mukhavata books and stories free download online pdf in Marathi

मुखवटा

मुखवटा

चेहेरे से चेहेरे,
जब उतरने लगे।
आईने मे असली,
किरदार दिखने लगे।


या वर्षात खूप काही अप्रिय घटना घडल्यात...सगळ्यांसोबतच.... माझ्याही आयुष्यात गेल्या काही महिन्यांत काही 'छोटी मोठी' वादळ येऊन गेली...वादळ म्हटल्यावर छोटी मोठी कशी असायची, हो ना ?? तर छोटी मोठी यासाठी म्हणते कारण मनुष्याचा हा स्वभाव आहे जेंव्हा कोणी आपल्याला त्याच दुःख सांगत असतो तेंव्हा आपण मात्र आपलं दुःख त्याच्या दुःखापेक्षा किती सरस आणि वरचढ आहे हे सिद्ध करून दाखवण्यात बिझी असतो...त्यामुळे मी हे मान्य करते की माझ्या आयुष्यात जे प्रोब्लेम असतील ते इतर लोकांच्या तुलनेत नक्कीच कमी असतील...त्यामुळे छोटी मोठी वादळ बोलली...हां, पण एक खासियत या वादळांची नक्कीच आहे की हे लोकांचे खरे खुरे चेहेरे आपल्या समोर आणून ठेवतात... फक्त काहीवेळा आपल्याला ते ओळखता येत नाही.....माझ्याही सोबत असच होतं बहुतेक वेळा, मनाने विचार करण्याची जास्त सवय ना, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा भावनेच्या आहारी जाऊन विचार करायचा...आणि यामुळेच जे लोकं माझ्या आयुष्यात आहेत त्यांचा खरा चेहरा काय आहे दे दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करायचं...

तर सांगायचं तात्पर्य हे की काही दिवसांपूर्वी मला माझ्या चष्म्यातून अचानक सगळं पुसट दिसायला लागलं... मी नवऱ्याला बोलली आता चष्मा बदलायला पाहिजे, सगळं काही अस्पष्ट दिसते...त्याच उत्तर मला बुचकळ्यात टाकून गेलं, तो बोलला..."नैना, चष्मा बदलायची मला तरी गरज वाटत नाही, थोडासा पुसून बघ...कदाचीत सगळं स्वच्छ दिसायला लागेल...." आणि खरच कमालच झाली, चष्मा थोडा साफ केला तर सगळं काही नीट आणि स्पष्ट नजरेस पडलं.... त्याच्या ते एक वाक्य मात्र माझ्या मनावर खूप परिणाम करून गेलं...'टिपिकल अरेंन्ड मॅरेज' सारखं आमचं नातं...जेंव्हा पासून आम्ही सोबत आहोत अनेक मतभेद झालीत....खूप वेळा यामुळे झालीत की आम्ही एकमेकांना सगळं काही खुलेपणाने सांगितलं नाही... मला अस वाटायचं की मी याला खूप चांगलं ओळखते, त्यामुळे बहुतेक वेळा माझ्या अडचणी सांगितल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल हे मी स्वतःच गृहीत धरून बोलायचं टाळायची...

पण गेल्या काही दिवसांत माझ्या साठी त्याच्या ज्या भूमिका होत्या त्या मला अवाक करणाऱ्या होत्या, अनपेक्षितपणे माझ्या वाईट वेळेत त्याने इतकं काही केल माझ्यासाठी ज्याचा विचारही मी कधीच केली नव्हता....अर्थातच त्याच अस काळजी करणं माझ्यासाठी आश्चर्यकारक जरी असल तरी मला चांगलं वाटणार होतं... मी गंमतीने त्याला बोलली,
"अभय, तुझं हे रूप मी कधीच पाहिलं नव्हतं रे इतक्या वर्षात, मुखवटा लावून ठेवला होता का?"
त्याने तेवढ्याच संयमाने उत्तर दिलं...."कसं आहे ना नैना, मुखवटा या जगात प्रत्येक व्यक्तीच लावून ठेवतो, नुसतं ओळख करून देण्यासाठी आपला खरा चेहरा कोणीच दाखवत नाही...पण जेव्हा नात्यात समजून घेण्याची वेळ येते तेंव्हा तो मुखवटा आपोआप गळून पडतो...."

"पण मग हा मुखवटा आहे की खरा चेहरा हे कसं ओळखायचं.?" मी तेवढ्याच उत्सुकतेने वीचारलं....

"अगदी सोप्प आहे जेंव्हा आपण समोरच्या व्यक्तीला जीव लावतो काळजी करतो तेंव्हा तिकडूनही तसाच प्रतिसाद येतो...आणि जेंव्हा वाईट काळात आपल्याला गरज असते एका मानसिक समाधानाची, तेंव्हा आपला चिडचिडेपणा, आपला रुसवा फुगवा सगळं सहन करून घेतो, आणि आपण न काही मागता ही आपल्याला वेळ देतो, तेंव्हा ते त्याच खरं रूप असतं.... चांगल्या काळात तर सगळेच चांगले वागतात ग, पण साथ तोच देतो जो तुझ्या पडत्या काळातही तुझा राग सहन करूनही नातं टिकवतो...परिस्थिती बदलल्यावरही जो बदलत नाही त्याने मुखवटा धारण नाही केला हे समजावं...."

अभयचं उत्तर थोड्या बहोत प्रमाणात मला पटलं....प्रत्येक वेळी 'लोकांचं टेस्टिंग' करत बसायला आपल्याकडे वेळ नाही, मी जेव्हा अभयच्या 'चष्म्यातून' दुनिया पहिली तेंव्हा मला त्याचे सगळेच मत पटले असे नाही, आणि आम्ही दोघेही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर एकमत होईल असंही नाही, पण त्याने मला एक वेगळी आकलनशक्ती दिली लोकांना समजून घेण्याची....काय म्हणतात त्याला..त्याने मला एक वेगळं 'परसेप्शन' दिलं लोकांकडे पाहण्याचा....आपल्या आयुष्यात कितीतरी माणसं असतात जी आपलेपणाचा सोंग घेऊन आपल्या सोबत राहत असतात आणि आपण मात्र 'शत प्रतिशत' त्यांना देण्याचा प्रयत्न करतो...आपल्याला वाटतं की ही तर माझी जवळची व्यक्ती आहे, या व्यक्ती ला मी खूप चांगलं ओळखतो...पण खरंच अस घडत का? आपण आपल्या जवळच्या लोकांना ओळखतो का खूप चांगल्याप्रकारे?? माझ्या अनुभवावरून तरी मी 'नाही' हे उत्तर देईल....अभय बोलतो माणसं ही कांद्यासारखी असतात, आवरणावर आवरणं असणारी... जोपर्यंत तो व्यक्ती सगळ्यांत शेवटचं आवरण काढून बाजूला फेकत नाही तोपर्यंत आपण त्याच खर रूप पाहू शकत नाही...

जेंव्हा फक्त ओळख असते तेंव्हा आपण फक्त बाहेरचं आवरण पाहतो, जो की फक्त या समाजात वावरण्यासाठी त्या व्यक्तीने चढवलेला मुखवटा असतो, पण जस जस आपण त्या नात्यात रुजत जातो तस तस एक एक आवरण निघत जाते आणि त्या व्यक्तिचे एक एक पैलू आपल्याला दिसत जातात... आता हे पैलू काही आवडणारे असतात तर काही आपल्याला त्रासदायक असतात, आणि आपल्याला ते नातं, ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर आपण त्या त्रासदायक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, आणि त्याला काही कारण न देता त्याच्या आतल्या अवरणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो....आणि ज्याला आतल्या अवरणापर्यंत पोहोचायचं नसते तो मात्र कारणं देऊन तुम्हाला टाळतो...

अभय नेहमी मला बोलतो की मला माणसं ओळखता येत नाहीत...आता ते खरं वाटत मला, मला नाही ओळखता येत माणसं, कदाचित आपल्यापैकी बरेच लोकं नाही ओळखू शकत, कारण आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती एक मुखवटा लावून आपल्याला भेटते...कोणाचं मुखवटा उतरल्यावर त्याचे चांगले पैलू आपल्याला दिसतात तर काही मुखवटा लावून विश्वासाचा खेळ करून जातात...त्यामुळे जोपर्यंत आपण कोनाच्या आतल्या आवरणापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास करणं आणि त्याच्यावर अवलंबून राहणं चुकीचं आहे...शेवटी अभय बोलल्याप्रमाणे ज्याला नात्यात समजून घ्यायच असतं तो मुखवटा उतरवून तुमच्यासाठी झटतो...आणि ज्याला फक्त ओळख जपायची असते तो मात्र काहीतरी कारणं देऊन पळ काढतो..त्यामुळे या धूर्त दुनियेत कोणावरही अंधविश्वास ठेवण्याआधी कोण कशाप्रकारचा मुखवटा धारण करून बसलंय हे ओळखणं जिकरीचे ठरते.....
-------------------------------------------------
समाप्त.


इतर रसदार पर्याय