mayajaal - 12 books and stories free download online pdf in Marathi

मायाजाल-- १२

मायाजाल-- १२
प्रज्ञाची खात्री झाली होती; इंद्रजीतवर हर्षदची नजर यापुढेही रहाणार होती. इंद्रजीतचा धोका टळलेला नव्हता! दोघांना एकत्र पाहिलं, की हर्षदचा स्वतःवरचा ताबा सुटत होता, हे नक्की! यावर एकच मार्ग होता-- हर्षदने तिला इंद्रजीतबरोबर बघू नये; यासाठी काही दिवस दोघांनी बाहेर जास्त न भेटणं; आणि लग्न झाल्यावर त्याने सुचवल्याप्रमाणे परदेशात स्थाईक होणं! प्रज्ञाला भारत सोडून बाहेर रहाणं पसंत नव्हतं; पण जीतच्या प्रेमाखातर - नाइलाज म्हणून तिने मनाची तयारी केली होती.
हर्षदने आत्महत्येचा प्रयत्न केला; हे कळल्यावर इंद्रजीतला मात्र रहावलं नाही. कसाही असला; तरी त्याचा मित्र मृत्यूच्या दारातून परत आला होता. त्याच्या या टोकाच्या निर्णयाला काही प्रमाणात आपण जबाबदार आहोत; असं त्याला आता विनाकारण वाटू लागलं! " जर त्याला काही झालं असतं, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो! त्या दिवशी पोलिस स्टेशनमधून रागावून निघालो; हे माझं चुकलंच! मी हर्षदशी बोलायला हवं होतं! माझ्याशी बोलला असता; तर त्याचं मन हलकं झालं असतं, आणि त्याला त्याच्या कृत्याची लाज वाटून एवढं मोठं पाऊल त्यानं उचललं नसतं. एकदा त्याला भेटून सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावून टाकण्याची गरज आहे! हो! त्याला एकदा भेटलंच पाहिजे." त्याने मनाशी ठरवलं होतं.
तो हर्षदला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला. त्याचा चेहरा गंभीर होता. गेल्या काही दिवसात हर्षदमुळे जो त्रास झाला होता; तो विसरणं त्याला कसं शक्य होतं? वाॅर्डमधलं वातावरण कुंद होतं. जणू हर्षदच्या कपटी स्वभावाच्या नकारात्मक शक्तीने तिथलं वातावरण दूषित झालं होतं! इंद्रजीतला श्वास कोंडतोय; असं वाटत होतं. तो नाइलाजास्तव तिथे थांबला होता; पण तिथून उठून कधी एकदा बाहेर जातोय असं त्याला झालं होतं. दोघांमध्ये जो दुरावा उत्पन्न झाला होता त्यामुळे त्यांना एकमेकांच्या नजरेला नजर देणंही कठीण वाटत होतं. तासन् तास एकत्र घालवणा-या त्या मित्रांना आज एकमेकांशी काय बोलावं; हे सुचत नव्हतं.
जीतची अवघडलेली मनःस्थिती पाहून हर्षदचा चेहराही कसानुसा झाला! त्याने हात जोडले; डोळ्यात पाणी आणून जीतची माफी मागितली. पण त्याचबरोबर स्वतःच्या कृत्याचे समर्थनही केले.
" मला माफ कर! मी तुला खूप त्रास दिला. तू माझ्यावर रागावला आहेस! आणि ते साहजिकच आहे! पण मी तरी काय करू? मी प्रज्ञाशिवाय जगू शकत नाही ! जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी प्रज्ञाकडे माझी पत्नी म्हणून पाहिलं---- स्वतःला तिच्या योग्य बनवण्यासाठी गरीबीतही खूप अभ्यास केला ग्रॅज्युएट झल्यावर एम.बी.ए. केलं- चांगली नोकरी मिळवली आणि त्याच वेळी ती तुझ्याशी लग्न करणार आहे; असं कळलं; आणि मी बिथरलो.. प्रज्ञा माझ्याबरोबर नसेल तर माझ्या जगण्याला अर्थच नाही. माझ्या जिवलग मित्राने मला फसवलं; हे दुःख तर या सगळ्यापेक्षाही मोठं आहे. यावेळी प्रयत्न फसला-- पुढच्या वेळी मात्र मी असा मार्ग निवडेन, की कोणी मला वाचवू शकणार नाही."
"तू याविषयी माझ्याशी कधी बोललास? मला पहिल्यापासून सांगत होतास; की तुला तिचा स्वभाव आवडत नाही! ती गर्विष्ठ मुलगी आहे; तुझ्या मनात काय आहे; हे मला कसं कळणार? तुला आवडत नसली तरी मला सरळ आणि साध्या स्वभावाची प्रज्ञा आवडली! आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करू लागलो. दोघांच्या घरच्या संमतीने लग्न ठरवलं! या सगळ्यात मी तुला फसवलं असं तू कसं म्हणू शकतोस?" इंद्रजीतच्या प्रश्नाला हर्षदकडे उत्तर नव्हतं. त्याने नजर दुसरीकडे वळवली होती.. जीत पुढे बोलू लागला,
" तू आत्महत्येचा प्रयत्न करताना फक्त स्वतःच्या भावनांचा विचार केलास! जरा तात्यांचा आणि माईचा विचार कर! किती कष्टाने त्यांनी तुला वाढवलं-- शिक्षण दिलं! तू जर असा अविचार केलास; तर त्यांनी कोणाकडे बघायचं? तुला दोन लहान भावंडं आहेत! सीमाचं नर्सिंगचं ट्रेनिंग चालू आहे. नंतर तिच्या लग्नाचं बघायचं आहे! आणि अंकितचं शिक्षण कोण पूर्ण करणार? माई आणि तात्यांची सगळी भिस्त तुझ्यावर आहे. यापुढे कोणताही अविचार मनात आला तर प्रथम ह्या सगळ्या जबाबदा-या डोळ्यासमोर आण! " इंद्रजीत त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत होता. तो पुढे बोलू लागला,
" पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा कळलं की घडणा-या सगळ्या गोष्टींच्या मागे तू आहेस; तेव्हा केस मागे घ्यायच्या माझ्या निर्णयामागे हेच खरं कारण होतं. त्यावेळी मला तुझा खूप राग आला होता; पण माझ्या डोळ्यासमोर तात्या आणि माईंचे थकलेले चेहरे आले! तू त्यांचा आधार आहेस. तुला शिक्षा झाली असती ... तर ते कोणाच्या तोंडाकडे बघणार होते? शिवाय त्यांचा मान-सन्मानही धुळीला मिळाला असता! त्या दोघांना कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नसती! खरं म्हणजे मला तुझ्यामुळे खूप त्रास झाला; पण मी फक्त त्यांचा विचार करून तुला सोडून दिलं!" इंद्रजीतच्या या बोलण्यावर हर्षद चिडून म्हणाला,
" त्यांच्या नशिबात जे व्हायचं ते होईल! पण मी प्रज्ञाशिवाय जगू शकणार नाही. माझ्या भावंडांचा, आणि तात्या - माईचा विचार करण्याची तुला काय गरज आहे? आजकाल स्वतःच्या सुखापुढे दुस-यांचा विचार कोण करतं? तुम्ही दोघं सुखाने रहा! मी तुमच्या आयुष्यापासून कायमचा निघुन जाईन! तू मला नेहमीच समजून घेतलंयस! माझ्यासाठी शेवटची एक गोष्ट करशील? प्रज्ञाला यातलं काही सांगू नको-- हे सगळं समजलं, तर तिला खूप दुःख होईल! ” हर्षद मानभावीपणे बोलत होता. पण त्याच्या डोळ्यातील पाणी बघून कोणालाही त्याची दया आली असती.
काय बोलावं इंद्रजीतला कळत नव्हतं. हर्षद कोणाचं ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. इंद्रजीतचं विचारचक्र आता उलट्या दिशेने चालू लागलं होतं. "हर्षदचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप माझ्या माथी लागणार आहे. हा म्हणतो- "तुम्ही दोघं सुखी व्हा!" - मित्राच्या थडग्यावर उभा केलेला माझा संसार सुखी कसा होईल? हे सगळं मी सहन करतोय प्रज्ञासाठी! पण याच्यामुळे माझ्या जिवावर बेतलं होतं; हे कळल्यावरसुद्धा हर्षदचा राग येण्याऐवजी, मी त्याला सोडून दिलं; याचाच आनंद तिला जास्त झाला! मला आता असं वाटायला लागलंय; की मी माणसं ओळखायला चुकत तर नाही?"
प्रत्यक्षात तो वैतागून हर्षदला म्हणाला “ मीच या सगळ्यातून दूर निघून जातो; तुम्ही सगळे मजेत रहा! होय! तेच योग्य होईल! मला आता कंटाळा आलाय या सगळ्याचा!"
" तुला कुठे जायची काय गरज आहे! नशीबाचे फासे नेहमीप्रमाणे तुझ्या बाजूने पडले आहेत! मी परत एकदा तुला सांगतो! प्रज्ञाशी लग्न कर आणि सुखी संसार कर! माझं काय होईल; याचा विचार करू नको! माझं नशीबच वाईट आहे!" हर्षद त्याचा हात हातात घेत नाटकीपणाने म्हणाला.
त्याच्या हातातून हात सोडवून घेत, मनाशी काहीतरी निश्चित करून; इंद्रजीत उठला - त्याने हर्षदच्या खांद्यावर हात ठेवला; जणू तो त्याला काहीतरी आश्वासन देत होता -----आणि वाॅर्ड मधून बाहेर पडला.
इंद्रजीतची पाठ फिरताच हर्षद च्या चेहऱ्यावर छद्मी हास्य उमटलं. आपला बाण बरोबर लागला आहे हे त्यांनी ओळखलं होतं. जीतने जर मागे वळून पाहिलं असतं तर इतका वेळ डोळ्यात अश्रू आणणाऱ्या हर्षदला त्याने हसताना पाहिलं असतं, आणि त्याची लबाडी त्याच्या लक्षात आली असती.
हर्षदचा आत्महत्या करण्याचा -- प्रेमासाठी जीव देण्याचा मुळीच विचार नव्हता. त्याने कमीत कमी अपाय करेल एवढ्याच प्रमाणात विष घेतलं होतं, तेही अशा वेळी की लगेच घरच्या लोकांना समजेल आणि हाॅस्पिटलमध्ये नेलं जाईल. त्याला फक्त इंद्रजीतची सहानुभूती मिळवायची होती. त्याला मनाने कमकुवत बनवायचं होतं.
प्रज्ञा जरी मितभाषी होती; तरी ती तिच्या विचारांशी ठाम होती. तिचं मन दुबळं नव्हतं! विचारपूर्वक निर्णय घ्यायची तिला सवय होती. तिच्याकडे आपली डाळ शिजणार नाही; हे त्याला चांगलंच माहीत होतं.
याउलट इंद्रजीत होता. तो मनाने चंचल असल्यामुळे विचारांशी ठाम नव्हता. आयुष्यातल्या खडतर वळणांना सामोरं जाण्याची त्याची मानसिकता नव्हती. दुस-यांचे प्राॅब्लेम्स चुटकीसरशी सोडवणारा इंद्रजीत स्वतःच्या सुखासिन आयुष्यात मात्र लहानशी गुंतागुंतही सहन करू शकत नव्हता. त्याला भावनिक आवाहन करणं अधिक सोपं होतं. त्याच्या खुशालचेंडू स्वभावामुळे, कोणत्याहीव गोष्टीचा चारी बाजूंनी सखोल विचार करून निर्णय घ्यायची त्याला सवय नव्हती. त्याच्या स्वभावाची ही वैशिष्ट्ये हर्षदला चांगलीच माहीत होती.
आपण पकडले गेलो ; यापुढे शक्तीचा वापर करता येणार नाही; हे लक्षात आल्यावर हर्षदने इंद्रजीतच्या भोवती भावनांचं जाळं विणलं होतं, आणि त्यात तो अलगद अडकला होता. त्याच्या पलायनवादी स्वभावानुसार तो हा गुंता सोडवण्याऐवजी स्वतःला त्यापासून दूर ठेवण्याचा मार्ग निवडेल हे हर्षदला चांगलंच माहीत होतं.
आणि आज हर्षद जिंकला होता. इंद्रजीतने त्याला अपेक्षित प्रतिक्रिया दिली होती. तो मनाने प्रज्ञापासून दूर चालला होता.
********* contd. -- part 13

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED