Mayajaal - 21 books and stories free download online pdf in Marathi

मायाजाल - २१

मायाजाल २१

प्रज्ञाने हर्षदच्या प्रपोजलचा स्वीकार केला नाही. तिच्या बोलण्यातला करारीपणा हर्षदला जाणवला होता. तिला समजावून सांगणं आपल्या आवाक्यातील नाही; हे हर्षदच्या लक्षात आलं होतं. आता हर्षद वेगळ्या दिशेने विचार करत होता. "प्रज्ञाचा अजूनही इंद्रजीतवर विश्वास आहे. तो विश्वास किती अनाठाई आहे; हे तिला कळलं पाहिजे! त्यासाठी त्याने लग्न का मोडलं; याचं खरं कारण आता हिला सांगावंच लागेल!"
तो प्रज्ञाला सांगू लागला,
" सहवासाने मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला वेळ लागणार नाही. फक्त तू हो म्हण! मी तुला इतकं सुखात ठेवेन की तू माझ्यावर प्रेम करू लगशील! खरं सांगायचं तर; माझं तुझ्यावरचं निःसीम प्रेम बघूनच जीत आपल्या मार्गातून दूर झालाय." हर्षद तिला समजावण्याच्या भरात तोंडून निघून गेलं; असा अभिनय करत पुढे म्हणाला,
"तुला हे सांगायचं नव्हतं; पण--- हे खरं आहे!"
प्रज्ञाने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
"तू खरं बोलतोयस हर्षद? यासाठी जीत असा तडकाफडकी निघून गेला? तुझ्या मैत्रीसाठी त्याने माझं प्रेम लाथाडलं? यापूर्वी तू वेगळंच काहीतरी बोलत होतास. माझा विश्वास बसत नाही! मला काहीतरी खोटं सांगू नकोस!" तिने अविश्वासाने त्याच्याकडे बघत विचारलं. सत्य शोधून काढण्याची हीच वेळ आहे हे तिने ओळखलं होतं; आणि त्यासाठी हर्षदला बोलतं करण्याची गरज होती. तिचा अंदाज खरा ठरला.प्रज्ञा इंद्रजीतची इच्छा टाळणार नाही या खात्रीने हर्षदने सगळं सांगायला सुरूवात केली,
" मी खरं बोलतोय प्रज्ञा! तुझं लग्न ठरलं--- तुझ्याशिवाय जगण्यात स्वारस्य नव्हतं, म्हणून मी आत्महत्या करायचा प्रयत्न केला; हे जीतला कळलं! मी तुझ्यावर प्रेम करतो; हेसुद्धा ओघानं माहीत झालं. त्यानंतर त्याने कायमचं लंडनला जायचं ठरवलं; त्यावेळी त्याला त्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा मी खूप प्रयत्न केला पण त्याचा निश्चय पक्का होता! मी घरी आल्यावर मला कळलं, की तो लंडनला निघून गेला! खूप मोठा त्याग केला त्याने! त्याच्या जाण्याला नकळत का होईना; मी कारणीभूत ठरलो होतो; हे तुला कळलं तर तुला माझा राग येईल- तू माझ्याशी बोलणं सोडून देशील अशी भीती मला वाटत होती; म्हणून मी तुला वेगळ्याच गोष्टी सांगत होतो. पण खरं सांगतो-- मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता."
जरा थांबून अचानक् सत्य समोर आल्यामुळे प्रज्ञाची काय प्रतिक्रिया होतेय; हे अजमावत तो पुढे बोलू लागला,
"तुमचं लग्न मोडावं; अशी माझी इच्छा नव्हती. जीतने हे सगळं तुला न सांगण्याची शपथ घातली होती! मी तुला सगळं खरं सांगितलंय; जीतने आपल्यासाठी इतका मोठा त्याग केलाय!" जीतच्या इच्छेविरूद्ध प्रज्ञा जाणार नाही या खात्रीने हर्षदने तिच्याकडे पाहिलं.
प्रज्ञा मनाशी म्हणत होती,
"आमचं लग्न मोडावं म्हणून इंद्रजीतला याने किती त्रास दिला; हे मला माहीत नाही या भ्रमात हा आहे; म्हणून हे सगळं बोलतोय!"
प्रज्ञाच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या होत्या. पण जे सत्य समोर आलं ते भयानक होतं ; हर्षदचं तिच्यावर प्रेम आहे; आहे; हे कळल्यावर जीतने परस्पर निर्णय घेऊन टाकला होता. तिला काही विचारण्याचीही त्याला गरज वाटली नव्हती. जणू ती एखादी बाहुली होती. मित्राला आवडली; म्हणून दानशूरपणा दाखवत देऊन टाकली होती!
तिने ज्याच्यावर प्रेम केलं; त्यानेच तिच्या अस्तित्वाचा अपमान केला होता. पण मनात संताप अनावर होऊनही तिने स्वतःला सावरलं. तिचा चेहरा निर्विकार होता. आज हर्षदला न दुखवता; पण परखडपणे समजावणं जास्त गरजेचं होतं. त्याने निराशेपोटी काही चुकीचं पाऊल उचललं असतं तर सगळ्यांनाच नसता मनःस्ताप झाला असता. तिला या प्रकरणात जास्त गुंतागुंत नको होती; फक्त हर्षदला त्याची चूक दाखवून देऊन, त्याची एकतर्फी प्रेमाची नशा उतरवणं आवश्यक होतं.
तिने शांत स्वरात त्याला विचारलं,
"हर्षद! तुम्ही दोघेही स्वतःला माझे मित्र म्हणवता! माझ्या आयुष्याशी निगडीत असलेल्या या महत्वाच्या गोष्टी परस्पर ठरवताना मी सुद्धा माणूस आहे याचा थोडा तरी विचार तुमच्या मनात आला? तू स्वतःच्या भावना गोंजारत होतास, आणि मानव मित्रासाठी त्याग करून महानश्र बनू पहात होता; पण तुम्ही दोघांनी फक्त तुमच्या नाही; तर माझ्याही आयुष्याचा निर्णय मला न विचारता घेतला. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?" हे बोलताना तिचा स्वर शांत होता; पण तिचा रागाने लालबुंद झालेला चेहरा पाहिला, आणि हर्षदची नजर खाली गेली.
प्रज्ञाची प्रतिक्रिया अशी असेल अशी त्याने कल्पनाही केली नव्हती. आपण कधीच प्रज्ञाच्या मनाचा विचार केला नाही; फक्त ती आवडते --- आणि तिला कसं मिळवता येईल या पलिकडे आपण कधी विचारच केला नाही ही वस्तुस्थिती लक्षात आल्यावर तिला काय उत्तर द्यावं, हे त्याला सुचेना; त्याची मान आपसूकच खाली झुकली. प्रज्ञा बोलत होती--- तिचे शब्दाचे फटकारे त्याच्या कानावर पडत होते, आणि डोकं सुन्न होत होतं. तिने विचारलेल्या प्रश्नांना त्याच्याकडे उत्तरं नव्हती.
" माणसाने इतकी प्रगती केली पण स्त्रीविषयीच्या त्याच्या कल्पना अजूनही रानटी---- सभ्य भाषेत बोलायचं तर पुराणकाळातील आहेत असं म्हणतात ते खोटं नाही. माझं आणि जीतचं एकमेकांवर प्रेम होतं हे माहीत असतानाही तुझ्यासारख्या सुशिक्षित मुलाने असं वागावं--- तू आत्महत्त्येचा प्रयत्न करून इंद्रजीतची सहानुभूति मिळवावी, ही खेदाची गोष्ट आहे. शिक्षणाने तुला स्वभिमान नाही शिकवला? अशा प्रकारे मानसिक दबाव आणून जरी तू मला मिळवण्यात यशस्वी झालास तरी आपण सुखी होऊ; असं वाटतं तुला? प्रेम असं जबरदस्तीने मिळवता येतं?"
प्रज्ञाने बोलणं चालू ठेवलं. हर्षद तिचं बोलणं निरुत्तर झाल्यामुळे खाली मान घालून ऐकत होता. आपल्या बोलण्याचा योग्य परिणाम त्याच्यावर होतोय हे प्रज्ञाच्या लक्षात आलं होतं.
"शक्तीच्या आणि बुद्धीच्या बळावर स्त्रीला जिंकणं-- ही कल्पना इतिहासजमा झाली, हर्षद! आजच्या युगाने आपला जोडीदार निवडण्याचा हक्क स्त्रीलाही दिलाय! तू अजूनही कुठल्या जमान्यात वावरतोयस?"
हर्षदचा अंतरात्मा त्याला दूषणे देत होता. आपण किती मोठी चूक केली हे त्याला कळत होतं. " मी कधी प्रज्ञाच्या मनाचा विचार केलाच नाही! इतका स्वार्थी मी कसा झालो? " त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली.
तो प्रज्ञाची माफी मागू लागला,
"मला क्षमा कर, प्रज्ञा! मी चुकलो! मला माफ कर! तू म्हणतेयस ते खरं आहे! मी तुझ्या भावनांचाही विचार करायला हवा होता! खरं म्हणजे तुझ्या नकाराने मी खूप दुःखी झालोय माझी अनेक वर्ष पाहिलेली सगळी स्वप्नं आज धुळीला मिळाली आहेत. पण तुझं म्हणणंही मला पटतंय! मी यापुढे तुझ्या मार्गात येणार नाही. तुला हवं असेल तर मी जीतशी बोलून त्याला इथे बोलावून घेतो. माझ्या चुकांचं परिमार्जन करण्याचा हाच एक मार्ग आहे." हर्षद मनापासून बोलत होता. त्याला प्रज्ञाचं म्हणणं पटलं होतं. स्वतःच्या कृत्यांची त्याला आता लाज वाटत होती.
"नको! त्याचा निर्णय त्यानं घेतलाय! तुझ्यापेक्षाही त्यानेच माझ्यावर जास्त अन्याय केलाय! मी माझं जीवन त्याला अर्पण केलं होतं; पण त्याने माझ्या प्रेमाची किंमत ठेवली नाही! त्याला माझ्या आयुष्यात आता स्थान नाही!
"पण माझ्यामुळे तुमच्यामध्ये दुरावा आला; ही गोष्ट माझ्या मनातून कधीच जाणार नाही! !" हर्षद म्हणाला.
"मी आणि इंद्रजीत तुझ्यामुळे वेगळे झालोय; हा गैरसमज मनातून काढून टाक! उलट त्याच्या दृष्टीने माझी किंमत हीच असेल; तर झालं ते बरं झालं असंच म्हणावं लागेल कारण, काही ना काही कारणाने, आज ना उद्या आमच्यामध्ये वितुष्ट येणारच होतं! तू आता तुझ्या आयुष्याचा विचार कर! एखादी चांगली मुलगी बघून लग्न कर आणि आनंदाने आयुष्य जग! तुझा संसार बघण्याची आई -बाबांची इच्छा पूर्ण कर! " प्रज्ञा हर्षदला समजावत होती. आपल्यामुळे त्याचं आयुष्य बरबाद व्हावं, अशी तिची मुळीच इच्छा नव्हती. शेवटी चुकला असला, तरी तो तिचा मित्र होता. त्याचा पश्चात्ताप मनापासून होता; हे तिला कळत होतं!
"ते शक्य नाही! माझी जोडीदार म्हणून तुझ्याशिवाय मी कोणाची कल्पनाही करू शकत नाही! मी अनेक चुका केल्या असतील; पण प्रेम फक्त तुझ्यावर केलं! माझ्या हृदयातली तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही! मी वचन देतो; की माझ्या प्रेमाचा यापुढे तुझ्यासमोर मी कधीही उच्चार करणार नाही; पण कोणाशी लग्न करणं मात्र मला शक्य नाही!" हर्षद निश्चयी स्वरात म्हणाला.
"तू आज जरी असं म्हणालास; तरी आयुष्याच्या वळणावर तुला नक्कीच कोणीतरी अशी मुलगी भेटेल; की तू मनापासून तिच्यावर प्रेम करशील! मात्र त्यावेळी सत्य नाकारू नकोस! जीवन पुढे जात असतं! एका जागी थांबत नाही! माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्याबरोबर आहेत."
"हेच तुझ्या बाबतीतही खरं आहे; नाही का? तूसुद्धा तुझ्या आयुष्याचा विचार करायला हवा! " हर्षद म्हणाला.
" जो एखाद्या ध्येयाने प्रेरित झालेला असतो; त्याचं आयुष्य कधी थांबत नाही! मी माझं लक्ष अभ्यासावर केंद्रित करणार आहे. डाॅक्टर होऊन लोकांची सेवा करणंं; हे माझं ध्येय आहे. बाकी सगळ्या गोष्टी काळाच्या अोघात माझं नशीबच ठरवेल." प्रज्ञा हसत म्हणाली. तिच्या अपेक्षेपेक्षा खूप लवकर ती हर्षदला तिची बाजू समजावून देण्यात यशस्वी झाली होती. हर्षदने त्यांचं लग्न मोडण्याकरिता केलेल्या काळ्या कृत्यांचा पाढा वाचून तिला मेलेल्याला अजून मारायचं नव्हतं. त्यामुळे तो उल्लेख तिने टाळला होता.
"काळोख पडलाय! आपण आता निघूया! उद्यापासून नव्या आयुष्याची सुरुवात कर! मला माझ्या मित्राला खूप मोठा झालेला बघायचा आहे!" प्रज्ञा निघण्यासाठी पर्स उचलत म्हणाली.
एव्हाना दिवस मावळला होता. बागेत काळोखाचं साम्राज्य चालू झालं होतं. पण प्रज्ञाला आज सत्याचा प्रकाश दिसला होता! मित्रासाठी इंद्रजीतने तिच्या प्रेमाचा अपमान केला होता; हे समोर आलेलं सत्य कितीही कठोर असलं तरी आता प्रज्ञाच्या मनातला गोंधळ संपला होता. "माझं काय चुकलं असेल?" या प्रश्नाचा भुंगा अनेक दिवस तिचं मन कुरतडत होता. आज तिला कळलं होतं; की तिची काहीही चूक नसताना, हर्षदच्या मैत्रीखातर इंद्रजीतने एवढी मोठी शिक्षा तिला दिली होती. मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज तिला मिळाली होती. आता ती इंद्रजीतच्या आठवणींनी झुरणार नव्हती. शरीराने तो दूर गेलाच होता; आज तिच्या मनातूनही तो हद्दपार झाला होता.
********* contd ... part 22.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED