mayajaal - 22 books and stories free download online pdf in Marathi

मायाजाल - २२


मायाजाल २२
हर्षदने पाहिलेली सर्व स्वप्ने धुळीला मिळाली होती; पण प्रज्ञाला त्याच्या आणि इंद्रजीतच्या वागण्याची जी चीड आली होती ; ती योग्यच होती नाकारू शकत नव्हता.. आपण प्रज्ञाला गृहित धरलं होतं ---फक्त स्वतःचा विचार केला होता;! तिच्या काही आशा-आकांक्षा आकांक्षा असू शकतात, याचा विचार केला नव्हता; ही गोष्ट त्याला आता प्रकर्षाने जाणवत होती., आपण किती मोठी चूक केली; हे प्रज्ञाने लक्षात आणून दिल्यावर , त्याला आता स्वतःचीच लाज वाटत होती.
तारूण्यात आल्यापासून ज्या प्रज्ञावर प्रेम केलं, ती कायमची दुरावली होती. हे सत्य जरी त्याने स्वीकारलं होतं, तरीही तो मनाने उध्वस्त झाला होता. सवयीने सगळी कामं होत होती. पण त्याचं मन कशातच रमत नव्हतं.
"सर! आज तुमची प्रकृती बरी नाही का? एका दिवसात तुमच्यात किती बदल झालाय! रजा का नाही घेतली?"
त्याची सेक्रेटरी मृदुला त्याला दुस-या दिवशी विचारू लागली. नेहमी हसतमुख असणा-या हर्षदचा उतरलेला चेहरा पाहून तिला आश्चर्य वाटलं होतं. त्याच्या डोळ्यांमधलं तेज आज लुप्त झालं होतं.--- कपडेही नेहमीप्रमाणे टिपटाॅप नव्हते. त्याला असा अजागळ तिने कधीच पाहिला नव्हता.
"थोडं डोकं दुखतंय! थोड्या वेळात ठीक होईल!" हर्षद म्हणाला पण त्याच्या चेह-यावरची वेदना लपत नव्हती.
"सर! आजच्या मीटिंग कॅन्सल करू का?" तिने विचारले.
"नको! सगळं काम नेहमीप्रमाणे होईल! " हर्षद म्हणाला. " एकदा काम पेंडिंग ठेवलं; की फाइल्स साठत जातील! काम वेळेवर होऊ दे."
हर्षद यांत्रिकपणे काम करत होता. मृदुलाने दुपारी लंचच्या वेळी त्याला जबरदस्तीनं सँडविच खायला लावलं. त्याच्यासाठी काॅफी मागवली.
काही कारणास्तव तो मनाने पार खचून गेलेला आहे; हे तिच्या लक्षात आलं होतं. त्या दिवसानंतर मृदुला हर्षदकडे लक्ष देऊ लागली. घरून चांगले पदार्थ आणून त्याला ती आग्रह करून खायला लावत असे. लंचनंतर थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारत बसत असे. अाॅफिसच्या पिकनिक, सहका-यांचे सिनेमा-नाटकांचे वीक- एन्ड प्रोग्रॅम हर्षदला आग्रहाने अटेन्ड करायला लावत असे. त्याचं हसू पार लुप्त झालं होतं; ते परत आणण्यासाठी ती जमतील तेवढे प्रयत्न करत होती.
त्याची सेक्रेटरी म्हणून मृदुला त्या आॅफिसमध्ये आली तेव्हा प्रथमदर्शनीच तिला हर्षदचं उमदं व्यक्तिमत्त्व आवडलं होतं. हर्षदचं तिच्याशी वागणं सौजन्यपूर्ण होतं; पण तिच्याशी जास्त सलगी करण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही..... त्याच्या या स्बभावामुळे ती त्याच्याकडे अधिकच आकृष्ट झाली होती. त्याला विमनस्क अवस्थेत बघून तिला वाईट वाटत होतं-----
हर्षद तिचा बाॅस होता; त्यामुळे त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा तिने कधी प्रयत्न केला नाही; पण त्याला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे; हे मात्र नक्की होतं! तो स्वतः कधीतरी सांगेल याविषयी तिची खात्री होती; कारण हळू हळू हर्षदच्या नकळत त्याच्या वागण्यात तिच्याविषयी आपलेपणा दिसू लागला होता.
मृदुला आपल्याकडे विशेष लक्ष पुरवत आहे हे हर्षदला कळत होतं. तिच्यामुळेच आॅफिसची कामं व्यवस्थित होत होती अन्यथा अशा मनःस्थितीत त्याच्या कामात लहानशी चूक झाली असती; तरीही कंपनीला एखाद्या व्यवहारात मोठा तोटा होऊ शकला असता! त्याची नोकरी जाण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नव्हती.
मृदुला हे सर्व फक्त कर्तव्य म्हणून करत नव्हती हेसुद्धा तो जाणून होता. तिच्या डोळ्यातलं प्रेम त्याला दिसत होतं पण त्याचं मन त्याला हट्टाने सांगत होतं, "प्रज्ञा हेच तुझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. तिची जागा दुसरी कोणीही घेऊ शकणार नाही." त्यामुळे तो स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने मनाची कवाडं बंद करून घेतली होती पण मृदुलाने त्याच्यासाठी इतकं काही केलं होतं; की मैत्रीण म्हणून तिचं स्थान तो नाकारू शकत नव्हता. अनेक गोष्टीमध्ये तो तिला विश्वासात घेऊ लागला होता. पण त्याने प्रज्ञाबद्दल अजून तिला काहीही सांगितलं नव्हतं.
*******
काळ हे मनाच्या जखमांवरचं सर्वात मोठं औषध आहे. दिवस झपाट्याने पुढे सरकत होते. हर्षदचं दु:ख तो कोणाला सांगूही शकत नव्हता. प्रेमाची लढाई तो हरला होता.आता फक्त आईवडिलांसाठी आणि भावंडांसाठी जगायचं म्हणून जगत होता. तो आता वर्तमानात जगायला शिकला होता.तो घराकडे आई वडिलांकडे व्यवस्थित लक्ष देत होता. प्रज्ञाला विसरावंच लागेल; हे सत्य त्यानं स्वीकारलं होतं. पण घरून जेव्हा लग्नाचा विषय काढला जाई; तेव्हा मात्र तो काही ना काही कारण सांगून टाळत होता. आपला मुलगा लग्नाचा विषय काढला, की गंभीर होतो; आणि विषय बदलतो, हे माईंच्या लक्षात आलं होतं पण कारण समजत नव्हतं. रजेच्या दिवशीही तो फारसा घरातून बाहेर पडत नसे. मित्रांसोबत रहाणं त्यानं कमी केलं होतं.
एक गोष्ट चांगली झाली होती. अशी मनःस्थिती --- आणि हातात भरपूर पैसे---- हर्षदला अनेक व्यसनांच्या गर्तेत पडायला वेळ लागला नसता. पण त्याने परत वाईट संगत धरली नव्हती, याचं श्रेय बरंचसं मृदुलाकडे जात होतं! त्याच्या या परीक्षेच्या काळात तिने त्याला एकटं पडू दिलं नव्हतं.
बघता बघता दोन वर्षे निघून गेली. हर्षदची मनःस्थिती आता बरीचशी रुळावर आली होती. मधल्या काळात त्याने मनाला विचार करायला उसंत मिळू नये, म्हणून स्वतःला आॅफिसच्या कामात बुडवून घेतलं होतं. त्याचा परिणाम म्हणून कंपनीतील त्याचा हुद्दा वाढला होता. आर्थिक स्थितीही उंचावली होती. त्याला मदत मिळाली होती, ती मृदुलाची! हर्षदच्या अस्वस्थ मनाचा परिणाम कामावर होणार नाही, याकडे तिने काटेकोरपणे लक्ष दिलं होतं. हर्षदला सावलीसारखी साथ दिली होती.
********
प्रज्ञाचा एम.डी.चा तिचा अभ्यास चालू होता. त्याचबरोबर ती त्या हाॅस्पिटलमध्ये पार्ट- टाइम जाॅब करत होती. अभ्यासाबरोबर अनुभव मिळत होता! पण तिच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, की सतत कामात असल्यामुळे विचार करायला वेळ मिळत नव्हता, तिची चौकशी करायला हर्षद नेहमी आवर्जून जात होता. प्रज्ञाने तिची बाजू आडपडदा न ठेवता स्वच्छ शब्दांत सागितली होती, त्यामुळे आता प्रज्ञा आपल्याला जोडीदार म्हणून स्वीकारेल ही अपेक्षा त्याच्या मनात जराही नव्हती. फक्त तिच्याशी मैत्री कायम रहावी ही माफक अपेक्षा होती. इंद्रजीतविषयी मात्र काहीही बातमी नव्हती. लंडनला गेल्यापासून त्याने एकदाही कोणाशी संपर्क केला नव्हता. जणू इथली नाती इथेच ठेवून त्याने तिकडे नवीन जीवन जगायचं ठरवलं होतं. प्रज्ञा नको म्हणाली होती, तरीही त्याला फोन करण्याचा हर्षदने प्रयत्न केला होता; दोघांनीही प्रज्ञावर अन्याय केला; ही मनाची टोचणी त्याला इंद्रजीतला सांगायची होती! "जमल्यास परत भारतात येऊन प्रज्ञाला समजावून तिचा राग घालवण्याचा प्रयत्न कर!" अशी विनंती करायची होती. पण इंद्रजीतने फोन " राँग नंबर" म्हणून बंद केला होता. त्यानंतर हर्षदने परत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता!
नीनाताई मात्र अस्वस्थ होत्या. मुलगी कितीही शिकली तरी तिचं योग्य वयात लग्न व्हावं; ही त्यांची इच्छा गैर नव्हती. इंद्रजीत परत येईल; ही अपेक्षा ठेवणं चुकीचं होतं; कारण गेल्यापासून त्याने संबंध पूर्णपणे तोडून टाकले होते. पण प्रज्ञाला हाॅस्पिटल आणि पेशन्टस् यांच्यापलीकडे काहीच दिसत नव्हतं.. तिच्याशी ह्या विषयावर बोलायला त्यांना भीती वाटत होती. हर्षद निघून गेल्यावर अनेक दिवस प्रज्ञा डिप्रेशनमध्ये होती. तिच्याकडे लग्नाचा विषय काढला, तर मनाच्या जखमेवर धरलेली खपली निघेल की काय--- या विचाराने प्रज्ञाला काही विचारायला त्या घाबरत होत्या...
अनिरुद्धना मोतीबिंदूचा त्रास होऊ लागला होता. आॅफिसचं काम करणं कठीण झालं होतं. शिवाय आॅफिसला ट्रेनने जावं लागत होतं. त्यांना घरी यायला थोडा जरी उशीर झाला; तरी नीनाताईंचे प्राण कंठाशी येत होते! प्रज्ञाने हाॅस्पिटलच्या निष्णात डाॅक्टरचा सल्ला घेतला होता, त्यांनी लगेच आॅपरेशन करायचा सल्ला दिला होता. पण बाबा रजेचं कारण देत आॅपरेशन टाळत होते.
पण त्यांना फार दिवस आॅपरेशन पुढे ढकलता आलं नाही. त्यांना आॅफिसचं आकडेमोडीचं काम करताना खूपच त्रास होऊ लागला. नेमके त्याचवेळी त्यांचे डोळ्यांचे डाॅक्टर परदेशी गेले होते. हाॅस्पिटलकडून त्यांचा फोन नंबर घेऊन प्रज्ञाने त्यांना फोन लावला; पण अजून तीन महिने ते भारतात परतू शकत नव्हते. एवढे दिवस आॅरेशन लांबवणं धोक्याचं ठरलं असतं!
********** contd ----- part २३.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED