मायाजाल--१८
त्यादिवशी संध्याकाळी हर्षद आॅफिसमधून लवकर घरी आला! प्रज्ञाच्या परत येण्याच्या वेळात तो कॉलनीच्या गार्डन मध्ये जाऊन बसला. प्रज्ञा आत येताना दिसली की तिला थांबवायचं आणि आपलं मनोगत तिला सांगायचं; असं त्याने ठरवलं होतं. पण हर्षद वाट पाहून कंटाळला--- रात्र झाली ---तरी त्या मैत्रिणी आल्या नाहीत. त्या दिवशी प्रज्ञा बहुधा फिरायला गेलीच नव्हती. हर्षद परत घरी जायला निघाला; इतक्यात तिची मैत्रीण सुरेखा येताना दिसली.
" आज तू एकटीच कशी? प्रज्ञा नाही आली? रोज तर तुम्ही एकत्र फिरायला जाता !" हर्षदच्या या प्रश्नावर तिने आश्चर्याने हर्षदकडे पाहिलं, आणि म्हणाली
" तुला माहीत नाही? ते कालच सगळे बँगलोरला गेलेयत!" सुरेखा सांगत होती.
"पण असं अचानक् कसं ठरलं? मी तिच्या परीक्षेपूर्वी त्यांच्या घरी गेलो होतो! तेव्हा ती याविषयी काही बोलली नाही!" हर्षद आश्चर्यानं म्हणाला.
"त्यांचं तिकडे जायचं; तिच्या परीक्षेनंतरच ठरलं! प्रज्ञाने जगाला कितीही दाखवलं तरीही इंद्रजीतने दिलेला धक्का ती अजूनही पचवू शकली नाही! तीच अवस्था घरातील इतरांचीही आहे! घरातील तणाव कमी व्हावा, म्हणून तिचे बाबा मुद्दाम सगळ्यांना घेऊन गेलेयत!" सुरेखा सांगत होती.
" ही त्यांनी अगदी चांगली गोष्ट केली! खूप दिवस झाले; कोणी मला भेटले नाहीत, त्यामुळे माहीत नव्हतं! परत कधी येणार आहेत?" हर्षदने चौकशी केली.
" बहुतेक महिन्याभरासाठी गेलेयत ! परत येताना हुबळीला तिच्या मावशीकडे काही दिवस रहाणार आहेत! नाहीतरी सुट्टी आहे! परत यायची घाई नाही!" सुरेखाने इत्यंभूत माहिती पुरवली.
आता महिनाभर वाट पाहण्याशिवाय हर्षदकडे दुसरा पर्याय नव्हता.
********
सगळ्यांबरोबर बँगलोरला फिरताना प्रज्ञा इंद्रजीतला विसरू इच्छित होती. खरं म्हणजे तिच्या फोनला त्याने ज्या परकेपणाने उत्तर दिलं, त्यानंतर तिला त्याचा राग आला होता. पण तरीही उटीसारखी अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहताना तिला त्याची प्रकर्षाने आठवण येत होती. विशेषतः रात्रीच्या वेळी रंगी बेरंगी प्रकाशझोतांनी झगमगणा-या कारंज्यांमुळे स्वर्गसमान भासणारे वृंदावन गार्डन पहाताना तिला तो बरोबर असायला हवा होता; असं मनापासून वाटत होतं.
तिला आदिवासी पाड्यातलं शिबीर आठवत होतं! तिथे त्याला तिने जवळून पाहिलं होतं. तेव्हापासूनच तिच्या मनात त्याच्याविषयी मनात प्रीतीचा अंकुर फुटला होता. तिथल्या गरीब आदिवासींना तो ज्या कळकळीने मार्गदर्शन करत होता; ते पाहून त्याच्याविषयी आदर आणि विश्वास वाटू लागला होता. आता त्या विश्वासाला तडा गेला होता, पण प्रज्ञाला आश्चर्य वाटत होतं की; हृदयातलं त्याचं स्थान अजूनही कायम होतं. तो चुकीचं वागला होता; पण तिला सोडून जाताना त्याला सुद्धा तिच्याइतकंच दुःख झालं होतं याविषयी तिच्या मनात शंका नव्हती.
घरातील सगळ्यांबरोबर फिरतानाही मनातील एकटेपणाची जाणीव कमी होत नव्हती. वरकरणी मात्र ती इतरांप्रमाणेच सहलीमध्ये रंगून गेल्या सारखं दाखवत होती--- हसत खेळत होती. खरं म्हणजे ही सहल आई-बाबांनी तिला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी तिला विरंगुळा मिळावा म्हणून प्लॅन केली होती. त्यांचा हिरमोड तिला करायचा नव्हता. तिला हसताना खेळताना पाहून आपली योजना यशस्वी झाली हे त्यांना जाणवत होतं. वरकरणी सगळ्यांचं मन राखण्यासाठी आनंदी असल्याचं दाखवताना खरोखरच आपल्या मनावरचा भार हळू हळू कमी होतोय अशी प्रचिती प्रज्ञाला येत होती.
बँगलोरवरून बाबा मुंबईला घरी गेले; पण प्रज्ञा, आई अाणि निमेश हुबळीला तिच्या मावशीकडे गेले. मीना मावशीचे पती काही दिवसांपूर्वीच अचानक् निवर्तले होते. मुलं किशोरवयीन--- शाळेत जाणारी--- काही दिवस तिला सोबत होईल, तिचं मन रमेल; असा विचार आई बाबांनी केला होता. संजू आणि राजूला सुट्टी पडली होती. या सगळ्यांना बघून दोघेही उड्या मारू लागले. पुढच्या पंधरा दिवसांमध्ये काय काय करायचं--- कुठे कुठे जायचं सगळं ठरवायला त्यांनी सुरुवात केली.
" आम्ही गेल्या वेळी मुंबईला आलो होतो, तेव्हा आपण सिनेमा बघितला होता. इथल्या थिएटरला मस्त फायटिंगचा पिक्चर लागलाय! आपण सगळे जाऊया! आणि रोज गार्डनला फिरायलाही जाऊया! या वर्षीची सुट्टी आम्ही मस्त एन्जाॅय करू!" दोघेही उत्साहाने बोलत होते. मीना मावशीही त्यांना हसून साथ देत होती.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मावशीच्या वागण्यात जराही उदासीनता दिसत नव्हती. सगळी कामं तत्परतेने आणि हसतमुखानं करत होती. सगळ्यांना हवं- नको तत्परतेने बघत होती. तिला आनंदात बघून प्रज्ञाला बरं वाटलं; पण आश्चर्यही वाटलं; की मीना मावशी संतोष काकांना एवढ्या लवकर कशी विसरू शकते? त्यांचं एकमेकांवर किती प्रेम होतं ; हे तिला चांगलंच माहीत होतं.
पण एकदा आजूबाजूला कोणी नसताना प्रज्ञाने मावशीला डोळे पुसताना पाहिलं.
" मावशी! तू रडतेयस? काकांची आठवण आली का?" प्रज्ञाने विचारलं.
"हो ग! आज ते असते; तर तुम्हाला बघून त्यांना किती आनंद झाला असता! सगळीकडे फिरायला घेऊन गेले असते; गप्पाटप्पा- झाल्या असत्या! ते असताना घरात किती उत्साहाचं वातावरण असायचं. मी घर आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न करते, पण मी कितीही काही केलं; तरी त्यांची उणीव भरून काढू शकत नाही! मुलांनाही घरातला फरक जाणवतो! पुर्वीसारखा हट्ट करत नाहीत. गप्प गप्प असतात! तुम्ही तिघं आलात, आणि वातावरण बदललंय! मुलं खुश आहेत! उत्साहानं तुमच्याबरोबर सगळे कार्यक्रम ठरवतायत! पण तुम्ही गेल्यावर घर परत पूर्वीसारखंच शांत- शांत होईल!" मावशी तिचं मन मोकळं करत होती.
" तू दिवसभर मुलांचं सगळं करतेस-- आमच्याकडे नीट लक्ष देतेस--मला वाटलं होतं-- तू दुःखातून सावरली आहेस--पण-- आठवणी पाठ सोडत नाहीत हेच खरं" प्रज्ञाला काय बोलावं, सुचत नव्हतं. ती बोलता बोलता स्वत:चा अनुभव सांगत होती. तिचेही डोळे नकळत भरून आले होते.
"आठवणी तर येतच रहाणार! पण संजू आणि राजूचं भविष्य माझ्यावर अवलंबून आहे. त्या दोघांचं लहान वय आहे! मी दुःख उगाळत बसले; तर त्यांच्याकडे कोण बघणार? त्यांच्या वडिलांना त्यांना खूप शिकवायचं होतं! त्याचबरोबर दोघानीहि एखाद्या आवडत्या कलेत पारंगत व्हावं; अशी त्यांची इच्छा होती. हे सगळं प्रत्यक्षात आणायचं असेल तर त्यांच्यासाठी मला पदर खोचून उभं रहाणं भाग आहे. एक चांगली गोष्ट आहे; की दिवसभर शाळेत नोकरी आणि घरचं काम करताना माझा दिवस निघून जातो! विचार करायलाही फुरसत नसते!" मावशी जणू प्रज्ञाला कर्तव्याचे धडे देत होती.
"मावशीला तिच्या मुलांच्या प्रति असलेल्या प्रेमाने बळ दिलंय. मी सुद्धा माझ्या आई-बाबांशी आणि निमेशशी कर्तव्याने बांधली गेलेली आहे. त्यांना आनंदात पहायचं असेल; तर मला इंद्रजीतला विसरायला हवं! मला फक्त स्वतःच्या कोषात राहून चालणार नाही!" प्रज्ञाने स्वतःला बजावलं.
इंद्रजीतला लगेच विसरणं शक्यच नव्हतं पण मन शांत ठेवून परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याचा तिने निर्धार केला होता.
मीनामावशीची काही महत्वाची कोर्ट - कचे-यांची कामं होती; त्यामुळे ती त्यांच्याबरोबर मुंबईला आली नाही त्यामुळे प्रज्ञा आणि निमेश नाराज झाले; पण दिवाळीच्या सुट्टीत मुलांना घेऊन नक्की मुंबईला येईन असं प्राॅमिस मावशीने त्यांना दिलं. संजू आणि राजूचा जड अंतःकरणाने निरोप घेऊन तिघं मुंबईला परतली.
*********
प्रज्ञा मुंबईला आल्यावर काही दिवसांतच रिझल्ट लागला. प्रज्ञाच्या अंदाजाप्रमाणे तिने उत्कृष्ट यश मिळवलं होतं. आता इंटर्न डॉक्टर म्हणून एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम सुरू करायचं असं तिने ठरवलं होतं. त्यामुळे निमेशच्या भवितव्याला हातभार लागणार होता. शिवाय तिचं मन कामात व्यग्र राहीलं तर मनातली पोकळी जाणवणार नव्हती.
पण तिने MBBS होऊन शिक्षण थांबवावं; हे तिच्या आई - बाबांना मात्र मान्य झालं नाही . तिने इंटर्नशिपबरोबरच अभ्यास पुढे चालू ठेवावा; असा त्यांचा आग्रह होता. अनिरुद्ध तिला म्हणाले ,
" प्रज्ञा! तुला एवढे चांगले मार्क्स मिळाले आहेत की तुला पोस्ट - ग्रॅज्युएशनच्या अॅडमिशनसाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही. प्रॅक्टिस आयुष्यभर करायची आहे पण प्रथम शक्य तितकं शिकून घे! हिऱ्याला जेवढे पैलू पाडावेत तेवढा तू जास्त चमकतो. माणसाचंही तसंच आहे; माणूस जेवढं ज्ञान मिळवेल तेवढा तेजस्वी होतो - - कर्तबगार होतो! म्हणून जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत ज्ञान मिळवत रहा!"
" पण बाबा! तुम्ही किती दिवस माझ्या शिक्षणासाठी धावपळ करणार? तुम्ही अजूनपर्यंत खूप त्रास घेतला! आता मलाही थोडी घराची जबाबदारी उचलायची आहे! निमेशला खूप शिकवायचं आहे!" प्रज्ञा म्हणाली.
" निमेश आणि तुला-- दोघांनाही खूप शिकवणं; हे माझं ध्येय आहे! माझं स्वप्न पूर्ण करणं तुमच्या हातात आहे! खर्चाची काळजी तू करू नकोस. देवानं तेवढी शक्ती मला नक्कीच दिली आहे!" अनिरूद्ध तिला समजावत म्हणाले.
शेवटी प्रज्ञाला त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं. तिने शिक्षण पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. गायनकाॅलाजीमध्ये एम. डी करायचं तिने ठरवलं. त्यामुळे स्त्रीयांना जीवनात भेडसावणारे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ती मदत करू शकणार होती! अनेक संसार सुखी करू शकणार होती.
******* contd.... part 19