्या मागेच होतो. या प्रकाराकडे अनेकांनी कानाडोळा केला तर अनेकांची दृष्टी नलिनीवर होती..." नरेशला थांबवत नलिनी म्हणाली,
"घाईघाईने चालताना, पळताना मला धाप लागली. ठरल्याप्रमाणे त्या बागेत जास्त गर्दी नसलेल्या भागामध्ये पोहोचताच मी ठरल्याप्रमाणे जमिनीवर पडून लोळू लागले. माझ्या हातानी मीच केस विस्कटले. गालावर मी बोकारले. आणि सोबत ओरडायला सुरुवात केली. तसा नरेश सहेतुक माझ्याशेजारी पडला. त्याच्या हातात चाकू होताच. आम्ही उगीचच झटापट करु लागलो. काही क्षणात एक-एक व्यक्ती येत असल्याचे पाहून मी हातपाय झाडायला सुरुवात केली. तसा नरेश माझ्या अंगावर पडला. एका हाताने माझे तोंड दाबून त्याने माझ्या शरीराशी झटण्याचे नाटक सुरू केले. माणसे जमत होती परंतु नरेशच्या हातातील चाकू पाहून अंतरावरच थांबत होती. काही क्षण झटापटीचे आणि माझ्या शरीराशी खेळण्याचे नाटक करून हातातील चाकू दाखवत नरेश बाहेर पळाला. त्याला त्याच्या कृत्यापासून साधे थांबविण्याचाही कुणी प्रयत्न केला नाही."
"मायलॉर्ड, मला एक समजत नाही यातून या दोघांना सिद्ध काय करायचे आहे?" सरकारी वकिलांनी विचारले.
"बरेच काही. ठिकठिकाणी असे प्रकार सातत्याने सुरू आहेत हे दाखवायचे होते. समाजाची मानसिकता कशी आहे हेही मांडायचे होते. नलिनीला काकुबाई म्हणणारा समाज तिने स्वतःला थोडेसे बदलेले की, चक्क तिला धंदेवाली ठरवून मोकळे होतो. काही लोक लगेच तिचा पिच्छा सुरू करतात. त्यादिवशी माझ्या हातात चाकू नसता तर कदाचित त्या तरुणांनी बागेत तोच प्रकार केला असता. महोदय, नलिनीसारखी एखादी तरुणी स्वतःमध्ये थोडासा बदल करु पाहताच समाजाने लगेच रंग का बदलावेत?"
"समाजाला माझी विनंती आहे की, महिलांकडे पाहण्याची स्वतःची दृष्टी बदला. केवळ सरकारला कायदे करावयास भाग पाडून,मोर्चे काढून काहीही साध्य होणार नाही. स्वतःला बदला, समाज आपोआप बदलेल. केवळ अत्याधुनिक किंवा तोकडा पोशाख घातला आणि वागण्यात चंचलता आली म्हणजे ती मुलगी, ती स्त्री वाईट चालीची असते हा भ्रम काढून टाका. स्वतःसोबत काम करणाऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहताना, तिला स्वतःच्या जाळ्यात ओढताना प्रत्येक पुरुषाने एक विचार अवश्य करावा की, त्याचवेळी आपली आई, बहीण, पत्नी किंवा जवळची नातेवाईक स्त्री दुसऱ्याच्या हाताखाली, इतरांच्या सान्निध्यात काम करतेय कदाचित तिचाही पोशाख, मोकळेपणा असाच असेल तर? एखादा अपवाद वगळता संपर्कात येणारी स्त्री तशीच आहे हा समज काढून टाका. त्याचबरोबर महिलांना आणि विशेषतः तरुणींना माझी हात जोडून विनंती आहे की, शिका आणि सुसंस्कृत व्हा. सौंदर्य केवळ अर्धवट कपडे किंवा मोकळेपणा यातच नसते तर साधेपणा, शालीनता, नम्रता यातूनही सौंदर्य अधिक खुलते. नैसर्गिक आणि अंगभूत सौंदर्याला कशानेही सजविण्याची गरज नसते, श्रुंगाराची आवश्यकता नसते. ज्या घटना घडतात त्यास स्त्री-पुरुष दोघेही तितकेच जबाबदार असतात. पुरुष निसर्गतः बलवान असल्यामुळे त्याचा 'सिंहाचा' वाटा असतो परंतु बलवान हत्तीला एक निर्बल मुंगीही घाबरवू शकते हेही लक्षात घ्या..." बोलता बोलता नलिनीला धाप लागली. तसा नरेश म्हणाला,
"मायलॉर्ड, म्हणून सर्वांना आमची विनंती आहे, स्वतः बदला, इतरांना बदलण्याचा प्रयत्न करा म्हणजे समाज आपोआप बदलेल. महोदय, तरीही... आम्हाला मान्य आहे की, आम्ही अक्षम्य गुन्हा केलाय याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे म्हणून माननीय न्यायालय देईल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहोत."
"पोरांनो, यानिमित्ताने सांगू इच्छितो, सभ्य मित्रांनो, स्त्रीमध्ये एक नैसर्गिक सौंदर्य आहे. जीवनात अनेक नात्याने ती वावरते. सुंदर स्त्रीचे, तिच्या सौंदर्याचे निरीक्षण करणे हा भाग वेगळा पण त्या सौंदर्याला विद्रूप करणे हे अनैसर्गिक आहे. स्त्री ही भोग्य आहे हे जरी खरे असले तरी पत्नीशिवाय प्रत्येक स्त्रीकडे त्याच दृष्टिने पाहणे अत्यंत घृणास्पद आहे. महिलांनीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, मर्यादा हा स्त्रीचा फार मोठा दागिना आहे. सामाजिक रेषेचे उल्लंघन केल्यामुळे काय होते हे आपण अनेकदा वाचले आहे, ऐकले आहे, अनुभवले आहे. मित्रांनो, सौंदर्यपूजक होणे वेगळे आणि सौंदर्यविध्वंसक होणे निराळे. स्त्रीची विटंबना हे शूरपणाचे नव्हे तर भ्याडपणाचे लक्षण आहे. तेव्हा मुलांनो तुम्ही हे जे नाटक केलंय तो नक्कीच गुन्हा आहे. यातून कदाचित फार मोठा सामाजिक उद्रेक झाला असता. तुझ्या कुटुंबावर, नातेवाईकांवर फार कठीण प्रसंग गुदरला असता. देशात अस्थिरता निर्माण झाली असती, नरेशच्या जीवावरही बेतले असते. शेवटी गुन्हा तो गुन्हाच! कायद्यापुढे सारे समानच. त्यासाठी तुमची शिक्षा म्हणजे दोघांनाही आजीवन..." असे म्हणत न्यायमूर्तींनी तरुणींच्या जत्थ्याकडे पाहिले. त्या जत्थ्यातील मुलींच्या डोळ्यात नरेशसाठी तोपर्यंत असलेली प्रचंड घृणा अभिमानात बदललेली स्पष्टपणे दिसत होती. एका आवाजात साऱ्या मुली म्हणाल्या,
"मायलॉर्ड, या दोघांना आजीवन विवाह बंधनात राहण्याची शिक्षा द्यावी..." ते ऐकून दुसऱ्याच क्षणी उपस्थितीतांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. न्यायमूर्तींनी नरेश-नलिनीला विवाह करण्याची शिक्षा फर्मावली...
टाळ्यांच्या प्रचंड गजरात, समोर हात करणाऱ्या प्रत्येकाला हस्तांदोलन करीत नरेश-नलिनी न्यायालयाच्या बाहेर आले. तेव्हा बाहेर जमलेली तरुणाई जोरजोरात घोषणा देत होती,
'होय, मीच तो अपराधी!'
नागेश सू. शेवाळकर
(९४२३१३९०७१)