mayajaal - 23 books and stories free download online pdf in Marathi

मायाजाल-- २३

मायाजाल-- २३
प्रज्ञाने डाॅक्टरना विचारलं,
" सर! बाबांना हल्ली खूपच त्रास होतोय! आॅफिसचं काम करणं अशक्य झालंय! तुम्ही भारतात परत कधी येताय?"
"मी इकडे एका नवीन सर्जरी कोर्ससाठी असलो आहे. डोळ्यांच्या सर्जरीतले नवीन ट्रेंड शिकून घेण्यासाठी हा कोर्स आहे! अजून तीन महिन्यांचं ट्रेनिंग आहे! यासाठीच मी त्यांना लवकर आॅपरेशन करून घ्या; असं सांगत होतो!" डाॅक्टर तीन महिने येणार नाहीत हे ऐकून प्रज्ञा घाबरून म्हणाली,
"तीन महिने आॅपरेशन लांबवणं शक्य नाही. डोळ्यांसमोर इजा होण्याची शक्यता आहे. आता काय करायचं, सर?"
"तू असं कर! माझाच एक विद्यार्थी आहे! डाॅक्टर संदीप--गोरेगावला त्याचं स्वतःचं क्लिनिक आहे! फार निष्णात डाॅक्टर आहे! त्याच्याकडे त्यांना घेऊन जा; आणि तो काय म्हणतो ते बघ! जर आॅपरेशन लगेच करावं लागेल, असं म्हणाला; तर उशीर करू नका! त्याचा फोन नंबर आणि क्लिनिकचा पत्ता तुला मोबाइलवर पाठवून देतो!" डाॅक्टर म्हणाले.
त्याप्रमाणे प्रज्ञा अनिरूद्धना गोरेगावला घेऊन गेली. तिच्या मनात थोडी भीती होती. ती विचार करत होती,
"डाॅक्टरांचा स्टुडंट म्हणजे तरूण असणार! अनुभव कमी असणार! त्यांच्याकडून बाबांचं आॅपरेशन करून घ्यावं; की दुस-या अनुभवी डाॅक्टरांना दाखवावं?" पण नंतर तिने निदान ते काय म्हणतात, हे बघायचं ठरवलं.
क्लिनिकमध्ये गेल्यावर तिने पाहिलं; डाॅक्टर संदीप तरूण असूनही खूपच लोकप्रिय होते; क्लिनिकमध्ये खूप गर्दी होती. सरांनी डाॅ. संदीपना फोन करून अनिरुद्धविषयी सांगितलं होतं त्यामुळे त्यांनी त्यांना फार वेळ तिष्ठत ठेवलं नाही; लगेच केबिनमध्ये बोलावलं! आपण ज्या हाॅस्पिटलमध्ये शिकलो, तिथेच प्रज्ञा एम.डी. करतेय हे कळल्यावर त्यांनी केसमध्ये जास्त लक्ष घालणं साहजिक होतं. पण तिथले सगळेच पेशंट्स त्यांची प्रशंसा करत होते! प्रज्ञाच्या अंदाजाप्रमाणे डाॅक्टर प्रदीपने लवकरात लवकर आॅपरेशन करायचा सल्ला दिला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात आॅपरेशन झालं.
आॅपरेशन उत्तम झालं होतं. आठ दिवसांनी त्यांनी क्लिनिकवर व्हिजिटसाठी बोलावलं होतं. त्यावेळी ते प्रज्ञाशी त्यांची जुनी मैत्रीण असल्याप्रमाणे बोलत होते. नीनाताईच्या मनात विचार येऊ लागले,
" हा स्वभावाने किती चांगला आहे! शिवाय हुशार आणि देखणा! प्रज्ञाशी अगदी मैत्री असल्यासारखा बोलतोय! हा अविवाहित असेल का? पण कसं विचारणार? बरं दिसणार नाही!" त्यांच्या मनात उलटसुलट विचार चालू होते.
आजही क्लिनिकमध्ये खूप गर्दी होती; आणि अनिरुद्धना शेवटची अॅपाॅ‌इंटमेंट मिळाली होती.
"तुम्ही थोडा वेळ थांबा! मी सुद्धा अंधेरीलाच रहातो. तुमच्यापासून माझं घर बरंच दूर आहे, पण तुम्हाला ड्राॅप करून पुढे जाईन! काका माझे आजचे शेवटचे पेशंट आहेत! मी क्लिनिक बंद करून निघणारच आहे!" डाॅक्टर म्हणाले.
नीनाताई खुश झाल्या--- "आता गाडीतून जाताना गप्पा होतीलच ! चांगली संधी मिळाली!"
गाडीत संदीप प्रज्ञाला तिच्या मेडिकल करिअरविषयी प्रश्न विचारत होते! नीनाताईंनी संधी साधून विचारून घेतलं,
"तुम्हाला रोज घरी जायला एवढाच वेळ होतो का? घरी सगळ्यांना रोज खूप वाट बघावी लागत असेल नं? घरी कोण कोण आहे?"
" घरी कोणी असेल तर वाट बघेल नं! आई - बाबा पुण्याला रहातात. वहिनी नोकरी करते; तिच्या मुलांसाठी त्यांना तिकडेच रहावं लागतं! मी एकटाच आहे मुंबईत! इथे डाॅक्टर झालो! पुढचं उच्च शिक्षणही इथेच घेतलं! आणि इथेच स्थाईक झालो! आई पुण्याला शिफ्ट करायचा हट्ट नेहमीच करत असते! पण मला आता मुंबई आवडायला लागलीय! " संदीप प्रज्ञाकडे पहात म्हणाले.
नीनाताईंना वाटलं की संदीप हे सगळं सांगायची संधी शोधत होते.
घराजवळ उतरताना त्यांनी त्याला घरी यायचा आग्रह केला; पण
"आता खूप वेळ झालाय! कधीतरी नक्की येईन!" असं प्राॅमिस देऊन ते निघाले.
काही दिवस मधे गेले असतील--; त्या दिवशी रविवार होता. प्रज्ञा हाॅस्पिटलमध्ये गेली होती. बेल वाजली म्हणून नीनाताईंनी दरवाजा उघडला. दरवाजात डाॅक्टर संदीपना बघून त्यांची तारांबळ उडाली. सोफ्याचं कव्हर नीट करत त्यांनी त्यांना बसायला सांगितलं. अनिरुद्धही बाहेर येऊन बसले.
" तुमची उद्याची अॅपाइंटमेंट अाहे, पण मी आज संध्याकाळी पुण्याला चाललोय! दोन दिवसांनी येणार आहे! उद्याच्या अॅपाॅ‌इंटमेंट्स कॅन्सल केल्या आहेत! तुम्ही जवळ रहाता आणि मला घरही माहीत होतं; तुम्हाला काही प्राॅब्लेम तर नाही --- हे बघण्यासाठी आलो. नाहीतरी त्या दिवशी एकदा तुमच्याकडे येण्याचं प्राॅमिस केलं होतं!" डाॅक्टर म्हणाले.
"तुम्ही उत्तम आॅपरेशन केलं आहे! चष्मा लावायचीही गरज वाटत नाही! मला खरं म्हणजे हल्ली भिती वाटू लागली होती, की मी परत नीट पाहू शकेन की नाही? पण तुम्ही मला माझी दृष्टी परत दिली! अशा वेळी डाॅक्टर म्हणजे देव वाटतो." अनिरुद्ध मनापासून म्हणाले.
संदीप हसून म्हणाले,
"असं कोणी म्हणालं, की आम्हा डाॅक्टरना स्वतःचा अभिमान वाटतो! इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत असं वाटतं! पण माझी प्रॅक्टिस सुरू होण्यापूर्वीच एक घटना अशी घडली की माझे पाय जमिनीवर आले." अनिरुद्ध गोंधळून आपल्याकडे बघतायत, हे पाहून ते पुढे बोलू लागले,
"मी नुकताच एम. बी. बी. एस. झालो होतो. मेडिकलला शिकणा-या आम्हा मित्रांचा एक ग्रुप सहलीसाठी वस‌ईच्या किल्ल्यावर गेला होता. गाडीच्या ड्रायव्हरला संध्याकाळी परत पिक-अप साठी बोलावलं होतं. पावसाळी दिवस होते. त्यामुळे माणसं फारशी नव्हती. आम्ही खूप मजा केली. दुपारपर्यंत सगळं आलबेल होतं. कदाचित् थंड हवा आणि ओलसर वातावरणामुळे असेल, आमच्या एका मित्राला - नितेशला - दम्याचा अटॅक आला. प्रथम त्याला धाप लागली-- चालता येईना- तिथेच एका आडोशाला आम्ही त्याला बसवला. पण त्याची हळू हळू जास्तच बिघडू लागली. ट्रीटमेंट काय दिली पाहिजे, कोणती औषधे दिली पाहिजेत हे आम्हाला कळत होतं, पण औषधं मिळणार कशी? त्याला हाॅस्पिटलमध्ये न्यायची गरज भासू लागली पण हाॅस्पिटलपर्यंत नेणार कसं? नेटवर्क नसल्यामुळे ड्रायव्हरचा फोन लागत नव्हता. कसेबसे आम्ही त्याला रस्त्यापर्यंत घेऊन गेलो! " संदीप अनिरुद्ध काही विचारतील, या अपेक्षेने त्यांच्याकडे बघू लागला. अनिरुद्ध कुतुहलाने ऐकत होते. गोष्टीत रंगून गेल्यामुळे प्रश्नही विचारत नव्हते. संदीप पुढे बोलू लागले.
"नशीबाने आपल्या लहान मुलाला किल्यापर्यंत फिरवून आणायसाठी म्हणून एक रिक्षा ड्रायव्हर तिथे आला. त्याच्या रिक्षातून नितेशला हाॅस्पिटलमध्ये नेलं. आॅक्सिजन लावला गेला. औषध इंजेक्शन चालू झाली. काही तासांमध्ये त्याची तब्येत रूळावर येऊ लागली. त्यावेळी माझ्या मनात विचार आला; आम्हा डाॅक्टरांकडे ज्ञान असतं, पण उपचारांसाठी आवश्यक असणा-या गोष्टी उपलब्ध करून देणारी किती मोठी यंत्रणा -- किती माणसं आमच्या मदतीला असतात; याचा आम्ही कधी विचारच करत नाही! त्या दिवशी गोल्डन मेडल मिळवलेले डाॅक्टर्सही आमच्या ग्रुपमध्ये होते! पण जर तो रिक्षावाला, औषधं- हाॅस्पिटलमधल्या सोई -- उपचारांसाठी धावपळ करणारा स्टाफ हाताशी नसता तर आम्ही काय करू शकणार होतो? तेव्हापासून माझ्यातला अहंकार कमी झाला! जेव्हा एकदा पेशंट आभार मानतो, तेव्हा ज्यांच्यामुळे आम्ही हे करू शकलो, त्यांचे मनोमन आभार आम्ही मानतो का? एकटा माणूस कितीही बुद्धिमान असला तरीही इतरांसाठी काही करू शकत नाहीच पण इतरांच्या मदतीशिवाय तो स्वतःही जगू शकत नाही; हा जगाचा नियम आहे;"
" वाह! किती सुंदर विचार आहेत तुमचे! म्हणूनच तुम्ही उत्तम डाॅक्टर आहात!" अनिरुद्ध हसत म्हणाले.
डाॅक्टरांच्या फिलाॅसाॅफीने ते भारावून गेले होते. "संदीपच्या वागण्यात जो साधेपणा आहे, त्याचं कारण हेच असावं!" ते मनाशी म्हणत होते.
"अचानक् पुण्याला जायचं कसं ठरवलं?
"आईचा सकाळी फोन आला होता; तिनं बोलावलंय! गेलंच पाहिजे! सहसा मी सोमवारी आॅपरेशनसाठी तारीख देत नाही! फक्त उद्याच्या अॅपाॅ‌ईंटमेंट कॅन्सल कराव्या लागल्या! " घराच्या आत नजर टाकत तो पुढे म्हणाला,
" तुम्हाला त्रास होत नसला, तरी काही दिवस चष्मा अवश्य लावा! डोळ्यात जर धूळ किंवा इतर काही गेलं, तर इजा होईल! तुम्हाला प्रज्ञा सांगत असेलंच! --- ती कुठे बाहेर गेलीय का? " संदीपचे डोळे आल्यापासून प्रज्ञाला शोधत होते; ही गोष्ट नीनाताईंच्या नजरेतून सुटली नव्हती.
" तिला आज हाॅस्पिटलला जावं लागलं! संध्याकाळी येईल!" नीनाताई त्यांच्यासमोर काॅफी आणि बिस्किट्स ठेवत म्हणाल्या म्हणाल्या. संदीपच्या डोळ्यातील नाराजी बघून डाॅक्टर प्रज्ञासाठीच आले आहेत, याबद्दल त्यांची खात्री झाली होती.
" आज तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या--- खूप बरं वाटलं! " ते निघताना दोघांना म्हणाले.
"आता पुढच्या वेळी जेवायला या! घाईघाईत येऊ नका!" नीनाताई आपलेपणानं म्हणाल्या.
"हो! अगदी नक्की!" डाॅक्टर संदीपनी आमंत्रण मनापासून स्वीकारलं.

********** contd. --- part 24

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED