Navnath Mahatmay - 16 books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ महात्म्य भाग १६

नवनाथ महात्म्य भाग १६

आठवा अवतार “वटसिद्ध नागनाथ”

===================
वटसिद्ध नागनाथ याची जन्मकथा

असो वटवृक्ष पोखरांत । अंड राहिले दिवस बहूत ।।
अवि होत्र नारायण त्यांत । ईश्‍वर सत्ते संचारला ।।
दिवसेंदिवस अंडात। वाडी लागले जीववंत ।।
देह होता सामर्थ्यवंत । भगन लागे अंड ते ।।
त्यात तलवर पोखरांत । बाळ रुदन करी अत्यंत ।।
निढळवाणी कोण त्यांते । रक्षणाते नसेची ।।

पूर्वी सरस्वतीच्या लालसेने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले असता ते एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले.
ते तिने भक्षण करुन आपल्या पोटात साठवून ठेविले.
मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला.
ही गोष्ट आस्तिकऋषीच्या लक्षात आली.
नऊ नारायणांपैकीं एक पोटी येईल व त्यास लोक नागनाथ म्हणतील हेसुद्धा त्यांना समजले .
मग आस्तिकमुनीने त्या सर्पिणीला जवळ बोलावून सांगितले की, तू या गोष्टीबद्दल काही चिंता करु नको.
तुझ्या पोटी ऐरहोत्रनारायण जन्मास येणार आहे.
परंतु तुला हे सांगावयाचे कारण असे की, पुढे तुझ्यावर मोठा कठिण प्रसंग येणार आहे.
सध्या जनमेजय राजाने सर्पसत्र आरंभले असून मोठ मोठ्या ऋषीच्या साह्याने समिधांच्या ऐवजी सर्पांची योजना करून त्याची यज्ञकुंडांत आहुति देत आहे.
म्हणुन ही गोष्ट मी तुला सांगुन ठेवली.
आता तु कोठे तरी लपून रहा.
याप्रमाणें आस्तिक मुनीने जेव्हा तिला भय घातले.
तेव्हा तिने आता तिला राहावयास निर्भय स्थळ कोणते म्हणून त्यास विचारले.
तेव्हा जवळच एक वडाचे झाड होते.
त्याच्या पोखरामध्यें लपून राहावयास आस्तिक ऋषीने तिला सांगितले.
मग ती सर्पिण त्या वडाच्या पोखरात लपुन राहिली व आस्तिकाने अचल वज्रप्रयोगाने ऋषिंनी ते झाड सिंचन करून ठेविले व आपण हस्तिनापुरास गेला.

नंतर आस्तिकमुनीने जनमेजय राजाच्या यज्ञमंडपात जाऊन सर्व ऋषींची भेट घेऊन त्यांना हा गुप्त वृत्तांत कळविला .
त्यांनी सांगितले ब्रह्मवीर्य सर्पिणीच्या उदरात असून पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होईल.
नऊ नारायणापैकी ऐरहोत्र नारायणाचा हा अवतार घेणार आहे.
त्यास कोणीही मारु नये.
ते सर्व ऋषींनी कबूल केल्यानंतर पुढें सर्पसत्र समाप्त झाले.
इकडे सर्पिणीचे नवमास पूर्ण झाले.
मग ती पद्मिण नावाची सर्पीण प्रसुत होऊन तिने एक अंडें घातले.
ते वडाच्या पोकळींत खुप दिवसपर्यंत राहिले होते.
त्यात ऐरहोत्र नारायणाने संचार केला.
पुढे त्याचा देह मोठा झाल्यावर अंडे फूटून त्यात मूल दिसू लागले.
ते मुल रडू लागले पण त्याचें रक्षण करण्यासाठी तेथे कोणी नव्हते.

त्या वेळी तेथे कोशधर्म या नांवाचा एक अथर्ववेदी गौडब्राह्मण रहात होता .
वेदशास्त्रांत तो निपूण होता, परंतु तो फार गरीब असल्याने त्याचे हाल होत होते .
दारिद्र्यामुळे तो उदास होऊन गेला होता.
उदरनिर्वाहासाठी तो पत्रावळीकरिता वडाची पाने आणावयास जात असे.
एके दिवशी तो त्या झाडाजवळ गेला असता तेथे लहान मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला.
ते ऐकून कोण रडते आहे हा शोध करण्यासाठी तो आसपास पाहू लागला.
परंतु त्यास कोणीही न दिसल्यामुळे तो संशयात पडला.
तरी पण हा लहान मुलाचाच आवाज आहे अशी त्याची खात्री झाली.
मग त्यास देवांनी सांगितले या वडाच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे.
त्यास स्पर्श झाला की त्याचा काळिमा जाऊन सुवर्ण होते.
तद्वत हा मुलगा तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य नाश पावेल.
मग देवांनी एक बाण सोडला.
त्यासरसे ते झाड मोडून पडले.
झाड पडताच आतील बालक दिसू लागले .
मग देवांनी हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला.
आणी कोशधर्म ब्राह्मणास सांगितले की ,महाराज या भुमंडळावर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणुन हा वटसिद्ध नागनाथ तुम्हास प्राप्त झाला आहे.
हा पद्मिणी नावाच्या नागिणीच्या पोटी जन्मला असून वटवृक्षामध्ये ह्याचे संरक्षण झाले आहे.
त्यास्तव आता ह्याचें ' वटसिद्ध नागनाथ ' हेच नाव प्रसिद्ध करावे.
हा सिद्ध असुन योगी लोकांचा नाथ होईल.
ती देववाणी ऐकताच कोशधर्माने त्या मुलास उचलून घरी नेले.
त्या समयी त्यास परमानंद झाला. तेऐकून त्याची स्त्री सुरादेवी ही देखील आनंदी झाली.
त्याचे रूप पाहून ती म्हणाली, मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्य अवतरला असावा.
तिनें मुलास उचलून स्तनाशी लाविलें तो पान्हा फुटला.
मग तिने आनंदानें मुलास स्नान घालून पाळण्यात घातले व त्याचें ' वटसिध्द नागनाथ ' असें नांव ठेवले.
तो मुलगा मोठा झाल्यावर कोशधर्माने सातव्या वर्षा त्याचे यथाविधि मौंजीबंधन केले. वडाच्या ढोलीत जन्मला म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले.
यास नंतर दत्तात्रयांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली.
नागनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य येथे आहे.
तर संजीवन समाधी वडवळ (ता. चाकूर, जि. लातूर) येथे आहे.
लातूरवरून 25 कि.मी. अंतरावर चाकूर तालुक्‍यात वडवळ हे गाव आहे.
हैद्राबाद - परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे.
वटसिद्ध नागनाथ याचा जन्म एका झाडाच्या ढोलीत नाग अंडजातुन झाला,ह्याचा अर्थ नागनाथ हे ढोलीत बसुन बिंदु त्राटक ही साधना करत असावेत.
या साधनासाठी त्यानी सर्पाची कात हे आसन घेतले होते .

एके दिवशी दोन प्रहरी वटसिध्द नागनाथ भागिरथीच्या तीरीं काशीविश्वेश्वराच्या समोर काही मुले जमवून खेळू लागला.
त्या वेळेस दत्तात्रेयाची स्वारी तेथे गेली व मुलांचा खेळ पाहू लागली.
तेथे मुलांच्या पंक्ति बसवुन त्यास वटसिद्ध नागनाथ खोटे खोटे अन्न वाढीत होता.
मुले पुरे म्हणत होती.
हा त्यांना घ्या, घ्या म्हणून आग्रह करून वाढत होता.
असा मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रेयाने पाहिला.
तेव्हा त्यास आश्चर्य वाटले.
लटक्याच अन्नाने पोट भरले म्हणून मुले म्हणत होती , हे ऐकून त्यास हसु आले.
नंतर बालरूप घेऊन दत्तात्रेय त्या मुलात मिसळला व अंगणात उभा राहून तो म्हणाला.
मी अतिथी आलो आहे मला भूक फार लागली आहे.
काहीं खायला अन्न वाढा.
हे ऐकून ती मुले त्याच्या पाठीस लागली व म्हणाली, तु रे कोण आमच्यात खेळायला आला आहेस ?
जातोस का मारू तुला ?
असे म्हणुन काही मुले काठी उगारू लागली व काही मुले दगड मारावयास धावली.
हे नागनाथाने पाहिले तेव्हा तो सर्व मुलास म्हणाला तो नवीन मुलगा आला आहे त्यास घालवून देऊ नका, आपल्याप्रमाणे त्याला वाढू आयत्या वेळी आलेल्या ब्राह्मणास अतिथी समजु.
त्याने त्या मुलास बसवले मग कल्पनेने स्नान, षोडशोपचारानी पूजा, भोजन वगैरे झाले.
जेवताना सावकाश जेवा, घाई करु नका.
जे लागेल ते मागून घ्या, असा तो आग्रह करीत होताच.
तेव्हा हा उदार आहे असे दत्तात्रेयास वाटले.
हा पूर्वीचा कोणी तरी योगी असावा असे त्याच्या मनात आले.
दुसऱ्यास संतोष देऊन त्यावर उपकार करण्याची बुद्धी होणे पूर्वपुण्याई वाचुन घडायचे नाही.
असा मनात विचार करून तो त्याचे पूर्वजन्मकर्म शोधू लागला.
तेव्हा त्याच्या जन्माचा सर्व प्रकार दत्तात्रेयाच्या लक्षात आला.
मग दत्तात्रयाने त्यास कृपा करून सिद्धि दिली.
तिचा गुण असा होता की नागनाथ ज्या पदार्थाचे नाव तोंडातुन घेई, तो पदार्थ तेथे उत्पन्न होऊ लागला.
नंतर मुलांना जेवायला वाढ म्हणून दत्तात्रेयाने नागनाथास सांगितले.
जातेसमयी दत्तात्रेयाने आपले नाव सांगुन त्याचें नाव विचारुन घेतलें.

या सिद्धीमुळे मुले नित्य तृप्त होऊन घरी बरोबर जेवेनाशी झाली.
न जेवण्याचे कारण आईबापानी मुलाना विचारलें असता आम्ही षड्रस अन्न जेवून येतो असे मुलांनी सांगितले .
त्यांनी स्वतः भागीरथीतीरी जाऊन नागनाथ षड्रस अन्ने वाढतो हे पाहताच त्यांची खात्री झाली.
मग ही बातमी सर्व क्षेत्रभर झाली व नागनाथाचा बाप कोशधर्म याच्या देखील ती कानांवर गेली.
कित्येकांनी त्यास सांगितले कीं, भागीरथीच्या काठी तुझा मुलगा मुलांच्या पंक्ति बसवुन उत्तम उत्तम पक्वान्नांच्या जेवणावळी घालीत असतो.
तो अन्न कोठून आणितो व कसें तयार करितो त्याचें त्यासच ठाऊक.
त्याने इच्छिला पदार्थ उप्तन्न होतो.
ही बातमी कोशधर्माने जेव्हा ऐकली, तेव्हा त्याला पूर्वी देवांनीं सांगितलेली गोष्ट आठवली .
पण त्याने लोकास ती हकिकत बोलून दाखविली नाहीं.

पुढे एके दिवशी कोशधर्माने आपल्या वटसिद्ध नागनाथ मुलासमोर मुलांच्या जेवणासंबधीं गोष्ट काढली.
तेव्हा तो म्हणाला, तुम्हालाही मी असाच चमत्कार दाखवतो.
असे म्हणुन त्याने जमिनीवर हात ठेवुन षड्रस अन्नाची इच्छा प्रकट करताच उत्तम उत्तम पदार्थानीं भरलेले पान तेथे उप्तन्न झाले ते पाहून कोशधर्मास फारच नवल वाटले.
मग हे तुला कसे साध्य झाले असे विचारल्यावर तो म्हणाला, बाबा आम्ही पुष्कळ मुले नदीतीरी खेळत होतो,इतक्यांत दत्तात्रेय नांवाचा मुलगा आला.
त्याचा सर्व मुलांनी धिक्कार केला पण मी त्याला खेळायला घेतले आणि त्याची खोटी खोटी मनोभावे पूजा केली.
तेव्हा त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवून कानात काही मंत्र सांगितला व अन्न वाढावयास लाविले.
त्या दिवसापासून माझ्या हातुन पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो.
हे ऐकुन बापास परमानंद झाला.
मग तो त्या दिवसापासुन मुलाकडून अतिथी अभ्यागतांची पुजा करवून त्यास भोजन घालुन पाठवू लागला.
त्यामुळे दत्तात्रयास आनंद झाला.
नागनाथाकडे हजारो लोक जेवून द्रव्य, वस्त्र , धान्ये वगैरे घेऊन जाऊ लागली.
या योगानें तो जगविख्यात झाला.
जो तो त्याची कीर्ति वाखाणूं लागला.

एके दिवशी नागनाथाने बापास विचारले की, माझ्या हातुन या गोष्टी घडतात यातला मुख्य उद्देश कोणता ?
तसाच तो दत्तात्रेय मुलगा कोण होता?
तेव्हा बाप म्हणाला तो द्त्तात्रेय तिन्ही देवांचा अवतार आहे .
तुझे दैव चांगले म्हणून तुला भेटुन तो सिद्धि देऊन गेला.
तो एके ठीकाणी नसतो यामुळें त्याची भेट होणे कठीण आहे .
त्याच्या भेटीची इच्छा धरुन प्रयत्‍न चालविल्याने भेट होतेच असे नाहीं.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED